🎯बारावी पेपर तपासणी बहिष्कार मागे*
By pudhari ,16/03/2017.
मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. त्यामुळे महासंघाने इयत्ता बारावीच्या पेपर तपासणीबाबत पुकारलेले असहकार आंदोलन मागे घेतले आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.
महासंघाने त्यांच्या आश्वासित व मान्य मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी बारावीच्या पेपर तपासणीवर असहकार आंदोलनाचा इशारा दिला होता. या अनुषंगाने वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शालेय शिक्षण मंत्री तावडे यांच्यात संयुक्त बैठक झाली. त्यामध्ये महासंघाच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याने असहकार आंदोलन मागे घेण्याचा निर्णय महासंघाने घेतला असल्याचे विधानसभेत सांगितले.
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃
👨🏻💻 केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ*
Maharashtra Times | Updated Mar 15, 2017.
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
केंद्र सरकारने होळीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना भेट दिली आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. बुधवारी सायंकाळी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे देशभरातील ५० लाख कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.
महागाई भत्त्यातील वाढ ही पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू करण्यात आली असून १ जानेवारी २०१७ पासून हा वाढीव महागाई भत्ता मिळणार आहे. मागील काही महिन्यांमध्ये महागाईत वाढ झाली आहे. त्यातुलनेने मिळणारा महागाई भत्ता कमी असल्याची ओरड कामगार संघटनांनी केली होती. मागील वर्षीदेखील महागाई भत्यात दोन टक्यांनी वाढ करण्यात आली होती. केंद्रीय कॅबिनेटने आयआयटी विधेयकाला मंजूरी दिली असून आयआयटीमध्ये सार्वजनिक-खासगी सहकार्याला प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃
👨🏻🏫 शिक्षण विभागातच संतप्त शिक्षकांचे ठाण*
कोल्हापूर -
अतिरिक्त शिक्षकांना चार महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने संतप्त झालेल्या शिक्षकांनी आज जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातच ठाण मांडत आंदोलन केले. त्यामुळे काही काळ माध्यमिक शिक्षण विभागातील कामकाज ठप्प राहिले. यासंदर्भात आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले.
पटसंख्येच्या आधारावरच शिक्षकांची मान्यता ठरत असते. अनेक शाळांमध्ये पटसंख्या बोगस दाखविण्यात येत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर शासनाने पटसंख्या मोजणीची मोहीमच हाती घेतली. मोहिमेत अनेक शाळांमध्ये बोगस पटसंख्या दाखविण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे प्राथमिक व माध्यमिकचे शेकडो शिक्षक अतिरिक्त ठरले. अतिरिक्त ठरलेल्या प्राथमिक शिक्षकांचे समायोजन जिल्हा परिषद किंवा महापालिका शाळांमध्ये केले. मात्र, माध्यमिक शिक्षकांचे समायोजन अनुदानित शिक्षण संस्थांमध्ये झाले. ही प्रक्रिया पाच ते सहा महिन्यांपूर्वी झाली होती. काही संस्थांनी शिक्षकांना हजर करून घेतले, तर काही संस्थांनी अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना दारातही उभे करून घेतले नाही. मात्र, या सर्वांचेच पगार गेल्या चार महिन्यांपासून थकीत आहेत. यासंदर्भात शिक्षण उपसंचालक, माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याशी अनेकवेळा चर्चा केली. परंतु, केवळ आश्वासनाशिवाय दुसरे काहीच या शिक्षकांना मिळाले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शिक्षकांनी आज जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या कार्यालयातच ठाण मांडले. वेतनाबाबत ठोस निर्णय झाल्याशिवाय आम्ही हलणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे कार्यालयात काही काळ गोंधळ झाल्याने कामकाज ठप्प राहिले.
आंदोलनाचे नेतृत्व के. ए. पाटील, विजय पाटील, शहाजी मासाळ, बी. ए. फकीर, श्रीमती एस. टी. कांबळे यांनी केले. यासंदर्भात लवकर निर्णय न झाल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.
*मार्ग काढण्याची ग्वाही*
माध्यमिक शिक्षणाधिकारी नसल्यामुळे कार्यालय अधीक्षक एस. ए. शेख यांच्याशी आंदोलकांनी चर्चा केली. यामध्ये हजर करून घेतले आहे; पण पगार निघालेला नाही आणि काही शिक्षकांना हजरच करून न घेतल्यामुळे त्यांचाही पगार थकीत आहे, यासंदर्भात शिक्षण उपसंचालक मकरंद गोंधळी यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी यातून सकारात्मक मार्ग काढण्याचे आश्वासन दिल्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले.
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃
🎋शिक्षकांचा मागण्यांसाठी हल्लाबोल*
*आझाद मैदानात विविध संघटनांचे धरणे आंदोलन*
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
राज्यातील कायम विनाअनुदानित, विनाअनुदानित आणि अनुदानित शाळांच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रश्नांसाठी विविध शिक्षक संघटनांनी बुधवारी आझाद मैदानात हल्लाबोल चढविला. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी आझाद मैदानात उपोषण केले, तर महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीने अनुदानाच्या मागणीसाठी आझाद मैदानात धरणे आंदोलन केल्याने बुधवारी याठिकाणी शिक्षकांची शाळाच भरल्याचे चित्र दिसले.
राज्यातील शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी बुधवारी अनेक शिक्षक आणि शिक्षकेतर संघटनांनी आझाद मैदानात विविध आंदोलने करीत आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले. शिक्षकांच्या या आंदोलनानंतर संघटनांच्या प्रतिनिधींची शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासोबत बैठक झाली असून या बैठकीत अनेक प्रश्न सोडविण्यात आल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
शिक्षक परिषदेचे मुंबई विभागाचे अनिल बोरनारे म्हणाले की, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यासह झालेल्या चर्चेत शिक्षक व शिक्षकेतरांच्या काही मागण्या मान्य झाल्या आहेत. त्यात शिक्षकेतरांचा सुधारित आकृतिबंध मार्चच्या शेवटच्या आठवड्यात घोषित करणार असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी मान्य केले. अर्धवेळ ग्रंथपालांना पूर्णवेळ करणे आणि पूर्णवेळ ग्रंथपालांच्या पदवीधर वेतनश्रेणीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढील आठवड्यात बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विनाअनुदानित कृती समितीच्या आंदोलनाबाबत बोलताना प्रशांत रेडीज म्हणाले की, १ व २ जुलै २०१६ रोजी घोषित प्राथमिक व माध्यमिक ६९० शाळांमध्ये कार्य करणाऱ्या ९ हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तत्काळ अनुदान देण्याची कृती समितीची मागणी आहे. त्यात सरकारने अघोषित असलेल्या ५५० प्राथमिक व माध्यमिक शाळा, ८५० उच्च माध्यमिक शाळा अनुदानास पात्र म्हणून घोषित कराव्यात. शिवाय अनुदानासाठी औरंगाबादमध्ये ४ ऑक्टोबर २०१६ रोजी झालेल्या हिंसक आंदोलनात शिक्षकांवर लादलेले गुन्हे तत्काळ मागे घेण्याची विनंती सरकारला केली असल्याचे त्यांनी सांगितले.
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃
👫आरटीई प्रवेश निश्चितीसाठी 18 मार्चपर्यंत मुदतवाढ*
By pudhari
कोल्हापूर: प्रतिनिधी
आरटीई अंतर्गत 25 टक्के राखीव कोट्यातून प्रवेश निश्चितीसाठी 18 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. बुधवारी 15 पर्यंत प्रवेश निश्चितीची मुदत होती, तथापि कागदपत्रांच्या पुर्ततेसाठी विलंब लागत असल्याने पालकांच्या आग्रहामुळे ही मुदत आणखी 3 दिवसाकरता वाढवत असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले यांनी सांगितले.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अंतर्गत वंचित व दुर्बल गटातील बालकांना प्राथमिक शिक्षणासाठी अल्पसंख्याक शाळा वगळता उर्वरीत शाळांमध्ये 25 टक्के जागा राखीव ठेवण्याचे शासन धोरण आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेने ही प्रक्रिया राबवली आहे. 2 मार्चपर्यंत 1330 ऑनलाईन अर्ज जिल्हा परिषदेकडे आले होते. त्यातील 1159 जणांना अर्ज छाननी पात्र ठरवण्यात आले.
त्यानंतर 34 शाळांमध्ये या प्रवेशासाठी लॉटरी पध्दतीने सोडतही काढण्यात आली आहे. या 1159 जणांना प्रवेश घेण्यासाठी शाळेच्या नावासह एसएमएस पाठवण्यात आले. यापैकी 293 विद्यार्थ्यांनीच बुधवार 15 मार्चपर्यंत प्रवेश निश्चित केला असून 861 अर्ज अजूनही प्रलंबित आहेत.
प्रलंबित आकडा मोठा असल्याने कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी पालकांनी मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार ही मुदतवाढ देण्यात आली आहे. संबंधित शाळेत मूळ कागदपत्रासह वेळेत जाऊन शाळा प्रवेश निश्चित करावा असे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃