twitter
rss

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨

📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣1⃣7⃣

*👨🏻‍🏫 ई-लर्निंगसाठी अंगठी मोडणार्‍या शिक्षकाचा अंगठ्या देऊन सत्कार,*

*_मराठवाडा साहित्य संमेलनाचे ठरले आकर्षण_*

Monday, 25 Dec,2017

अंबाजोगाई : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना, तेही जिल्हा परिषदेतील शाळेत ई-लर्निंगची सुविधा मिळाली पाहिजे, या उद्देशाने स्वत:ची अंगठी मोडून व भविष्य निर्वाह निधीची रक्कम कर्ज स्वरूपात घेऊन शाळा ई-लर्निंग करणार्‍या देठेवाडी येथील शिक्षक रवींद्र गायकवाड यांचा सत्कार २ अंगठ्या देऊन करण्यात आला. हा विशेष सत्कार हे या संमेलनाचे आकर्षण ठरले. वडवणी तालुक्यातील देठेवाडी ही दोन शिक्षकांची शाळा. रवींद्र गायकवाड हे शाळेचे मुख्याध्यापक ध्येयवेडे शिक्षक आहेत. ऊसतोड कामगारांच्या मुलांची ही शाळा. या शाळेतील विद्यार्थ्यांना गरिबीमुळे व शासनाच्या निधीअभावी ई-लर्निंगचे शिक्षण व टॅब कसे मिळणार? ही समस्या गायकवाड गुरुजींना भेडसावू लागली.
त्यांनी मागचा पुढचा विचार न करता स्वत:च्या लग्नात सासरवाडीकडून मिळालेली अंगठी मोडली. या अंगठीतूनही ई-लर्निंगचा खर्च निघेना म्हणून त्यांनी भविष्य निर्वाह निधीची ५० हजारांची रक्कम कर्जरूपी उचलली व या माध्यमातून शाळा ई-लर्निंग केली. प्रत्येक विद्यार्थ्यांना टॅब दिले. इतकेच नाही तर देठेवाडीची शाळा मुख्य रस्त्यापासून पाच किलोमीटर अंतरावर दूर होती.

या शाळेला जायला डोंगरदर्‍याचा रस्ता. गायकवाड गुरुजी शाळेत जाता-येता रस्त्यावरील दगड उचलून दूर करण्याचे काम करीत. या ध्येयवेड्या शिक्षकाची कहाणी जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख यांच्यासमोर आली आणि त्यांनी आजच्या साहित्य संमेलनात रवींद्र गायकवाड यांचा सपत्नीक भरपेहराव आहेर करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला. एक अंगठी विद्यार्थ्यांसाठी मोडणार्‍या या गुरुजींना यावेळी दोन अंगठ्या भेट देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

या विशेष सत्काराने उपस्थित सर्वच पाहुण्यांनी गायकवाड गुरुजींच्या कार्याचा गौरव सातत्याने आपल्या भाषणातून केला.

📚📕📗📘📙📔📒📚

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨

📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣1⃣6⃣

*जिद्द आणि मेहनत... मुंबईच्या तरुणाला थेट इस्रोत नोकरी!*

*_प्रखर इच्छाशक्ती आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर जगात काहीच अश्यक्य नाही, याचंच उदाहरण म्हणजे मुंबईच्या पवई भागातील फिल्टरपाडा झोपडपट्टीत राहणारा प्रथमेश हिरवे._*

By: वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई .
Tuesday, 5 December
      
मुंबई : प्रखर इच्छाशक्ती आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर जगात काहीच अश्यक्य नाही, याचंच उदाहरण म्हणजे मुंबईच्या पवई भागातील फिल्टरपाडा झोपडपट्टीत राहणारा प्रथमेश हिरवे. या तरुणाने दहा बाय दहाच्या खोलीत रात्रंदिवस अभ्यास करुन थेट इस्रोमध्ये वैज्ञानिक म्हणून नोकरी मिळवली आहे

प्रथमेशने पहिले ते दहावीपर्यंतचं शिक्षण अगदी साध्या मराठी माध्यमाच्या शाळेत केलं. त्यांनतर कॉलेजमध्ये प्रवेशाची वेळ आली त्यावेळी त्याने आपली आप्टिट्यूड टेस्ट दिली आणि त्यात त्याला कला शाखेत प्रवेश घेण्याचं मार्गदर्शन तज्ज्ञांकडून देण्यात आलं. मात्र, आपल्याला इंजिनिअरींग करायचं असा प्रथमेशनं आपल्या आई-वडिलांना सांगितलं.

आपली जिद्द कायम ठेवत प्रथमेशनं इंजिनिअरींगचं शिक्षणही पूर्ण केलं. त्यानंतर त्याने टाटा, एल अँड टी या सारख्या नामांकित कंपनीमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून कामही केलं.पण त्यावर समाधान न मानता लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसोबत इस्रोच्या प्रवेश परीक्षेचा अभ्यासही प्रथमेशने सुरु ठेवला.
मे महिन्यात जेंव्हा 16000 विद्यार्थ्यांमधून प्रथमेशची निवड इस्रोमध्ये झाली तेव्हा त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. जे स्वप्न प्रथमेशनं पाहिलं होतं ते त्यानं सत्यात आणलं होतं. प्रथमेश हा मुंबईतून पहिला वैज्ञानिक आहे जो इस्रोमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअर म्हणून रुजू होणार आहे.

📚📕📗📘📙📔📒📚

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

यापूर्वीचे भाग वाचण्यासाठी.......

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨

📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣1⃣4⃣

_जागतिक एड्स दिन विशेष_

*HIV वर मात करणाऱ्या रत्ना यांना थेट स्वित्झर्लंडचं निमंत्रण*

_साभार - अभिजीत कांबळे, BBC News Marathi._

लग्नानंतर काही वर्षातच नवऱ्याचा HIVने मृत्यू झाला. त्यानंतर 11 महिन्यांच्या पोटच्या गोळ्यानं दम तोडला. या आघातामुळे मग त्यांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला. पण नशीबात काही औरच लिहिलं होतं.

आज त्यांनी स्वित्झर्लंडमध्ये एका आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात हजेरी लावली आणि सर्वांना अचंबित केलं. ही कहाणी आहे रत्ना जाधव यांची.

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातलं टाकळी खंडेश्वरी नावाचं एक गाव. इथल्या रत्ना जाधव यांचं वयाच्या 15व्या वर्षीच एका वाहनचालकाशी लग्न झालं.

आपल्या नवऱ्यासोबत त्यांनी पनवेलला संसार थाटला. पण लग्न होऊन दीड वर्ष झालं नाही, तोच त्यांचे पती सारखे आजारी पडू लागले. त्याचवेळी रत्ना गरोदर राहिल्या.

नवव्या महिन्यात रत्ना बाळंतपणासाठी माहेरी आल्या असताना तिकडं पनवेलमध्ये नवऱ्याची तब्येत आणखी खालावू लागली. दरम्यान रत्ना यांना मुलगा झाला.

मुलगा काही आठवड्यांचा असतानाच रत्ना यांची सासू त्यांच्याच्याकडे आली आणि रत्ना यांना घाईघाईनं पनवेलला घेऊन गेली.

पनवेलला पोहोचल्यावर रत्ना यांना धक्काच बसला. नवऱ्याच्या आजारपणामुळे केलेल्या तपासणीत त्याला HIV असल्याचं उघड झालं होतं.

रत्ना हादरूनच गेल्या. आता त्यांचीही HIV चाचणी करावी लागणार होती.

रत्ना यांची मुंबईत तपासणी झाली आणि दुर्दैवानं त्यांची भीती खरी ठरली. रत्नालाही नवऱ्यापासून HIVचं संक्रमण झालं होतं. तिथून सुरू झाला एक अत्यंत वेदनादायी आणि खडतर प्रवास.

रत्ना यांच्याच तोंडून ऐकायचं तर, "आम्हा नवरा-बायकोला HIV असल्याचं कळल्यावर पहिला धक्का बसला तो पनवेलमध्ये. आम्ही ज्या सोसायटीत राहत होतो ती सोसायटी सोडावी लागली. आमच्या आजाराबद्दल कळल्यानंतर काही लोकांनी आम्हाच्या तिथं राहण्याला आक्षेप घेतला."

"मग आम्ही माझ्या नवऱ्याच्या बीड जिल्ह्यातल्या गावी आलो. तिथं काही दिवस राहिलो नाही तोच गावातल्या लोकांचा त्रास सुरू झाला. सासरच्यांनाही वाटू लागलं की आम्ही त्यांच्यासोबत राहायला नको. शेवटी आम्हाला गाव सोडून शेताचा आसरा घ्यावा लागला."

"हळूहळू नवऱ्याची प्रकृती आणखीनच ढासळू लागली. एका दवाखान्यात गेलो तर डॉक्टरनं हात लावायलाही नकार दिला. अखेर 2001 मध्ये त्यांचा मृत्यू झाला," असं रत्ना सांगतात.

नवरा गेला आणि मग सासरच्यांनी रत्ना यांना त्यांच्यासोबत राहू दिलं नाही. म्हणून त्या माहेरी आल्या आणि आईसोबत राहू लागल्या.

"पण आईच्या मैत्रिणींनी तिला HIVबद्दल भीती घातली, 'हिला सोबत ठेवलं तर तुम्हालाही आजार होऊ शकतो'," रत्ना सांगतात.

"मग आईलाही भीती वाटू लागली की माझ्यामुळे माझ्या भावंडांना HIV होईल. आई मला लांबच ठेऊ लागली. अखेर मी माझ्या बाळाला घेऊन वेगळी राहू लागले."

"सुरुवातीला घरकामाला, शेतावरच्या कामाला जाऊ लागले. पण काही दिवस काम केल्यानंतर माझ्या आजाराबाबत त्यांना कळलं की तेही काम हातातून जायचं," जुन्या आठवणी त्या सांगत होत्या.

काही दिवस त्यांची अक्षरश: उपासमार झाली. मग रोजगार हमीचं काम मिळालं.

मग एके दिवशी, बाळ 11 महिन्यांचं असताना, त्या कामावरून घरी आल्या आणि पाहिलं की त्यांच्या बाळानं दम तोडला होता.

"माझं बाळ जाण्याचा धक्का सहन करण्यापलीकडचा होता. आता आपण जगून काही उपयोग नाही, असं मला वाटलं आणि मीही विष प्यायले."

पण रत्नाच्या शेजाऱ्यांनी त्यांना ताबडतोब दवाखान्यात नेलं, म्हणून त्यांचा जीव वाचला.

नवरा गेला, मूल गेलं, एकदा आयुष्य संपवण्याचा प्रयत्नही झाला. पण रेखाच्या नशीबात काय होतं, कुणास ठाऊक?

पुढच्या प्रवासाबद्दल त्या सांगतात, "त्यानंतर जामखेडच्या ग्रामीण आरोग्य प्रकल्पात काम करणारी एक आरोग्यसेविका माझ्या संपर्कात आली. ती मला प्रकल्पाचे संचालक डॉ. रजनीकांत आरोळेंकडे घेऊन गेली. त्यांनी लगेचच माझ्यावर औषधौपचार तर सुरू केले."

सोबतच, डॉ. आरोळेंनी रत्नाला प्रकल्पाच्या खडकतमधल्या शेतावर नोकरी दिली. त्यांनी तिथं कामाला सुरुवात केली खरी, पण तो आजार आणि त्यामुळं होणारा सामाजिक त्रास काही पाठ सोडत नव्हता.

त्या सांगतात, "शेतावर काम करणारे इतर लोक माझ्यापासून फटकून वागू लागले."

"डॉ. आरोळेंना ही गोष्ट कळाल्यावर एक दिवस ते शेतावर आले. सर्व जण जेवायला बसले आणि डॉ. आरोळेंनी मला त्यांच्या ताटात जेवायला बसवलं. माझ्यासोबत काम करणाऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला."

मग डॉ. आरोळेंनी प्रकल्पातील इतरांना समजावून सांगितलं की हा आजार सोबत राहिल्यानं होत नाही. "मग त्या सगळ्यांनी मला स्वीकारलं," रत्ना सांगतात.

"त्यानंतर मी स्वत:ला कामात बुडवून घेतलं. एकेक गोष्ट शिकत गेले. रोपवाटिका तयार करायला शिकले, गांडूळ शेतीचं प्रशिक्षण घेतलं. पोल्ट्री, शेळीपालनाचंही प्रशिक्षण घेतलं. या कामामुळं मी माझं दु:ख विसरून गेले."

ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या कृषी संशोधन केंद्रावर कामगार म्हणून रुजू झालेल्या रत्ना आज या केंद्राच्या व्यवस्थापक म्हणून काम पाहत आहे. शेतीतील वेगवेगळे प्रयोग करत आहेत. शेळीपालन प्रकल्प चालवत आहे आणि गाई-बैलांचा सांभाळही करत आहे.

एवढंच नाही तर इथे भेटीला येणाऱ्या व्यक्तीला गांडूळ खत प्रकल्पाची माहिती देणं, शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करणंही रत्नाची जबाबदारी आहे. सर्व हिशोब त्याच सांभाळतात.

शेतीशिवाय बचत गटांमध्येही रत्ना कार्यरत आहेत. बचत गट चालवणाऱ्या महिलांना त्या मार्गदर्शन करतात.

ज्या लोकांनी रत्ना यांना दूर सारलं तेच सर्वजण आता त्यांना सन्मानानं बोलावतात. नातेवाईक लग्न किंवा इतर कार्यक्रमाला आवर्जून आमंत्रित करतात.

पुढे जाऊन रत्ना यांनी त्यांच्या बहिणीच्या मुलीला 3 वर्षांची असताना दत्तक घेतलं. आज ती मुलगी अकरावीत शिकत आहे.

रत्ना यांनी केवळ त्यांचंच आयुष्य नाही पालटलं तर आसपासच्या लोकांच्याही त्या प्रेरणास्रोत झाल्या. त्या सांगतात, "HIV-एड्ससह जगणारे लोक आणि त्यांचे नातेवाईक जेव्हा मला भेटायला येतात तेव्हा मी त्यांना सांगते की, मी HIV असूनही मी स्वत:च्या पायावर उभे राहिले. त्यांचा विश्वास बसत नाही. मग मी माझे मेडिकल रिपोर्ट दाखवते."

"मग त्यांचा विश्वास बसतो, आणि विश्वासही वाढतो की HIVशी संघर्ष करून जगता येऊ शकतं. इतर एड्सबाधितांची, त्यांच्या नातेवाईकांची हिंमत वाढवणं, यामध्ये मला खूप समाधान मिळतं."

रत्ना यांच्या या संघर्षाची, प्रतिकूल परिस्थितीवर मात करणाऱ्या त्यांच्या वाटचालीची दखल स्वित्झर्लंडमधील जी. आय. सी. ए. एम. या आंतरराष्ट्रीय पातळीवर आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेनं घेतली.

आज 1 डिसेंबरला जागतिक एड्स दिनाच्या दिवशी रत्ना यांना व्याख्यान देण्यासाठी स्वित्झर्लंडला आमंत्रित करण्यात आलं आहे.

रत्ना सांगतात, "मला हेच मांडायचं आहे की, समाजाने HIV-एड्ससह जगणाऱ्यांबद्दल आपला दृष्टिकोन बदलण्याची खूप गरज आहे. त्यांचा तिरस्कार करू नका. कॅन्सर आणि डायबेटिस यासारखा हाही एक आजारच आहे."

"HIV-एड्ससह जगणाऱ्यांना औषधोपचार तर मिळायलाच हवेत. पण त्यांना रोजगारही मिळायला हवा. स्वत:च्या पायावर उभे राहिले तर ते सन्मानानं जगू शकतात. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे HIV-एड्ससह जगणाऱ्यांच्या मुलांना दूर सारू नका," असं त्या सांगतात.

स्त्रोत- अभिजीत कांबळे, BBC News Marathi

*रत्नाताई च्या दुर्दम्य ईच्छाशक्ती ला ऊत्तुंग भरारीला सलाम..*

   *त्यांच्या मध्ये जगण्याची ऊमेद जागवणार्या डाँ आरोळे यांना साष्टांग दंडवत.....*

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨

📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣1⃣3⃣

*👵🏻आजीबाईंची शाळा आता कॅनडात*

Maharashtra Times |Nov 27, 2017

साभार- म. टा.प्रतिनिधी, ठाणे

वयोवृद्ध महिलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुरबाडच्या फांगणे गावात सुरू झालेल्या आजीबाईच्या शाळा आता थेट कॅनडा येथे भरणार आहे. ही संकल्पना राबवणारे शिक्षक योगेंद्र बांगर यांना थेट कॅनडामध्ये येण्याचे निमंत्रणही तेथील लूसिन्ट क्याय कन्सल्टिंग या संस्थेचे जान पेझार्रो यांनी धाडले आहे.
गेल्यावर्षी महिला दिनाचे औचित्य साधत मुरबाड तालुक्यात आजीबाईंच्या शाळेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती. चूल आणि मूल या रहाटगाड्यात अडकलेल्या आणि आयुष्य अशिक्षितपणात घालवणाऱ्या महिलांना किमान अक्षरओळख व्हावी, यासाठी मोतीराम गणपतदादा चॅरिटेबल ट्रस्ट आणि जिल्हा परिषदेच्या सहकार्याने ही शाळा सुरू झाली होती. शाळेत ६० ते ९० वर्षे वयोगटातील २८ आजी शिक्षणासाठी येतात. दररोज दुपारी २ ते ४ या वेळेत ही शाळा भरते. अल्पावधीतच हा उपक्रम देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांनी गावात दाखल होत आजीबाईंची शाळा घराघरांत पोहोचवली. योगेंद्र बांगर यांच्या प्रयत्नातून उभ्या राहिलेल्या या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले आणि मदतीचा हातही पुढे केला होता. अनेक परदेशी पाहुणे या शाळेत येत असतात. कॅनडा येथील लूसिन्ट क्याय कन्सल्टिंग या सामाजिक संस्थेला त्याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांचे प्रतिनिधी इथे दाखल झाले होते.

शाळेची वेळ, अभ्यासक्रमाची रचना, शाळेचे गावापासूनचे अंतर, शाळेत आजीबाईंना सामावून घेण्याची प्रक्रिया, शिक्षण साहित्य याविषयीची माहिती संस्थेने सुरुवातीला संकलित केली होती. त्यानंतर शाळेच्या या अभिनव उपक्रमाला कॅनडामध्ये विशेष पसंती मिळत असून तिथल्या ग्रामीण भागामधील रहिवाशांसाठी विशेषतः ज्येष्ठांसाठी हा उपक्रम राबवण्याचा मानस संस्थेने व्यक्त केला आहे. या उपक्रमाचे जागतिक स्तरावर कौतुक होत असल्याने योगेंद्र बांगर यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे.

📚📕📗📘📙📔📒📚

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨

📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣1⃣2⃣

*शिक्षणासाठी बंड पुकारत सुनीताने रोखला स्वत:चा बालविवाह*

साभार - श्रीकांत बंगाळे आणि अमेय पाठक

*बीबीसी मराठी,14 नोव्हेंबर 2017*

जेमतेम 12-13व्या वर्षी सुनिताला लग्न करायचं नव्हतं. तिला शिकायचं होतं. सरकारी अधिकारी व्हायचं होतं.
सुनीता देविदास उबाळे ही जालना जिल्ह्यातल्या नंदापूर इथं राहते. सातवीत असतानाच सुनीताच्या घरच्यांनी तिचं लग्न ठरवलं. लग्न ठरवताना ना तिला त्याची कल्पना देण्यात आली, ना तिची मर्जी विचारात घेण्यात आली.
त्यामुळे मुलगा कोण आहे, कसा आहे, काय करतो, याबद्दल तिला काहीही माहीत नव्हतं. काही दिवसातच नातेवाईकांच्या दबावाखाली सुनिताच्या आई-वडिलांनी तिचा साखरपुडाही उरकला.
जेमतेम 12-13व्या वर्षी सुनिताला लग्न करायचं नव्हतं. तिला शिकायचं होतं. सरकारी अधिकारी व्हायचं होतं.
सुनीताने सर्वप्रथम घरच्यांना आणि नातेवाईंकांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्यात यश मिळत नाही हे लक्षात आल्यावर ती शाळेतल्या तिच्या शिक्षकाकडे गेली आणि त्यांना लग्नाबद्दल सांगितलं.
त्या वेळी काही दिवसांपूर्वीच जालना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सुनीताच्या शाळेत जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचं आयोजन केलं होतं. स्पर्धेनंतर शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शाळेतल्या शिक्षकांना त्यांचा मोबाईल क्रमांक दिला होता.

मग सुनीताने शाळेतल्या शिक्षकाकडून जालन्याचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी राधाकृष्णन यांना फोन लावला. "इच्छा नसतानाही माझं लहान वयात लग्न करून दिलं जात आहे," असं तिनं फोनवरून त्यांना कळवलं.

त्यांनीही वेळ न घालवता 'सर्व शिक्षा अभियाना'साठी काम करत असलेल्या टीमला सुनीताच्या गावी पाठवलं. अठरा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीचं लग्न करणं कायद्यानं कसं अयोग्य आहे, त्याचे काय परिणाम होतात, हे या टीमनं सुनीताच्या पालकांना समजावून सांगितलं.
मग सुनीताच्या पालकांनीही आपला निर्णय मागे घेतला. आणि सुनिताला पुढे शिकायची संधी मिळाली.

*पण लग्न का करणार होते?*

सुनीताचे वडील देविदास उबाळे यांना पाच अपत्य आहेत - तीन मुली आणि दोन मुलं. घरी फक्त दीड एकर शेती. तीही कोरडवाहू.
पहिल्या दोन मुलींची लग्न करताना त्यांचं कबरडं मोडलं होतं.

त्यांनी सांगितलं, "पोरीला शिकवायला मही 10 रुपयाची ऐपत नव्हती. शेतात काही माल होत नाही. मग काय करणार होतो तिला घरी ठेवून?"
अठरा वर्षांखालील मुलीचं आणि 21 वर्षांखालील मुलाचं लग्न कायद्याने करणं गुन्हा आहे, हे समजल्यावर आपण चुकत आहोत, याची जाणीव त्यांना झाली.

"आता पोरगी स्वत:हून शिकत आहे. जोवर तिला शिकायचं आहे, तोवर ती शिकेल. जोवर तिची शिकायची इच्छा संपत नाही, तोवर तिच्या लग्नाचा विषय काढणार नाही," असं त्यांनी पुढे सांगितलं.

*बालविवाह थांबवण्याचा इम्पॅक्ट*

बालविवाह थांबल्यानंतर सुनीता सर्व शिक्षा अभियानातील कर्मचाऱ्यांसोबत गावोगावी जाऊन बालविवाहाबद्दल जनजागृती करू लागली.
"माझ्या आई-वडिलांनी माझं लग्न लहान वयात ठरवलं होतं. पण तुम्ही तसं करू नका. जसं माझ्यासोबत झालं, तसं तुमच्या मुलींसोबत करू नका," असं ती गावोगावच्या महिलांना सांगून त्यांच्या मुलींचा बालविवाह न करण्यासाठी प्रवृत्त करू लागली.

*महिलाही तिची कहाणी ऐकून प्रेरित होतात.*

"आम्ही आमच्या मुलीचं लवकर लग्न करणार नाही. कारण तुझं ऐकल्यापासून आम्हाला समजलं की, मुलगी पण अधिकारी बनू शकते. मुलगी पण कोणत्याही क्षेत्रामध्ये कमी नाही," असं त्या महिला सुनीताला सांगतात.

*मुख्य कार्यकारी अधिकारी व्हायचं स्वप्न*

सुनीता सातवीपर्यंत गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकली. आठवीत तिला केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत बदनापूरच्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात प्रवेश मिळाला.
दहावीपर्यंतचं शिक्षण तिनं तिथंच पूर्ण केलं. नंतर मात्र कॉलेजच्या शिक्षणाचा खर्च परवडत नसल्यानं तिला पुन्हा गावाकडं परतावं लागलं.

सुनीताला मुख्य कार्यकारी अधिकारी व्हायचं आहे.
आज ती गावातल्या शाळेत बारावीत शिकत आहे. इतकी सगळी उठाठेव झाली पण तिचं ध्येय कायम आहे.
"मी लहानपणी लग्न केलं नाही, कारण मला शिकायचं होतं. कितीही अडचणी आल्या तरी मी शिक्षण सोडणार नाही. कारण मला मुख्य कार्यकारी अधिकारी व्हायचं आहे."

*जबरदस्तीविरोधात आवाज उठवा!*

आपल्यावर घडलेल्या प्रसंगातून सुनीता ना केवळ स्वत: सावध आहे, ती समाजात एक सावधतेचा संदेश पसरवत आहे.
"मुलींनो, तुमच्या स्वत:मध्ये हिंमत असायला पाहिजे. घरच्यांनी लग्नासाठी जास्त जबरदस्ती केली, तर त्या विरुद्ध बोलायची तुमच्यामध्ये हिंमत असायला पाहिजे."
कारण मुलीने जर ठामपणे नकार दिला, तर आई-वडीलच काय, कोणीच काही करू शकत नाही."

📚📕📗📘📙📔📒📚

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨

📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣1⃣1⃣

*गणपती मंडळाचे शिक्षणासाठी ७.५६ कोटी*

Maharashtra Times | Updated Oct 9, 2017

साभार ~ मुंबई मिरर । मुंबई

गोरगरीब, गरजवंत मुलांना शाळा अर्ध्यावर सोडण्याची गरज नाही. त्यांच्या मदतीला थेट गणपती बाप्पाच धावून आला आहे. राज्यातील गणपती मंडळांनी यासाठी पुढाकार घेतला असून धर्मादाय आयुक्तालयाला ७.५६ कोटी रुपये दिले आहेत. गणपती मंडळांनी दिलेल्या या पैशाचा वापर गरजू मुलांच्या शिक्षणासाठी करण्यात येणार आहे.
राज्यातील गरजवंत मुलांच्या शिक्षणासाठी गणपती मंडळांनी एकूण मिळकतीमधील १० टक्के रक्कम आर्थिक मदत म्हणून द्यावी, असे आवाहन धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी केले होते. डिगे यांच्या आवाहनाला गणपती मंडळानं सकारात्मक प्रतिसाद दिला. 'लालबागचा राजा' सार्वजनिक गणपती मंडळाने ४ कोटी रुपये आणि पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने १.६२ कोटी रुपये आयुक्तांकडं सुपूर्द केले आहेत. आतापर्यंत आयुक्तालयाकडं ७.५६ कोटी रुपये जमा झाले आहेत. हे सर्व पैसे मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केले जाणार आहेत.

शिक्षण, आरोग्यासोबतच सणांच्या दिवसात शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी मंडळानं पुढाकार घ्यावा, या आवाहनालाही गणपती मंडळानं चांगला प्रतिसाद दिला. संपूर्ण राज्यात १०,३८४ खड्डे गणपती मंडळाच्या सहकार्याने बुजवण्यात आले, अशी माहिती डिगे यांनी दिली. समाजात चांगलं काम करण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर असतो. यावेळी धर्मादाय आयुक्तांनी हा विचार आमच्यासमोर मांडला व त्याला आम्ही तात्काळ अनुमती दिली. आम्ही लोकांकडून पैसा जमा करतो. ते लोकांच्या कल्याणासाठी वापरतो, असे 'लालबागचा राजा' गणपती मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी सांगितलं. तर चांगल्या कामासाठी आमचा नेहमीच पुढाकार राहिला आहे. पुण्यात जवळपास ५०० वंचित विद्यार्थी वेगवेगळ्या शाळांमध्ये चॅरिटीतून मिळणाऱ्या पैशांतून शिक्षण पूर्ण करीत आहोत, असं दगडूशेट हलवाई गणपती मंडळाचे उपाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी सांगितलं.

📚📕📗📘📙📔📒📚

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_