twitter
rss

🎋सावित्रीबाई फुले विद्यापीठ देशातील सर्वोत्कृष्टच्या यादीत*

By pudhari | Publish Date: Apr 4 2017

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

शिक्षण क्षेत्रात आघाडीवर असलेले राज्य अशी महाराष्ट्राची ओळख असली तरी दर्जेदार शिक्षणाच्या बाबतीत मात्र महाराष्ट्राचे स्थान नगण्य असल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या यादीवरून दिसून आले आहे. देशातील 10 सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या यादीत एकमेव पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे नाव असून हे विद्यापीठही दर्जेदार शिक्षणाच्या बाबतीत तब्बल 10 व्या क्रमांकावर आहे. पहिल्या 10 विद्यापीठांत प्रदीर्घ परंपरा असलेल्या मुंबई विद्यापीठाचाही समावेश नाही.

दर्जेदार शंभर विद्यापीठांमध्ये बंगळुरूचे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स पहिल्या क्रमांकावर असून दिल्लीचे जेएनयू विद्यापीठ दुसर्‍या, वाराणसीचे बनारस हिंदू विद्यापीठ तिसर्‍या, बंगळुरूची जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर अ‍ॅडव्हान्स्ड रिसर्च ही संस्था चौथ्या, तर कोलकात्याचे जाधवपूर विद्यापीठ पाचव्या क्रमांकावर आहे. यानंतर चेन्‍नईच्या अन्‍ना विद्यापीठ, तेलंगणाचे हैदराबाद विद्यापीठ, दिल्‍ली विद्यापीठ, कोईमतूर-तामिळनाडूचे अमृता विश्‍व विद्यापीठ यांचा क्रमांक लागतो. 10 व्या क्रमांकावर पुण्याचे सावित्रीबाई फुले विद्यापीठ आहे. सर्वंकष गुणवत्तेच्या बाबतीतही बंगळुरूचे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स पहिल्या क्रमांकावर आले असून चेन्‍नई आयआयटी दुसर्‍या, मुंबई आयआयटी तिसर्‍या, खरगपूर आयआयटी चौथ्या, तर दिल्ली आयआयटी पाचव्या क्रमांकावर आहे. यापाठोपाठ जेएनयू विद्यापीठ, आयआयटी कानपूर, गुवाहाटी आयआयटी, रुरकी आयआयटी आणि बनारस हिंदू विद्यापीठ यांचा क्रमांक आहे.

वेगवेगळ्या प्रकारच्या शैक्षणिक सुविधा, निकालाचे प्रमाण, अध्यापनाचा दर्जा, विद्यार्थ्यांशी संवाद/सर्वसमावेशकता, शिक्षणाचा दृष्टिकोन, उत्पादक संशोधन आदी निकषांच्या आधारे ‘नॅक’ समितीकडून शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन करण्यात आले होते. चालूवर्षी आठशे नव्या शिक्षण संस्था या प्रक्रियेत सामील झाल्या होत्या, यंदा वैद्यकशास्त्र आणि विधी शाखेची महाविद्यालयांची यादीही मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आली आहे.

देशातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालयांची यादीही जाहीर करण्यात आली असून त्यात दिल्‍लीचे मिरांडा हाऊस कॉलेज पहिल्या क्रमांकावर आहे. चेन्‍नईचे लोयाला महाविद्यालय दुसर्‍या, दिल्‍लीचे श्रीराम कॉमर्स कॉलेज तिसर्‍या, तिरुचिरापल्लीचे बिशप हेबर महाविद्यालय चौथ्या, तर दिल्लीचे आत्माराम सनातन धर्म महाविद्यालय पाचव्या क्रमांकावर आहे. याखालोखाल कोलकाताचे संत झेवियर्स महाविद्यालय, दिल्‍लीचे लेडी श्रीराम महिला महाविद्यालय, दयालसिंग महाविद्यालय, दीनदयाळ उपाध्याय महाविद्यालय व चेन्‍नईच्या वुमेन्स ख्रिश्‍चन महाविद्यालय यांचा क्रमांक लागतो. 10 नामांकित इंजिनिअरिंग महाविद्यालयांत चेन्‍नईच्या आयआयटीचा पहिला क्रमांक असून मुंबई आयआयटी दुसर्‍या, खरगपूर आयआयटी तिसर्‍या, दिल्ली आयआयटी चौथ्या, कानपूर आयआयटी पाचव्या, रुरकी आयआयटी सहाव्या, गुवाहाटी आयआयटी सातव्या क्रमांकावर आहे. सातव्या क्रमांकावर चेन्‍नईचे अण्णा विद्यापीठ असून नवव्या क्रमांकावर जाधवपूर विद्यापीठ, तर 10 व्या क्रमांकावर हैदराबाद आयआयटी आहे.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

⛳‘शाळासिद्धी’त कोल्हापूर अव्वल*

By pudhari | Publish Date: Apr 3 2017

कोल्हापूर : प्रतिनिधी

शालेय गुणवत्ता सुधारण्यासाठी राबविण्यात आलेल्या ‘शाळासिद्धी’ मानांकनात कोल्हापूर जिल्ह्यातील 3,683 पैकी 610 शाळा ‘अ’ श्रेणीत आहेत. कोल्हापूरने पुन्हा एकदा गुणवत्तेत स्थान अधोरेखित केले असून, राज्यात अव्वल ठरले आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन विद्यापीठ (न्यूपा) दिल्ली, मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी  शाळा मानके व मूल्यांकनाचा (शाळासिद्धी) राष्ट्रीय कार्यक्रम राबविण्यात आला. या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याने 30 मार्च 2016 रोजी शाळासिद्धी उपक्रम हाती घेतला. प्रत्येक शाळेने स्व-सुधारणेसाठी उपाययोजना करणे व त्यासाठी सक्षम पाऊल उचलणे हा उपक्रमाचा उद्देश होता. दिल्ली येथील ‘न्यूपा’ संस्थेने शाळासिद्धी नावाचे राष्ट्रीय संकेतस्थळ निर्माण केले. त्यावर देशातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी स्वयंमूल्यमापन व रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक करण्यात आले होते.

प्राथमिक शिक्षण विभागाने सात मानांकनानुसार तालुका, केंद्र व शाळानिहाय अंमलबजावणीसाठी अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला. यात जिल्हयातील 3683 शाळांनी स्वयंमूल्यमापन केले. यात 610 शाळा ‘अ’श्रेणीत असून टक्केवारीचे प्रमाण (16.55) आहे. याचबरोबर जिल्ह्यातील 1012 शाळा ‘ब’श्रेणी आहेत. उर्वरित 919 ‘क’ श्रेणी व 628 ‘ड’ श्रेणीत आहेत. या स्वयंमूल्यमापनानंतर विद्या परिषद पुणे यांच्याकडून ‘अ’श्रेणीतील शाळांचे बाह्य मूल्यमापन केले जाणार आहे. त्यासाठी 200पेक्षा जास्त निर्धारकांना राज्यभरातून प्रशिक्षीत केले आहेत. ही प्रक्रिया 10 एप्रिलनंतर सुरु होईल. बाह्य मूल्यमापनानंतर पात्र शाळांना ‘एसएस-2016’ हे शासनाकडून प्रमाणपत्र देण्यात येणार असून ते पाच वर्षापर्यंत वैध असेल.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

🌿अल्प मानधनवाढीवर शिक्षकांची बोळवण*

By pudhari | Publish Date: Apr 3 ,2017

मुंबई : प्रतिनिधी

दहावी व बारावी पेपर तपासणार्‍या शिक्षकांच्या मानधनात केवळ 1 रुपयांची वाढ करुन राज्य मंडळाने शिक्षकांची बोळवण केल्याची शिक्षकांची तक्रार आहे.

गेल्या 9 वर्षांपासून बोर्डाच्या पेपर तपासणीसाठीच्या मानधनात कोणतीही वाढ केली गेली नव्हती. त्यावेळी झालेली वाढ अत्यंत तुटपुंजी असल्याने दहावी व बारावी पेपर तपासणार्‍या परीक्षक व नियामक यांच्यामध्ये असंतोष आहे.  बोर्डाने बारावीला प्रविष्ठ होणार्‍या विद्यार्थ्यांकडून 75 रुपये वाढीव परीक्षा शुल्क घेतले आहे. परीक्षक व नियामक यांचे मानधन दुप्पट होईल असे अपेक्षित होते पण  1रुपये एवढी तुटपुंजी  मानधन वाढ करून  राज्य मंडळाने राज्यातील शिक्षकांची चेष्टा केल्याचे मत शिक्षक भारती ज्युनिअर कॉलेज युनिट मुंबईचे अध्यक्ष  प्रा. शरद गिरमकर यांनी व्यक्त केले आहे.

गेल्या पाच वर्षांपासून संघटना मानधनात वाढ करण्याची मागणी करत आहे. शिक्षकांना देण्यात येणारा प्रवास भत्ता हा फक्त 150 रुपये आहे. पुढच्यावर्षी मंडळाने मानधनात योग्य वाढ न केल्यास पेपर तपासणीवर बहिष्कार टाकणार असल्याचे  टीचर डेमोक्रेटिक फ्रण्टचे उपाध्यक्ष राजेश पंड्या यांनी सांगितले.

बर्‍याच वर्षानी ही वाढ केली आहे. मात्र ती समाधानकारक नाही, परीक्षा फी वाढवली आहे. मात्र त्या प्रमाणात मानधनात वाढ केलेली नाही असे मत काँग्रेस शिक्षक सेलच्या महादेव सुळे यांनी सांगितले.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

📱अंगणवाडी सेविकांना मिळणार मोबाइल*

By pudhari | Publish Date: Apr 3 2017

पुणे  : सुनील जगताप

राज्यात कोणत्याच जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट दर्जाचे शालेय पोषण आहार मिळत नसल्याची तक्रार केली जाते. या तक्रारीची दखल केंद्र सरकारने घेतली असून, त्याचा परिणाम म्हणजे अंगणवाडी सेविकांना आता अ‍ॅन्ड्रॉईड मोबाइल देण्यात येणार आहे. हा उपक्रम प्रथमतः राबविण्यात येणार असल्याने प्रायोगिक तत्त्वावर असून, त्यामध्ये राज्यातील आठ जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे.

महिला व बाल विकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत हा उपक्रम राबविला जाणार आहे. शालेय पोषण सुधारणा आणि बळकटीकरण कार्यक्रमांतर्गत हा निर्णय केंद्राने घेतला आहे. पोषण सुधारणा प्रकल्पाची पुनर्रचनाही करण्यात आले आहे. त्यानुसार पूर्वी केंद्र हिस्सा 90 टक्के व राज्याचा 10 टक्के हिस्सा असे निधीचे प्रमाण होते, परंतु त्यामध्ये बदल करून केंद्र हिस्सा 88 टक्के, तर राज्याचा 12 टक्के हिस्सा करण्यात आला आहे. वास्तविक पाहता हा निर्णय 30 एप्रिल 2014 रोजीच घेण्यात आला होता. त्यामध्ये 20 जिल्ह्यातील 317 प्रकल्पात या अंगणवाड्यांचा समावेश करण्यात आला होता; परंतु हा उपक्रम राबविण्यात त्यावेळचे सरकार आणि अधिकारी अपयशी ठरल्याचे चित्र समोर आले आहे.

या प्रकल्पाची पुन्हा नव्याने पुनर्रचना करता त्यामध्ये काही प्रमाणात बदलही करण्यात आलेले आहेत. जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा शालेय पोषण आहार उत्कृष्ट दर्जाचा पोचविण्याच्या द‍ृष्टीने सरकारने पावले उचलल्याचे दिसून येत आहे. त्यामध्ये पारदर्शकता ठेवण्यासाठी केंद्राने आता थेट अंगणवाडी सेविकांनाच अ‍ॅन्ड्रॉईड मोबाइल देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये संबंधित सेविकेला सिम कार्डही देण्यात येणार आहे. त्यामुळे पोषण आहाराबाबतची थेट माहिती संबंधित खात्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांपर्यंत पोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या योजनेचे बळकटीकरण व पोषण सुधारणा कार्यक्रमांतर्गतच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. *त्यामध्ये धुळे, हिंगाली, जालना, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नागपूर, परभणी व सांगली या जिल्ह्यांचा समावेश आहे.* या जिल्ह्यांतर्गत येणार्‍या 103 प्रकल्पांमधील तब्बल 16 हजार 527 अंगणवाडी केंद्रांची निवड या उपक्रमासाठी करण्यात आलेली आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी अंगणवाडी सेविकांना या योजनेअंतर्गत अ‍ॅन्ड्रॉईड बेस्ड मोबाईल फोन व डाटा प्लॅनसाठी सिमकार्ड पुरविण्याकरिता एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्‍तांमार्फत निधीही उपलब्ध करून दिला जाणार आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे ज्या अंगणवाडीमध्ये पोषण आहाराबाबत हलगर्जीपणा दाखविला जात होता त्यावर आता काही प्रमाणात अंकुश येणार आहे. तसेच, आगामी काळात शालेय पोषण आहारामध्ये सुधारणाही होण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

🎯कॉपीबहाद्दर ‘रडार’वर*

By pudhari | Publish Date: Apr 3 ,2017

कोल्हापूर : प्रतिनिधी

दहावी, बारावीच्या परीक्षेत गैरप्रकारांमध्ये सहभागी झालेले कॉपीबहाद्दर बोर्डाच्या ‘रडार’वर आहेत. 6 एप्रिलपासून कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाकडून (बोर्ड) बारावीच्या विद्यार्थ्यांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी, बारावीच्या परीक्षा नुकत्याच संपल्या आहेत. कोल्हापूर विभागात दहावीसाठी 1 लाख 51 हजार व बारावीच्या परीक्षेला 1 लाख 32 हजार विद्यार्थी बसले होते. विभागीय शिक्षण मंडळाने कॉपीमुक्त अभियान राबविले. मात्र, अनेक परीक्षा केंद्रांवर राजरोस गैरप्रकार सुरू होते. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर अनेक विद्यार्थी गैरप्रकारामध्ये सहभागी झाल्याचे दिसून आले.

यावर्षी बारावीच्या परीक्षेला 24 व दहावीच्या परीक्षेला 23 कॉपी प्रकरणे उघडकीस आली. यात कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत प्रमाण जास्त आहे. या सर्व प्रकरणांतील कॉपीबहाद्दरांना 6 एप्रिलपासून बोलावण्यात येणार आहे. यासंदर्भात विद्यार्थ्यांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. शाळेच्या मुख्याध्यापकांनाही याची एक प्रत पाठविली आहे. कॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांना बोलावून त्यांची निवृत्त अधिकार्‍यांकडून चौकशी होईल, जबाब लिहून घेतले जातील. त्यानंतर चौकशी अधिकार्‍यांचा अहवाल तदर्थ समितीसमोर ठेवण्यात येईल. बोर्डाच्या नियमानुसार दोषी आढळल्यास ‘त्या’ विद्यार्थ्यांची चालू परीक्षेची संपादणूक रद्द व पुढील एका परीक्षेस प्रतिबंध अशी शिक्षा सुनावली जाणार असल्याची माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

🌻विद्यार्थ्यांना वेळेत शिष्यवृत्ती द्यावी*

By pudhari | Publish Date: Apr 3 2017

कोल्हापूर : प्रतिनिधी

मागासवर्गीय शिष्यवृत्ती पद्धतीमध्ये ऑनलाईनमुळे होणार्‍या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी संबंधित शाळा, महाविद्यालय व समाजकल्याण विभाग यांच्यात सुसूत्रता आणावी. विद्यार्थ्यांना वेळेत शिष्यवृत्ती द्यावी यासह अन्य मागण्यांसाठी सेक्युलर मुव्हमेंटच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी लाड-पागे समितीच्या शिफारशींचा पुनर्विचार करून सफाई कामगारांच्या नियुक्तीबाबत वारसा पद्धत पुढे चालू ठेवण्याबाबतचा शासन निर्णय रद्द करावा, व्यक्ती वा कुटुंब जास्तीत जास्त किती श्रीमंत असावे याची मर्यादा निश्‍चित करावी, 1989 ते डिसेंबर 2016 या कालावधीतील अ‍ॅट्रॉसिटीच्या संदर्भातील सर्वंकष माहिती देणारी श्‍वेतपत्रिका शासनाने प्रसिद्ध करावी आदी मागण्या करण्यात आल्या. धरणे आंदोलनात संग्राम सावंत, अवंती कवाळे, डॉ. भरत नाईक, प्रा. जयकुमार सरतापे, अजयकुमार देशमुख, प्रमोद पाटील, शिवाजीराव नाईक, पुंडलिक कांबळे, लवकुमार देसाई, वैभव कांबळे, प्रकाश देवकर, दिग्विजय खवनेवाडकर आदी सहभागी झाले होते.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃