twitter
rss

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 5⃣2⃣2⃣

*‘उत्कृष्ट आई’ बहुमान मिळविणारा बाप!*

Last Updated: Mar 07 2020 11:50PM

पुणे : पुढारी वृत्तसेवा

रूढ अर्थाने लेकरं प्रसूत करते, लेकरांचा सांभाळ-प्रतिपाळ करते ती आई... पण ती जशी प्रसंगी बापही बनते, तसे पुरुषांना आई होणे सहजासहजी शक्य होत नाही. म्हणायला विठू माऊली, ज्ञानेश्‍वर माऊली ठीक आहे; पण प्रत्यक्ष आईपण हे एक स्त्रीच निभावू जाणे... हाच समाजाचा समज आहे आणि एका अर्थाने हेच वास्तवही आहे... पण पुण्यातील सॉफ्टवेअर इंजिनिअर आदित्य तिवारी हे त्याला अपवाद ठरले आहेत... खरे तर विशेष अपवाद... कारण या आदित्य माऊलीचे बाळही साधारण बाळ नाही... विशेष बाळ आहे! स्पेशल चाईल्ड!! अँड ही इज मदर फॉर अ स्पेशल चाईल्ड!!

अवनीश हे या बाळाचे नाव... आदित्य यांनी हे बाळ दत्तक घेतले आणि त्याचे ‘अवनीश’ हे नामकरण केले तेच एक संकल्प घेतल्यासारखे... अवनीश म्हणजे पृथ्वीचा स्वामी... आदित्य म्हणजे सूर्य... पृथ्वी आणि पृथ्वीच्या स्वामीसाठी आदित्याची दिनचर्या ठरलेली असते. अवनीशच्या तयारीसाठी सकाळी वेळेवर उठणे... त्याचे अंघोळ वगैरे सगळे आवरणे... त्याला भरविणे...

‘डाऊन सिंड्रोम’ आजाराने ग्रस्त असलेले हे बालक आदित्य यांनी मध्य प्रदेशातील इंदूरच्या एका संस्थेतून 1 जानेवारी 2016 रोजी दत्तक घेतले. अवनीश तेव्हा 22 महिन्यांचा होता. आज अवनीश सहा वर्षांचा आहे. ‘डाऊन सिंड्रोम’ असतानाही तो सामान्य मुलांच्या शाळेत नर्सरीला आहे. अवनीशची परवड व्हायला नको, त्याच्याकडे दुर्लक्ष व्हायला नको म्हणून आदित्य यांनी सॉफ्टवेअर इंजिनिअरची नोकरी सोडली. अवनीशच्या सोयीने करता येईल आणि दोन पैसेही मिळवता येतील, असे मोटिवेशनल स्पीकर आणि समुपदेशक हे नवे काम सुरू केले. अवनीशसाठी आदित्य हे आता ‘त्वमेव माता, पिता त्वमेव...’ आहेतच; पण जगासाठीही ते रोल मॉडेल बनले आहेत. ‘उत्कृष्ट आई’ हा बहुमान मिळविणारा अपवादात्मक ‘बाप’ ठरले आहेत. बंगळूर येथे महिलादिनी हा किताब त्यांना देण्यात येणार आहे. त्याबद्दल त्यांच्या या एकल पालकत्वाचा प्रवास दै. ‘पुढारी’ने जाणून घेतला...

आदित्य यांनी विशेष मुलाला दत्तक घेतले, ही बाब अद्भुतच. मुळात ही दत्तक प्रक्रियाही काही साधी, सरळ नव्हती. एक तर आदित्य यांना दत्तक प्रक्रियेबद्दल काहीही माहिती नव्हती. अवनीशचे पालकत्व एका पुरुषाला, त्यातही अविवाहित पुरुषाला देणे हे त्या संस्थेलाही अवघड वाटत होते. आदित्य यांनी हमी दिली, मी आई म्हणून कमी पडणार नाही की, बाप म्हणून कमी पडणार नाही... मग सगळ्या औपचारिकता पार पाडण्यात आल्या. दीड वर्ष या सगळ्या प्रक्रियेत गेले. अवनीशचा सांभाळ करणे हे आदित्य यांच्यासाठी आव्हान होते. आदित्य म्हणतात, अवनीशच माझ्यासाठी सगळे सोपे करत गेला. त्यानेच मला त्याचा सांभाळ करणे किती सोपे आणि मजेदार आहे, हे शिकवले! थोडा काळ लडिवाळ गेला आणि पुढे पुढ्यात काळच उभा ठाकला जणू! अवनीशच्या हृदयात दोन छिद्रे असल्याचे निदान झाले!! अवनीशचा सांभाळ करण्यात आई म्हणून जसे आदित्य कुठेही कमी पडले नाहीत, तसेच त्याच्या उपचारात ते बाप म्हणूनही कुठे कमी पडले नाहीत!

अवनीश आता नुसता नर्सरीत नाही काही... तो नाचतोही, गातोही... त्याला ताल कळतो... तो पोहतोही! आदित्य म्हणतात, “लोक आई-बापामुळे ओळखले जातात. अवनीशमुळे मला आई ही ओळख तर मिळालीच... शिवाय युनायटेड नेशन्सच्या आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभागाच्या संधी मिळाल्या... आणि महत्त्वाचे म्हणजे त्याला सांभाळता-सांभाळता, घडवता-घडवता मला विशेष मुलांना कसे सांभाळावे, कसे घडवावे, याचे तंत्र दस्तुरखुद्द अवनीशनेच शिकविले! हेच तंत्र मी आता अशी अपत्ये असलेल्या आई-बाबांना सांगतो!! माझा अवनीश महान आहे!!!”

*दहा हजार पालकांशी भेट*

‘विशेष मुलां’ना कसे सांभाळावे, कसे वाढवावे, या विषयावर 22 राज्यांतील 50 शहरांतून 400 कार्यशाळा आदित्य तिवारी यांनी घेतल्या आहेत. समुपदेशक म्हणून ते 10 हजार पालकांना भेटलेले आहेत.
अवनीशच माझ्यासाठी सगळे सोपे करत गेला. त्यानेच मला त्याचा सांभाळ करणे किती सोपे आणि मजेदार आहे, हे शिकवले!

- आदित्य तिवारी,

‘उत्कृष्ट आई’ पुुरस्कारप्राप्‍त अभियंता

*एकल पालकत्वासंबंधी...*

एकल पुरुषाने मूल दत्तक घ्यायचे, तर त्याचे वय 30 असायला हवे, असा नियम पूर्वी आपल्याकडे होता. नंतर वयाची अट 25 वर्षे करण्यात आली, म्हणूनच आदित्य हे अवनीशला दत्तक घेऊ शकले. कायद्यानुसार एकल पुरुष आपल्याकडे आजही मुलगी दत्तक घेऊ शकत नाही.

जुलै 2015 मधील एका न्यायालयीन निवाड्यानुसार अविवाहित महिला एकल माता होऊ शकते आणि तिला अपत्याच्या पित्याचे नाव नमूद करणे बंधनकारक नाही. डिसेंबर 2018 मध्ये एकल पालक असलेल्या पुरुष शासकीय कर्मचार्‍यांना बाळाची काळजी वाहण्यासाठी भारत सरकारने सुट्टीची तरतूद केली. अभिनेता तुषार कपूर, दिग्दर्शक करण जोहर हेही एकल पालक आहेत.

https://www.pudhari.news/news/Pune/pune-The-Father-Who-Gives-Excellent-Mother-Glory-/m/

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -*  
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_