twitter
rss

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨

📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* -3⃣6⃣5⃣

*२५ शहिदांच्या मुलांचं पालनपोषण करणार गौतम गंभीर*

टाइम्स वृत्त । नवी दिल्ली

छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या २५ जवानांच्या मुलांच्या पालनपोषणाची संपूर्ण जबाबदारी टीम इंडियाचा शिलेदार आणि कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार गौतम गंभीरनं स्वीकारली आहे. अनेक सामन्यांमध्ये भारताच्या विजयाचा पाया रचणाऱ्या गंभीरचं हे पाऊल नक्कीच आदर्श पायंडा पाडणारं आहे.
प्रत्येक देशभक्त भारतीयाप्रमाणे गौतम गंभीरलाही आपल्या लष्कराबद्दल अतीव आदर आणि अभिमान आहे. भारतीय जवानांना काश्मीरमध्ये झालेली मारहाण आणि 'मानवी ढाल' प्रकरणावेळी त्यानं जवानांची पाठराखण केली होती. स्वाभाविकच, सुकमामधील नक्षली हल्ल्याच्या बातमीनं तो अस्वस्थ झाला. सीआरपीएफच्या २५ जवानांचं हौतात्म्य त्याच्या मनाला चटका लावून गेलं. त्यांना केवळ श्रद्धांजली वाहून, मानवंदना देऊन थांबायचं नाही, तर काहीतरी ठोस मदत करायची, असं त्यानं तेव्हाच ठरवून टाकलं होतं. त्यानुसारच, या २५ शहिदांच्या मुलांचा सगळा खर्च उचलण्याचं गंभीरनं ठरवलं आहे. त्याच्या मीडिया मॅनेजरनं या वृत्ताला दुजोरा दिला.

सुकमा हल्ल्यानंतर झालेल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सचा संघ काळ्या पट्ट्या लावून मैदानावर उतरला होता. त्यानंतर आता शहिदांच्या मुलांची जबाबदारी स्वीकारून गंभीर आजवरची सगळ्यात सर्वोत्तम इनिंग्ज खेळण्यास सज्ज झालाय. त्याच्या या निर्णयाचं भरभरून कौतुक होतंय.

📚📕📗📘📙📔📒📚

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🎯सांगली जि.प.शाळांना उन्हाळी सुट्टी 1 मे पासून देण्याची मागणी*

By pudhari | Publish Date: Apr 28 2017

सांगली : प्रतिनिधी

शिक्षण संचालक यांच्या परिपत्रकानुसार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना दि. 1 मे पासून उन्हाळा सुट्टी द्यावी. सर्व शाळा दि. 15 जूनपासून सुरू व्हाव्यात, *अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे, सरचिटणीस अविनाश गुरव यांनी केली आहे.*

जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती तम्मनगोंडा रवी यांना निवेदन दिले आहे. शिक्षण समिती सभेत निर्णय होईल, असे आश्‍वासन रवी यांनी संघाच्या शिष्टमंडळाला दिले आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार पहिली ते पाचवीच्या वर्गाचे कामकाजाचे दिवस 200 व घड्याळी तासिका 800, तर सहावी ते आठवीच्या वर्गाचे कामकाजाचे दिवस 220 व घड्याळी तासिका 1 हजार इतके निश्‍चित केले आहे.

जिल्हा परिषदेकडील परिपत्रकाप्रमाणे एकूण शैक्षणिक वर्षातील कामकाजाचे दिवस 240 होतात. घड्याळी तासिका 1200 होतात. त्यामुळे ‘आरटीई’ नुसार विचार करता सांगली जिल्हा परिषदेकडील शाळांना दि. 1 मे पासून सुटी देणे शक्य आहे.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

🌸मायबोली मराठीच्या मुळावर नववी-दहावीचा नवा पॅटर्न!*

By pudhari | Publish Date: Apr 29 ,2017

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

नव्या शैक्षणिक वर्षात नववी व दहावीचे मराठी माध्यमाचे विद्यार्थीही प्रथम भाषा म्हणून मराठी नाकारू शकतील आणि इंग्रजीची प्रथम भाषा म्हणून निवड करू शकतील. इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनाही प्रथम भाषा म्हणून इंग्रजी किंवा मराठी निवडण्याचे स्वातंत्र्य असेल. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा हा नवा पॅटर्न आहे. या पॅटर्नचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे द्वितीय भाषा किंवा सामाजिक शास्त्रे टाळून नववी/दहावीचे विद्यार्थी व्यवसाय विषयाची निवड करू शकणार आहेत.

राज्याच्या अभ्यासक्रमांत त्रिभाषा सूत्री आहे. त्यानुसार मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठी ही प्रथम भाषा म्हणून आणि इंग्रजी ही द्वितीय भाषा म्हणून अभ्यासणे बंधनकारक होते. मात्र आता नव्या रचनेत इंग्रजी किंवा मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना प्रथम भाषा कोणती निवडायची इंग्रजी की मराठी याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. या दोन्ही भाषा विषयांत नापासांचे प्रमाण पाहता हे स्वातंत्र्य का देण्यात आले हे कळण्यास मार्ग नाही. शिवाय ऐन नववी किंवा दहावीच्या परीक्षेत इंग्रजी माध्यमाच्या मुलांना मराठीची सक्ती सोडाच पण मराठी माध्यमाच्या मुलांनाही मातृभाषा मराठी नाकारून इंग्रजी भाषा ही प्रथम भाषा म्हणून निवडण्याचे स्वातंत्र्य मंडळाने बहाल केले आहे.

इंग्रजीचे विद्यार्थीही नववी/दहावीला प्रथम भाषा म्हणून मराठीचा विचार करू शकतात, अशी मखलाशी या पॅटर्नमध्ये करण्यात आली असली तरी मुळात पालकांचा आणि ओघानेच विद्यार्थ्यांचा कल हा इंग्रजी शिकण्याकडे असतो. त्यामुळे इंग्रजी आणि मराठी माध्यमाचे विद्यार्थी प्रथम भाषा म्हणून मराठी नाकारू शकतात ही या पॅटर्नची सर्वात मोठी मेख आहे. म्हणजे मराठीच्या सक्तीचा आग्रह राहिला दूरच पण ती नाकारण्याचे स्वातंत्र्य या पॅटर्नने दिले. गतवर्षीचा दहावीचा निकाल पाहता प्रथम भाषा मराठी घेऊन 93.55% विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. त्या तुलनेत प्रथम भाषा इंग्रजी घेऊन 96.10% विद्यार्थी  उत्तीर्ण झाले आहेत. मराठीत नापास होण्याचे प्रमाण हे अधिक असल्याचे या टक्केवारीवरून दिसते. त्यामुळे मराठीच बाद करण्याचे स्वातंत्र्य या पॅटर्नने दिल्याने याचे मोठे गंभीर परिणाम मराठी भाषा शिक्षणावर संभवतात.

नववी, दहावी व्यावसायिक तरुणांना कौशल्याधारित बनविण्यासाठी नववीच्या विद्यार्थ्यांना यंदापासून व्यवसाय शिक्षणाचे धडे गिरविता येणार आहेत. भाषा किंवा सामाजिकशास्त्रे यांपैकी एका पारंपारिक विषयाऐवजी व्यवसाय विषयाची विद्यार्थी निवड करू शकणार आहेत. विशेष म्हणजे या व्यवसाय विषयाची 30 गुणांची लेखी तर 70 गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहे.

जागतिक, राष्ट्रीय व स्थानिक पातळीवरील बदलती अर्थिक परिस्थिती आणि त्यामुळे रोजगार बाजारात होत असलेले बदल, सतत निर्माण होणारी नव नवीन क्षेत्रे व रोजगाराच्या संधी यांचा शोध घेवून रोजगाराच्या संधीनुसार कुशल मनुष्यबळाचा पुरवठा होण्यासाठी आता शालेय अभ्यासक्रमांत मोठे बदल केले जात आहेत. शिक्षण व्यवसायाभिमुख व्हावे, या दृष्टीने राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानातर्ंगत  नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्कने आखून दिलेले तब्बल दहा व्यवसाय विषय नववी व दहावीसाठी सुरू करण्यात येणार आहे. 2017-18 या शैक्षणिक वर्षात नववीसाठी तर 2018-19 साठी दहावीसाठी या विषयांची अंमलबजावणी होणार आहे. हे विषय घेण्यास व्यवसाय शिक्षण संचालनालयाने ज्या शाळांना मान्यता दिली आहे. त्याच शाळांना हे विषय सुरू करता येणार आहे, असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यामिक शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे.

*विद्यार्थ्यांची पसंती तर शिक्षकांचा विरोध होणार*

व्यवसाय विषयाची 30 गुणांची लेखी तर 70 गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा असल्याने हे व्यावसायिक विषय विद्यार्थ्यांसाठी स्कोअरिंग देणारे ठरणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची पसंती ठरेल. मात्र द्वतीय किंवा तृतीय भाषा किंवा सामाजिकशास्त्रे यांपैकी एका विषयास हा पर्याय आता उभा असल्याने या विषयांचे विद्यार्थी कमी होतील आणि त्यामुळे शिक्षकांज्या जागा घटण्याच्या शंकाही उपस्थित होत आहे. त्यामुळे शिक्षकांतून विरोध होण्याची शक्यता आहे.

*नववी, दहावीसाठी सामान्य गणित विषय बंद*

नववी, दहावीच्या बीजगणित व भूमिती या विषयात नापास होण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांना दिलेला सामान्य गणिताचा पर्याय आता बंद होणार आहे. यंदापासून विद्यार्थ्यांना बीजगणित आणि भूमितीचाच अभ्यास करावा लागणार आहे. त्याचबरोबर अर्थशास्त्र विषयाचा समावेश गणित आणि भूगोल विषयात करण्यात येणार असून व्यक्तिमत्व विकास, कार्यानुभव, समाजसेवा व व्यवसाय मार्गदर्शन या विषयांऐवजी ‘स्व विकास व कलारसास्वाद’ या आशयाचे विषय असणार आहेत.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज 🍃🍂🍃

🌼दहावीच्या तासिका कमी होणार*

Updated Apr 28, 2017

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

SHARE
यंदा नववी आणि पुढील वर्षी दहावीच्या काही विषयांमध्ये बदल करण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आला आहे. त्या थेट परिणाम म्हणून दहावीच्या विद्यार्थ्यांच्या तासिका कमी होऊन आठवड्याला ५०वरून ४५ होणार आहेत. तासिका कमी होणार असल्या तरी शाळेच्या वेळेवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे.
गणिताची भीती वाटणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गेल्या काही वर्षांपासून राज्य शिक्षण मंडळातर्फे सामान्य
गणिताचा पर्याय सुरू करण्यात आला होता. मात्र, यंदा नववीसाठी आणि पुढील शैक्षणिक वर्षापासून दहावीसाठी हा सामान्य गणिताचा पर्याय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याशिवाय, ‘अर्थशास्त्र’ हा विषय आता स्वतंत्रपणे शिकवण्यात येणार नाही. यापूर्वी सामाजिक शास्त्र विषयांचे इतिहास-नागरिकशास्त्र, भूगोल आणि अर्थशास्त्र असे चार भाग करण्यात येत होते. मात्र, यंदापासून अर्थशास्त्र हा विषय भूगोल आणि गणित या विषयांत समाविष्ट करण्यात आल्याचे बोर्डाने जाहीर केले आहे. त्यानुसार दहावीच्या तासिकांमध्ये बदल होणार असून, तशा सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत. हे नवे वेळापत्रक शैक्षणिक वर्षे २०१७-१८साठीच असल्याचे बोर्डाचे अध्यक्ष गंगाधर मम्हाणे यांनी जाहीर केले आहे.

*नवे 'वेळा'पत्रक*

-दहावीसाठी आठवड्याला ४५ तासिका घेतल्या जाणार. यापूर्वी आठवड्याला ५० तासिकांचे वेळापत्रक असायचे.

-नव्या निर्णयानुसार दहावीच्या वर्गांची पहिली तासिका ४० मिन‌टिांची असेल. उर्वारित तासिका ३५ मिनिटांच्या असतील. यापूर्वी या तासिका ३० मिन‌टिांच्या होत्या.

-समाजसेवा गटातील विषयांसाठी शनिवारी शेवटची तासिका ठेवण्याचे निर्देश शाळांना
देण्यात आले आहेत.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूद🍃🍂🍃

🥀भाषा, कला, शारीरिक शिक्षणावर घाला!*

*पहिली ते आठवीच्या तासिकांमध्ये घट*

प्रतिनिधी, पुणे | Updated: April 29, 2017

_*पहिली ते आठवीच्या तासिकांमध्ये घट*_

भाषा, कला आणि शारीरिक शिक्षण हे व्यक्ती जडणघडणीसाठीचे शाळेतील सर्वाधिक महत्त्वाचे विषय. मात्र या विषयांतल्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासात कपात करण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे. पहिली ते आठवीसाठी  आठवडय़ाच्या तासिकांमध्ये घट झाली असून आता ५० ऐवजी ४५ तासिका असणार आहेत. त्यामुळे भाषा, कला, शारीरिक शिक्षण या विषयांचा अभ्यास कमी होणार आहे.
नव्या वर्षांचे शैक्षणिक वेळापत्रक, विषयानुसार तासिकांची आखणी कशी असावी याचे नियोजन विद्या प्राधिकरणाने जाहीर केले आहे. त्यानुसार आठवडय़ाच्या तासिकांमध्ये बदल करण्यात आला आहे. पूर्वी एक तासिका ३५ मिनिटांची याप्रमाणे आठवडय़ाला पन्नास तासिका घेणे बंधनकारक होते.  आता मात्र आठवडय़ाच्या तासिका ४५ असतील.

*बदल काय?*

पहिली आणि दुसरीसाठी मराठीच्या तासिका आता १८ ऐवजी १५ असतील. शारीरिक शिक्षण आणि कार्यानुभवासाठी ५ ऐवजी ४ तासिका असणार आहेत. तिसरी आणि चौथीला मराठीसाठी १३ ऐवजी १२ तासिका, शारीरिक शिक्षणासाठी ५ ऐवजी ३, कलेसाठी ४ ऐवजी ३ आणि कार्यानुभवासाठी ५ ऐवजी ४ तासिका करण्यात आल्या आहेत. पाचवी आणि सहावीसाठी प्रथम भाषा आणि तृतीय भाषेसाठी ७ ऐवजी ६ तासिका असणार आहेत. द्वितीय भाषेच्या तासिका वाढवण्यात आल्या असून त्या ४ ऐवजी ६ करण्यात आल्या आहेत. परिसर अभ्यासासाठी १३ ऐवजी ११ तासिका असणार आहेत. सहावीपासून पुढील वर्गासाठी शारीरिक शिक्षण, कला, कार्यानुभव या विषयांच्या तासिका मोठय़ा प्रमाणावर कमी करण्यात आल्या असून त्या ८ ऐवजी ३ करण्यात आल्या आहेत. सहावी ते आठवीसाठी प्रथम भाषा, तृतीय भाषा, सामाजिक शास्त्रे यांसाठी ७ ऐवजी ६ तासिका असतील, द्वितीय भाषेसाठी ४ ऐवजी ६ तासिका असतील. विज्ञानाच्या तासिकांमध्ये वाढ करण्यात आली असून त्या ६ ऐवजी ७ करण्यात आल्या आहेत. शारीरिक शिक्षण आणि कला विषयाच्या तासिका ४ ऐवजी २ आणि कार्यानुभवाच्या ४ ऐवजी ३ तासिका असतील.

*संमिश्र प्रतिक्रिया*

या बदलांबाबत शिक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. पूर्ण शंभर गुण असलेल्या विषयांना अधिक वेळ दिल्यामुळे या विषयांना न्याय मिळत असल्याची भावना शिक्षक व्यक्त करत आहेत. त्याच वेळी कला, शारीरिक शिक्षण या विषयांच्या प्राथमिक वर्गाच्या तासिका कमी केल्यामुळे नाराजीही व्यक्त होत आहे. ‘लहान मुले खेळ आणि कलेतून अधिक शिकतात. या तासिका त्यांना आवडतात. त्यातून ती व्यक्त व्हायला शिकतात अशा वेळी या तासिका कमी करणे दुर्दैवी आहे. त्याचबरोबर हिंदीसाठी तासिका वाढवण्याचेही कारण कळू शकत नाही,’ अशी प्रतिक्रिया शिक्षक भाऊसाहेब चासकर यांनी व्यक्त केली आहे.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

🎯नववी नापासांचीही होणार फेरपरीक्षा*

Updated Apr 28, 2017

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

मुंबईसह राज्यात वाढत असलेल्या नववी नापासांच्या संख्येला पूर्णविराम देण्यासाठी येत्या शैक्षणिक वर्षांपासून नववी नापासांचीही फेरपरीक्षा घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शालेय शिक्षण विभागाने गुरुवारी जाहीर केला. मुख्य म्हणजे यावर्षी जूनमध्ये नववीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा होणार आहे. त्याचबरोबर येत्या जुलैमध्ये नववी आण‌ि दहावीच्या विद्यार्थ्यांची नैदानिक चाचणी घेण्याचा निर्णयही शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.

दहावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल चांगला लागावा यासाठी अनेक शाळांमार्फत नववीच्या निकालावर कात्री मारली जात होती. त्यामुळे नववीत नापासांची संख्या गेल्या काही वर्षांपासून वाढली होती. त्यामुळे या विद्यार्थ्यांचीही दहावीच्या विद्यार्थ्यांप्रमाणे फेरपरीक्षा घेण्याच्या निर्णयावर शिक्षण विभागाने अखेर गुरुवारी शिक्कामोर्तब केले. जूनच्या पहिल्या आठवड्यात ही परीक्षा शाळास्तरावरच घेतली जाणार आहे.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या कार्यक्रमांतर्गत हा निर्णय असून यंदाच्या शैक्षणिक वर्षात नववीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची नैदानिक चाचणी न घेण्यात आल्यामुळे त्यांची पुर्नपरीक्षेचा होणार नाही, असेही गुरुवारी जाहीर केलेल्या निर्णयात स्पष्ट केले. या निर्णयानुसार विद्यार्थ्यांची गणित, विज्ञान आणि इंग्रजी या विषयांच्या नैदानिक चाचण्या येत्या जुलैमध्ये घेण्यात येणार आहेत.

*नववीसाठी सामान्य गणित नाही*

यंदापासून नववीच्या विद्यार्थ्यांची भाषा विषयांची कृतीपत्रिकांद्वारे मूल्यमापन होणार आहे. त्यानुसार अभ्यासक्रम पुर्ननरेचत केलेल्या बदलांनुसार आता नववीसाठी सामान्य गणित या विषयांच्या पर्याय राहणार नसल्याची घोषणा बोर्डाने गुरुवारी रात्री केली. सामान्य गणित ऐवजी बीजगणित आणि भूमिती हीच पाठ्यपुस्तके राहणार आहेत. तर आयसीटी हा विषय स्वतंत्र न राहता आयसीटीचा समावेश सर्व विषयांमधून करण्यात आल्याने त्याचे स्वातंत्र्य पाठ्यपुस्तक नसेल. तर इतर अनेक बदल यावेळी करण्यात आले असून त्यासाठी वेबसाईटवर भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षात नववीत असणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांला जलद गतीने शिक्षण पद्धती देवूनही जर हा विद्यार्थी पुन्हा नापास झाला तर अशा विद्यार्थ्यांची ही पुर्नपरीक्षा घेण्यात येणार आहे. या निर्णयाचे अनेक विद्यार्थी संघटनांनी आणि शिक्षक संघटनांनी स्वागत केले असून विद्यार्थ्यांना नक्कीच याचा फायदा होईल, असा विश्वास यावेळी अनेकांनी व्यक्त केला.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

⛳‘जेईई’मध्ये नाशिकची वृंदा राठी देशात प्रथम*

By pudhari | Publish Date: Apr 28 2017

नाशिक : प्रतिनिधी

राष्ट्रीय स्तरावरील ‘जेईई मेन’मध्ये येथील वृंदा नंदकुमार राठी ही मुलींमध्ये देशात पहिली आली आहे. देशातील अव्वल दर्जाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयीन प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली जाते. ‘जेईई मेन’ परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर ‘जेईई अ‍ॅडव्हान्स’साठी विद्यार्थी पात्र ठरतात. गेल्या 2, 8 व 9 एप्रिल रोजी देशभरात ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने ‘जेईई मेन’ परीक्षा घेण्यात आली होती. देशभरातील 13 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यांपैकी 2 लाख 20 हजार विद्यार्थी जेईई अ‍ॅडव्हान्ससाठी पात्र ठरले आहेत. गुरुवारी (दि. 27) सायंकाळी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत नाशिक येथील वृंदा नंदकुमार राठी या विद्यार्थिनीने 360 पैकी 321 गुण मिळवत देशभरातील मुलींमध्ये प्रथम येण्याचा मान पटकावला. तिला फिजिक्स विषयात 105, केमिस्ट्रीमध्ये 106, तर मॅथेमॅटिक्समध्ये 110 गुण मिळाले. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनचे (सीबीएसई) अध्यक्ष आर. के. चतुर्वेदी यांनी स्वत: दूरध्वनी करून तिला ही बातमी कळवली व तिचे अभिनंदन केले. वृंदा ही नाशिकमधील पेस आयआयटीयन्स अ‍ॅकॅडमीची विद्यार्थिनी असून, बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएससी) येथे प्रवेश घेण्याचा तिचा मानस आहे.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

🎋शिक्षकांचा 27 रोजीचा मोर्चा स्थगित*

By pudhari | Publish Date: Apr 25 ,2017

सांगली : प्रतिनिधी

ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे व प्राथमिक शिक्षक संघटनांच्या राज्यस्तरीय समन्वय समितीच्या शिष्टमंडळ यांच्यात सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यामुळे दि. 27 रोजीचा मोर्चा स्थगित करण्यात आला आहे, अशी माहिती शिक्षक संघटना समन्वय समितीचे निमंत्रक बाबासाहेब लाड यांनी दिली.

शिक्षकांच्या बदलीच्या धोरणात बदल करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. पन्नास वर्षावरील शिक्षिकांना बदलीतून सूट, दहा वर्षे सेवा झालेल्या बदलीपात्र शिक्षकांना पसंतीच्या शाळा न मिळाल्यास उपलब्ध रिक्त जागांवर बदली, सर्वसाधारण क्षेत्रात 10 वर्षे सेवा झालेल्या शिक्षकाची पुन्हा सर्वसाधारण क्षेत्रात बदली झाल्यास 3 वर्षे बदलीसाठी पात्र असणार नाही, नव्याने शिक्षकांना भरती करताना अवघड क्षेत्रातील शिक्षकांच्या सर्वसाधारण क्षेत्रात बदली करणे, संगणक परीक्षा मुदतवाढीस अनुकुलता तसेच अन्य मागण्या सोडवण्यासाठी मंत्री मुंडे यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे मोर्चा स्थगित करण्यात आला आहे, अशी माहिती लाड यांनी दिली.

शिक्षक समितीचे किरणराव गायकवाड, सयाजीराव पाटील, शिक्षक संघाचे (थोरात प्रणित) विनायक शिंदे, अविनाश गुरव, ऊर्दू शिक्षक संघटनेचे मुश्ताक पटेल, शिक्षक संघाचे (पाटील प्रणित) विजयकुमार चव्हाण, जगन्नाथ कोळपे, पदवीधर शिक्षक संघटनेचे ज्ञानदेव भोसले, शिक्षक भारतीचे महेश शरणाथे, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे अमोल शिंदे उपस्थित होते.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

💸‘त्यांना’ही ग्रॅच्युईटीचा लाभ!*

Updated Apr 25, 2017

*२००५नंतरच्या राज्य सरकारी कर्मचा‍ऱ्यांना ‘मॅट’चा दिलासा*

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

राज्य सरकारच्या सेवेत २००५ मध्ये आलेल्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी लाभ देता येणार नाही, असा आदेश सरकारतर्फे काढण्यात आला होता. मात्र त्या लाभापासून कर्मचाऱ्यांचा वंचित ठेवता येणार नसल्याचा महत्त्वपूर्ण निकाल नुकताच महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) एका प्रकरणात दिल्याने त्याचा बऱ्याच कर्मचाऱ्यांचा लाभ मिळणार आहे.

या प्रकरणी पुण्यातील अरुण पानसारे या निवृत्त कर्मचाऱ्याने ‘मॅट’कडे दाद मागितली होती. त्यात त्यांनी गृहखात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव, ठाणे पोलिस आयुक्त, ठाणे जिल्हा कोषागार कार्यालय, वित्त खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव यांना प्रतिवादी केले होते. अर्जदारातर्फे अॅड. आर.एम. कोलगे यांनी तर प्रतिवादींसाठी अॅड. के. एस. गायकवाड यांनी बाजू मांडली. या प्रकरणामध्ये ‘मॅट’चे न्यायिक सदस्य आर. बी. मलीक यांनी निकाल दिला.

अर्जदाराने अगोदर लष्करात नोकरी केली होती व त्यानंतर ते नोव्हेंबर, २००५ पासून राज्य सरकारच्या सेवेत आले होते. ३१ ऑक्टोबर, २००५ रोजी राज्य सरकारच्या वित्त खात्याने आदेश काढून २००५ नंतर नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले होते. याशिवाय पेन्शन योजनेतही बदल करुन कर्मचाऱ्यांच्या वेतनातील ४० टक्के भाग कापून घेऊन निवृत्तीच्यावेळी त्यांना एकरकमी पेन्शन रक्कम दिली जाईल, असे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे १ नोव्हेंबर २००५ पासून राज्य सरकारच्या सेवेत असलेल्यांना सध्याची पेन्शन योजना लागू नाही आणि त्यांना ग्रॅच्युईटी लाभही​ मिळणार नाही, असा दावा सरकारतर्फे ‘मॅट’पुढे करण्यात आला.

या संदर्भात वित्त खात्याचे उपसचिव नारायण रिंगणे यांनी प्रतिज्ञापत्र करून अर्जदाराला २००५ पूर्वीचा पेन्शन नियम लागू नसल्याने परिणामी ग्रॅच्युईटी लाभही दिले जाणार नसल्याचे त्यात स्पष्ट केले होते.

पेन्शनच्या योजनेतच ग्रॅच्युईटीचा समावेश असल्याने ती स्वतंत्रपणे देता येणार नसल्याचा युक्तिवाद प्रतिवादीतर्फे अॅड. गायकवाड यांनी केला. तथापि अर्जदाराच्यावतीने अॅड. कोलगे यांनी सरकारची भूमिका बेकायदा असल्याचे विविध मुद्दे मांडून स्पष्ट केले. पेन्शनविषयीचे नियम स्वयंस्पष्ट असून ग्रॅच्युईटी ही स्वतंत्र बाब असून त्यावर कर्मचाऱ्याचा हक्क असल्याचेही त्यांनी प्रतिपादन केले.

सर्व मुद्दे ऐकून ‘मॅट’ने अर्जदार हे ग्रॅच्युईटी मिळण्यास पात्र असल्याचा निर्वाळा देत त्यांना ती देण्यास नकार देणारा आदेश रद्द केला. तसेच अर्जदाराला सहा आठवड्यात ग्रॅच्युईटी देण्यात यावी, असेही आदेश राज्य सरकारला दिले.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

🥀सर्व्हर डाऊनने ‘नीट’चे विद्यार्थी हैराण*

Updated Apr 25, 2017

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नॅशनल इलिजीबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (नीट) या ७ मे रोजी होणाऱ्या परीक्षेचे रिसीट पदरी पाडण्यासाठी विद्यार्थ्यांना इंटरनेटवर खटाटोप करावा लागत आहे. अगोदर या परीक्षेचे रिसीट १५ एप्रिल रोजी उपलब्ध होणार होते. मात्र ‌तांत्रिक कारणास्तव ही तारीख पुढे ढकलून २२ एप्रिल करण्यात आल्याचे सीबीएसईने दोन दिवस उशिरा कळविले होते. या पाठोपाठ आता २२ एप्रिलपासून रिसीटसाठी सर्व्हर डाऊनच्या तांत्रिक कारणामुळे विद्यार्थी वैतागले आहेत.
७ मे रोजी होणाऱ्या या परीक्षेचे रिसीट अगोदर १५ एप्रिलऐवजी २२ एप्रिलपासून वेबसाइटवर उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे नोटिफिकेशन सीबीएसईने जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला होता. २५ वर्षांवरील उमेदवारांनाही या परीक्षेस बसण्याची सूट मिळावी, यासाठी हे प्रकरण कोर्टात होते. या कारणाने रिसीट मिळण्यास उशीर झाला असला तरीही दोनदा जाहीर करूनही विद्यार्थी मात्र वेटिंगवर आहेत. दोन दिवसांपासून विद्यार्थ्यांना सर्व्हर डाऊनचा सामना करावा लागत आहे. या परीक्षेचे रिसीट नियोजित तारखेऐवजी पुढील तारखेस देण्याचे जाहीर केल्यानंतर नव्या तारखेत सात दिवसांचा अवधी होता. यामुळे २२ तारीख उजाडताच लाखो विद्यार्थ्यांनी या वेबसाईटला व्हिजिट दिली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे सर्व्हरला तांत्रिक अडथळे येत असण्याची शक्यता काही तज्ज्ञांनी व्यक्त केली. दुसरीकडे रिसीटअभावी विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागल्याने मध्यरात्रीही रिसीटसाठी विद्यार्थी सर्फिंग करीत असल्याचे काही विद्यार्थ्यांनी सांगितले. नीटच्या मेरीट लिस्टवर विद्यार्थ्यांचे एमबीबीएस आणि बीडीएस या अभ्यासक्रमांचे प्रवेश अवलंबून आहेत.

अभ्यासावर लक्ष केंद्रित करा

विद्यार्थ्यांनी रिसीटच्या मुद्द्यावरून गोंधळून जात अभ्यासावरून लक्ष हटवू नये. काही कारणांमुळे रिसीट येण्यास थोडासा वेळ जाऊ शकतो. विद्यार्थ्यांनी त्यांचा अभ्यास अगोदर सुरू ठेवावा, असा सल्ला नीटचे मार्गदर्शक आदित्य ओक यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

🎯नववीसाठी सरसकट फेरपरीक्षा नाही*

By pudhari | Publish Date: Apr 26 2017

मुंबई : प्रतिनिधी

शैक्षणिक प्रगती चांगली असूनही ज्या विद्यार्थ्यांना नववीची परीक्षा काही कारणामुळे देता आली नाही अशा विद्यार्थ्यांची नववीची परीक्षा होईल. सरसकट सर्व नववी नापास विद्यार्थ्यांचीफेरपरीक्षा घेतली जाणार नाही अशी माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयातून देण्यात आली आहे.

राज्यभरात दरवर्षी दीड लाखाहून अधिक विद्यार्थी नववीत नापास होत आहेत. शालेय शिक्षण विभागाने नववीत मागे राहणार्‍या विद्यार्थ्यांसाठी विशेष शिकवणीचे नियोजन केले आहे. त्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेऊन उत्तीर्ण करण्यासाठी शाळांना कार्यक्रम आखून दिला आहे. मुंबई विभागात नववीची फेरपरीक्षा होणार नाही असे संकेत शिक्षण उपसंचालकांनी दिले आहेत.

यंदाचा नववीचा निकाल 1 किंवा 2 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. या निकालानंतर मुंबईसह ठाणे, रायगड आणि नवीमुंबई या परिसरातील शाळांच्या नववीच्या निकालाची आकडेवारी पाहिली जाणार आहे. जे विद्यार्थी काही अडचणीमुळे परीक्षा देऊ शकलेले नाहीत अशा विद्यार्थ्यांचा फेरपरीक्षेसाठी विचार केला जाईल. जे विद्यार्थी प्रगती करुन पुढे जातील अशा विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचे अधिकार वर्ग शिक्षकांना देण्यात येतील. असेही शिक्षण उपसंचालक बी.बी. चव्हाण यांनी सांगितले. एप्रिल 2016 मध्ये शाळेच्या वार्षिक परीक्षेत

नापास झालेले नववीचे विद्यार्थी आणि ऑक्टोबर 2016 मध्ये सहामाही परीक्षा दिलेले व 45 टक्क्यांपेक्षा कमी गुण प्रात्प करणारे विद्यार्थी यांची पाहणी करुनच याचा निर्णय घेण्यात येईल. जो विद्यार्थी परीक्षा घेवूनही नापास होणार असेल त्या विद्यार्थ्यांचा अंदाज वर्गशिक्षकांना असणारच आहे. त्यामुळे सरसकट परीक्षा घेण्यात काहीच तथ्य नाही असेही चव्हाण यांनी सांगितले.

दहावीचा निकाल शंभर टक्के लागावा, यासाठी काही शाळा अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यांना मुद्दामच नापास करतात. यामुळे विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक प्रवासालाच ब्रेक लागत असतो याचीही निकाल आल्यानंतर चाचपणी केली जाईल.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

🌼शाळांच्या दुकानदारीला लगाम*

Updated Apr 25, 2017

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

शालेय गणवेश आणि शैक्षणिक साहित्याची खरेदी विशिष्ट दुकानातून करण्याची सक्ती विद्यार्थ्यांवर करणाऱ्या सीबीएसईच्या शाळांपाठोपाठ, आता मुंबईतील खासगी आणि अनुदानित शाळांच्या दुकानदारीलाही लगाम बसणार आहे. मुंबई महापालिका क्षेत्रातील अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांनी गणवेश आणि इतर शैक्षणिक साहित्याची खरेदी विशिष्ट दुकानातून करण्याची सक्ती करू नये, असे आदेश देतानाच, या आदेशाचे उल्लंघन केल्यास शाळांवर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा पालिकेच्या शिक्षण विभागाने दिला आहे.
मुंबईतील अनेक शाळांकडून स्थानिक दुकानदारांशी हातमिळवणी करीत शालेय पुस्तके, गणवेश व इतर साहित्य त्यांच्याकडूनच खरेदी करण्याची सक्ती केली जाते. काही शिक्षण संस्थांनी तर शाळा परिसरात दुकाने थाटून शालेय साहित्य विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. या विरोधात काही दिवसांपूर्वीच बॉम्बे बुकसेलर्स अॅण्ड पब्लिशर्स असोसिएशनने शालेय शिक्षण विभागाकडे तक्रार केली होती. त्यांनी कोर्टात जाण्याची तयारीही केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत, शाळांमार्फत सुरू असलेल्या दुकानदारीला चाप लावण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे पालिकेने स्पष्ट केले.

पालिकेच्या शिक्षण विभागाकडून मुंबईतील अनुदानित आणि विनाअनुदानित संस्थाचालक व मुख्याध्यापकांना परिपत्रक धाडण्यात आले आहे. त्यानुसार, शाळांतील विद्यार्थ्यांना गणवेश, शूज, शैक्षणिक साहित्य शाळेच्या भांडारातून किंवा शाळा सांगेल त्याच दुकानातूनच खरेदी करण्याची सक्ती करता येणार नाही. प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या असे करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. ११ जून २००४चा सरकार निर्णय आणि २९ मार्च रोजीचा सरकार निर्णय यानुसार हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

🥀पाच दिवसांच्या आठवड्याचा प्रस्ताव विचाराधीन नाही*

Updated Apr 25, 2017

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

मुंबईसह राज्यातील शाळा आणि कॉलेजांना पाच दिवसांच्या आठवड्यासंदर्भात सुरू असलेल्या चर्चेला पुन्हा एकदा जोर चढला आहे. सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात चाचपणी सुरू असल्याची माहिती स्पष्ट केल्यानंतर मंगळवारी दिवसभर पुन्हा एकदा याबाबतच्या हालचालींना वेग आला. दरम्यान, याबाबत सध्या कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले असून मुख्याध्यापक संघटनांनी मात्र पाच दिवसांच्या आठवड्याला शाळा अनुकूल असल्याचे जाहीर केले आहे.
राज्यातील शासकीय कार्यालयांसह शाळा, कॉलेजांनाही पाच दिवसांचा आठवडा करावा का, याबाबत चाचपणी सुरू आहे, अशी लेखी माहिती सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाला दिली. त्यानुसार सरकारी कार्यालयांसह शैक्षणिक संस्थांना पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याबरोबरच राज्यातील शाळा आणि कॉलेजांना देखील पाच दिवसांचा आठवडा सुरू करण्यासंदर्भात अभिप्राय मागविण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या माहितीनंतर मंगळवारी पुन्हा एकदा पाच दिवसांच्या आठवड्याबाबत चर्चेला उधाण आले आहे. यासंदर्भात शिक्षण विभागाच्या एका उच्च अधिकाऱ्याकडे विचारणा केली असता त्यांनी याबाबत कोणताही अंतिम निर्णय झालेला नसल्याचे स्पष्टीकरण दिले. अशाप्रकारचा कोणताही प्रस्ताव सध्या शिक्षण विभागाकडे नसून याबाबत सामान्य प्रशासन विभाग फक्त चाचपणी करीत असल्याचे त्यांनी नमूद केले. सामान्य प्रशासन विभागाकडून अहवाल आल्यानंतरच योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी यावेळी नाव न छापण्याच्या अटीवर स्पष्ट केले.

पाच दिवसांच्या आठवड्याच्या निर्णयाचे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ महामंडळाचे प्रवक्ते प्रशांत रेडीज यांनी स्वागत केले आहे. राज्यात अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये पाच दिवसांचा आठवडा आहे. शिवाय गेल्या काही दिवसांपासून शनिवारी वर्गांमध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण कमी झाले आहे. शाळांसाठी पाच दिवसांचा आठवडा झाल्यास त्याचा परिणाम शाळांच्या कामकाजावर होणार नसल्याने आम्ही त्याचे स्वागतच करू, असे त्यांनी स्पष्ट केले.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃