twitter
rss

संकटावर मात करत पिता-पुत्रांची "स्वप्नील'भरारी

- - सकाळ वृत्तसेवा


मालेगाव - संकटे कितीही येवोत, नाउमेद न होता त्यातून मार्ग काढत विजयाचे लक्ष्य ठेवून वाटचाल कशी करायची, हे शिकावे ते नाशिक जिल्ह्यातील अरुण पवार व वैभव पवार या पिता-पुत्रांकडून. अनेक वर्षांच्या पोल्ट्री उद्योगात प्रत्येक संकटाने त्यांच्या क्षमतेची परीक्षा पाहिली. मात्र, हिंमत, चिकाटी, अन्य पूरक व्यवसायाचा आधार, व्यावसायिक सलोखा जपणे, मेहनत आदी गुणांच्या आधारावर "स्वप्नील ऍग्रो ऍण्ड पोल्ट्री‘ कंपनी स्थापन केली. त्याची उलाढाल सुमारे 25 कोटींच्या घरात पोचवण्यापर्यंत त्यांनी मजल मारली आहे.

देवळा व चांदवड या दुष्काळी तालुक्‍यांच्या सीमेलगत वडाळागावातील बी.एस्सी., बी.एड. झालेले अरुण पवार शिक्षकीसेवेत कार्यरत होते. त्यांनी पोल्ट्री व्यवसाय सुरू केला तो एक हजार पक्ष्यांपासून. भांडवलाची स्थिती बिकट असताना श्री. पवार नेटाने या उद्योगात उतरले. पुढे शिक्षक व शेतकरी अशा दोन्ही आघाड्या एकावेळी सांभाळणे शक्‍य न झाल्याने नोकरीचा राजीनामा देत ते पूर्णवेळ पोल्ट्री उत्पादक झाले. अर्थात, या वेळचा प्रवास सोपा नव्हता. मुंबईच्या एका व्यापायाने पिल्ले खरेदी केली आणि मालासह पोबारा केला. दरम्यानच्या काळात पोल्ट्रीला जोड म्हणून सात एकर क्षेत्रावर भगव्या डाळिंबाची लागवड केली. पुढे ही संपूर्ण डाळिंब शेती तेल्याच्या कचाट्यात सापडली अन्‌ संपूर्ण बाग काढून टाकावी लागली. त्यानंतर वाइन द्राक्षाची लागवड केली व पुढील वर्षात वाइन उद्योगाचेही तीन तेरा वाजले. या काळात पोल्ट्री व्यवसाय हळूहळू रुळत चालला होता. या व्यवसायातून घरप्रपंचाला आधार मिळण्याइतके उत्पन्न मिळत होते. मात्र, लागोपाठ दोन वर्षांच्या अंतराने "बर्ड फ्लू‘च्या साथीच्या तडाख्याने पवार यांना झोडपून काढले. या काळात पावणेदोन लाख पक्ष्यांचे नुकसान झाले. जोडव्यवसाय म्हणून त्यांनी जेसीबी मशिन घेतले. मात्र, उत्पन्नापेक्षा उधारीच अधिक झाल्याने हा व्यवसायही बंद करावा लागला.


यानंतर वैभव पवार यांचे या व्यवसायात आगमन झाले. कृषी पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेत वैभवने कुक्कुटपालन हा विषय अधिक तन्मयतेने समजून घेतला. पॅंरेट्‌स पक्षी (बीडर) फार्म सुरू करण्याची कल्पना सुचली आणि ती त्यांनी प्रत्यक्षात आणली. बीडर फार्मचे पक्षी याच उद्योगातील एका आघाडीच्या कंपनीकडून घेतले जातात. त्यापासून अंडी व पक्षी तयार केले जातात. व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळावी म्हणून वैभवने एमबीए अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. व्यवसायातील सखोल बारकावे, बाजारातील उलथापालथ समजावून घेतली. राज्याबाहेर जाऊन अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांतील लोकांच्या भेटी घेतल्या. शिक्षण, अनुभव, नवीन तंत्रज्ञान आणि मेहनतीच्या जोरावर विविध ठिकाणी व्यवसायाच्या जागी जाऊन पाहणी केली. अनावश्‍यक खर्चावर निर्बंध घातले तर उत्पादन खर्चात आमूलाग्र बदल होतो, हे वैभवला समजले. व्यापाऱ्यांकडून माल खरेदी करण्यापेक्षा स्वत:च अडतदार होऊन थेट शेतकऱ्यांकडून मका खरेदी करण्यास सुरवात केली. वजनकाट्याचा व्यवसाय सुरू केला. वाया जाणाऱ्या घटकांवर नियंत्रण, खेळत्या भांडवलाची तजवीज, पक्ष्यांना पाण्यासाठी निपल सिस्टिम, खाद्य देण्यासाठी स्वयंचलित पद्धतीचा वापर केला. जिद्द, चिकाटी, नवनवीन तंत्रज्ञानाचा सतत अभ्यास आणि मेहनतीच्या जोरावर वैभवने आपला पोल्ट्री व्यवसाय एका नव्या उंचीवर नेला आहे.