twitter
rss

गुरुजी घडविणारे मंदिर- गोसलिया अध्यापक विद्यालय,मिरज .

🖋श्री.दीपक माळी  📱९६६५५१६५७२.

  महाराष्ट्रात असंख्य शाळा आहेत,जिथे आदर्श विद्यार्थी घडविले जातात पण असेही एक विद्यालय आहे जिथे सर्वगुणसंपन्न गुरुजी घडविले जातात ते म्हणजे मिरज येथिल शेठ र.वि.गोसलिया अध्यापक विद्यालय .

  मिरजेहून सांगलीला जाताना कृपामयी हॉस्पिटल समोरील विद्यालय दिसायचे त्याचवेळी ठरविले होते की याच अध्यापक विद्यालयातून शिक्षक बनायचं , १२ वीचा निकाल लागला, मार्क्स् ही चांगले मिळाले पण आमच्या सुदैवाने-दुर्दैवाने आमच्यावेळी प्रवेशप्रक्रिया न्यायप्रविष्ठ झाली,न्यायालयाने राज्यस्तरीय प्रक्रिया करावयास सांगितले .औरंगाबाद शहरामधून संपूर्ण महाराष्ट्राची प्रवेश प्रक्रिया पार पडली. मला पहिल्या राउंडमध्ये प्रवेश मिळाला अर्थातच मी माझ्या स्वप्नातल्या विद्यालयाची निवड केली , डिसेंबर २००० मध्ये माझा प्रवेश निश्चित झाला ,फेब्रुवारीच्या १ तारखेपासून आमचे कॉलेज सुरु झाले तेव्हा आम्ही फक्त ९ जण सांगली जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी होतो.. त्यानंतर एक - एक करीत आमचे दुसऱ्या जिल्ह्यातील मित्र हजर होवू लागले. आमची ४० ची बॅच पूर्ण व्हायला मे २००१ उजाडला .
    या विलंबाने झालेल्या प्रवेश प्रक्रियेमुळे आमचा फायदा असा झाला की, जो कोर्स दोन वर्षात पूर्ण व्हायचा तो पूर्ण करावयास आम्हांला तीन वर्षे लागली, या विद्यालयाचा सर्वाधिक सहवास लागला , विद्यालयाचे सर्वात जास्त प्राध्यापकांच्या सहवासाचे भाग्य लाभले . प्राचार्य फडणीस सर, आपटे सर,वाडीकर सर,खोत सर,पांढरे सर,मोटकट्टे सर,वांगीकर मॅडम् ,कोटीभास्कर मॅडम् , मनिषा कोरे मॅडम् , चौगुले मॅडम् ,दोन महिन्यांसाठी आलेले मिरजकर सर आणि सेकंड इयरच्या शेवटी लाभलेले चित्रकलेचे प्राध्यापक या सर्व तज्ञ गुरुजनांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही घडलो गेलो.(सध्याचे प्राचार्य शिंगे सर त्यावेळी डाएटला प्रतीनियुक्तीवर असल्याने त्यांचा सहवास चुकला.)
   आणखी एक फायदा झाला तो म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले मित्र मिळाले. आमच्या बॅचचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आमच्या बॅच पासून अध्यापक विद्यालयात पुन्हा मुलींना प्रवेश सुरु झाला. आम्ही ३२ मुले आणि ८ मुलींची ही बॅच म्हणजे आठवणींचा खजिनाचं आहे.

    अध्यापक विद्यालयातील प्रत्येक दिवस सुरु व्हायचा परिपाठाने त्या अगोदर आमचे पांढऱ्या शुभ्र गणवेशातील प्रशिक्षणार्थी बांधव मा.पांढरे मार्गदर्शनाखाली झाडू घेवून परिसर १५ मिनिटात स्वच्छ करायचे , त्यानंतर प्राचार्य फडणीस सरांच्या संगीतसाथीने आमच्या परिपाठाची सुरुवात व्हायची.
     फडणीस सरांना या कामांत सर्वप्रथम विश्रांती दिली ती आमच्या जयकुमार पवार या मित्राने .जयकुमार पवार,सचिन माळी , वाल्मिकी फाळके यांची संगीत क्षेत्रात घौडदौड सुरु झाली. मी मात्र खोत सरांचा सल्ला ( ' गाढवाच्या मागे आणि साहेबाच्या पुढे कधी उभे राहू नये.' ) शिरसावंद्य मानून प्राचार्यांपासून चार हात दूरचं राहिलो आणि अजूनही हा सल्ला पाळायचा प्रयत्न करतोय.
   आमचे आपटे सर मला फार आवडायचे , सरांनी पहिल्या दिवशी वर्गातील सर्वांची नावे विचारली की ती कायमची त्यांच्या लक्षात रहायची ,एकाचेही नाव चुकायचे नाही. चार वर्षापूर्वी आमचे गेटटुगेदर झाले त्यावेळी सरांना आम्ही भेटलो तरी सरांनी सर्वांना नावासहित ओळखले. साधारण शरीरयष्टीचे आपटे सर क्रीडाशिक्षक असतील हे कोणाला पटणारही नाही पण  B.PEd & M.PEd च्या प्राध्यापकांना ज्यावेळी समस्या यायच्या त्यावेळी आपटे सरांचा ते धावा करायचे. माझ्या कित्येक मित्रांचे फलकलेखन आपटे सरांनी सुबकतेने घडविले. सचिन जरी महान असला तरीही राहुल द्रविड किती ग्रेट होता हे आपटे सरांच्यामुळेचं समजले . आजही शिक्षणक्षेत्रात चमकणाऱ्या सचिन पाठीमागे कितीतरी द्रविड झाकोळले जातात... पण माझी नजर त्या द्रविडला शोधत असते. ही सवय लागली ते आपटे सरांचे व्यक्तिमत्व पाहूनचं...

या विद्यालयातील सर्वकालिन विद्यार्थ्यांपैकी सर्वात नशिबवान म्हणजे खोत सर .. खोत सरांनी आपले डी.एड्.येथेच पूर्ण केले ,पुढे प्रयोगशाळा परिचर म्हणून काम करीत असताना उच्चशिक्षण पूर्ण करुन ते याच अध्यापक विद्यालयात प्राध्यापक बनले , शेवटी या विद्यालयातील प्राचार्य या सर्वोच्च पदावर विराजमान होवून सेवानिवृत्त झाले. आजही सर YCMOU च्या माध्यमातून मार्गदर्शन करतात. या वयातही Whats App , Facebook या सारख्या माध्यमातून सोशल मीडीयावर active असणारे खोत सर आपल्या चुकणाऱ्या विद्यार्थ्यांना तिथेही कानपिचक्या देवून ठिकाणावर आणतात.
   प्रथम वर्षाचे वर्गशिक्षक आणि कार्यनुभवाचे तज्ञ पांढरे सर शिस्तप्रिय असायचे , योग्य जागेवर योग्य ठिकाणी उपाय करावा तो पांढरे सरांनीच...'फुटात बारा इंचाचा फरक ' कसा असतो ते नेमके पांढरे सरांनी शिकविले.
     ' नदीचे मूळ आणि ऋषीचे कूळ कधी शोधू नये ' असे सांगत महाराष्ट्रातील विविध भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या बोलीभाषेकडून प्रमाणभाषेकडे अचूक नेणाऱ्या आपल्या कोटीभास्कर मॅडम मराठी सोबत हिंदीही सांभाळायच्या .....कोणत्याही कार्यक्रमाचे अचूक नियोजन कसे करायचे ,तो कार्यक्रम कसा पार पाडायचा याचे धडे कोटीभास्कर मॅडम् यांनी दिले.
     _मी असे म्हणेन की_ या अध्यापक विद्यालयात सर्व विद्यार्थ्यांना एक हक्काची आई मिळायची जी सर्वांना आईच्या मायेने समजून घ्यायची प्रसंगी कठोर व्हायची त्या म्हणजे ' पाच पैशाच्या गारेगार पासून पाचशे रुपयाच्या आईस्क्रिमचा आस्वाद घेतलेल्या ' आमच्या वांगीकर मॅडम् ... आम्हाला एका तासात भारताची नव्हे _तर मी असे म्हणेन की_ संपूर्ण जगाची सैर करुन आणायच्या. डी.एड्.चे क्लिष्ट इंग्रजी इंग्रजीतून शिकणारी पहिली बॅचही आमचीच.. वांगीकर मॅडम् यांनी आमचे हे दिव्यही सहज पार केले.

आम्ही प्रशिक्षणार्थी म्हणून घडत असताना काही प्राध्यापकही घडत गेले. नवीन आलेल्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी शंका विचारल्यावर चिढणाऱ्या चौगुले मॅडम् नंतर सेवांतर्गत वर्गातही मार्गदर्शन करणाऱ्या अनुभवी पाटील मॅडम् बनल्या.
   संस्थेच्या माध्यमिक शाळेतून बदलून आलेले मोटकट्टे सरांनी (यांना फर्स्ट इयरची मुले आबा म्हणायची ) हिंदी आणि इतिहास विषयाचा विढा उचलला. सोबत आम्हांला महाबळेश्वर दर्शन घडवून सहल विभागही पार पाडला. पाठ निरीक्षण करताना A+ आणि A- आतील फरक मात्र आम्हीच सरांना सांगितला...

आमच्या बॅचपासून स्पर्धांचे स्वरुपही बदलले, विद्यालयातंर्गत स्पर्धाऐवजी आमचे प्राचार्य फडणीस सरांच्या नियोजनाखाली सांगली जिल्ह्यातील सर्व अध्यापक विद्यालयांच्या आंतर अध्यापक विद्यालयीन स्पर्धा सुरु झाल्या. वैयक्तिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन आमच्या विद्यालयाकडे होते. पहिल्या वर्षी सांघिक स्पर्धा आष्ट्याला झाल्या तर दुसऱ्या वर्षी तासगांवला झाल्या.दोन्हीही वर्षी आमच्या तळणे सरांच्या नेतृत्वाखालील कबड्डी संघाने सुयश मिळवले. गोडभरले, वाडिले यांनी वैयक्तिक स्पर्धा गाजवल्या...
KWC वर बौद्धिक स्पर्धा व्हायच्या. गायन स्पर्धेत पहिला क्रमांक काढून आमचा सचिन माळी दोन्ही वर्षाचा लेटकमरचा शिक्का अलगद पसून टाकायचा. मला कथाकथन सादर करायची संधीही या स्पर्धेमुळेच मिळाली.

   या दोन अडीच वर्षाच्या कालावधीत अनेक जिवाभावाचे मित्र भेटले , सेकंड इयरमध्ये आमचे 'रक्षाबंधन ' करणाऱ्या भगिनीही लाभल्या. यापैकी श्याम गोडभरले आज गटविकास अधिकारी झाले आहेत तर दत्तात्रय वाघ पोलिस उपनिरीक्षक पदावर आहेत. उरलेले बांधव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्या शिक्षण सेवा बजावत आहेत.

दरम्यानच्या काळात शिक्षण क्षेत्रातील चुकीच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील अध्यापक विद्यालयांना उतरती कळा लागली .२००७ -०८ दरम्यान निर्माण झालेली मृगजळे लयास गेली पण आमचे ही मंदिर आजही भक्कम उभे आहे..
    येणाऱ्या काळात 'पवित्र ' शिक्षक भरती लवकर होवून पुन्हा एकदा या क्षेत्राकडे युवकांचा ओढा वाढून अध्यापक विद्यालयास पुर्वीचे सुवर्णयुग येवो ही अपेक्षा करतो. विद्यालयाच्या माजी विद्यार्थी मेळाव्यास माझ्या खूप खूप शुभेच्छा...!

अंबाबाई तालीम संस्थेच्या ज्ञानरुपी मंदिरास माझे त्रिवार वंदन....!

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

🖋श्री.दीपक महादेव माळी.
📱९६६५५१६५७२.
मु.पो.खरशिंग.ता.कवठेमहांकाळ.
जि.सांगली.