twitter
rss

*प्रज्ञान बग्गी....🖋️दीपक माळी ©*

_ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून तिचा विश्वातील कोणत्याही मानवी अथवा अमानवी जीवाशी कसलाही संबंध नाही, असा संबंध आढळल्यास तो योगायोग समजावा._

           *प्रज्ञान बग्गी*

*🖋️ दीपक माळी 📲९६६५५१६५७२.*

*भाग - 2*

आपल्या भूमीवरील परग्रहवासियांचे हे निशाण पाहून राजपुत्राला भयंकर राग आला,या घटनेचा बदला घ्यायचाचा असा त्याने निश्चय केला. चांदसा'चे संशोधक या घटनेचे संशोधन करु लागले.त्यांनी त्या मानवांच्या पावलांच्या ठशांचे आणि झेड्यांचे निरीक्षण केले .त्यावरुन ते या निर्णयाप्रत ते आले की हे कृत्य पृथ्वीवरील मानवाचेच असून त्यांनी एकप्रकारे आपल्यावर आक्रमण केले आहे.
  आता हे जर राक्षस आपल्या ग्रहावर आले तर आपले काही खरे नाही, आता फक्त दोघे आले होते ,नंतर शेकड्याने येतील आपली भूमीही वाटून घेतील.येथेही तोच हैदोस मांडतील .यांच्या आगमनाने आपले अस्तित्वच संपून जाईल ,अशी शंका सर्वांना वाटू लागली हे जर टाळायचे असेल तर त्यांचे आक्रमण थोपवावे लागेल.यासाठी आपल्याला गप्प बसून चालणार नाही,त्यांच्याशी सामना करणारी शस्त्रात्रे निर्माण करावयास हवीत.प्रसंगी आपणांसही पृथ्वीवर जावावे लागेल.त्यासाठी पृथ्वीवर जाऊन परत येणारे 'पृथ्वीयान' तयार करावे लागेल.
    राजपुत्राच्या आदेशाने चांदसा'मध्ये पृथ्वीयाना'ची निर्मिती करावयास सुरुवात झाली.पृथ्वीवासियांच्या लक्षात न येणारे,पृथ्वीवरील सर्व रडारयंत्रणांना चुकवून चांद्रभूमीवर सुरक्षित परत येणाऱ्या पृथ्वीयाना'ची निर्मिती करण्यासाठी चांदसा'चे शास्त्रज्ञ दिवसरात्र राबू लागले. शेवटी एका तबकडीचा आकार असणारे, एकाच वेळी दोन चांद्रवासियांना घेऊन जाणारे आणि प्रचंढ वेग असणारे पृथ्वीयान तयार करण्यात चांदसा'चे संशोधक यशस्वी झाले.       
   आता पृथ्वीवर स्वारी करण्याची आपली वेळ होती.आजपर्यंत कथेतून ऐकलेला निळा ग्रह चांद्रवासियांना प्रत्यक्ष अनुभवता येणार होता.शेवटी दिवस ठरला,वेळ ठरली, राजपुत्राने आपल्या सुरक्षा दलातील दोन वीरांची या कामगिरीसाठी निवड केली. धुळीच्या आवरणाच्यावर असलेल्या चांदसा'च्या प्रक्षेपककेंद्रातून पृथ्वीयाना'चे प्रक्षेपण होणार होते. या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी चांद्रराज्याचा राजा स्वत: उपस्थित होता. राजपुत्राने इशारा करताच काऊंटडाऊन सुरु झाले...10,9,8,7,5,4,3,2,1 झूम्.... प्रचंढ वेगाने गरगर फिरत ,तबकडीच्या आकाराच्या पृथ्वीयाना'ने अवकाशात झेप घेतली , काही क्षणातच ते दिसेनासे झाले. इकडे कंट्रोेलरुममधील मॉनिटर वर अचूक दिशेने मार्गक्रमण करणारे पृथ्वीयान दिसत होते ,चांद्रभूमीला दोन प्रदक्षिणा मारुन ते पृथ्वीच्या दिशेने आक्रमण करु लागले , काही क्षणात ते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत प्रवेश करणार होते ,हिच वेळ फार महत्वाची होती ,थोडी जर चूक झाली तर .. आगीच्या ठिणग्यातच रुपांतर होणार.. पण सर्व काही ठरल्याप्रमाणे घडले आणि आईच्या कुशीत शिरणाऱ्या बालकाप्रमाणे पृथ्वीयानाने  पृथ्वीच्या कक्षेत अलगद प्रवेश केला.हळूहळू पृथ्वीवरील पक्ष्यांप्रमाणे ते मुक्त संचार करु लागले. सात खंड ,चार महासागर क्षणार्धात पार करुन हव्या त्या ठिकाणचे मातीचे अन् दगडाचे नमुने गोळा करुन पृथ्वीयान परतीच्या मार्गावर निघाले. काही वेळातच पुन्हा तबकडीने चंद्राच्या कक्षेत प्रवास केला.चांद्रभुमीला दोन प्रदक्षिणा मारुन सावकाश वेग कमी करीत ते अलगद चंद्राच्या पृष्ठभागावर येऊन विसावले .पृथ्वीयाना'च्या छोट्या गोलाकार कप्पीतून अवकाशवीर खाली उतरले. आपल्या या पराक्रमी वीरांचे  राजपुत्राने मिठी मारुन स्वागत केले .
     राजपुत्र त्यांना घेऊन चांदसा'च्या गुप्त कक्षात घेऊन गेला. अवकाशवीरांनी पृथ्वीचे वर्णन करायला सुरुवात केली.पृथ्वीची आजपर्यंत माहित नसलेली माहिती ते सांगू लागले.
पृथ्वीचा आकार,पृथ्वीवरील पाण्याचे प्रमाण,अवाढव्य आकाराची माणसे,त्यांची वेगवेगळी राज्ये,विविध प्राणी ,वनस्पती,मानवामधील विषमता, मानवाने केलेला विध्वंस,प्रदूषण,निसर्गाची हानी, इतर प्राण्यांचा करीत असलेले छळ या सर्वांचे वस्तुनिष्ठ वर्णन अवकाशवीरांनी केले.

...................................................

*क्रमश:*