twitter
rss

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 5⃣2⃣6️⃣

*अभिमानास्पद ! बाळाला जन्म देण्याआधी 'या' मराठी महिलेने दिला कोरोना टेस्टिंग किटला जन्म*

सकाळ न्यूज नेटवर्क,01.24 PM

_मिनल यांच्या टेस्टिंग किटला कोरोनाची टेस्ट करण्यासाठी मान्यता मिळाली आहे. मायलॅब्सकडून पहिल्या १५० टेस्टिंग किट मुंबई, पुणे, बंगळुरू, गोवा आणि दिल्ली इथल्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्या आहेत._

मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव भारतात वाढत चालला असताना भारताकडे स्वतःची कोरोना चाचणी करण्याची टेस्टिंग किट नाही यावरून भारतावर सतत टीका करण्यात आली. भारताकडे सुसज्ज सोयी नाहीत अशी टीकाही काही लोकांकडून करण्यात आली. मात्र आता या टीकेला सडेतोड उत्तर एका मराठमोळ्या महिलेनं दिलंय. या महिलेनं कोरोना व्हायरस साठीचं पाहिलं-वहिलं पहिली 'मेड इन इंडिया टेस्टिंग किट' बनवलाय.

मिनल दाखवे-भोसले असं या महिलेचं नाव आहे. पुण्यातल्या मायलॅब्स या प्रयोगशाळेत त्या विषाणू वैद्यक शास्त्रज्ञ आहेत. मायलॅब्समध्ये मिनल आणि यांनी कोरोनाच्या या टेस्टिंग किटचा शोध लावला आहे. विशेष म्हणजे मीनल यांनी आपल्या बाळाला जन्म देण्याच्या काही तासांआधीच या टेस्टिंग किटचा शोध लावला. हे टेस्टिंग किट्स बनवण्याचं काम वेळेत पूर्ण करून दाखवलं असं देखील मिनल यांनी म्हंटलंय. 

मिनल यांच्या टेस्टिंग किटला कोरोनाची टेस्ट करण्यासाठी मान्यता मिळाली आहे. मायलॅब्सकडून पहिल्या १५० टेस्टिंग किट मुंबई, पुणे, बंगळुरू, गोवा आणि दिल्ली इथल्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्या आहेत. तसंच हे टेस्टिंग किट तयार करण्याची किंमत अत्यंत कमी आहे. देशात आतापर्यंत परदेशातून कोरोनाच्या टेस्टिंग किट मागवण्यात येत होत्या. परदेशातील एका किटची किंमत तब्बल ४५०० रुपये इतकी होती. मात्र मायलॅब्सनं बनवलेल्या या टेस्टिंग किटची किंमत फक्त १२०० रुपये आहे. त्यामुळे आता कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त रुग्णांची कोरोना तपासणी होऊ शकणार आहे.

"आमचा लढा वेळेशी होता, कारण कोरोना वेगानं पसरत चालला होता, आमची टीम ही टेस्टिंग किट बनवण्यासाठी योग्य ती मेहनत घेत होती आणि मिनल आम्हा सगळ्यांचं मनोधैर्य वाढवत काम करत होती. मायलॅब्स अशा तब्बल १ लाख टेस्टिंग किट एका आठवड्यात बनवू शकते तसाच गरज पडली तर प्रतिआठवडा हा आकडा वाढवूही शकते," असं मायलॅब्सचे संचालक डॉक्टर गौतम वानखेडे यांनी म्हंटलंय. 

*बाळाआधी दिला टेस्टिंग किटला जन्म:*

मिनल यांनी हे टेस्टिंग किट तयार करण्याच्या काही तासानंतरच त्यांच्या बाळाला जन्म दिला. "गरोदर असताना हे काम करणं खूप अवघड होतं, मात्र मला माझ्या देशासाठी काही करून दाखवायचं होतं. माझ्याकडे वेळ नव्हता मात्र हे आव्हान मी स्वीकारलं. मी आणि माझ्या साथीदारांनी मिळून हे टेस्टिंग किट बनवण्याचं काम वेळेत पूर्ण करून दाखवलं. मीनल यांनी बनवल्या टेस्टिंग किट मधून चाचणीचा निष्कर्ष  २-३ तासात देते तर परदेशातून आयात करण्यात आलेल्या किटमधून चाचणीचा निष्कर्ष ५-६ तासात येतो. यामुळे आम्ही जलद आणि उत्तम दर्जाचे किट बनवण्यात यशस्वी झालो आहोत,असं मीनल भोसले यांनी म्हंटलंय.

या टेस्टिंग किटला अन्न आणि औषध प्रशासनाकडून मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आता हे किट्स कोरोना संशयितांच्या चाचण्या करण्यासाठी उपलब्ध करण्यात येणार आहे.

https://www.esakal.com/mumbai/fight-against-corona-virus-marathi-women-minal-bhosale-made-made-india-covid19-testing-kits

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -*  
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 5⃣2⃣5⃣

*सलाम! आई ICU मध्ये असूनही करोनाग्रस्तांसाठी झटत आहेत आरोग्यमंत्री राजेश टोपे*

_राजेश टोपे यांच्या कर्तव्यदक्षतेचं सगळ्यात स्तरातून कौतुक होतं आहे_

लोकसत्ता ऑनलाइन | March 19, 2020 07:10 pm

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आईला ICU म्हणजेच अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं आहे.  राज्यातल्या करोनाग्रस्तांसाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे हे डोळ्यात तेल घालून दिवसभर झटत आहेत. वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांशी चर्चा, मुलाखती, मीडियाशी बोलणं. केंद्रातल्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधणं. करोनाग्रस्त वाढू नयेत यासाठीची खबरदारी घेणं यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्या आईला ICU म्हणजेच अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं आहे. तरीही अथकपणे ते राज्यातील करोनाग्रस्तांची चिंता करत आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या या कर्तव्यदक्षतेचं कौतुक होतं आहे.
राजेश टोपे यांच्या आईवर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. मात्र टोपे यांना आईची भेट घेण्यासाठी मिनिटभराचाही वेळ मिळू शकलेला नाही. याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे करोनाचा महाराष्ट्रात होणारा प्रादुर्भाव. हा प्रादुर्भाव रोखण्याचं मोठं आव्हान राजेश टोपे यांच्यासमोर आहे. अशावेळी त्यांनी त्यांची कौटुंबिक जबाबदारी बाजूला ठेवत जनतेच्या सुरक्षेला जास्त महत्त्व दिलं आहे. त्यांची ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे.
विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जेव्हा राजेश टोपे यांनी पहिल्यांदा करोनाबाबत निवेदन दिले तेव्हाच सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांचे कौतुक केलं. घरातील अडचण विसरुन तुम्ही राज्यासाठी झटत आहात असे गौरवोद्गार सभापतींनी काढले होते. महाराष्ट्र स्टेज ३ मध्ये जाऊ नये यासाठी सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. त्यासाठी राजेश टोपे विशेष प्रयत्न करत आहेत. अनेक कठोर निर्णयही त्यांनी सहजतेने घेतले आहेत. पत्रकारांच्या तिरकस प्रश्नांचीही उत्तरं ते शांतपणे देताना दिसत आहेत.

https://www.loksatta.com/mumbai-news/health-minister-rajesh-tope-mother-in-hospital-but-he-still-doing-efforts-in-maharashtra-against-corona-virus-scj-81-2111457/

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -*  
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 5⃣2⃣4⃣

*पद्मश्री मिळवणारा संत्रेवाला....*

आयुष्यात घडणाऱ्या सामान्य घटनांमधेच आयुष्याला असामान्य वळण देण्याची ताकद असते. अनेकदा सामान्य वाटणाऱ्या ह्या घटना आपल्या आयुष्याला लक्ष्य देतात. अशीच एक घटना मंगळुरु जवळच्या पडउ गावात राहणाऱ्या हरेकाला हजब्बा सोबत घडली. अतिशय गरीबीत दिवस काढणारा हरेकाला आपल्या कुटुंबाची उपजिविका पडउ गावात रस्त्यावर संत्री- मोसंबी विकून चालवत होता. एका छोटी झोपडी सारखं असणार घर आणि बायको सोबत तीन मुलांची जबाबदारी त्याच्या डोक्यावर होती. एकदा अशीच संत्री-मोसंबी रस्त्यावर विकत असताना दोन परदेशी लोकांनी त्याच्याकडे त्या संत्र्यांची किंमत विचारली. न शिकलेल्या हरेकाला ला इंग्रजी भाषेतून ते लोकं काय विचारत आहेत ह्याचा काही अंदाज आला नाही. मान डोलावून त्याने समजण्याचा प्रयत्न केला पण  त्याच्याकडे विकायला असलेल्या संत्र्यांची किंमत तो समोरच्या परदेशी लोकांना सांगू शकला नाही. अखेर ते दोघेही काही न घेता निघून गेले. अतिशय सामान्य वाटणाऱ्या घटनेत विशेष असं काही नव्हतं. पण ह्या घटनेने हरेकाला च्या आयुष्याची दिशाच बदलून गेली.

आपल्याकडे शिक्षण नसल्याने आपण त्या परदेशी गिऱ्हाइकासोबत संवाद करू शकलो नाही. एका चांगल्या गिऱ्हाईकाला आपला विक्रीचा माल चांगला असून फक्त भाषेमुळे, शिक्षणामुळे विकू शकलो नाही ह्याची खंत त्याला मनात खूप खोलवर टोचली. तिकडेच त्याने ठरवलं की आज जे आपल्यासोबत घडलं ते आपल्या गावात कोणासोबत घडायला नको. आज शिक्षणामुळे, भाषेमुळे तो मागे राहिला होता त्याच गोष्टींना त्याने आपलं लक्ष्य बनवलं. शिक्षणापासून आपल्या गावात कोणीच वंचित राहू नये म्हणून त्याने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला. दिवसाला अवघे १५० रुपये मिळवणाऱ्या हरेकाला च्या डोक्यावर तीन मुलांची जबाबदारी होती. पण तो मागे हटला नाही. त्याचा हा निर्णय त्याच्या बायकोला रुचला नाही. आपल्या मुलांच्या वाट्याचे पैसे शाळेसाठी देण्याची कल्पनाच तिला सहन होतं नव्हती. पण हरेकाला आपल्या निर्णयावर ठाम होता. 'थेंबे थेंबे तळे साचे' तसं त्याने एक- एक रुपया शाळेसाठी वाचवायला सुरवात केली.

"मुश्किलें बहोत थी, लेकिन कुछ कर जाने का जोश उन मुश्किलों से लाख गुना ज्यादा था"...

कदाचित हरेकाला च्या मनात तोच जोश होता. १९९९ साली हरेकाला ने मदरश्याच्या बाजूला एक छोटी शाळा सुरु केली. त्या वेळेस फक्त २८ मुलं त्याच्या शाळेत आली. गरीबीत असलेल्या कोणत्याही मुलाला त्याची जात-पात, धर्म न बघता त्याने आपल्या शाळेत प्रवेश दिला. त्याला हे पक्के ठाऊक होतं की आज न उद्या आपल्याला ही शाळा मोठ्या जागेत न्यावी लागणार. त्यासाठी त्याने प्रत्येक रुपया वाचवायला सुरवात केली. वाचवलेल्या पैश्यातून त्याने जमिनीचा एक तुकडा २००४ साली विकत घेतला पण शाळा उभी करण्यासाठी लागणारा पैसा त्याच्याकडे नव्हता. त्याने लोकांकडे ह्या कार्यासाठी मदत मागितली. सरकारी कार्यालय ते प्रत्येक पक्षाचे राजकारणी सगळ्यांचे उंबरठे त्याने झिजवले. आजूबाजूच्या श्रीमंत व्यक्तींकडे त्याने शाळेसाठी मदतीची याचना केली. अनेकवेळा वाईट अनुभव आले. एकदा तर एका व्यक्तीने त्याच्या बंगल्यात शिरला म्हणून आपला कुत्रा त्याच्या आंगावर सोडला. पण ह्या सगळ्याने हरेकाला थांबला नाही. त्याच लक्ष्य त्याला खुणावत होतं.

ह्या सगळ्या प्रवासात हरेकाला ने शाळा उभारण्या इतपत पैसे उभे केले आणि बघता बघता एका शाळेची स्थापना त्याने केली. त्याच्या ह्या जिद्दीचं कौतुक सगळीकडे झालं आणि त्याचा प्रवास मिडियाच्या नजरेत आला. CNN IBN ने त्याला ‘Real Heroes’ चा पुरस्कार दिला. जवळपास ५ लाख रुपये रोख ह्या बक्षिसाच्या रूपात त्याला मिळाले. हरेकाला ने सगळ्याचे सगळे पैसे शाळेच्या उभारणीत लावले. एका झोपडीपासून सुरु झालेली शाळा आता १.५ एकराच्या परीसरात विस्तारली. जवळपास १५० गरीब मुलांच्या शिक्षणाची सोय हरेकाला ने केली.

एकीकडे १५० मुलांची शाळा उभारणाऱ्या हरेकालाकडे स्वतःच्या घराचं छप्पर दुरुस्त करण्यासाठी पैसे नव्हते. हिच बाब त्याला आतून पोखरत होती. समाजासाठी आपलं सगळं काही देणाऱ्या हरेकाला साठी आता समाजाने काही करण्याची पाळी होती. एका समाजसेवी संस्थेने हरेकाला ला स्वतःच घर बांधून दिलं. हरेकाला च्या ह्या प्रवासाचा अनुभव अनेकांना प्रेरणा देणारा ठरला. त्याच्यावर अनेक पुरस्कारांचा वर्षाव झाला. ह्या सगळ्यातून मिळालेले सर्व पैसे शाळेला अजून मोठं करण्यासाठी हरेकाला ने दान दिले. त्याच्या ह्या असाधारण कामाची दखल भारत सरकारने घेताना त्याला २०२० च्या पद्मश्री सन्मानाने गौरवांकित केलं.

https://m.facebook.com/photo.php?fbid=10157430489334794&id=786749793&set=a.10150829407484794&refid=52&__tn__=EH-R

'पद्मश्री' सारखा सन्मान मिळाल्यावर ही हरेकाला आपल्या लक्ष्यापासून हटला नाही. शाळेला मोठं करण्याचं त्याच काम आजही अव्याहतपणे सुरु आहे. खिशात एक दमडी नसताना शाळा उभारण्याचं स्वप्न बघून प्रत्येक गरीब मुलाला शिक्षणाच्या पायरीवर नेणाऱ्या हरेकाला हजब्बा ह्यांच कार्य एव्हरेस्ट इतकं मोठं आहे. त्याचं निष्पक्ष कार्य हे भारतातील प्रत्येकाला ज्या समाजातून आपण येतो त्या समाजाला काहीतरी परत देण्यासाठी नक्कीच उद्युक्त करेल. शिक्षण हे सर्वांसाठी, सर्वव्यापक असावं असं आपल्या साध्या वागणुकीतून, कर्तृत्वातून दाखवून देणाऱ्या हरेकाला हजब्बा ह्यांना माझा कडक सॅल्यूट आणि साष्टांग नमस्कार.

फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -*  
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 5⃣2⃣3⃣

*तब्बल ८८ प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या पोलिसाचा गृहमंत्र्यांकडून सत्कार*

Last Updated: Mar 16 2020 7:54AM

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

बोट अपघातातून प्रसंगावधान राखत ८८ प्रवाशांचे प्राण वाचविण्यात मोलाची भूमिका पोलिस नाईक प्रशांत घरत बजावली होती. या कार्यामुळे ते अवघ्या महाराष्ट्राचे कौतुकास पात्र ठरलेले होते. याची दखल घेत पोलिस नाईक प्रशांत घरत यांचा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सत्कार केला आहे.

गेट वे ऑफ इंडिया येथून अलिबागला जाणारी प्रवासी लाँच काल मांडव्याजवळ अपघातग्रस्त झाली. या बोटीत ८८ प्रवासी होते. ही बोट बुडत असताना तेथे मांडवा पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक बोटीतून गस्ती घालत होते. त्यांनी तात्काळ प्रवाश्यांच्या मदतीला धाव घेतली तसेच स्वतःच्या जीवाची पर्वा न करता खलाश्यांच्या मदतीने पोलिस गस्तीवरील बोटीत आणि अन्य एका प्रवासी बोटीत बसवून किनाऱ्याला आणले. घरत यांनी केलेल्या कामगिरीमुळे पोलिस दलाची शान उंचावली आहे, असे कौतुकाचे उद्गार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काढले.

तसेच राज्यातला पोलिस हा लोकहित व सुरक्षिततेच्या दृष्टीने किती जागरूक आहे याचे हे सुंदर उदाहरण आहे, असेही गृहमंत्री म्हणाले. तर असा सत्कार व पाठीवर थाप खूप प्रेरणादायी आहे. पोलिस दलातील इतरांना सुद्धा यातून प्रेरणा मिळेल असे गृहमंत्र्यांचे आभार व्यक्त करताना घरत यांनी म्हटले आहे.

https://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Home-Minister-Anil-Deshmukh-praised-Prashant-Gharat-for-his-proud-performance/m/

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -*  
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 5⃣2⃣2⃣

*‘उत्कृष्ट आई’ बहुमान मिळविणारा बाप!*

Last Updated: Mar 07 2020 11:50PM

पुणे : पुढारी वृत्तसेवा

रूढ अर्थाने लेकरं प्रसूत करते, लेकरांचा सांभाळ-प्रतिपाळ करते ती आई... पण ती जशी प्रसंगी बापही बनते, तसे पुरुषांना आई होणे सहजासहजी शक्य होत नाही. म्हणायला विठू माऊली, ज्ञानेश्‍वर माऊली ठीक आहे; पण प्रत्यक्ष आईपण हे एक स्त्रीच निभावू जाणे... हाच समाजाचा समज आहे आणि एका अर्थाने हेच वास्तवही आहे... पण पुण्यातील सॉफ्टवेअर इंजिनिअर आदित्य तिवारी हे त्याला अपवाद ठरले आहेत... खरे तर विशेष अपवाद... कारण या आदित्य माऊलीचे बाळही साधारण बाळ नाही... विशेष बाळ आहे! स्पेशल चाईल्ड!! अँड ही इज मदर फॉर अ स्पेशल चाईल्ड!!

अवनीश हे या बाळाचे नाव... आदित्य यांनी हे बाळ दत्तक घेतले आणि त्याचे ‘अवनीश’ हे नामकरण केले तेच एक संकल्प घेतल्यासारखे... अवनीश म्हणजे पृथ्वीचा स्वामी... आदित्य म्हणजे सूर्य... पृथ्वी आणि पृथ्वीच्या स्वामीसाठी आदित्याची दिनचर्या ठरलेली असते. अवनीशच्या तयारीसाठी सकाळी वेळेवर उठणे... त्याचे अंघोळ वगैरे सगळे आवरणे... त्याला भरविणे...

‘डाऊन सिंड्रोम’ आजाराने ग्रस्त असलेले हे बालक आदित्य यांनी मध्य प्रदेशातील इंदूरच्या एका संस्थेतून 1 जानेवारी 2016 रोजी दत्तक घेतले. अवनीश तेव्हा 22 महिन्यांचा होता. आज अवनीश सहा वर्षांचा आहे. ‘डाऊन सिंड्रोम’ असतानाही तो सामान्य मुलांच्या शाळेत नर्सरीला आहे. अवनीशची परवड व्हायला नको, त्याच्याकडे दुर्लक्ष व्हायला नको म्हणून आदित्य यांनी सॉफ्टवेअर इंजिनिअरची नोकरी सोडली. अवनीशच्या सोयीने करता येईल आणि दोन पैसेही मिळवता येतील, असे मोटिवेशनल स्पीकर आणि समुपदेशक हे नवे काम सुरू केले. अवनीशसाठी आदित्य हे आता ‘त्वमेव माता, पिता त्वमेव...’ आहेतच; पण जगासाठीही ते रोल मॉडेल बनले आहेत. ‘उत्कृष्ट आई’ हा बहुमान मिळविणारा अपवादात्मक ‘बाप’ ठरले आहेत. बंगळूर येथे महिलादिनी हा किताब त्यांना देण्यात येणार आहे. त्याबद्दल त्यांच्या या एकल पालकत्वाचा प्रवास दै. ‘पुढारी’ने जाणून घेतला...

आदित्य यांनी विशेष मुलाला दत्तक घेतले, ही बाब अद्भुतच. मुळात ही दत्तक प्रक्रियाही काही साधी, सरळ नव्हती. एक तर आदित्य यांना दत्तक प्रक्रियेबद्दल काहीही माहिती नव्हती. अवनीशचे पालकत्व एका पुरुषाला, त्यातही अविवाहित पुरुषाला देणे हे त्या संस्थेलाही अवघड वाटत होते. आदित्य यांनी हमी दिली, मी आई म्हणून कमी पडणार नाही की, बाप म्हणून कमी पडणार नाही... मग सगळ्या औपचारिकता पार पाडण्यात आल्या. दीड वर्ष या सगळ्या प्रक्रियेत गेले. अवनीशचा सांभाळ करणे हे आदित्य यांच्यासाठी आव्हान होते. आदित्य म्हणतात, अवनीशच माझ्यासाठी सगळे सोपे करत गेला. त्यानेच मला त्याचा सांभाळ करणे किती सोपे आणि मजेदार आहे, हे शिकवले! थोडा काळ लडिवाळ गेला आणि पुढे पुढ्यात काळच उभा ठाकला जणू! अवनीशच्या हृदयात दोन छिद्रे असल्याचे निदान झाले!! अवनीशचा सांभाळ करण्यात आई म्हणून जसे आदित्य कुठेही कमी पडले नाहीत, तसेच त्याच्या उपचारात ते बाप म्हणूनही कुठे कमी पडले नाहीत!

अवनीश आता नुसता नर्सरीत नाही काही... तो नाचतोही, गातोही... त्याला ताल कळतो... तो पोहतोही! आदित्य म्हणतात, “लोक आई-बापामुळे ओळखले जातात. अवनीशमुळे मला आई ही ओळख तर मिळालीच... शिवाय युनायटेड नेशन्सच्या आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभागाच्या संधी मिळाल्या... आणि महत्त्वाचे म्हणजे त्याला सांभाळता-सांभाळता, घडवता-घडवता मला विशेष मुलांना कसे सांभाळावे, कसे घडवावे, याचे तंत्र दस्तुरखुद्द अवनीशनेच शिकविले! हेच तंत्र मी आता अशी अपत्ये असलेल्या आई-बाबांना सांगतो!! माझा अवनीश महान आहे!!!”

*दहा हजार पालकांशी भेट*

‘विशेष मुलां’ना कसे सांभाळावे, कसे वाढवावे, या विषयावर 22 राज्यांतील 50 शहरांतून 400 कार्यशाळा आदित्य तिवारी यांनी घेतल्या आहेत. समुपदेशक म्हणून ते 10 हजार पालकांना भेटलेले आहेत.
अवनीशच माझ्यासाठी सगळे सोपे करत गेला. त्यानेच मला त्याचा सांभाळ करणे किती सोपे आणि मजेदार आहे, हे शिकवले!

- आदित्य तिवारी,

‘उत्कृष्ट आई’ पुुरस्कारप्राप्‍त अभियंता

*एकल पालकत्वासंबंधी...*

एकल पुरुषाने मूल दत्तक घ्यायचे, तर त्याचे वय 30 असायला हवे, असा नियम पूर्वी आपल्याकडे होता. नंतर वयाची अट 25 वर्षे करण्यात आली, म्हणूनच आदित्य हे अवनीशला दत्तक घेऊ शकले. कायद्यानुसार एकल पुरुष आपल्याकडे आजही मुलगी दत्तक घेऊ शकत नाही.

जुलै 2015 मधील एका न्यायालयीन निवाड्यानुसार अविवाहित महिला एकल माता होऊ शकते आणि तिला अपत्याच्या पित्याचे नाव नमूद करणे बंधनकारक नाही. डिसेंबर 2018 मध्ये एकल पालक असलेल्या पुरुष शासकीय कर्मचार्‍यांना बाळाची काळजी वाहण्यासाठी भारत सरकारने सुट्टीची तरतूद केली. अभिनेता तुषार कपूर, दिग्दर्शक करण जोहर हेही एकल पालक आहेत.

https://www.pudhari.news/news/Pune/pune-The-Father-Who-Gives-Excellent-Mother-Glory-/m/

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -*  
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 5⃣2⃣1⃣

*बुलढाण्यात गुणवंत विद्यार्थिनी ‘एक दिवसाच्या जिल्हाधिकारी’*

_*महिला सप्ताहानिमित्त जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांचा अभिनव उपक्रम*_

लोकसत्ता टीम | March 4, 2020 03:06 am

अकोला : बुलढाण्यात गुणवंत विद्यार्थिनींना एक दिवसाचा जिल्हाधिकारी व एक दिवसाचे मुख्य कार्यकारी अधिकारी होण्याची अनमोल संधी मिळत आहे. जागतिक महिला दिनानिमित्त राबवण्यात येणाऱ्या विशेष सप्ताहात बुलढाण्याच्या जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्या अभिनव संकल्पनेतून हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबवला जात आहे.

बुलढाणा जिल्हय़ात २ मार्चपासून जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्या संकल्पनेतून ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्ताने आंतरराष्ट्रीय महिला दिन सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्याअंतर्गत गुणवंत विद्यार्थिनीला जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसवून तिला प्रशासनाचा अनुभव घेण्याची संधी देण्यात येत आहे. तसेच महिलांच्या सुदृढ आरोग्यासाठी पिंक वुमेन सप्ताहही राबवण्यात येत आहे. पहिल्या दिवशी जिल्हा परिषदेच्या पाडळी येथील शाळेची विद्यार्थिनी पूनम देशमुख व दुसऱ्या दिवशी चिखली तालुक्यातील मंगरूळ नवघरे येथील जिल्हा परिषद शाळेची इयत्ता नववीची विद्यार्थिनी योगिता नितीन मगर यांनी एक दिवसांचा जिल्हाधिकारी बनून कार्य केले. जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी एक दिवसाच्या जिल्हाधिकारी विद्यार्थिनींना स्वत: जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसवून त्यांचा आत्मविश्वास द्विगुणित केला. पूनम देशमुख हिने जिल्ह्यात अवकाळी पाऊस व पिकांच्या नुकसानीसंदर्भात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक यांच्याकडून आढावा घेतला. त्यानंतर एक दिवसाच्या जिल्हाधिकारी पूनम देशमुख यांनी लोकशाही दिन कार्यवाहीचे कामकाज अनुभवले. दुसऱ्या दिवशीच्या एकदिवसीय जिल्हाधिकारी योगिता मगर यांनी आर्थिक वर्ष २०१९-२० मधील खर्चाचा आढावा घेतला. आत्मविश्वास वाढावा, प्रशासनात येण्यासाठी मुलींना प्रेरणा मिळावी, यासाठी जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी ‘एक दिवसासाठी जिल्हाधिकारी’ हा उपक्रम राबवला आहे.
हा उपक्रम ‘इमरजन्स इन गव्हर्नन्स’ या संकल्पनेवर आधारित आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या उपक्रमाबरोबरच ‘पिंक वुमेन सप्ताह’मध्ये विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत.
दोन विद्यार्थिनी एक दिवसाच्या ‘सीईओ’ झाल्या
जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्या संकल्पनेवर आधारित ‘एक दिवस जिल्हाधिकारी’ व ‘एक दिवस मुख्य कार्यकारी अधिकारी’ उपक्रम ८ मार्चपर्यंत सुरू करण्यात आला. त्यानुसार आज जिल्हा परिषदेला एक दिवसाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर सावरगांव डुकरे येथील इयत्ता नववीमधील विद्यार्थिनी कृतिका राऊत व स्नेहा जाधव यांची निवड करण्यात आली. या दोघींनी मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या कामकाजाचा अनुभव घेतला. मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुगराजन एस यांनी स्वत: स्नेहा जाधवला मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या खुर्चीत बसवले. स्नेहा व कृतिका यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण व्यवस्थेचा आढावा घेतला.

_माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा दिवस होता. मला जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्या संकल्पनेमुळे थेट जिल्हाधिकारी होण्याचा मान मिळाला. दिवसभरात प्रशासनाच्या कामकाजाचा अनुभव घेतला. मलाही भविष्यात जिल्हाधिकारी व्हायचं आहे. त्यासाठी अभ्यास करून कठोर परिश्रम घेण्याची प्रेरणा मिळाली._

– पूनम देशमुख, विद्यार्थिनी.

https://www.loksatta.com/maharashtra-news/meritorious-girl-students-in-buldhana-to-become-one-day-collector-on-occasion-of-world-womens-day-zws-70-2099622/

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -*  
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

यापूर्वीचे भाग वाचण्यासाठी आमच्या
https://guruvarykm.blogspot.com
या ब्लॉगला भेट द्या....