twitter
rss

*🤼‍♀महाराष्ट्र कबड्डी संघाची कर्णधार सोनाली हेळवीचे पंतप्रधानांकडून कौतुक*

Published On: Jan 28 2019 6:16PM | Last Updated: Jan 28 2019 7:19PM

दैनिक पुढारी,

वारणावती (सांगली) : आष्पाक आत्तार

भटक्या विमुक्त समाजातील मुला मुलींसाठी सुरू करण्यात आलेल्या आश्रमशाळेत शिक्षण घेवुन त्याच शाळेच्या मैदानावर आपल्या भविष्याचा पाया मजबूत करणार्‍या सोनाली हेळवी हिचा मन की बात या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नामोल्लेख करून तिच्या खेळाचं तोंडभरुन कौतुक केले.

खेलो इंडिया खेलो या युवा क्रीडा स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या. या स्पर्धेत अठरा खेळांमध्ये सहा हजार खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. यातील एकविस वर्षाखालील महिला कबड्डी संघाची महाराष्ट्राची कर्णधार सोनाली हेळवी हिने नेत्रदीपक कामगिरी करत आपल्या संघाला फायनलपर्यंत धडक मारून दिली होती.

प्रजासत्ताक दिनादिवशी मन की बात या कार्यक्रमात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोनालीच्या या खेळाचं कौतुक केलं. ते म्हणाले अत्यंत कमी वयात सोनालीने क्रीडा क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केली. कबड्डीसारख्या खेळांमध्ये मुलींना जास्त प्रेरणा मिळत नाही मात्र सोनालीने कबड्डी हा खेळ निवडून उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले आहे. 

भटक्या  विमुक्त समाजात जन्मलेल्या सोनालीची घरची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. आईने मोलमजुरी करून तिचा सांभाळ केला आहे. शेरे (ता. कराड) येथील सद्गुरू आश्रमशाळेत 2008 साली चौथीच्या वर्गात तिने प्रवेश घेतला. अभ्यासात जेमतेम असणारी सोनाली खेळात करिअर करू शकते. तिच्यात प्रचंड इच्छाशक्ती अचूक निर्णयक्षमता, आक्रमकता  उत्कृष्ट गती  हे गुण आहेत हे तिच्या क्रीडा शिक्षकांनी हेरलं. मुख्याध्यापक मिलिंद बनसोडे, विष्णू खरात, संजय धुमाळ या शिक्षकांनी तिला विशेष मार्गदर्शन केले त्यांच्या मार्गदर्शनाचं तिने चीज करून दाखवले.

उत्कृष्ट खेळ करून शालेय स्पर्धा ती गाजवू लागली. आठवीत असताना औरंगाबाद येथे झालेल्या चौदा वर्षांखालील शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये मुलींच्या कबड्डी संघाचं तिने महाराष्ट्राचे नेतृत्व केले. यातही तिने महाराष्ट्राला विजेतेपद मिळवून दिलं इथून पुढेच तिच्या प्रगतीची घोडदौड गतीने सुरू झाली. सध्या ती शाळेची माजी विद्यार्थिनी आहे .
एका मोलमजुरी करणार्‍या कुटुंबात जन्मलेल्या मुलीने आश्रमशाळेत शिक्षण घेऊन क्रीडा क्षेत्रात  लौकिक मिळवणं आणि खुद्द देशाच्या पंतप्रधानांनी तिच्या खेळाचं कौतुक करणं ही गोष्ट सर्वांनाच प्रेरणा देणारी आहे हे मात्र निश्चित .

http://pudhari.news/news/Sangli/Prime-Minister-Narendra-Modi-praises-Sonali-Helvi/m/