🎯नववी नापासांचीही होणार फेरपरीक्षा*
Updated Apr 28, 2017
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
मुंबईसह राज्यात वाढत असलेल्या नववी नापासांच्या संख्येला पूर्णविराम देण्यासाठी येत्या शैक्षणिक वर्षांपासून नववी नापासांचीही फेरपरीक्षा घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शालेय शिक्षण विभागाने गुरुवारी जाहीर केला. मुख्य म्हणजे यावर्षी जूनमध्ये नववीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा होणार आहे. त्याचबरोबर येत्या जुलैमध्ये नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांची नैदानिक चाचणी घेण्याचा निर्णयही शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.
दहावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल चांगला लागावा यासाठी अनेक शाळांमार्फत नववीच्या निकालावर कात्री मारली जात होती. त्यामुळे नववीत नापासांची संख्या गेल्या काही वर्षांपासून वाढली होती. त्यामुळे या विद्यार्थ्यांचीही दहावीच्या विद्यार्थ्यांप्रमाणे फेरपरीक्षा घेण्याच्या निर्णयावर शिक्षण विभागाने अखेर गुरुवारी शिक्कामोर्तब केले. जूनच्या पहिल्या आठवड्यात ही परीक्षा शाळास्तरावरच घेतली जाणार आहे.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या कार्यक्रमांतर्गत हा निर्णय असून यंदाच्या शैक्षणिक वर्षात नववीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची नैदानिक चाचणी न घेण्यात आल्यामुळे त्यांची पुर्नपरीक्षेचा होणार नाही, असेही गुरुवारी जाहीर केलेल्या निर्णयात स्पष्ट केले. या निर्णयानुसार विद्यार्थ्यांची गणित, विज्ञान आणि इंग्रजी या विषयांच्या नैदानिक चाचण्या येत्या जुलैमध्ये घेण्यात येणार आहेत.
*नववीसाठी सामान्य गणित नाही*
यंदापासून नववीच्या विद्यार्थ्यांची भाषा विषयांची कृतीपत्रिकांद्वारे मूल्यमापन होणार आहे. त्यानुसार अभ्यासक्रम पुर्ननरेचत केलेल्या बदलांनुसार आता नववीसाठी सामान्य गणित या विषयांच्या पर्याय राहणार नसल्याची घोषणा बोर्डाने गुरुवारी रात्री केली. सामान्य गणित ऐवजी बीजगणित आणि भूमिती हीच पाठ्यपुस्तके राहणार आहेत. तर आयसीटी हा विषय स्वतंत्र न राहता आयसीटीचा समावेश सर्व विषयांमधून करण्यात आल्याने त्याचे स्वातंत्र्य पाठ्यपुस्तक नसेल. तर इतर अनेक बदल यावेळी करण्यात आले असून त्यासाठी वेबसाईटवर भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षात नववीत असणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांला जलद गतीने शिक्षण पद्धती देवूनही जर हा विद्यार्थी पुन्हा नापास झाला तर अशा विद्यार्थ्यांची ही पुर्नपरीक्षा घेण्यात येणार आहे. या निर्णयाचे अनेक विद्यार्थी संघटनांनी आणि शिक्षक संघटनांनी स्वागत केले असून विद्यार्थ्यांना नक्कीच याचा फायदा होईल, असा विश्वास यावेळी अनेकांनी व्यक्त केला.
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃
⛳‘जेईई’मध्ये नाशिकची वृंदा राठी देशात प्रथम*
By pudhari | Publish Date: Apr 28 2017
नाशिक : प्रतिनिधी
राष्ट्रीय स्तरावरील ‘जेईई मेन’मध्ये येथील वृंदा नंदकुमार राठी ही मुलींमध्ये देशात पहिली आली आहे. देशातील अव्वल दर्जाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयीन प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली जाते. ‘जेईई मेन’ परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर ‘जेईई अॅडव्हान्स’साठी विद्यार्थी पात्र ठरतात. गेल्या 2, 8 व 9 एप्रिल रोजी देशभरात ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने ‘जेईई मेन’ परीक्षा घेण्यात आली होती. देशभरातील 13 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यांपैकी 2 लाख 20 हजार विद्यार्थी जेईई अॅडव्हान्ससाठी पात्र ठरले आहेत. गुरुवारी (दि. 27) सायंकाळी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत नाशिक येथील वृंदा नंदकुमार राठी या विद्यार्थिनीने 360 पैकी 321 गुण मिळवत देशभरातील मुलींमध्ये प्रथम येण्याचा मान पटकावला. तिला फिजिक्स विषयात 105, केमिस्ट्रीमध्ये 106, तर मॅथेमॅटिक्समध्ये 110 गुण मिळाले. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनचे (सीबीएसई) अध्यक्ष आर. के. चतुर्वेदी यांनी स्वत: दूरध्वनी करून तिला ही बातमी कळवली व तिचे अभिनंदन केले. वृंदा ही नाशिकमधील पेस आयआयटीयन्स अॅकॅडमीची विद्यार्थिनी असून, बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएससी) येथे प्रवेश घेण्याचा तिचा मानस आहे.
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃