twitter
rss

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग -*  5️⃣3️⃣6️⃣

 तुम्हीच सांगा झोप कशी येईल ?

*दुर्घटनेनंतर 40 तासांपासून पोकलेन चालवतोय 'किशोर'*

तारिक गार्डन ही पाचमजली इमारत सोमवारी सायंकाळी कोसळली आणि मोठी दुर्घटना घडली. क्षणात अनेकांचे संसार मातीमोल झाले. इमारत कोसळण्याच्या स्थितीत असतानाच काही जण बाहेर पडले.

By ऑनलाइन लोकमत | Follow  | Published: August 26, 2020 02:18 PM | Updated: August 26, 2020 03:36 PM

मयूर गलांडे 

मुंबई - २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मोठा अवाज झाला...आणि हाहाकार माजला... महाड शहरातील तारिक गार्डन इमारत पत्त्यासारखी कोसळल्याने काही काळ परिसरात धुळीचे लोट पसरले होते... कानठळ्या बसणाऱ्या स्फोटाप्रमाणे आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांची धावाधाव सुरू झाली... प्रत्यक्ष घराबाहेर पडल्यानंतर कानी पडला तो फक्त...आक्रोश...काळीज धस्स करणारे दृश्य पाहून अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकला आणि डोळे विस्फारून पाणावले... भेदरलेल्या नागरिकांना काही काळ काहीच सूचले नाही. डोळ्यासमोर मातीचा डोंगर पाहून मदतीसाठी धावपळ सुरू झाली. याच मदतीसाठीचा एक फोन एल अँड टी कंपनीने ठेका घेतलेल्या पोकलेन मालकाच्या कामगारालाही गेला.  

तारिक गार्डन इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेनंतर शोध व बचाव पथके ढिगारा उपसून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींना सोडविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करू लागले. त्यांच्या या प्रयत्नांना गती येण्यासाठी माणुसकीला महत्व देत अविरतपणे न थकता, न झोपता अखंडपणे 40 तास पोकलेन चालवण्याचं, काम किशोरने केलंय. बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यातील उखंडा लिंबडेवी गावचा 24 वर्षीय किशोर सध्या महाडमध्ये पोकलँड चालविण्याचे काम करतो. 24 तारखेच्या सायंकाळी ठेकेदाराचा फोन येताच, किशोरने तत्काळ पॉकलेनला चावी देत तारिक गार्डनच्यादिशेने गिअर टाकला. घटनास्थळी पोहोचताच कामाला सुरुवात केली, तब्बल 40 तासांनंतरही त्याचं काम सुरूच आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या माणसांना बाहेर काढायचंय हे एकच ध्येय त्याच्या डोळ्यासमोर आहे.

आम्ही इमारत कोसळलेल्या जागी पोहचताच काम सुरू केलं, तवापासून माझं काम सुरूचय. सिमेंट-मातीचा ढिग बाजूला सारण्याचं आणि अडकलेल्यानांना अलगदपणे वर काढण्याचं काम मी करतोय. ढिगाऱ्याखाली अडकेल्या माणसांना शोधण्यासाठी पोकलेनचा हँण्डल फिरवताना पोटात गोळा येतो. एखादा माणूस मशिनखाली तर येणार नाही ना, याची काळजी घेत मशिन चालवतोय. कालपासून मी 10 डेडबॉडी ढिगाऱ्याखालून बाहेर काढल्यात, ते बघून लय वाईट वाटतंय. पण साहेब, काल एका 4 वर्षाच्या पोराला जिंवत बाहेर काढल्यानंतर मला लय भारी वाटलं, आनंद झाला होता. तो मुलगा जिवंत बाहेर आल्याचं पाहिल्यानंतर कामाचा ताणच गेला, उलट पुन्हा जोमात काम करायला लागल्याचं किशोरनं लोकमतशी बोलताना सांगितलं.

तू 40 तास झालं सलग काम करतोय मग, जराही झोपला नाहीस का? असा प्रश्न केल्यावर मराठवाड्याच्या टोनमध्ये, झोपच नाही ना आली साहेब... तुम्हीच सांगा झोप कशी येईल हे असं पाहिल्यावर? असा प्रतिप्रश्न किशोरने केला. किशोरच्या प्रश्नावर मी निरुत्तर होऊन त्याला पुढचा प्रश्न केला. कालपासून जेवण तरी केलं का नाही मग? त्यावर तो उत्तरला. दुपारी समोसा आणि रात्री खिचडी खाल्लीय. साहेब मी कामातंय ओ मला जास्त बोलता नाही येणार असंही तो म्हणाला. त्यानंतर, जास्त काही न विचारता ... थँक्यू किशोर प्राऊड ऑफ यु म्हणून फोन ठेवला. अजूनही पोकलेन चालवण्याचं त्याचं काम सुरूच आहे, ते कदाचित उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत असंच चालू राहिल.  

बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यातील उखंडा लिंबडेवी गावचा 24 वर्षीय किशोर गेल्या 6 वर्षांपासून जेसीबी आणि पोकलेन चालवायचं काम करतोय. गावापासून दूर महाडमध्ये सध्या त्याचं काम सुरुय. मालक सांगेत त्या साईडवर जाऊन काम करावं लागत असल्याचं किशोरनं सांगितलं. किशोर बारावी पास असून बीए फर्स्टला अॅडमिशनही घेतलं होतं. मात्र, कामामुळे जमत नसल्यामुळे परीक्षाच दिली नाही. सध्या ज्या मालकाकडे काम करतो, तो मालक महिन्याला 18 हजार रुपये पगार देत होता, गेल्याच महिन्यात 20 हजार रुपये पगार केल्याचंही त्यानं लोकमतशी बोलताना सांगितलं. किशोरचा फोटो पाहिल्यानंतर त्याचे लालबुंद डोळेच त्याच्या सलग 40 तास कामाची साक्ष देत आहेत. त्यामुळेच, एनडीआरएफच्या जवानांप्रमाणे मला किशोरचं कामही तितकंच निष्ठेचं, माणूसकीचं आणि देशसेवेचं वाटतं.     
    
तारिक गार्डन ही पाचमजली इमारत सोमवारी सायंकाळी कोसळली आणि मोठी दुर्घटना घडली. क्षणात अनेकांचे संसार मातीमोल झाले. इमारत कोसळण्याच्या स्थितीत असतानाच काही जण बाहेर पडले. बाहेर पडताना चिचकर यांचा पुतण्या आवेश आणि इतर तरुणांनी सुरुवातीला २० जणांना बाहेर काढले आणि इमारत कोसळली. या दुर्घटनेत इमारतीमधील ८० जण बचावले असून, १४ मृतदेह काढण्यात आले आहेत. मदत कार्याला वेग आला असून, इमारतीचा पडलेला भराव काढण्याचे काम सुरू आहे. एनडीआरएफ टीम, पोलीस, प्रशासनाला परिसरातील नागरिक मदत करत आहेत. तर ज्यांच्या नातेवाइकांचा मृत्यू झाला त्यांचे सांत्वन करत आहेत. या संकट प्रसंगी माणुसकी टिकून असल्याचे अनेकांच्या कृतीतून दिसून येत आहे. त्यापैकीच एक आहे, बीड जिल्ह्याच्या एका छोट्याशा खेड्यातील किशोर लोखंडे 

https://m.lokmat.com/mumbai/you-tell-me-how-sleep-teenager-runs-pokland-40-hours-after-mahad-building-accident-a601/?fbclid=IwAR1DecxgcD5dvoOEavSw-ufM6YZPRIdj-tfIVIQyTWtMRdpRa2iKGKEmS2w


📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -*  
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

यापूर्वीच्या प्रेरणादायी पोस्ट वाचण्यासाठी आमच्या
https://guruvarykm.blogspot.com/?m=1
या ब्लॉगला भेट द्या.

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग -*  5️⃣3️⃣5️⃣

*arjuna award : दोन्ही हात गमावलेले असतानाही अर्जुन पुरस्कार; आता लक्ष्य टोकियो ऑलिम्पिक*

Bhimrao Gawali | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 23 Aug 2020, 03:11:00 PM

_काळ्या मातीत राहून नियतीने दिलेल्या अपंगत्वावर मात करीत पॅरा स्विमिंगमध्ये केलेल्या चमकदार कामगिरीमुळे सुयश जाधवला अर्जुन पुरस्कार मिळाला असून त्याला पुरस्कार मिळाल्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे._

साभार - सुनील दिवाण; पंढरपूर: 

   तो बारा वर्षाचा असताना एका लग्नात विजेचा झटका बसला आणि भाजलेले दोन्ही हात गमवावे लागले... वडील क्रीडाशिक्षक त्यामुळे त्यांना सुयशाला एक आंतराराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू बनवायचे होते मात्र दुर्दैवी अपघातात दोन्ही हात गेल्याने त्यांना सुयशचे आयुष्य संपल्यासारखे वाटू लागले... याची जाणीव छोट्याश्या सुयशाला होती आणि याच जिद्दीतून त्याने वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रवृत्त केले... दोन्ही हात गमावलेले असतानाही बघता बघता जलतरणपटू म्हणून त्याने नावलौकीक कमावला आणि पदकांची कमाईही केली... केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अर्जुन पुरस्कारासाठी सुयशाची निवड झाली आणि वडिलांना स्वप्नपूर्तीची खूप मोठी भेट मिळाली. आता सुयशचे लक्ष आहे टोकियो ऑलिम्पिकचे. या स्पर्धेसाठी पात्र होऊन देशासाठी सुवर्ण पदक मिळविण्यासाठी त्याने कठोर परिश्रमाला सुरुवात केली आहे.

https://maharashtratimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/solapur/arjuna-award-announced-for-swimmer-suyash-jadhav-from-solapur/articleshow/77702608.cms

करमाळा तालुक्यातील भाळवणी हे एक छोटेसे गाव. याच गावातील नियतीने दोन्ही हात गमवाव्या लागलेल्या सुयश जाधवची ही कहाणी... वडिलांच्या इच्छाशक्तीमुळे फोगट भगिनींनी कुस्तीत इतिहास रचला तशीच कहाणी या सुयश जाधवची आहे. करोनामुळे सध्या शेतात राबणाऱ्या सुयश जाधवला भारत सरकारचा अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आणि सोलापूरच्या इतिहासात पहिल्या अर्जुन पुरस्काराची नोंद झाली ती सुयशाच्या रुपाने. पण गावात नाही तर तालुक्यातही अजून कोणाला याबाबत माहितीच नसल्याने जाधव कुटुंब शेतावरील झोपडीत निवांत असलेले पाहायला मिळाले. सुयश जाधव याचे वडील नारायण जाधव हे उत्कृष्ट जलतरणपटू म्हणून नावाजलेले, त्यांनी राज्यात व देशात अनेक पुरस्कार मिळविले मात्र परिस्थितीमुळे त्यांना यात करियर करता आले नाही आणि ते वेळापूर येथील एका शाळेत क्रीडा शिक्षक म्हणून सेवेत दाखल झाले. यावेळी त्यांचा लाडका मुलगा सुयशालाही चांगला जलतरणपटू बनवून त्याला देश-विदेशात खेळण्यासाठी साऱ्या सोयी उपलब्ध करून देण्याचे स्वप्न त्यांनी पहिले. मात्र नियतीला हे मान्य नव्हते आणि २००४ साली विजेचा झटका बसून सुशांतचे दोन्ही हात तोडावे लागले. आता पोहणे सोडा पण त्याने जगायचे कसे हा प्रश्न त्यांच्यासमोर असतानाच एकदा हात गमावल्यावर त्याला सफाईदारपणे पोहताना वडिलांनी पहिले आणि त्याच्यावर मेहनत घेण्यास सुरुवात केली. राज्य सरकारचा शिवछत्रपती पुरस्कार असो, एकलव्य पुरस्कार असो सुयश एकापाठोपाठ एक पुरस्कार आणि पदके मिळावीत गेला. दोन्ही हात गमावल्यानंतर सुयशने राज्य स्तरावर ५० सुवर्ण, राष्ट्रीय स्तरावर ३७ सुवर्ण, आंतरराष्ट्रीय स्तरावर ५ सुवर्ण पदकांसह आजवर १११ पदकांची कमाई केली आहे. २०१६ मध्ये झालेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये सुयशने देशासाठी पहिल्यांदाच सुवर्ण पदक मिळवीत मोठा सन्मान मिळवून दिला होता. ही त्याची कामगिरी पाहून भारत सरकारने सुयशाला यंदाचा अर्जुन पुरस्कार जाहीर करीत त्याच्या जिद्दीला आणि कष्टाला सन्मानित केले आहे.

सध्या करोनामुळे पुणे येथे क्रीडाधिकारी पदावर कार्यरत असणारा सुयश आपल्या शेतातील झोपडीत कुटुंबासमवेत राहतोय. सकाळी उठल्यापासून शेतात वडिलांसोबत काम करणे आणि नियमित व्यायाम या दोनच गोष्टी त्याला सध्या करता येत आहेत. याचठिकाणी त्याला अर्जुन पुरस्कार मिळाल्याची बातमीही समजली आणि कुटुंब या आनंदात हरवून गेले. वडिलांनी पेढा भरावीत आपल्या स्वप्नपूर्तीचा आनंद व्यक्त केला तर सुयशने त्यांच्या चरणावर मस्तक ठेवत त्यांच्या जिद्दीला वंदन केले. पाण्यासोबत गट्टी जमलेला सुयश गेल्या ५ महिन्यापासून टँक व जिम बंद असल्याने पोहण्यापासून दूर गेला आहे. यातच त्याला टोकियो ऑलिम्पिक मध्ये देशाला सुवर्ण मिळवायचे स्वप्न खुणावू लागले आहे. अशावेळी स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाने ६ स्वीमरना दुबईत जाऊन ट्रेनिंगची सोय केली आहे. त्याच पद्धतीने ३ पॅरा स्वीमरसाठीही दुबईमध्ये पोहण्याची सोय करण्याची मागणी सुयशने केली असून यामुळे टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाची सर्वोत्तम कामगिरी होईल अशी अपेक्षा सुयश व्यक्त करतोय.

सोलापूर जिल्ह्यात जाहीर झालेला हा पहिलाच अर्जुन पुरस्कार असून २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते याचे वितरण केले जाणार आहे. काळ्या मातीत राहून नियतीने दिलेल्या अपंगत्वावर मात करीत पॅरा स्विमिंगमध्ये केलेल्या चमकदार कामगिरीमुळे सुयशला अर्जुन पुरस्कार मिळाला आहे. अपंगत्वाचा बाऊ करण्यापेक्षा आपल्यात कोणत्या प्रतिभा आहेत त्याला वाव दिल्यास जीवनात हमखास यश मिळते असा संदेश सुयश आपल्या इतर अपंग बांधवाना देऊ इच्छितो.

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -*  
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

यापूर्वीच्या प्रेरणादायी पोस्ट वाचण्यासाठी आमच्या
https://guruvarykm.blogspot.com/?m=1
या ब्लॉगला भेट द्या.

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग -*  5️⃣3️⃣3️⃣

*लॉकडाऊनमध्ये गावी अडकली, ऑनलाईन शिक्षणासाठी नेटवर्क नाही, डोंगरदऱ्यात झोपडी टाकून तरुणीचा अभ्यास*

साभार- महेश सावंत, टीव्ही 9 मराठी, सिंधुदुर्ग

23 hours ago

_सिंधुदुर्ग : मनात काहीतरी करण्याची जिद्द असेल तर अडथळे फारच शुल्लक ठरतात. संकटावर मात करत आपल ध्येय गाठण्याची महत्त्वकांक्षा इतिहास घडवून जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्गम गावातील एका तरुणीने हे सिद्ध करुन दाखवलं आहे. गावात इंटरनेटची सेवा मिळत नसल्यामुळे सध्या ही तरुणी जंगलात, डोंगरावर भर पावसात झोपडीत दिवसभर अभ्यास करते. ध्येय गाठण्याची तिची जिद्द नक्कीच सलाम करण्यासारखी आहे._

स्वप्नाली सुतार …….ही कणकवली तालुक्यातील दारिस्ते गावातील तरुणी. अभ्यासात हुशार असलेली स्वप्नाली मुंबईत पशुवैद्यकीय अधिकारी होण्याचे शिक्षण घेत आहे. लॉकडाऊनमध्ये ती गावी अड़कली त्यातच तिचे ऑनलाईन शिक्षण सुरु झाले. मात्र गावात साधा फोन लागताना कठीण तिथे इंटरनेट कसं असणार. मात्र ध्येयाने पछाडलेली स्वप्नाली भावाचा मोबाईल घेऊन राना-वनात इंटरनेटसाठी फिरु लागली. घरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगरात तिला पुरेसे इंटरनेट मिळू लागले.

दिवसभर झाडाखाली उभी राहून तिने उन्हाळ्यात अभ्यास केला. मात्र पावसाळ्यात खरा प्रश्न निर्माण झाला. अनेक संकटांवर मात करत पशूपक्षांच्या, निसर्गाच्या सानिध्यात तिचा अभ्यास सुरु आहे.

पावसाळ्यातदेखील तिने छत्री घेऊन अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. तिची अड़चण आणि धडपड तिच्या भावांच्या लक्षात आली. भर डोंगरात तिच्या चार ही भावांनी त्या ठिकाणी छोटीसी झोपडी उभारली. स्वप्नाली दिवसभर या झोपडीतच अभ्यास करते.

लॉकडाऊनच्या आधी आठ दिवस गावी आलेली स्वप्नाली लॉकडाऊनमुळे इथेच अड़कली. अभ्यासात हुशार असणाऱ्या स्वप्नालीला दहावीत 98 टक्के गुण मिळाले होते. तर बारावीत प्रथम येऊन तिने आपलं अभ्यासातील कौशल्य दाखवलं. खरतर तिला डॉक्टर व्हायचं होत. पण गरिबी समोर आली. तिने पशुवैद्यकीय अधिकारी होण्याचं स्वप्न बाळगलं. शेतकरी असणारे तिचे आईवडील हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला नेहमीच प्रोत्साहन देत आले आहेत. जंगलात जाऊन आपल ध्येय गाठण्यासाठी परिश्रम करणाऱ्या आपल्या कन्येचा त्यांना सार्थ अभिमान आहे.

घरातल्या घरात अनेक सुविधा मिळूनसुद्धा शिक्षणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या पाल्यांनी स्वप्नालीचा आदर्श बाळगायला हवा. उपलब्ध स्थितीत सुद्धा प्रयत्न केले तर मार्ग नक्कीच सापडतो हेच स्वप्नालीने संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे. फक्त त्यासाठी जिद्द आणि परिश्रम करण्याची तयारी हवी.

https://www.tv9marathi.com/maharashtra/sindhudurg-girl-swapnali-sutar-studying-in-mountain-due-to-internet-problem-257600.html/amp

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -*  
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

यापूर्वीच्या प्रेरणादायी पोस्ट वाचण्यासाठी आमच्या
https://guruvarykm.blogspot.com/?m=1
या ब्लॉगला भेट द्या.