twitter
rss

*प्रज्ञान बग्गी....🖋️दीपक माळी ©*

_ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून तिचा विश्वातील कोणत्याही मानवी अथवा अमानवी जीवाशी कसलाही संबंध नाही, असा संबंध आढळल्यास तो योगायोग समजावा._

           *प्रज्ञान बग्गी*

🖋️ *दीपक माळी ,*📲९६६५५१६५७२.

*भाग - ६*
*अंतिम भाग*

     पृथ्वीवरील भारत राज्यातही क्षणाक्षणाला उत्कंठा वाढत होती,भारतीय वेळेनुसार शनिवारी पहाटे 1.55 वा.भारतीय चांद्रयानाच्या विक्रम लॅण्डरचे सॉफ्ट लँडिंग करून भारत इतिहास रचणार असे सर्वांना वाटत होते, या घटनेचे साक्षीदार होण्यासाठी भारत राज्याचे प्रधान स्वत: इस्त्रोच्या कंट्रोलरुम मध्ये उपस्थित होते.सोबत भारत आणि शेजारच्या भुटान राज्यातील निवडक मुलेही भविष्याचा वेध घेण्यासाठी कंट्रोलरुममध्ये उपस्थित होती. शेवटची १५ मिनिटे विक्रम लॅण्डरसाठी महत्वाची होती.क्रिकेटच्या सामन्यांसाठी रात्री जागणारे लाखो भारतीय लोक आज पहिल्यांदाच इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी मध्यरात्री जागे होते.

  चांदसा'च्या कंट्रोलरुममध्येही थरार वाढत होता. ऑर्बिटर काही वेळापुर्वी वरुन गेल्यामुळे आता लगेच येण्याचा धोका नव्हता.सैनिकांनी दक्षिण ध्रुवाजवळील सर्व भाग व्यापून टाकला होता.चुकुन जर यानासोबत मानव असतील तर त्यांच्यावर प्रतिघात करण्यासाठी सैनिक सज्ज होते,आपल्यापेक्षा आकाराने दहापट मोठ्या असणाऱ्या मानवाशी मुकाबला करण्यासाठी चांद्रवीर तयार होते कारण हे युद्ध होते आत्मरक्षणासाठी,हे युद्ध होते स्वसंरक्षणासाठी,हे युद्ध होते आपल्या भुमीच्या रक्षणासाठी .. तसेच हे युद्ध साम्राज्यवादी मानवी प्रवृत्तीच्या विरोधात होते,त्यासाठी आपल्या राजपुत्राला साथ देण्यासाठी सर्व चांद्रवीर तयार होते. चंद्रावर मानव आलाच तर मानवाचे शिरस्त्राण आणि प्राणवायूच्या टाक्यांना लक्ष्य करण्यात येणार होते. ज्यामुळे मानव चंद्रावर जगूच शकणार नाही.

   विक्रम लॅण्डर क्रुमगतीने चांद्रभुमीकडे झेपावू लागला होता , इस्त्रो'मध्ये मोठ्या पडद्यावर प्रक्षेपण सुरु होते,निवेदक हिंदीमधून निवेदन करीत सर्वांचा उत्साह वाढवत होते.भारताचे प्रधान इस्त्रो'प्रमुखांची पाठ थोपटत प्रोत्साहन देत होते,एक एक टप्पा पार करीत चांद्रभुमीला स्पर्श करण्यासाठी 'विक्रम' पुढे सरकत होता.

   चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ खिंडीत दबा धरुन बसलेल्या सैनिकाप्रमाणे चांद्रवीर आपली क्षेपणास्त्रे रोखून बसले होते.राजपुत्र चंद्रसेन कंट्रोलरुममधील मॉनिटरवर लॅण्डरचा मार्गावर लक्ष ठेवून होता. विक्रम लॅण्डर  चंद्रापासून 2 कि.मी.अंतर असताना फक्त एकच इशारा होणार होता.विक्रम लॅण्डर हळूहळू खाली येत होता. अखेर तो क्षण आला.विक्रम लॅण्डर चांद्रभुमीपासून बरोबर 2 कि.मी.अंतरावर होता.
राजपुत्राने इशारा केला ...डोळ्याची पापणी लवते ना लवते तोच क्षेपणास्त्राने विक्रम'चा वेध घेतला.पण थोडा अंदाज चुकला. विक्रमचा फक्त अॅन्टेना मोडला गेला.पंख छाटलेल्या पक्ष्याने जीवाच्या आकांताने उडण्याचा प्रयत्न करावा तसा विक्रम'ने स्वत:हून योग्य दिशा पकडण्याचा प्रयत्न केला. राजपुत्राने दुसरा इशारा केला ,क्षणात दुसऱ्या चांद्र-क्षेपणास्त्राने विक्रम लॅण्डर'चा अचूक वेध घेतला. आपली दिशा आणि वेग गमावून ते धप्पकन खाली आले .

    इस्त्रो'मध्ये डोळ्यांत प्राण आणून विक्रम चा मार्गक्रमण पाहण्याऱ्यांना निर्धारीत रेषेपासून विक्रम लॅण्डर किंचित खाली आल्यासारखे जाणवले ,लगेच पुन्हा ते त्या निर्धारीत रेषेवर गेले.पुढच्या क्षणाला ते दिसेनासे झाले. विक्रम लॅण्डरने सिग्नल देणे बंद केले. निवेदकांचा आवाज धीरगंभीर झाला.दोन,चार वाक्ये बोलून त्यांनी निवेदन बंद केले. संशोधक विक्रम'शी संपर्क साधायचा पुन्हा पुन्हा संपर्क करु लागले. विक्रम'कडून कोणताचा सिग्नल येत नव्हता.थोड्यावेळाने इस्त्रोप्रमुख आपल्या जागेवर उठले,भारतीय प्रधानांच्या जवळ जाऊन कानात काही तरी पुटपुटले. शेवटी इस्त्रोप्रमुखांनी 'विक्रम लॅण्डर' शी संपर्क तुटल्याची अधिकृत घोषणा केली,अन् लाखों भारतीयांच्या काळजाचा ठोका चुकला.भारतभरातून इस्त्रोच्या कंट्रोलरुममध्ये आलेल्या चिमुकल्यांचे चेहरे हिरमुसले गेले.

...................................................................

    विक्रम लॅण्डर चांद्रभुमीवर येताच चांद्रवीरांनी त्याला चारीबाजुंनी घेरले . छोटे चांद्रवीर सावधानी बाळगत त्याच्यावर चढू लागले होते , त्यांनी विक्रम लॅण्डरच्या आत प्रवेश करुन त्यामध्ये मानव नसल्याची खात्री केली .तोपर्यंत राजपुत्र चंद्रसेन आपल्या सुरक्षादलासह तेथे पोहचला.चांदसा'च्या शास्त्रज्ञांनी विक्रम लॅण्डर'ची पाहणी केली.विक्रम'चा एक पाय वाकला होता त्यामुळे ते थोडे वाकले होते तसेच त्याची सर्व इंजिने बंद पडल्याने त्याने कार्य करणे बंद केले होते.विक्रम लॅण्डरच्या आत 'प्रज्ञान बग्गी' सुरक्षित होती.शास्त्रज्ञांनी 'प्रज्ञान बग्गी'ची विक्रम लॅण्डरशी जोडलेली सर्व संपर्क यंत्रणा तोडून टाकली. आता 'प्रज्ञान बग्गी' मानवाच्या लहान मुलांच्या खेळण्यातील गाडीप्रमाणे होती. चांद्रवीरांनी 'विक्रम लॅण्डर'चा घसरगुंडी प्रमाणे असणारा जीना खाली सोडला. त्या जिन्यावरुन 'प्रज्ञान बग्गी' हळुवार खाली सोडण्यात आली. 'प्रज्ञान बग्गी' खाली येताच सैनिकांनी 'विक्रम लॅण्डर'वर धुळ टाकण्यास सुरुवात केली . विक्रम लॅण्डर धुळीखाली लपवून टाकला.चांद्रयानाचा ऑर्बिटर काही वेळाने जरी अवकाशातून गेला तरी विक्रम लॅण्डर'वरील धुळीमुळे त्याचे स्थान समजणार नव्हते . त्यानंतर काही तासांनी चंद्राच्या दक्षिण भागात मोठी रात्र सुरु होणार होती. जेणेकरुन विक्रम लॅण्डर' पृथ्वीवासियांना दिसण्याची शक्यता जवळजवळ संपुष्टात आली होती.

     ' प्रज्ञान बग्गी'चा चांद्रभुमीला स्पर्श होताच राजपुत्र चंद्रसेनाने शास्त्रज्ञांना मिठी मारली त्यांच्या डोळ्यांतूनच आनंदाश्रू वाहू लागले. त्याचवेळी इकडे पृथ्वीवर 'इस्त्रो'प्रमुख भारतीय प्रधानांच्या मिठीत अश्रू ढाळत होते.

    आता चांद्रवीरांनी 'प्रज्ञान बग्गी' ओढायला सुरुवात केली होती. सर्वांनी राजपुत्राला ' प्रज्ञान बग्गी'त बसायची विनंती केली. राजपुत्र 'प्रज्ञान बग्गी'त चढून उभा राहिला अन् सर्व चांद्रसैनिकांनी जल्लोष केला .सर्वांनी राजकुमार चंद्रसेनाच्या नावाने जयजयकार करण्यास सुरुवात केली. चांद्रराज्यात ही बातमी गुप्तचरांनी ताबडतोब कळवली. आपल्या राजपुत्राच्या विजयामुळे राजा खुश झाला. संपुर्ण चांद्रराज्य आपल्या राजपुत्राच्या स्वागताला सज्ज झाले.........

   ''युवराज,आपण राजभवनात आलो.'' रक्षकाचे वाक्य ऐकून राजपुत्र भानावर आला. कित्तेक दिवसांचा जीवनपट राजपुत्राच्या डोळ्यासमोरुन सर्रकन निघून गेला. राजपुत्र चंद्रसेनाने 'प्रज्ञान बग्गी'त उभा राहून राजभवनात प्रवेश केला. राजपुत्राने शेवटी आपली प्रतिज्ञा पूर्ण केली.

  राजभवनाच्या समोरील प्रांगणात मधोमध 'प्रज्ञान बग्गी' उभी करण्यात आली. सर्व सैनिक आपापल्या जागेवर जाऊन उभे राहिले. 'प्रज्ञान बग्गी ' राजभवनात येताच राजमाता राजवाड्यातून धावतच बाहेर आली. तिने राजपुत्राच्या गालावरुन हात फिरवला आणि राजपुत्राला कडकडून मिठी मारली. राजमातेचे डोळे लाल झाले होते. राजपुत्र आईचा आशीर्वाद घेऊन महाराजांची भेट घेण्यासाठी महालाच्या दिशेने निघाला.
    राजमातेचे लक्ष प्रांगणात उभी असलेल्या 'प्रज्ञान बग्गी'कडे गेले. ती धावतच 'प्रज्ञान बग्गी'जवळ गेली आणि मनातल्या मनात तिच्या पृथ्वीमातेला हात जोडून म्हणाली , '' हे माते, तू माझ्या इतक्या दिवसांच्या प्रार्थनेची लाज राखलीस. माझ्या मुलाचे मोठ्या संकटातून रक्षण केलेस आणि तुझा प्रसाद म्हणून ही प्रज्ञान बग्गी दिलीस.तुझे आभार मी कसे मानू ? तुझी कृपा अशीच आमच्यावर सदैव राहू दे.''
  
   राजपुत्र चंद्रसेन अभिमानाने राजवाड्याच्या पायऱ्या चढत होता,जाता जाता त्याने मागे वळून पाहिले.राजभवनाच्या प्रांगणात *प्रज्ञान बग्गी*  दिमाखात उभी होती....आणि आकाशातील  *नीलग्रह*  आणखीनचं निळसर दिसत होता......!

.........................................................................................

*समाप्त*

*🖋️ दीपक माळी ©* *📲९६६५५१६५७२*