मूल वाचन शिकताना...
✒ श्री.दीपक माळी.
माणूस हा समाजशील प्राणी आहे,तो समुहात राहतो ,एकमेकांशी आपल्या विचारांची देवाणघेवाण करतो.विचारांचे आदान प्रदान करण्याचे ,आपल्या भावना व्यक्त करण्याचे माध्यम म्हणजे भाषा होय. भाषा फक्त आवाजाचीच नसते तर ती हावभावाची ,चित्रांची आणि खाणाखुणांचीसुद्धा असू शकते पण आवाज ही मनुष्याला मिळालेली सर्वोत्तम देणगी आहे.या आवाजाचा उपयोग करुन माणसाने आपले भाषिक कौशल्य विकसित केले आहे.
श्रवण,भाषण-संभाषण,वाचन,लेखन ही भाषिक कौशल्ये आहेत.कोणत्याही भाषेचा भाषा शिकण्याचा नैसर्गिक क्रम हा श्रवण,भाषण- संभाषण,वाचन आणि लेखन असाच आहे.
वाचन म्हणजे काय ? -
वाचन करतो म्हणजे आपण विशिष्ट लिपीमधील खाणाखुणांमध्ये लपलेला अचूक अर्थ काढण्याचा प्रयत्न करीत असतो म्हणजेच असे म्हणता येईल की,
''वाचन म्हणजे लिहिलेल्या अथवा मुद्रित केलेल्या मजकुरातील अर्थ शोधणे होय.''
ही अर्थ शोधण्याची प्रक्रिया आयुष्यभर सुरु असते.
वाचन क्षमतेत मुले मागे का राहतात ?
आजही आपण NAS सारख्या शासकीय किंवा असर सारख्या संस्थेने केलेले सर्वेक्षण पाहिले असता महाराष्ट्रातील विद्यार्थी वाचन कौशल्यात मागे असल्याचे दिसून येते. मग पाचवीच्या विद्यार्थ्यांना मुळाक्षरे वाचता येत नाहीत असा सरसकट आरोप सर्व शिक्षकांच्यावर केला जातो.
वाचन क्षमतेत विद्यार्थी मागे राहण्याची कारणे वेगवेगळी कारणे असली तरी मुख्य कारण म्हणजे भाषिक कौशल्य योग्य क्रमाने न शिकवणे हे आहे , आपल्याकडे आजही पूर्वप्राथमिक वर्गांसाठी निश्चित असा अभ्यासक्रम नाही तसेच आपल्या पाल्याला लवकर लिहिता आले की त्याचे शिक्षण सुरु झाले असा नवपालकांचा गैरसमज झाला आहे त्यामुळे पूर्वप्राथमिक वर्गांच्यामध्ये तसेच काही ठिकाणी पहिलीच्या वर्गातही लेखन - वाचन - भाषण-संभाषण - श्रवण या उलट क्रमाने शिकविले जाते. त्यामुळे नैसर्गिक क्रम चुकल्यामुळे वाचन क्षमता शिकविण्यापूर्वी आवश्यक असणाऱ्या श्रवण ,भाषण,संभाषण या क्षमता विकसित झालेल्या नसतात.या उलट क्रमाने शिकलेले बहुतांश विद्यार्थी वाचन क्षमतेत मागे राहतात.
वाचन शिकविण्याचा योग्य क्रम
मूल वाचनात मागे राहू नये,आपल्या वर्गातील सर्व मुले अचूक वाचन करु शकतील यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर करावा असा प्रश्न शिक्षकांनाच नाही तर पालकांनाही पडतो . वाचन क्षमता विकसित करण्यासाठी भाषा शिकण्याच्या नैसर्गिक क्रमानेच जायला हवे, याचाच अर्थ वाचनापूर्वी श्रवण ,भाषण- संभाषण या क्षमता विकसित व्हायलाच हव्यात.तसेच त्यापूर्वी अध्यापनपूर्व उपक्रमही घ्यायला हवेत.या क्रमाने कृती आणि उपक्रम घेतले तर नक्कीच विद्यार्थी अचूक वाचन करु शकतील. यासाठी कोणकोणत्या कृती घेता येतील ते पाहूया.
अध्यापनपूर्व कृती
पहिलीत अथवा पूूर्वप्राथमिक वर्गात येणारे मूल हे घरातून प्रथमच शाळेत येत असते .त्याला एका जागेवर बसायची सवय नसते. त्यासाठी काही कृती सर्वप्रथम घेणे आवश्यक आहेत.
शेंगा फोडणे,कागद फाडणे,कागद चुरगाळणे,चिखलाचे गोळे करणे इत्यादी कृती जर वर्गात घेतल्या तर मुलाला शाळेत आनंद मिळून ते वर्गात बसू लागेल.
याशिवाय लगोरी,सागरगोट्या,चंपाडाळ्या,जिबली,गोट्या ,विटीदांडू यासारखे पारंपारिक खेळ जर शाळेत घेतले तर अंदाज लावणे,तर्क करणे,तुलना करणे,निष्कर्ष काढणे ,विश्लेषण करणे इ.क्षमता मुलांच्यात वाढीस लागतात.
श्रवण
लहान मुलांना गोष्टी ऐकायला फार आवडतात ,ते आईवडीलांकडून आजीआजोबांकडून गोष्टी ऐकत असतातचं या सवयीचा आपणांस उपयोग करुन घेता येईल, गोष्टींसोबत गाणी व बडबडगीते ऐकविणे,विविध प्राणी,पक्षी,वाहने इत्यादींचे आवाज ऐकवता येतील.तसेच चिमणी भुर्र...कावळा भुर्र ....राजा म्हणतो... या सारखे श्रवणावर आधारित खेळ घेता येतात.
भाषण - संभाषण
मूल लहान असले तरी त्याला स्व-ची जाणीव असते,त्याला स्वत:विषयी अभिमान असतो त्यामुळे ते स्वत:विषयी,आपल्या कुटुंबाविषयी,आपल्या मित्रांविषयी माहिती सांगू शकते.
चित्र दाखवून चित्राविषयी माहिती विचारता येईल, एखादे मूल चित्रावरुन गोष्टही सांगू शकेल. आपल्या घरी ऐकलेल्या,शाळेत सांगितलेल्या गोष्टी मूल ऐकून लक्षात ठेवते व नंतर स्वत: आपल्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करते यासाठी त्याला संधी द्यायला हवी.
विविध गाणी,बडबडगीते,कृतीयुक्तगीते वर्गात दररोज घेतली तर भाषण-संभाषण कौशल्य विकसित होवून वाचनास सुरुवात करता येईल.
वाचन -
वाचनाची सुरुवात बहुतेक शाळेत अ,आ,इ,ई....अशीच केली जाते ,काही ठिकाणी क्रम बदलून मुळांक्षरांपासूनच सुरुवात केली जाते. असे केल्याने विद्यार्थ्यांना अक्षररुपी अनोळखी जंगलात अचानक सोडल्याप्रमाणे होते त्यामुळे ते गोंधळून जातात. यासाठी वाचनाची सुरुवात चित्रवाचनापासून करावयास हवी.
चित्रवाचन -
चित्र पाहून चित्राचे नाव सांगणे, चित्रातील कृती ओळखणे, एकसारख्या चित्रांच्या जोड्या लावणे, चित्रातील साम्य-भेद ओळखणे इत्यादी कृती अगोदर चित्रवाचनासाठी देता येतील.
यांचा सराव झाल्यानंतर अक्षरवाचन न घेता अक्षर हे चित्रचं आहे असे समजून काही कृती घ्याव्यात.उदा.अक्षरकार्डांची गाडी बनवून खेळणे,समान अक्षरांच्या जोड्या लावणे,दिलेल्या अक्षरांपैकी वेगळे अक्षर ओळखणे यासारखे खेळ घेतल्याने मुलांना अक्षरांची भिती वाटणार नाही आणि पुढील वाचनप्रक्रिया सुलभ होईल.
चित्र शब्द वाचन
चित्रवाचनानंतर चित्र शब्द वाचन घेता येईल उदा.आंब्याचे चित्र दाखवून 'आंबा' हा शब्द दाखवावा, घराचे चित्र दाखवून 'घर' हा शब्द दाखवावा.
यानंतर चित्र व शब्द दोन्ही एकाच कार्डवर असलेल्या चित्रशब्द कार्डांचा सराव घ्यावा.असा सराव एक आठवडा घेतल्यानंतर फक्त शब्द लिहिलेल्या कार्डांचे वाचन घ्यावे, विद्यार्थी आता शब्द ओळखून वाचू शकतात.पण येथे शब्दवाचन करताना विद्यार्थी 'शब्द' हे चित्र समजून वाचन करतात.त्यातील प्रत्येक अक्षर सुटे ओळखता येईल ही अपेक्षा करु नये.
शब्दचक्राच्या मदतीने अक्षर शिकणे -
आता आपण शब्दचक्राच्या मदतीने अक्षराची ओळख करुन देणार आहोत,यासाठी आपणांस जे अक्षर शिकवायचे आहे ते फळ्यावर लिहावे व त्याच्याभोवती छोटेसे वर्तुळ करावे.उदा.जर आपणांस 'क' अक्षर शिकवायचे असेल तर 'क' फळ्यावर लिहावे व त्याच्याभोवती छोटेसे वर्तुळ रेखाटावे. नंतर प्रत्येक विद्यार्थ्याला क'पासून सुरु होणारे शब्द विचारावे.विद्यार्थ्यांनी सांगितलेले शब्द फळ्यावरील वर्तुळाभोवती गोलाकारात क्रमाने लिहावे. अशाप्रकारे फळ्यावर 'क'चे शब्दचक्र तयार होईल. जर विद्यार्थ्यांनी सांगितलेल्या शब्दात 'क' नसेल तर तो शब्द फळ्यावर बाजूला लिहावे.त्यानंतर आपण विद्यार्थ्यांनी जे शब्द सांगितले आहेत त्याचे त्यांच्याकडून वाचन करुन घ्यावे.(विद्यार्थ्याने स्वत: कोणता शब्द सांगितला आहे हे त्याला माहित असते त्यामुळे ते शब्द वाचू शकतात.) त्यानंतर प्रत्येक शब्दातील 'क' अक्षराला गोल करावा. जे शब्द फळ्यावर बाजूला लिहिले आहेत ते आपण वाचून दाखवावेत व ते का बाजूला लिहिले ते सांगावे.
पुन्हा एकदा शब्दचक्रातील सर्व शब्दांचे वाचन घ्यावे, असे प्रकारे 'क' या अक्षराची विद्यार्थ्याला ओळख करुन दिली तर ते मूल ते अक्षर कधीच विसरणार नाही. पुरेसा सरावानंतर नवीन अक्षराची शब्दचक्राच्या सहाय्याने ओळख करुन द्यावी.
अक्षरगटासोबत स्वरचिन्हांची ओळख -
काही अक्षरांची ओळख करुन दिल्यानंतर अक्षरगटासोबत स्वरचिन्हांची ओळख द्यावी. उदा. क,म,र,ब,घ आणि ा (काना) यांच्यापासून तयार होणारे शब्द तयार करावेत.उदा.काम,मार,बघा,राम,बाक,घार इ.शब्द तयार होतील. या शब्दांचे मुलांच्याकडून वाचन करुन घ्यावे .
तसेच दोन ,तीन शब्दांचे सोपे वाक्य तयार करता येतील. अशाप्रकारे सर्व अक्षरे आणि स्वरचिन्हे यांचा सराव घेता येईल.
चौदाखडीची ओळख
मराठी भाषा लिहिण्यासाठी आपण देवनागरी लिपीचा वापर करतो आणि देवनागरी लिपीत आपण जसे बोलतो तसेच लिहितो त्यामुळे English प्रमाणे प्रत्येक शब्दाचे स्पेलिंग लक्षात ठेवावे लागत नाही, एका ध्वनीसाठी एकच चिन्ह वापरल्यामुळे मराठी भाषा वाचण्यास सोपी आहे. मराठी ही भाषा प्रवाही असल्याने मराठीत दुसऱ्या भाषेतील शब्द स्विकारले आहेत .इंग्रजीतील बॅट,बॉल,कॅप् , डॉक्टर, टॅब यासारखे आपण मराठी स्विकारले आहेत ,या शब्दांच्या लेखनासाठी अॅ आणि ऑ या नवीन स्वरांचा आपण समावेश केला आहे त्यामुळे आपली बाराखडी आता चौदाखडी झाली आहे. या नवीन स्वरांची ओळख करुन द्यावी .
जोडाक्षर वाचन
सोप्या शब्दांचे वाचन झाल्यानंतर पुढील टप्पा म्हणजे जोडाक्षरयुक्त शब्दांचे वाचन होय.या जोडाक्षरांचे योग्य प्रकारे आदर्श वाचन शिक्षकांनी करुन त्याप्रमाणे जोडाक्षरयुक्त शब्दांचा सराव करुन घ्यावा.
शिक्षकांचे आदर्श प्रकट वाचन
शिक्षकांच्या आदर्श प्रकट वाचनामुळे विरामचिन्हांसह वाक्य वाचता येणे,एकाच दृष्टीक्षेपात वाक्य वाचता येणे,स्वराघातासह योग्य गतीने वाचन करता येणे या क्षमता विद्यार्थी आत्मसात करु शकतात.
अवांतर वाचन -
मुलांच्यात वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी भरपूर अवांतर व पूरक वाचनाची पुस्तके उपलब्ध करुन द्यायला हवीत,गोष्टीची पुस्तके,भरपूर रंगीत चित्रे असलेली पुस्तके दिली तर वाचनाची आवड निर्माण होवू शकते.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचन क्षमता विकसित करण्यासाठी वरील क्रमाने कृती करावयास हव्यात असे मला माझ्या अनुभवावरुन वाटते,सातारा जिल्ह्यातील कुमठे बीटमधील सर्व शाळांमध्ये याचा प्रत्यय आला आहे. आपण ही ' वाचाल तर वाचाल' या उक्तीप्रमाणे अनुभव घेवून वाचन क्षमतेत सर्व विद्यार्थी सक्षम करण्याचा प्रयत्न करावा.
धन्यवाद.....!
✒श्री.दीपक माळी .📲९६६५६१६५७२.
सहाय्यक शिक्षक,
जि.प.शाळा,माळीवस्ती (हरोली)
ता.कवठेमहांकाळ,जि.सांगली.