twitter
rss

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 5⃣1⃣9⃣

*रतन टाटा भावूक!, शेअर केली सफाई कामगाराच्या मुलाची कविता*

Last Updated: Feb 18 2020 5:24PM

मुंबई : पुढारी ऑनलाईन

टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा (वय ८२) हे सध्या सोशल मीडियावर चांगलेच ॲक्टीव्ह झाले आहेत. फेसबुक, इन्स्टाग्राम यावर ते सातत्याने आपल्या खासगी आयुष्यातील रंजक गोष्टी शेअर करत आहेत. दरम्यान, रतन टाटा यांनी एका शाळकरी मुलाची हृदयस्पर्शी कहाणी शेअर केली आहे.

काय आहे रतन टाटा यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत...

ही एक जाहीरात आहे. ज्यामध्ये एक शाळकरी मुलगा वर्गात कविता वाचनाचा कार्यक्रमात भाग घेतो, सर्व मित्र आणि पालक त्याच्यासमोर बसलेले असतात. त्यांच्यासमोर उभा राहिलेला हा गरीब विद्यार्थी आपल्या कविता वाचायला सुरुवात करतो. यात मेरा बाबा देश चलाता है या वाक्यापासून कवितेची सुरुवात होते. उपस्थित पालक, शिक्षक एकमेकांकडे पाहत बसतात.

त्यापुढे जाऊन तो मुलगा सांगतो की, माझे बाबा राजकीय नेते नाहीत, डॉक्टरही नाहीत, पोलिस नाहीत की लष्करात नाहीत. पण, देशातील घाणीशी ते लढतात. घाण साफ करतात. माझ्या वडिलांनी स्वच्छतेचे काम केले नाही तर देश थांबेल, ते जर कामाला गेले नाहीत तर देशातील प्रत्येक घर थांबेल, मुले शाळेत जाणार नाहीत, मंत्री मंत्रालयात जाणार नाहीत, कारण माझे बाबा असे काम करतात जे कोणीच करणार नाही.

एका सफाई कामगाराच्या मुलाने वाचलेली ही कविता सर्वांच्या ह्दयाला स्पर्श करते. कचऱ्याच्या ढिगाऱ्यात, नाल्यात, गटारात जीव धोक्यात घालून तो साफसफाई करत असतो. त्याच्या कामामुळे रोगराई दूर राहण्यास मदत होते. नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण होते. देश सुका आणि ओला कचरा वेगळा करत नाही, माझे बाबा त्या कचऱ्यात उतरतात आणि आजारी पडतात, कधी कधी वाटते माझे बाबा आजाराला हरतील, घरी परतणार नाहीत, त्यामुळे माझ्या बाबांना वाचवा. अशा प्रकारची जाहीरात उद्योजन रतन टाटांनी शेअर केली आहे.

यासंदर्भात बोलताना रतन टाटा म्हणाले....

मुंबईत जवळपास सव्वादोन कोटी लोकसंख्या आहे, फक्त ५० हजार सफाई कामगार मुंबई स्वच्छ ठेवण्याचे काम करतात. अनेक धोकादायक स्थितीत त्यांचे काम सुरू असते. मिशन गरीमा अशा लोकांसाठी सुरक्षा, आरोग्यदायी आणि मानवी काम करण्याची परिस्थिती बदलेल, जेणेकरून त्यांना स्वच्छ वाटेल असे त्यांनी म्हटले आहे.

तसेच सफाई कामगारांवर पडणारा ताण कमी करण्यासाठी लोकांनीही कचऱ्याचं वर्गीकरण करायला हवे असे आवाहनही केले आहे.

https://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/no-one-will-do-work-my-father-does-ratan-tata-shared-story-boy/m/

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -*  
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 5⃣1⃣8⃣

*🇮🇳आगीचे लोळ उठले होते तरी स्वत:चा जीव धोक्यात घालून त्यानं तिरंगा वाचवला!*

6:42 pm7,107 Views1 Min

FacebookTwitterWhatsAppTelegramFacebook Messenger
मुंबई |  मुंबईतील माझगावमध्ये असलेल्या जीएसटी भवनाला भीषण आग लागली आहे. इमारतीच्या आठव्या मजल्यावर ही आग लागली असून अग्निशमन दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. मात्र, यावेळी सर्वांना अभिमान वाटावा अशी घटना घडली आहे.

जीएसटी भवनाला आग लागली असताना शिपाई कुणाल जाधव यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून 9 व्या मजल्यावरील तिरंगा सुरक्षित उतरवला आहे. जाधव यांच्या या कृतीमुळे त्याचं कौतुक होत आहे. जीवाची पर्वा न करता जाधव यांनी तिरंगा सन्मानपूर्वक खाली उतरवला आहे.

कुणाल जाधव हे गेल्या 16 वर्षांपासून जीएसटी भवनात काम करतात. भवनाला आग लागल्यानंतर त्यांनी प्रसंगावधान दाखवत 9वा मजला गाठला आणि ध्वज सन्मानपूर्वक उतरवला. देशप्रेमातून ही कृती केली असल्याची प्रतिक्रिया जाधव यांनी दिली आहे.

https://www.thodkyaat.com/he-save-natinal-flag-mumbai-fire-news/?fbclid=IwAR1cm6c-ovoRrq0ksHp08qsuSNkXMwFXdXWPr2WBufs3LhXaPv6dK3xunow

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -*  
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 5⃣1⃣7⃣

*पुलवामा हल्ला : 'ती' पवित्र माती गोळा करण्यासाठी मराठमोळ्याचा 61 हजार किमी प्रवास*

Last Updated: Feb 14 2020 1:02PM

लेथपारा : पुढारी ऑनलाईन

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता. या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. या घटनेला आज (दि.14) एक वर्ष पूर्ण झाले. या निमित्ताने काश्मीर मधील लेथपूरा येथील सीआरपीएफ कार्यालयाच्या आवारात शहिदांना मानवंदना देण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला एक मराठमोळ्या व्यक्तीला विशेष पाहुणा म्हणून आमंत्रित केले होते. या व्यक्तीला विशेष आमंत्रण मिळण्याचे कारणही विशेष आहे. त्याने 40 शहीद जवानांच्या घरातील माती गोळा करण्यासाठी तब्बल 61 हजार किमीचा प्रावास केला आहे.

सध्या बंगळूरुमध्ये स्थायिक असलेल्या मराठमोळा गायक उमेश गोपिचंद जाधव यांना पुलवामा हल्यातील शहीदांना मानवंदना देण्यासाठी लेथपूरा येथील सीआरपीएफ कार्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमाला विशेष पाहुणे म्हणून बोलावण्यात आले होते. उमेश जाधव यांनी भारतभर 61 हजार किमीचा प्रवास केला होता. या प्रवासात त्यांनी पुलवामा हल्ल्यात जे 40 जवान शहीद झाले होते त्यांच्या घरच्यांची भेट घेतली. याचबरोबर त्यांनी त्या शहिदांच्या घरातील माती गोळा केली आहे.

याबाबत बोलताना जाधव म्हणाले, 'मी पुलवामामध्ये शहीद झालेल्या जवानांच्या घरच्यांना भेटून त्यांचा आशीर्वाद घेता आला हे मी माझे भाग्य समजतो त्याचा मला अभिमान आहे. या हल्ल्यात पालकांनी त्यांचा मुलगा, पत्नीने आपला पती, मुलांनी त्याचे वडील तर मित्रांनी त्यांचा मित्र गमावला आहे. मी त्यांच्या घरातील पवित्र माती, अंत्यविधीच्या ठिकाणची माती गोळा केली आहे.' 

याचबरोबर त्यांनी 'या कामासाठी मी कोणाकडूनही मदत घेतलेली नाही किंवा याला कोणीही प्रायोजक नाही. माझा असं करण्याचा मुख्य उद्देश हा जवानांप्रती आणि त्यांच्या घरच्यांप्रती आदर व्यक्त करणं हाच होता. मी जवळपास 61 हजार किमीचा प्रवास करुन ही पवित्र माती गोळा केली आहे. हे मातृभूमीसाठी आहे.' अशी प्रतिक्रिया हे काम करण्याची प्रेरणा कोठून मिळाली हे सांगितले.

https://www.pudhari.news/news/National/Umesh-Gopinath-Jadhav-from-Maharashtra-He-took-a-61000-km-long-journey-to-meet-pulwama-attack-martyr/m/

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -*  
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 5⃣1⃣6⃣

*अनाथांची माय*

महाराष्ट्र टाइम्स | Updated: 03 Feb 2020.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या, देहविक्रय करणाऱ्या, अत्याचारग्रस्त महिलांच्या, तमाशा कलावंतांच्या, ऊसतोडणी कामगारांच्या आणि अनाथ मुलांचा स्वीकार करून त्यांचा आईच्या मायेने सांभाळ करण्याचे काम बीड जिल्ह्यातील कावेरी दीपक नागरगोजे बीडमध्ये करत आहेत.
बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील आर्वी गावात २०००मध्ये शांतीवन प्रकल्प सुरू करून कावेरी यांनी जवळजवळ ३०० अनाथ मुलांचे पालकत्व स्वीकारले. त्यातील १२५ मुली आहेत. तसेच या प्रकल्पात शाळेची उभारणी करून आज १००० मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांनी पेलली आहे. याशिवाय दहावीनंतर या मुलांना शिक्षणसंधी मिळाव्यात यासाठीही त्या प्रयत्न करत आहेत. मुलांना नवे आयुष्य देण्याबरोबरच अनेक अत्याचारग्रस्त तरुणी-महिलांच्या पुनर्वसनाचे कार्य त्या करत आहेत.
बाबा आमटे यांच्या कार्यातून प्रेरणा घेत कावेरी आणि दीपक नागरगोजे यांनी संस्थेची स्थापना केली. सुरुवातीला कावेरी यांना घरातून प्रचंड विरोध झाला, पण न डगमगता त्यांनी कार्य सुरू ठेवले. प्रारंभी नागरगोजे दाम्पत्याने दोन महिने बीड जिल्ह्याचा प्रत्येक कोपरा पालथा घालून त्याचा सखोल अभ्यास केला. सुरुवातीला कावेरी यांच्या छत्रछायेखाली ५१ मुले होती. कालांतराने संस्था सुरू झाली तेव्हा पुरेसे आर्थिक साहाय्य नव्हते. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असे. अशावेळी कावेरीताईंनी त्यांचे दागिने विकून आर्थिक पाठबळ उभे केले. मुलांच्या पुनर्वसनाबरोबरच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शाश्वत शेतीचा प्रकल्प त्यांनी सुरू केला. १०० शेतकऱ्यांना संघटित करून हा प्रकल्प पूर्णत्वास नेला. पूर्वी बीड जिल्ह्यातील शेतकरी किंवा कामगार यांच्या स्थलांतराचे प्रमाण ८५ टक्के होते ते प्रकल्पानंतर ६० टक्क्यांवर आले आहे. शांतीवनातील मुले उत्तम शिक्षण घेऊन पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर या ठिकाणी स्थायिक झाली आहेत. आता हे कमावते हातही संस्थेला मदत करण्यास पुढे सरसावले आहेत. कावेरीताईंना नातेवाईकांचा विरोध मावळला असून शांतीवनाचे कार्य ६५ एकर जागेत विस्तारले आहे. आज शांतीवनचा परीघ विस्तारत असताना कावेरीताई भक्कमपणे उभ्या राहून अनेकांच्या आधारवड होत आहेत.

https://m.maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/the-mother-of-the-orphans/articleshow/73879910.cms

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -*  
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 5⃣1⃣5⃣

*🎥'या' पठ्‌ठ्याने ई-कचऱ्यापासून बनवले ६०० ड्रोन!*

Last Updated: Feb 01 2020 8:03PM

बेंगलोर : पुढारी ऑनलाईन

भारतात नवनवीन गोष्टी शोधणाऱ्यांची कमी नाही. कधी काय शोधून काढतील याचा नेम नाही. कर्नाटकमधील मांड्या येथील प्रताप एनएम नावाच्या तरुणाने अशीच एक गोष्ट शोधून काढली. प्रतापने ई-कचऱ्यापासून ड्रोन तयार केले आहेत. हे ड्रोन लोकांच्या कामासाठीही येतात. वयाच्या १४ व्या वर्षी प्रतापचा ड्रोनशी संबंध आला. यावेळी त्याने ड्रोन खोलायला व दुरुस्त करायला सुरु केली. वयाच्या १६ व्या वर्षी त्याने ई- कचऱ्यामधून ड्रोन तयार केला. जो आकाशात उडत होता आणि फोटो घेत होता. हे सर्व प्रतापने स्वत:च शिकले. यानंतर त्यांनी म्हैसूरच्या जेएसएस कॉलेजमध्ये बीएससी पूर्ण केली.

प्रतापला ड्रोन वैज्ञानिक म्हणूनही ओळखले जाते. त्याने स्वतः ६०० ड्रोन तयार केले आहेत. एवढेच नव्हे तर सीमाप्रश्नासाठी टेलीग्राफी, वाहतूक व्यवस्थापनासाठी ड्रोन तयार करणे, मानवरहित विमान, बचाव कार्यासाठी यूएव्ही, ऑटोपायलट ड्रोन यासह अनेक प्रकल्पांवर त्याने काम केले आहे. त्याने हॅकिंग रोखण्यासाठी ड्रोन नेटवर्किंगमध्ये क्रिप्टोग्राफीवरही काम केले आहे. जेव्हा कर्नाटकला पूर आला होता, तेव्हा त्याच्याद्वारे बनवलेल्या ड्रोनमुळे आपत्ती निवारण कार्यात खूप मदत झाली होती. ड्रोनच्या मदतीने पीडितांना औषधे व भोजन दिले होते.

प्रतापला आतापर्यंत ८७ देशांनी बोलवले आहे. आंतरराष्ट्रीय ड्रोन एक्सपो २०१८ मध्ये त्याला अल्बर्ट आईनस्टाइन इनोव्हेशन गोल्ड मेडल देण्यात आले. २०१७ मध्ये जपानमधील आंतरराष्ट्रीय रोबोटिक्स प्रदर्शनात त्यांना सुवर्ण आणि रौप्य पदक देण्यात आले. त्यांना दहा हजार डॉलर्स इतकी रक्कमही देण्यात आली. प्रतापने आयआयटी बॉम्बे आणि आयआयएससी येथे व्याख्यानही दिले आहे. तो सध्या डीआरडीओच्या प्रकल्पामध्ये कार्यरत आहे.

ड्रोन बनवताना प्रताप कमीत कमी ई-कचरा तयार होईल याचा प्रयत्न करतो. ते तुटलेले ड्रोन, मोटर्स, कॅपेसिटर आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंमधून ड्रोन बनवतात. यासह, कमी किंमतीत ड्रोन तयार केले जात नाहीत तर ते पर्यावरणपूरक देखील असल्याचे सिद्ध होत आहे.

https://www.pudhari.news/news/National/this-young-man-made-600-drones-with-the-help-of-e-waste/m/

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -*  
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

मूल वाचन शिकताना...

✒ श्री.दीपक माळी.

माणूस हा समाजशील प्राणी आहे,तो समुहात राहतो ,एकमेकांशी आपल्या विचारांची देवाणघेवाण करतो.विचारांचे आदान प्रदान करण्याचे ,आपल्या भावना व्यक्त करण्याचे माध्यम म्हणजे भाषा होय. भाषा फक्त आवाजाचीच नसते तर ती हावभावाची ,चित्रांची आणि खाणाखुणांचीसुद्धा असू शकते पण आवाज ही मनुष्याला मिळालेली सर्वोत्तम देणगी आहे.या आवाजाचा उपयोग करुन माणसाने आपले भाषिक कौशल्य विकसित केले आहे.
   श्रवण,भाषण-संभाषण,वाचन,लेखन ही भाषिक कौशल्ये आहेत.कोणत्याही भाषेचा भाषा शिकण्याचा नैसर्गिक क्रम हा श्रवण,भाषण- संभाषण,वाचन आणि लेखन असाच आहे.

वाचन म्हणजे काय ? -

     वाचन करतो म्हणजे आपण विशिष्ट लिपीमधील खाणाखुणांमध्ये लपलेला अचूक अर्थ काढण्याचा प्रयत्न करीत असतो म्हणजेच असे म्हणता येईल की,
''वाचन म्हणजे लिहिलेल्या अथवा मुद्रित केलेल्या मजकुरातील अर्थ शोधणे होय.''
ही अर्थ शोधण्याची प्रक्रिया आयुष्यभर सुरु असते.

वाचन क्षमतेत मुले मागे का राहतात ?

आजही आपण NAS सारख्या शासकीय किंवा असर सारख्या संस्थेने केलेले सर्वेक्षण पाहिले असता महाराष्ट्रातील विद्यार्थी वाचन कौशल्यात मागे असल्याचे दिसून येते. मग पाचवीच्या विद्यार्थ्यांना मुळाक्षरे वाचता येत नाहीत असा सरसकट आरोप सर्व शिक्षकांच्यावर केला जातो.

वाचन क्षमतेत विद्यार्थी मागे राहण्याची कारणे वेगवेगळी कारणे  असली तरी मुख्य कारण म्हणजे भाषिक कौशल्य योग्य क्रमाने न शिकवणे हे आहे , आपल्याकडे आजही पूर्वप्राथमिक वर्गांसाठी निश्चित असा अभ्यासक्रम नाही तसेच आपल्या पाल्याला लवकर लिहिता आले की त्याचे शिक्षण सुरु झाले असा नवपालकांचा गैरसमज झाला आहे त्यामुळे पूर्वप्राथमिक वर्गांच्यामध्ये तसेच काही ठिकाणी पहिलीच्या वर्गातही लेखन - वाचन - भाषण-संभाषण - श्रवण या उलट क्रमाने शिकविले जाते. त्यामुळे नैसर्गिक क्रम चुकल्यामुळे वाचन क्षमता शिकविण्यापूर्वी आवश्यक असणाऱ्या श्रवण ,भाषण,संभाषण या क्षमता विकसित झालेल्या नसतात.या उलट क्रमाने शिकलेले बहुतांश विद्यार्थी वाचन क्षमतेत मागे राहतात.

वाचन शिकविण्याचा योग्य क्रम

मूल वाचनात मागे राहू नये,आपल्या वर्गातील सर्व मुले अचूक वाचन करु शकतील यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर करावा असा प्रश्न शिक्षकांनाच नाही तर पालकांनाही पडतो . वाचन क्षमता विकसित करण्यासाठी भाषा शिकण्याच्या नैसर्गिक क्रमानेच जायला हवे, याचाच अर्थ वाचनापूर्वी श्रवण ,भाषण- संभाषण या क्षमता विकसित व्हायलाच हव्यात.तसेच त्यापूर्वी अध्यापनपूर्व उपक्रमही घ्यायला हवेत.या क्रमाने कृती आणि उपक्रम घेतले तर नक्कीच विद्यार्थी अचूक वाचन करु शकतील. यासाठी कोणकोणत्या कृती घेता येतील ते पाहूया.

अध्यापनपूर्व कृती

   पहिलीत अथवा पूूर्वप्राथमिक वर्गात येणारे मूल हे घरातून प्रथमच शाळेत येत असते .त्याला एका जागेवर बसायची सवय नसते. त्यासाठी काही कृती सर्वप्रथम घेणे आवश्यक आहेत.
    शेंगा फोडणे,कागद फाडणे,कागद चुरगाळणे,चिखलाचे गोळे करणे इत्यादी कृती जर वर्गात घेतल्या तर मुलाला शाळेत आनंद मिळून ते वर्गात बसू लागेल.
याशिवाय लगोरी,सागरगोट्या,चंपाडाळ्या,जिबली,गोट्या ,विटीदांडू यासारखे पारंपारिक खेळ जर शाळेत घेतले तर अंदाज लावणे,तर्क करणे,तुलना करणे,निष्कर्ष काढणे ,विश्लेषण करणे इ.क्षमता मुलांच्यात वाढीस लागतात.

श्रवण

लहान मुलांना गोष्टी ऐकायला फार आवडतात ,ते आईवडीलांकडून आजीआजोबांकडून गोष्टी ऐकत असतातचं या सवयीचा आपणांस उपयोग करुन घेता येईल, गोष्टींसोबत गाणी व बडबडगीते ऐकविणे,विविध प्राणी,पक्षी,वाहने इत्यादींचे आवाज ऐकवता येतील.तसेच चिमणी भुर्र...कावळा भुर्र ....राजा म्हणतो... या सारखे श्रवणावर आधारित खेळ घेता येतात.

भाषण - संभाषण

     मूल लहान असले तरी त्याला स्व-ची जाणीव असते,त्याला स्वत:विषयी अभिमान असतो त्यामुळे ते स्वत:विषयी,आपल्या कुटुंबाविषयी,आपल्या मित्रांविषयी माहिती सांगू शकते.
  चित्र दाखवून चित्राविषयी माहिती विचारता येईल, एखादे मूल चित्रावरुन गोष्टही सांगू शकेल. आपल्या घरी ऐकलेल्या,शाळेत सांगितलेल्या गोष्टी मूल ऐकून लक्षात ठेवते व नंतर स्वत: आपल्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करते यासाठी त्याला संधी द्यायला हवी.
   विविध गाणी,बडबडगीते,कृतीयुक्तगीते वर्गात दररोज घेतली तर भाषण-संभाषण कौशल्य विकसित होवून वाचनास सुरुवात करता येईल.

वाचन -
      वाचनाची सुरुवात बहुतेक शाळेत अ,आ,इ,ई....अशीच केली जाते ,काही ठिकाणी क्रम बदलून मुळांक्षरांपासूनच सुरुवात केली जाते. असे केल्याने विद्यार्थ्यांना अक्षररुपी अनोळखी जंगलात अचानक सोडल्याप्रमाणे होते त्यामुळे ते गोंधळून जातात. यासाठी वाचनाची सुरुवात चित्रवाचनापासून करावयास हवी.

चित्रवाचन -

    चित्र पाहून चित्राचे नाव सांगणे, चित्रातील कृती ओळखणे, एकसारख्या चित्रांच्या जोड्या लावणे, चित्रातील साम्य-भेद ओळखणे इत्यादी कृती अगोदर चित्रवाचनासाठी देता येतील.
     यांचा सराव झाल्यानंतर अक्षरवाचन न घेता अक्षर हे चित्रचं आहे असे समजून काही कृती घ्याव्यात.उदा.अक्षरकार्डांची गाडी बनवून खेळणे,समान अक्षरांच्या जोड्या लावणे,दिलेल्या अक्षरांपैकी वेगळे अक्षर ओळखणे यासारखे खेळ घेतल्याने मुलांना अक्षरांची भिती वाटणार नाही आणि पुढील वाचनप्रक्रिया सुलभ होईल.

चित्र शब्द वाचन
          चित्रवाचनानंतर चित्र शब्द वाचन घेता येईल उदा.आंब्याचे चित्र दाखवून 'आंबा' हा शब्द दाखवावा, घराचे चित्र दाखवून 'घर' हा शब्द दाखवावा.
    यानंतर चित्र व शब्द दोन्ही एकाच कार्डवर असलेल्या चित्रशब्द कार्डांचा सराव घ्यावा.असा सराव एक आठवडा घेतल्यानंतर फक्त शब्द लिहिलेल्या कार्डांचे वाचन घ्यावे, विद्यार्थी आता शब्द ओळखून वाचू शकतात.पण येथे शब्दवाचन करताना विद्यार्थी 'शब्द' हे चित्र समजून वाचन करतात.त्यातील प्रत्येक अक्षर सुटे ओळखता येईल ही अपेक्षा करु नये.

शब्दचक्राच्या मदतीने अक्षर शिकणे -

     आता आपण शब्दचक्राच्या मदतीने अक्षराची ओळख करुन देणार आहोत,यासाठी आपणांस जे अक्षर शिकवायचे आहे ते फळ्यावर लिहावे व त्याच्याभोवती छोटेसे वर्तुळ करावे.उदा.जर आपणांस 'क' अक्षर शिकवायचे असेल तर 'क' फळ्यावर लिहावे व त्याच्याभोवती छोटेसे वर्तुळ रेखाटावे. नंतर प्रत्येक विद्यार्थ्याला क'पासून सुरु होणारे शब्द विचारावे.विद्यार्थ्यांनी सांगितलेले शब्द फळ्यावरील वर्तुळाभोवती गोलाकारात क्रमाने लिहावे. अशाप्रकारे फळ्यावर 'क'चे शब्दचक्र तयार होईल. जर विद्यार्थ्यांनी सांगितलेल्या शब्दात 'क' नसेल तर तो शब्द फळ्यावर बाजूला लिहावे.त्यानंतर आपण विद्यार्थ्यांनी जे शब्द सांगितले आहेत त्याचे त्यांच्याकडून वाचन करुन घ्यावे.(विद्यार्थ्याने स्वत: कोणता शब्द सांगितला आहे हे त्याला माहित असते त्यामुळे ते शब्द वाचू शकतात.) त्यानंतर प्रत्येक शब्दातील 'क' अक्षराला गोल करावा. जे शब्द फळ्यावर बाजूला लिहिले आहेत ते आपण वाचून दाखवावेत व ते का बाजूला लिहिले ते सांगावे.
   पुन्हा एकदा शब्दचक्रातील सर्व शब्दांचे वाचन घ्यावे, असे प्रकारे 'क' या अक्षराची विद्यार्थ्याला ओळख करुन दिली तर ते मूल ते अक्षर कधीच विसरणार नाही. पुरेसा सरावानंतर नवीन अक्षराची शब्दचक्राच्या सहाय्याने ओळख करुन द्यावी.

अक्षरगटासोबत स्वरचिन्हांची ओळख -

          काही अक्षरांची ओळख करुन दिल्यानंतर अक्षरगटासोबत स्वरचिन्हांची ओळख द्यावी. उदा. क,म,र,ब,घ आणि ा (काना) यांच्यापासून तयार होणारे शब्द तयार करावेत.उदा.काम,मार,बघा,राम,बाक,घार इ.शब्द तयार होतील. या शब्दांचे मुलांच्याकडून वाचन करुन घ्यावे .
      तसेच दोन ,तीन शब्दांचे सोपे वाक्य तयार करता येतील. अशाप्रकारे सर्व अक्षरे आणि स्वरचिन्हे यांचा सराव घेता येईल.

चौदाखडीची ओळख

       मराठी भाषा लिहिण्यासाठी आपण देवनागरी लिपीचा वापर करतो आणि देवनागरी लिपीत आपण जसे बोलतो तसेच लिहितो त्यामुळे English प्रमाणे प्रत्येक शब्दाचे स्पेलिंग लक्षात ठेवावे लागत नाही, एका ध्वनीसाठी एकच चिन्ह वापरल्यामुळे मराठी भाषा वाचण्यास सोपी आहे. मराठी ही भाषा प्रवाही असल्याने मराठीत दुसऱ्या भाषेतील शब्द स्विकारले आहेत .इंग्रजीतील बॅट,बॉल,कॅप् , डॉक्टर, टॅब यासारखे आपण मराठी स्विकारले आहेत ,या शब्दांच्या लेखनासाठी अॅ आणि ऑ या नवीन स्वरांचा आपण समावेश केला आहे त्यामुळे आपली बाराखडी आता चौदाखडी झाली आहे. या नवीन स्वरांची ओळख करुन द्यावी .

जोडाक्षर वाचन

    सोप्या शब्दांचे वाचन झाल्यानंतर पुढील टप्पा म्हणजे जोडाक्षरयुक्त शब्दांचे वाचन होय.या जोडाक्षरांचे योग्य प्रकारे आदर्श वाचन शिक्षकांनी करुन त्याप्रमाणे जोडाक्षरयुक्त शब्दांचा सराव करुन घ्यावा.

शिक्षकांचे आदर्श प्रकट वाचन

शिक्षकांच्या आदर्श प्रकट वाचनामुळे विरामचिन्हांसह वाक्य वाचता येणे,एकाच दृष्टीक्षेपात वाक्य वाचता येणे,स्वराघातासह योग्य गतीने वाचन करता येणे या क्षमता विद्यार्थी आत्मसात करु शकतात.

अवांतर वाचन -
     मुलांच्यात वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी भरपूर अवांतर व पूरक वाचनाची पुस्तके उपलब्ध करुन द्यायला हवीत,गोष्टीची पुस्तके,भरपूर रंगीत चित्रे असलेली पुस्तके दिली तर वाचनाची आवड निर्माण होवू शकते.

     शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचन क्षमता विकसित करण्यासाठी वरील क्रमाने कृती करावयास हव्यात असे मला माझ्या अनुभवावरुन वाटते,सातारा जिल्ह्यातील कुमठे बीटमधील सर्व शाळांमध्ये याचा प्रत्यय आला आहे. आपण ही ' वाचाल तर वाचाल' या उक्तीप्रमाणे अनुभव घेवून वाचन क्षमतेत सर्व विद्यार्थी सक्षम करण्याचा प्रयत्न करावा.
धन्यवाद.....!

✒श्री.दीपक माळी .📲९६६५६१६५७२.
सहाय्यक शिक्षक,
जि.प.शाळा,माळीवस्ती (हरोली)
ता.कवठेमहांकाळ,जि.सांगली.