twitter
rss

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣6⃣9⃣

*मुलीच्या लग्नात दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना आर्थिक मदत ;*

*पुण्यातील उद्याेजकाचे स्तुत्य पाऊल*

*_पुण्यातील उद्याेजक असलेल्या श्रीधर जाेशी यांनी आपल्या मुलीच्या लग्नात दुष्काळग्रस्त भागातील 10 विद्यार्थ्यांना मेससाठी आणि इतर खर्चासाठी आर्थिक मदत केली आहे._*

By ऑनलाइन लोकमत | Follow  | Published: December 31, 2018

पुणे : मुलीचं लग्न म्हंटलं की माेठ्या थाटामाटात करण्याकडे अनेकांचा कल असताे. पाहुण्यांची बडदास्त ठेवण्यापासून ते चायनीज पासून ते साऊथ इंडियन डिशेसची मेजवाणी ठेवली जाते. परंतु पुण्यातील उद्याेजक असलेल्या श्रीधर जाेशी यांनी आपल्या मुलीच्या लग्नातदुष्काळग्रस्त भागातील 10 विद्यार्थ्यांना मेससाठी आणि इतर खर्चासाठी आर्थिक मदत केली आहे. जाेशी यांनी लग्नातील अनावश्यक खर्च टाळून गरजूंना मदतीचा हात दिला आहे. त्यांच्या या पाऊलाचे सर्वच स्तरातून आता काैतुक हाेत आहे.

    यंदा मराठवाडा भीषण दुष्काळाच्या छायेत आहे. मराठवाड्यातील लाखाे विद्यार्थी पुण्यात शिक्षण घेत आहेत. दुष्काळामुळे पिकं करपल्याने या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचा उदनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पालकांना मुलांना पुण्यात पैसे पाठवणे अशक्य झाले आहे. परिणामी हजाराे विद्यार्थ्यांना अर्धपाेटी राहूनच शिक्षण घ्यावे लागत आहे. या विद्यार्थ्यांच्या मदतीला पुण्यातील सामाजिक कार्यकर्ता कुलदीप आंबेकर पुढे आला. कुलदीपने हेल्पिंग हॅण्ड ही संस्था सुरु करुन दुष्काळीभागातील विद्यार्थ्यांच्या मेसचा आणि इतर खर्च भागविण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून मदत गाेळा करण्यास सुरुवात केली. पाहता पाहता अनेक लाेक मदतीसाठी पुढे आले. जाेशी यांना सुद्धा दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना मदत करायची हाेती. अर्धपाेटी बुद्धी चालत नाही याची त्यांना जाणीव हाेती. त्यांचे मित्र सचिन ईटकर यांच्या मदतीने त्यांना हेल्पिंक हॅण्ड या संस्थेची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी या संस्थेच्या 10 गरजू विद्यार्थ्यांना प्रत्येकी 10 हजार रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला. अशाप्रकारे त्यांनी तब्बल 1 लाख रुपयांची मदत या मुलांना केली.

    जाेशी म्हणाले, मला मुलीच्या लग्नात एखाद्या सामाजिक उपक्रमाला मदत करायची हाेती. याबाबत मी सचिन इटकर यांच्याशी बाेललाे. त्यांनी मला हेल्पिंग हॅण्ड या संस्थेबद्दल सांगितले. त्यानंतर मी 10 मुलांना मदत करण्याचा निर्णय घेतला. मी या आधी शिक्षक म्हणूनही काम केले आहे. त्यामुळे उपाशी पाेटी बुद्धी चालत नाही हे मी पाहिलं आहे.  समाजाचं आपण काहीतरी देणे लागताे या भावनेतून मी मदत करण्याचा निर्णय घेतला. यातून इतरांनाही आपण समाजातील गरजुंना मदत केली पाहिजे हा संदेश मिळणार आहे. तसेच माेठा खर्च करुन लग्न करण्यापेक्षा गरजू विद्यार्थ्यांना मदत केली तर तुम्ही वाजवलेल्या लाखभर रुपयातून त्या मुलांच्या सहा महिन्याच्या मेसचा खर्च वाचविता येताे हा विचारही लाेक यापुढे करतील अशी आशा आहे.

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣6⃣8⃣

*'नासा'च्या कॅलेंडरमध्ये महाराष्ट्राच्या मुलांना मानाचं पान; कव्हर पेजवर भारतीय सुकन्येला स्थान*

*_महाराष्ट्रातील दोन मुलांनी रेखाटलेलं चित्र नासाच्या कॅलेंडरमध्ये_*

By ऑनलाइन लोकमत | Follow  | Published: December 24, 2018

वॉशिंग्टन: नासाच्या वार्षिक कॅलेंडरमध्ये भारतीय मुलांनी मानाचं स्थान पटकावलं आहे. कमर्शियल क्रू कार्यक्रमाच्या अंतर्गत नासानं नववर्षासाठी कॅलेंडर लाँच केलं आहे. यातील सर्व चित्रं लहान मुलांनी रेखाटली आहेत. विशेष म्हणजे या कॅलेंडरच्या कव्हर पेजवर भारतीय कन्येनं रेखाटलेल्या चित्राला जागा देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील दोघांनी काढलेल्या चित्राचादेखील या कॅलेंडरमध्ये समावेश आहे.

नासाचं यंदाचं कॅलेंडर अवकाशातील जीवन या विषयाला वाहिलेलं आहे. या कॅलेंडरचं कव्हर पेजवरील चित्र उत्तर प्रदेशातील नऊ वर्षांच्या दीपशिखानं रेखाटलं आहे. याशिवाय या कॅलेंडरमध्ये आणखी तीन भारतीय विद्यार्थ्यांची चित्रं आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, यातील दोघेजण महाराष्ट्राचे आहेत. राज्यातील 10 वर्षांच्या इंद्रयुद्ध आणि 8 वर्षांच्या श्रीहन यांनी एकत्रितपणे तयार केलेलं चित्र या कॅलेंडरमध्ये आहे. अंतराळातील जीवन आणि तिथं चालणारं काम या विषय केंद्रस्थानी ठेऊन दोघांनी चित्र रेखाटलं आहे.

तमिळनाडूत राहणाऱ्या 12 वर्षांच्या थेमुकिलिमनच्या कलाकृतीलादेखील कॅलेंडमध्ये स्थान देण्यात आलं आहे. त्यानं रेखाटलेलं चित्र अंतराळातील खाद्य यावर आधारित आहे. कॅलेंडरमध्ये स्थान देण्यात आलेली चित्रं अंतराळ विज्ञानाशी नातं सांगणारी आहेत, असं नासानं प्रसिद्धीपत्रात म्हटलं आहे. अंतराळस्थानकात वास्तव्यात असणाऱ्या अंतराळवीरांचं आयुष्य, त्यांचं काम मुलांपर्यंत पोहोचावं, या उद्देशानं कॅलेंडरची निर्मिती करण्यात आल्याची माहिती नासाकडून देण्यात आली आहे.

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣6⃣7⃣

*संघर्षातून द्राक्षशेती फुलविणारी कृषिकन्या -  उमा क्षीरसागर.*

मराठवाडा म्हटलं की पहिलं चित्र डोळ्यासमोर उभा राहतं ते म्हणजे दुष्काळ आणि दुष्काळी परिस्थितीने नाडलेली इथंली माणसं, परंतु अशा दुष्काळी परिस्थितीत देखील या भागात अशी काही माणसं आहेत जी आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर येथील नैसर्गिक परिस्थितीला आव्हान देऊन या भागाची ओळख बदलू पाहत आहेत. खरं तर अशा लोकांकडे पाहून इतरांना देखील जगण्याची आणि काही तरी वेगळं करुन दाखविण्याची उर्जा  व प्रेरणा मिळत राहते. त्यापैकीच एक नाव म्हणजे उमा क्षीरसागर, उमाने आपल्या जिद्द व मेहनतीने मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागात द्राक्षशेती फुलवून येथील तरुण युवक- युवती, महिलांपुढे एक उदाहरण घालून दिले आहे.

खरं तर द्राक्षशेतीचा नाद करणं हे काही येऱ्या- गबाळ्याचं काम नाही असं म्हटलं जातं. वास्तविक त्यात तथ्यही कारण द्राक्षशेती करण्यासाठी प्रचंड मेहनत, जिद्द-चिकाटी सोबतच नैसर्गीक परिस्थितीशी दोन हात करण्याची देखील जबरदस्त तयारी ठेवावी लागते. त्यामुळे अनेक नवखे शेतकरी द्राक्षशेतीच्या नादाला लागण्यापुर्वी हजारवेळा विचार करत असतात. परंतु याला अपवाद राहिलीय ती १९ वर्षाची उमा क्षीरसागर ही तरुणी, पुरुष शेतकऱ्यांना देखील लाजवेल अशा पध्दतीने तिने जिद्द, चिकाटी आणि प्रचंड मेहनतीची तयारी ठेऊन तिने द्राक्षशेतीचा नाद केलाय, आणि तो नाद  या ताराराणी काळजाच्या वाघिणीने  यशस्वी करुन दाखवलाय. आज एक - दोन नव्हे तर तब्बल ६एकर शेती उमा एकटी पिकवतेय.

आज द्राक्षशेतीकडे वळणाऱ्या युवती, महिलांसोबतच, पुरुष शेतकऱ्यांसाठी उमा रोलमॉडेल ठरली आहे. जालना जिल्ह्यातील कडवंची गावात एका साधारण शेतकरी कुटुंबात उमाचा जन्म झाला आहे. सर्वसामान्य समाज मानसिकतेप्रमाणेच वंशाला दिवा मिळेल या अपक्षेने क्षीरसागर कुटुंबात जन्मलेल्या आठ मुलींपैकी सातव्या क्रमांकाची ही मुलगी, खरं तर वडिलांना घरी मुलाची अपेक्षा होती, मात्र ती काही पुर्ण होऊ शकली नाही.  परंतु क्षीरसागर कुटुंबात असणारी मुलाची ही उणीव उमाने भरुन काढली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आज एखाद्या मुलाप्रमाणेच तीने आपल्या घराची व शेतीवाडीची जबाबदारी खांद्यावर पेलली आहे.
घरी आजारी वडील, आई आणि सात बहिणी असा परिवार, वडील नारायण क्षीरसागर यांनी ३० वर्ष दुसऱ्याच्या शेतात सालगडी म्हणून काम केलं. प्रामाणिकपणाने व मेहनतीने काम करुन वडील नारायण यांनी गावात सहा एकर जमीन विकत घेतली. परंतु जमीन घेऊन झाली आणि काही काळातच नारायण क्षीरसागर यांचा अपघात झाला. गुडघे फ्रॅक्चर झाले. तेव्हा ६ एकरांपैकी एका एकरात द्राक्षबाग होती. वडिलांचा अपघात झालेला. आई वृद्धत्वाकडे झुकलेली. बहीण मतिमंद अशा परिस्थितीत शेतीकडे कोण पाहणार ?  शेती ओसाड होऊन पुन्हा गरिबीत जीवन कंठायची वेळ येणार या भितीने उमा चिंताग्रस्त झाली होती.परंतु अशा कठीण परिस्थितीत हातपाय गळू न देता तीने आपल्या कुटुंबाचा आधार होण्यासाठी वयाच्या १३ व्या वर्षात उमाने कंबर कसली. ज्या वयात मुली लाली- पावडरचा डबा हाती घेऊन साजशृंगार करु लागतात, त्या वयात उमाने हाती औषध फवारणीचा गण घेऊन मोठी जबाबदारी सांभाळली.

लहानपणापासून शेती कशी करतात,  पिकं कशी घेतात,  द्राक्षबागेवर कोणती रासायनिक औषधं कशी फवारतात हे सगळं ती बारकाईनं बघत होतीच. सुरुवातीला ताकदीची कामे करताना तिला मोठा त्रास सहन करावा लागला, परंतु  आतापर्यंतचं निरीक्षण आणि वडिलांचं मार्गदर्शन यामुळे उमाचं मनोधैर्य वाढलं. कष्ट कामी आले आणि द्राक्षबाग बहरली. पहिल्या वर्षी तिला द्राक्षशेतीमधून दीड लाखांपर्यंत उत्पन्न मिळालं,त्यामुळे तिचाही आत्मविश्वास आता वाढला, वर्षाकाठचे दीड लाखाचेउत्पन्न तिने ४ लाखांवर नेले. ट्रॅक्‍टरच्या साहाय्याने औषधांची फवारणी करताना ती करीत असलेला औषधांचा अचूक वापर आसपासच्या शेतकऱ्यांसाठी अनुकरणीय असतो. तिने द्राक्षापुरते मर्यादीत न राहता इतर पिकांवर काकडी, कलींगड, खरबूज पिके घेतली. उमा सातत्याने नवनवे प्रयोग शेतीत करीत आहे.  ती याविषयी म्हणते, ‘मी ही शेती सांभाळून नेली पाहिजे अशी वडिलांची इच्छा होती. मग मी ही बाईपणाची झूल झुगारून सहा एकरांचा गाडा स्वतः ओढला. आईवडिलांचा सांभाळ करून वर्षाकाठी ३ ते ४ लाखांचे उत्पन्न मिळवतेय याचे समाधान आहे. शेतीसाठी पाण्याचे योग्य नियोजन केले आहे. शेतीला १ शेततळे, दोन विहिरीच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो, द्राक्षशेतीसाठी संपुर्णपणे ड्रीपचा वापर केला आहे, त्यामुळे मोठ्याप्रमाणात पाण्याची बचत देखील होते.

आज ‘मुली देखील उत्तम शेती करू शकतात हे उमानं दाखवून दिले आहे. उमाने यंदा बारावीची परिक्षा उत्तीर्ण केली असून सध्या ती जालन्यातील जेईएस कॉलेज मध्ये बीएससी अग्रीच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. उमाला शेती क्षेत्रातच करिअर करायचे असून भविष्यात तिला  शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल असे कार्य करायचे आहे.

माझं जे काही अस्तित्व आहे त्याची सुरुवात शेतीतूनच झाली आहे आणि याचा शेवटही शेतीतच होईल असं ती सांगते. दुष्काळाने खचून आत्महत्येचा मार्ग स्विकारण्यापेक्षा शेतकऱ्यांनी संघर्षाची तयारी ठेऊन मेहनत केल्यास आपण सर्व कठीण परिस्थितीवर मात करु शकतो असा ती शेतकऱ्यांना विश्वास देते आहे.

आपल्या मुलीबद्दल नारायणराव आज अभिमानानं बोलतात, “दोन-तीन वर्षांपासून शेतीचं सगळं काम उमा
करते. एखाद्या पुरुषशेतकऱ्यासारखंच ती काम करते. औषध फवारणी असो, पिकाला पाणी देणं सगळंकाही ती करते. मला मुलाची गरज नाही, अशी मुलगी काम करुन राहिली आहे ”, असं नारायणराव कौतुकानं सांगत असतात.

उमाच्या  आईलाही आपल्या या लेकीचा सार्थ अभिमान आहे. ती उमाला आपला मुलगाच मानते. परंतु तिच्या बाईपणाची जाणीव त्यांना आहे. त्यामुळे  आता उमाचं लग्न वय झाल्याने तिच्या लग्नाचीही त्यांना काळजी आहे. आता उमाला स्थळं येऊ लागली आहेत. त्यावर तिची आई सांगते, “उमा सगळी कामं करते. स्वयंपाक करते, झाडलोट करते, दुधं काढते. रात्री बाराला लाईट आली की मोटर चालू करुन पिकांना पाणी देते. तुमचा मुलगा काय करीन ते सगळं आमची मुलगीच करते.

आज या उमाचे "आई-वडिल जरी उमाला वंशाचा दिवा मानून  मुलींन आमचं स्वप्न साकार केलं म्हणून सांगत असले तरी आज समाजात या उमासारख्याच अनेक उमा आहेत, की ज्या संघर्षाच्या परिस्थितीत आपल्या कुटुंबाचा आधार बनून जबाबदारी सांभाळत आहेत. परंतु लहान वयात मोठी जबाबदारी सांभाळत असताना या मुलींचे बालपण आणि स्वप्ने मात्र हरवतात. आज अशा मुलींची स्वप्ने पुर्ण कशी होतील, हे पाहण्याची जबाबदारी शासनाची व आपल्या समाजाची आहे. त्यामुळे समाजातील लोकांनी व शासनाने देखील अशा गुणी व मेहनती मुलींच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकून त्यांच्या स्वप्नांना बळ द्यायला हवं. तरंच  महिला सक्षमीकरणाबरोबरच देशही समृध्द आणि प्रगतीच्या दिशेने झेप घेईल.

पोस्ट - अभिजीत झांबरे,
सदर लेख - जनशांती या दिवाळी अंकात प्रसिध्द झाला आहे.

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

यापूर्वीचे भाग वाचण्यासाठी आपल्या .....

http://guruvarykm.blogspot.in/     

या blog ला भेट द्या..

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣6⃣5⃣

*🚲सायकल दुरूस्ती करून तिन्ही मुलींना उच्च शिक्षण देणाऱ्या सायरा सय्यद..*

साभार - लोकसत्ता,

आई ही मुलांची पहिली गुरू असते त्यानंतर खऱ्या अर्थाने या जगाची ओळख मुलांना होते. आईने केलेल्या काबाड कष्ठामुळे अनेकांना जगण्याची दिशा मिळते, मुलांना नोकरी लागते. ते केवळ आणि केवळ आईने केलेले संगोपण आणि संस्कार यामुळे शक्य असते. अशाच एका माउलीने काबाड कष्ट करून दोन मुलींना संगणक अभियंता तर एकीला उच्चशिक्षित केलेल आहे. सायरा नजीर सय्यद वय-५७ अस या माऊलीचे नाव आहे. त्यांच्या शिक्षणासाठी गेल्या ३६ वर्षांपासून सायरा या सायकल दुरुस्थितीच काम करत आहेत. त्यांनी केलेल्या कष्टाच फळ मिळालं असून आज तिन्ही मुली उच्चशिक्षत आहेत. त्यातील दोघींचं लग्न झालं असून त्या सुखाने संसार करत आहेत.

सायरा नजीर सय्यद वय-५७ रा.पिंपरी-चिंचवड यांनी केलेलं कष्ट त्यांच्या मुलींसाठी खूप महत्वाचं होत. त्यांनी अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतुन मार्ग काढत मुलींना शिक्षण दिले. वहिदा,निलोफर आणि साजिदा अशी त्यांच्या मुलींची नावे आहेत. सायरा यांना एक मुलगा असून तो देखील उच्च शिक्षित आहे.सायरा यांचं १२ पर्यंत शिक्षण झालेलं असून १९८२ ला त्यांचा निकाह नजीर यांच्याशी झाला. निकाहच्या तीन महिन्यानंतर त्यांना सेंट्रल गव्हरमेंट खात्यातील नोकरीचा पत्र आलं. परंतु त्यांच्या सासऱ्यानी नोकरी करण्यास नकार दिला त्यामुळे आलेली संधी निघून गेली. काही वर्षांनी पतीला दुर्धर आजार जडला. यामुळे पतीला काही काम करता येत नव्हतं. मुलींना शिक्षण देण्याचं ठरवलं मात्र पतीचा त्याला विरोध होता. तो जुगारून मुलींना सायरा यांनी शाळेत पाठवलं. त्यासाठी त्यांनी सायकल दुरुस्तीतीचे काम घरासमोरील मोकळ्या जागेत सुरू केले.

व्यवसाय जोमाने चालत होता,महिन्याकाठी हजार रुपये मिळायचे. तेव्हा पंचर ला ६० पैसे घेत असत अस सायरा यांनी सांगितलं. आता तेच पंचर २० रुपयांना झालं आहे. मुलींनी १० पर्यंतच शिक्षण मराठी शाळेत पूर्ण केलं. मुलींनी कोणत्याही गोष्टींसाठी हट्ट केला नाही. मिळेल त्यावर समाधान मानलं. एकेकाळी मुलींनी दुसऱ्यांनी दिलेले जुने कपडे घालून दिवस काढले. हे सांगताना त्यांच्या डोळ्यात पाणी आले. मात्र कधी हेच पाहिजे म्हणून त्रास दिला नाही. आज मला मुलींचा अभिमान वाटतो आहे अस सायरा म्हणाल्या.
मुलींनी अगोदर मिळेल ते काम केलं. पुढील शिक्षणासाठी त्यांनी मेहनत घेतली. त्या आज उच्च शिक्षित असून वहिदा आणि साजीदा या हिंजवडी मधील नामांकित कंपनीत संगणक अभियंता म्हणून कार्यकरत आहेत.तर त्यांची दुसरी बहीण निलोफर मेडिकल व्यवसायात आहे. वहिदा सर्वात लहान असून दोन्ही बहिणीचा निकाह झाला आहे. हे सर्व पाहून आनंद होत आहे. मुलींनी भरभरून प्रेम दिलं आहे. माझ्या कष्टच फळ मिळालंय. शिक्षणाला मरण नाही. शेवटच्या क्षणापर्यंय शिक्षण घ्या अस सायरा म्हणाल्या. सायरा यांच्या पतीच पाच वर्षांपूर्वी निधन झालं. त्यांना खंबीर पाठिंबा देण्याचं काम त्यांनी केलं आहे. व्यवसाय असल्याने पैश्याची कमी पडली नाही. कोणताही व्यवसाय करा,पण तो मन लावून करा त्यात तुम्ही नक्की यशस्वी व्हाल असा सल्ला सायरा यांनी दिला आहे. मुलगी झाली म्हणून नाराज होऊ नका. जोपर्यंत हातपाय चालतात तोपर्यंत काम करत राहणार असून कोणावर अवलंबून राहणार नाही. आता सायकल दुरुसाठीच काम मानसिक त्रासामुळे सायरा यांनी कमी केलं आहे. परंतु आजही त्यांच्यात तेवढीच ऊर्जा आहे. त्यामुळे आई ही ईश्वराच रूप असत ते या माऊलीच्या रूपातून पाहायला मिळत आहेत.

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣6⃣1⃣

*लक्ष्मणराव किर्लोस्कर आणि त्यांची वाडी*

🖋विलास शिंदे 12/09/2018

लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर यांचा जन्म 20 जून 1869 रोजी कर्नाटकात गुर्लहोसूर येथे झाला. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण धारवाड व कलादगी येथे झाले. त्यांनी घरच्यांच्या विरोधास न जुमानता चित्रकलेच्या अभ्यासक्रमाला मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्टस येथे प्रवेश घेतला; दोन वर्षें अभ्यासही केला. मात्र त्यांनी त्यांना त्या क्षेत्रात पुढे रंगांधळेपणामुळे जाता येणार नाही हे लक्षात येताच यंत्र अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण होताच ‘जिजामाता संस्थे’मध्ये बाष्प अभियांत्रिकीचे अध्यापक म्हणून नोकरी सुरू केली. त्यांना उपकरणे खोलून पुन्हा जोडण्याची सवय होती. त्यामुळे ते केवळ शिक्षकी पेशात रमले नाहीत. त्यांनी 1887 मध्ये मुंबईतून सायकली खरेदी करून त्या बेळगावमध्ये वडील बंधू रामण्णा यांच्या मदतीने विकण्यास सुरूवात केली.

त्यांनी इंग्लंडच्या मूळ सायकल उत्पादक कंपनीशी थेट करार केला. दरम्यान, त्यांना भारतीय म्हणून शिक्षण संस्थेत पदोन्नती नाकारली गेली आणि लक्ष्मणराव नोकरीचा राजीनामा देऊन बेळगावला आले. त्यांनी भावासह ‘किर्लोस्कर ब्रदर्स’ अशी कंपनी स्थापन केली. त्यांनी काही वर्षें विविध उद्योग केले. परदेशातून पवनचक्क्या आणूनही विकल्या. ते  लोकांना सायकल चालवण्यास शिकवायचे. त्यांनी लाकडाच्या खिडक्या आणि दरवाजे करून विकले. दरम्यान, त्यांनी औंध संस्थानिकांच्या घरातील कुलदैवताच्या मूर्तीला इलेक्ट्रोप्लेटिंगने मुलामा चढवून देण्याचे काम करून दिले.

त्यांनी भारतासारख्या कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांच्या कामी येतील अशी यंत्रे बनवण्याचे ठरवले. जनावरे वैरणीतील बुडख्याकडील मोठा भाग खात नाहीत आणि तो वाया जातो हे त्यांच्या लक्षात आले. त्यातून त्यांचे पहिले यंत्र तयार झाले ते कडबा कापण्याचे. जनावरांच्या चाऱ्यातून बुडखा वेगळा करणे आणि चाऱ्याचे बारीक तुकडे करून ते जनावरांपुढे टाकणे सोपे झाले. ते यंत्र लोकांच्या पसंतीस उतरले.

त्यांनी स्वत:ची कार्यशाळा उभारली. त्यांनी लोखंडाचे ओतीव नांगर बनवण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांना जागा व भांडवल, दोन्हीची गरज भासू लागली. औंध संस्थानने त्यांना दहा हजार रूपये आणि बत्तीस एकर जमीन देऊ केली. ती जागा म्हणजे संस्थानातील कुंडल या गावाजवळील ओसाड जमीन होती. जमिनीवर निवडूंग आणि सराटा यांचे साम्राज्य. लक्ष्मणरावांनी त्यांचा उद्योग त्या सलग जमिनीवर उभा केला. अडचणी अनंत होत्या. त्यांनी तरीही तेथे एक उद्योगनगरी उभी केली. तो परिसर किर्लोस्करवाडी म्हणून ओळखला जातो. ‘उद्यम नगरी’ किर्लास्कर वाडी!

तिच्या उभारणीचे काम 1910 साली सुरू झाले. ती औद्योगिक वसाहत जमशेदपूरनंतरची देशातील दुसऱ्या क्रमांकाची होती. बिहारमध्ये जमशेटजी टाटा यांच्या पोलाद कारखान्याचे जमशेदपूर उभारले गेले. त्यानंतर कै लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी त्यांच्या स्वत:च्या उद्योगसमूहासाठी स्वतंत्र नगरी उभारण्याचे स्वप्न पाहिले आणि त्यातून  ‘किर्लोस्करवाडी’चा जन्म झाला.

लक्ष्मणरावांनी कारखान्याजवळच कामगारांची राहण्याची सोयही केली. बेळगावहून येणारी जुनी यंत्रे आणि साहित्य कारखान्याच्या स्थळी आणली गेली. कारखाना उभारणीच्या काळात उघड्यावर स्वयंपाक आणि झोपण्यास धर्मशाळा असा सर्व प्रकार होता. कारखान्यात जातिभेदाची दरी तेथूनच मिटण्यास सुरूवात झाली. एकमेकांच्या चुलीशेजारी चुली मांडून स्वंयपाक बनू लागला. आपोआपच मने जुळत गेली आणि एकसंध साथीदारांची टीम त्यातून तयार झाली. निवारा, पाणी, अनंत अडचणी! मात्र निर्धार पक्का होता. हळुहळू उद्योग उभारत गेला आणि उत्पादन सुरू झाले. सुरुवातीला, रेल्वे लाइनच्या गळतीचे पाणी गोळा करून आणले जात असे. नंतर एका शेतकऱ्याच्या विहिरीवरून गाडीतून पाणी आणले जाई. त्यानंतर पाईपलाइनने पाणी आणून एका हौदात सोडले जाई. तेथून कामगार पाणी भरत. पांढऱ्या मातीच्या विटा पाडून घरे बांधून झाली. उत्पादन सुरू झाले. मात्र संकटे काही संपत नव्हती. त्यावर्षी जोरात पाऊस झाला आणि पांढऱ्या मातीत बांधलेली अनेक घरे पडली. कामगार बेघर झाले. पांढऱ्या मातीऐवजी लाल मातीतील विटा पाडणे आवश्यक असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यासाठी लाल मातीची जमीन विकत घेणे आवश्यक होते. त्यासाठी खर्च येणार होता.

लक्ष्मणरावांकडील गंगाजळी संपत आली. पुन्हा पंतप्रतिनिधींकडे पैसे मागण्यास मन तयार होईना. तेव्हा स्नेही रामभाऊ गिडे यांनी दहा हजार रूपयांची आर्थिक मदत दिली. लक्ष्मणरावांनी कारखाना सुरू केला. नांगराचे उत्पादन सुरू झाले. रब्बीच्या पिकानंतर मशागतीचा हंगाम आला आणि नांगराची विक्री जोरात सुरू झाली. नांगर भाड्याने देणे हाही फायद्याचा धंदा आहे हे काही चाणाक्ष मंडळींनी हेरले आणि मालाला उठाव मिळाला.

किर्लोस्करवाडीत सुरुवातीला फक्त पाण्याचे पंप बनत. किर्लोस्करांचे पंप इतके लोकप्रिय झाले की, पुढे ‘पंप म्हणजे किर्लोस्करांचे’ अशी ख्याती झाली. किर्लोस्करांनी त्यांच्या उत्पादनांचा पसारा पुढे वाढवला आणि डिझेल व विजेवर चालणाऱ्या पंपांबरोबर यांत्रिक नांगर, ट्रॅक्टर्स अशा शेती उत्पादनांसाठी लागणाऱ्या यंत्रांचीही निर्मिती तेथे सुरू झाली. कर्मचाऱ्यांना कामावर येण्या-जाण्यासाठी प्रवासाची यातायात करावी लागत नसल्याने त्यांच्या कामाची गुणवत्ताही वाढीस लागली. त्यांनी परिसरात शाळा, क्रीडांगणे, पोस्ट ऑफिस अशा सुविधा निर्माण केल्या आणि जणू एक गावच वसवले! मोठाले रस्ते, टुमदार प्रशस्त घरे, स्वच्छता व कर्मचाऱ्यांसाठी उद्याने, विद्यार्थ्यांसाठी शाळा-वाचनालय अशा सर्व सोयींनी सुसज्ज किर्लोस्करवाडी एक आदर्श नगर ठरले. लक्ष्मणराव स्वत:ही तेथे राहू लागले. त्यामुळे उद्योगाची भरभराट झाली.

लक्ष्मणरावांनी त्यांच्या नांगराच्या मूळ रचनेत बदल करून अधिक चांगला नांगर बनवला. त्यातच 1914 मध्ये पहिले महायुद्ध सुरू झाले आणि कच्चा माल, त्यातही लोखंड मिळेनासे झाले. त्यावर उपाय म्हणून विनावापर पडून असलेले लोखंडी साहित्य वितळवून नांगर बनवण्याचे कार्य सुरू ठेवले. रंगांचा कारखाना काढला. उद्योगाचे भाग भांडवल 1918 पर्यंत पाच लाख रूपये झाले. कंपनी शेअर मार्केटमध्ये उतरली. किर्लोस्कर समूहाने ऊसाचा रस काढण्याचे यंत्र, छिद्र पाडण्याचे मशीन अशी साधने तयार केली. हातपंपांची निर्मिती हे त्यांचे आणखी मोठे साध्य. एकूण वीस विविध प्रकारचे नांगर, दहा प्रकारचे हातपंप यांसह चाळीस उत्पादने कंपनीमार्फत बनू लागली. ती इंग्लंडच्या ऑईल कंपनीबरोबर करार (1920) करणारी पहिली भारतीय कंपनी. त्यातून ऑईल इंजिनचे उत्पादन सुरू झाले. त्या यंत्रामुळे किर्लोस्कर हे नाव समग्र शेतकरी वर्गाच्या हृदयावर कोरले गेले. कंपनी ऑईल इंजिन परदेशी निर्यात 1946 पासून करू लागली. त्यांचे चिरंजीव शंतनुराव ‍यांनी शिक्षण संपताच कंपनीच्या कार्यामध्ये लक्ष घातले. कंपनीचे भागभांडवल 2018 साली अडीच अब्ज डॉलर इतके आहे.

लक्ष्मणरावांना औंध संस्थानचे दिवाण म्हणून 1935 मध्ये नेमण्यात आले. त्यांच्या कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन भारत सरकारने 1969 मध्ये त्यांच्यावर पोष्टाचे तिकीट काढले.  शेती पिकावी, शेतकऱ्यांचे कष्ट कमी व्हावेत म्हणून आयुष्यभर कार्य करणाऱ्या त्या उद्योजकाचे 26 सप्टेंबर 1956 रोजी निधन झाले. त्यांनी कृषी उपकरणांच्या उत्पादनात उभारलेली कंपनी जगातील ऐंशी देशांत योगदान देत आहे.

‘किर्लोस्करवाडी’ हे स्टेशन मध्य रेल्वेवर बनले आहे. तेथे प्रवाशांप्रमाणे मालाची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. किर्लोस्करवाडी मराठी मनाचा काही काळ मानबिंदू बनून राहिली आहे.

🖋- विलास शिंदे

vilasshindevs44@gmail.com

(शेतीप्रगती, ऑगस्ट 2018 वरून उद्धृत)

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_