🇬 🇺 🇷 🇺 🇻 🇦 🇷 🇾 🇦
🇳 🇪 🇼 🇸
*👩🏻जागतिक महिला दिन विशेष* 👩🏻
*👵🏻 आजींची शाळा 👵🏻*
अगं "क' असं काढ ... "जमतंय की तुला हं हं हं हं, असंच काढायचं....' "हे बघा बाई काढलं...' "बाई नाव बरोबर काढलं ना मी?..' "सय कर तुझी, अगं नाव लिही.. नाव', "माझं कपडा कुठं गेला पाटी पुसायचा...' "हिकडं बघा, काल काय सांगितलं व्हतं...' "आजी हा असा काना काढा'... असे विद्यार्थी आणि शिक्षकांचा संवाद कानी पडत होते; "आजींच्या शाळेत'! मुरबाड तालुक्यातील फांगणे गावात भरणारी ही "शाळा' भारतातील पहिली "आजीबाईंची' शाळा आहे. या वर्षी 8 मार्च 2017 ला - महिला दिनाला पहिले वर्ष पूर्ण करून दुसऱ्या वर्षात पदार्पण करत आहे. कशी आहे ही शाळा?...
रोज दुपारी पावणे दोन-दोनच्या सुमारास "चल...य अनुसया' यांसारख्या आरोळ्या एकमेकींना देत गुलाबी रंगाची साडी नेसलेल्या, एका हातात लाल-काळ्या रंगाचं दप्तर, दुसऱ्या हातात काठी; नाय तर नातवंडांचा हात आधारासाठी घेऊन सगळ्या आजीबाई शाळेची वाट चालू लागतात. बरोबर आणलेल्या दप्तरात एक पाटी, अंकलिपी, पेन्सिल आणि पाटी पुसायचं फडकं घेऊन न चुकता दररोज शाळेत येतात. गेल्या वर्षी 8 मार्च 2016 पासून सुरू झालेली भारतातील ही पहिली आजीबाईंची शाळा मोठ्या उत्साहात आणि आनंदात सुरू आहे.
"बिनभिंतीची उघडी शाळा, लाखो इथले गुरू, झाडे, वेली, पशू-पाखरे यांशी दोस्ती करू' या ग. दि. माडगूळकरांच्या गाण्याचा प्रत्यक्ष अनुभव देणारी, निसर्गाच्या सान्निध्यात वसली आहे. मोठ्या आंब्याच्या झाडाखाली बांबूच्या कळकांचे दोन भाग करून भिंत तयार करण्यात आली आहे. त्यावर गव्हाच्या कुडाचं छत आहे. वर्गाच्या समोर ठराविक अंतरावर प्रत्येक आजीच्या नावाची झाडं आहेत. टाकाऊ फरश्यांचा वापर करून त्यावर मुळाक्षरं लिहिलेली आहेत. वयाच्या साठीनंतरही अत्यंत उत्साहानं पुस्तकातले धडे गिरवणाऱ्या आजीबाईंच्या शाळेचं हे चित्र बघताच मोहित करून टाकतं.
वर्गात शिरताच समोरील फळ्यावर दिनांक, वार यांसह "शिक्षणाला वयाचं बंधन नसतं', हा सुविचार लक्ष वेधून घेतो. फळ्याच्या समोर एका सरळ रांगेमध्ये डोक्यावरील पदर सावरत मांडी घालून बसलेले "विद्यार्थी' दिसतात. मांडीवर पाटी, समोर दप्तर, त्या दप्तरावर बालमित्रची अकंलिपी, दप्तराच्या बाजूला असलेलं पाटी पुसायचं फडकं अन् हातात पेन्सिल या सगळ्या साहित्यासह हे "विद्यार्थी' अर्थात सर्व आजी - मुळाक्षरं गिरवण्यात दंग असतात.
"अगं "क' काढ "क'...' "अशी रेघ काढ' "हां.. हां असंच' "आता बघं आलं तुला' "बाई, हे बघा काढलं, "माझं नाव बराबर हाय ना?' "मी माझी सय करून दावते आता', "अहो आजी, "दोपदा' नाही, मी कसं शिकवलं व्हतं, "द्रो' कसा काढायचा, "द'च्या पोटात रेघ मारायची राहिली का नाय? पुसा बरं ते अन् परत काढा आणि मला दाखवा.' "माझं पाटी पुसायचं फडकं कुठं गेलंऽऽ, आता तर हितं व्हतं' "अगं, त्ये बघ तुझ्या मांडीखाली हाय... तुझं का नाय दुरपदा, ध्यानच नसतं.. स्वतःच्या जवळचं हाय, तरी कुठंय कुठंय करत बसती.' शाळा सुरू असतानाचे हे संवाद!
गेल्या वर्षभरापासून शिक्षण घेणाऱ्या आजी आता या शाळेत चांगल्याच रमून गेल्या आहेत. त्यांच्यासाठी ही शाळा म्हणजे उतरत्या वयातील संवाद साधण्याचं, आपल्या मैत्रिणींना भेटण्याचं, खळखळून हसण्याचं, भरपूर गप्पा मारण्याचं हक्काचं ठिकाण होऊन गेलं आहे. दररोज दुपारी दोन ते चार शाळेत आल्यानंतर अभ्यासाबरोबरच या आजी अभंग, ओव्या अन् पाढेही म्हणतात. तसे करताना एक आजी आधी म्हणणार, नंतर इतर आज्या पहिल्या आजीमागं शिस्तीत ते म्हणत असल्याचं चित्र पाहायला मिळतं. वर्गासमोर लावण्यात आलेल्या झाडांमधील प्रत्येक एका झाडाचं पालकत्व या प्रत्येक आजीकडं देण्यात आलं आहे. प्रत्येक झाडाच्या समोर पालकत्व असलेल्या आजीच्या नावाची पाटी लावण्यात आली आहे. शाळेच्या नियमानुसार आज्यांना त्या झाडाची पाणी, खत घालून जोपासना करण्याचं, झाडांची काळजी घेण्याचं काम करावं लागतं. (अर्थातच हे सगळं करायला त्यांच्या शिक्षिका मोरेमॅडम मदत करतात) त्यांच्या अभ्यासक्रमात या उपक्रमाचाही समावेश आहे. एकूण 29 पटसंख्या असलेल्या या शाळेत कधी कधी आज्यांना अभ्यासात मदत करण्यासाठी त्यांची नातवंडंदेखील येऊन बसतात. ते देखील "असं नाही गंऽऽ आजी... असा काना दे' असं सांगत असतात. गावात दर गुरुवारी भजनाचा कार्यक्रम असल्यामुळं शाळेला या दिवशी साप्ताहिक सुटी असते.
शाळेतील वातावरणाविषयी बोलताना सुनंदा केदार आजी म्हणतात, "या शाळेमुळं खरंतर आमचं एकमेकींना नियमानं भेटणं व्हतं, नाहीतर जी ती आपल्या घरी असायची; भेटायचं म्हटलं, की स्वतःहून येळ काढून भेटायला जावं लागायचं. शाळंमुळं चार अक्षरं शिकायला बी मिळत्यात. या वयात तेवढाच काय तो इरंगुळा...'
"आमच्या बालपणी गरिबीमुळं शिक्षण नाय घेता आलं. पुढं आई-वडिलांचं कष्ट आमच्या वाट्याला आलं. मात्र, आपण शिकाय पाहिजे व्हती चार बुकं, असं नेहमी वाटायचं,' असं 67 वर्षांच्या यमुना केदारआजी सांगतात. त्या म्हणतात, "बांगर गुरुजींनी सुरू केलेल्या या आजीबाईंच्या शाळेमुळं म्हाताऱ्या वयात का व्हयना, पण शिकायला मिळालं याचा लय आनंद वाटतू.'
याच शाळेत शिकणाऱ्या 70 वर्षांच्या अनुसया केदारआजी सांगतात, "शिकशाण नसल्यामुळं कधी कुठं सय मागितली तर अंगठा मारावा लागायचा. शाळेचं तोंडच कधी बगितलं नसल्यामुळं नाव लिहायला येतं नव्हतं. मग सय तर लय लांबची गोष्ट... पण आता मला माझं नाव लिहायला येतं अन् सयपण करती.'
*शीतल मोरे (शिक्षिका)*
शालेय जीवनात शिक्षण घेण आणि आता या वयात शिक्षण घेणं यातला फरक इथं जाणवतो. इथं शिक्षण घेणाऱ्या आज्या शिकण्यासाठी नेहमीच उत्साही असतात, याचा प्रत्यय गेलं वर्षभर मला येतोय. दररोज शाळेत न चुकता आलं पाहिजे, असं कधी त्यांना सांगावं लागत नाही. या शाळेत येणाऱ्या सर्व आज्यांची वयं ही 60 वर्षांच्या पुढं आहेत. आमच्या वर्गातील सर्वांत वयानं मोठी असणारी विद्यार्थिनी-आजी 87 वर्षांची आहे. त्यामुळं वयानुसार कमी ऐकायला येणं, लक्षात न राहणं, मुळाक्षरांचे उच्चार न जमणं यांसारख्या अडचणी येतात. मात्र, माझ्या सर्व "विद्यार्थिनी-आज्या' या गोष्टीवर मात करून शिकण्याचा प्रयत्न करतात, याचा मला फार अभिमान वाटतो.
जेव्हा योगेंद्र बांगर गुरुजींनी मला आजीच्या शाळेत शिक्षक म्हणून शिकवशील का? असं विचारलं तेव्हा मी पटकन "हो' म्हणाले. माझं स्वतःचं शिक्षण दहावीपर्यंतच झालं आहे. माझं घरातील काम आवरून मी दुपारी आजींच्या शाळेत शिकवते. मला सांगायला आनंद वाटतो की, या आजीबाईंच्या शाळेत माझ्या सासूबाईदेखील शिक्षण घेतात. या शाळेत शिकवण्याचं कोणत्याही प्रकारचं मानधन मी घेत नाही.
इथं शिकवत असताना बऱ्याचदा तुम्हाला संयम बाळगावा लागतो. कारण, जिल्हा परिषदांच्या शाळांप्रमाणं इथं एकदाच फळ्यावर लिहून चालत नाही. एकच अक्षर तुम्हाला अगदी शंभर वेळादेखील रिपीट करावं लागतं. शिकवत असताना नॉर्मल शाळेत मुलांना रागवतो, तसं कोणत्याही विद्यार्थिनी-आज्यांवर रागवता येत नाही. प्रत्येक आजीच्या जवळ जाऊन, कधी आजीच्या थरथरत्या बोटांना धरून अक्षर गिरवायला शिकवावं लागतं. याबद्दलचा एक खास किस्सा आहे - वर्गातील वयानं सर्वांत मोठ्या असणाऱ्या "सीता आजी' जेव्हा पहिल्यांदा शाळेत येऊ लागल्या, तेव्हा त्यांना अंकलिपी कशी धरायची हेच कळत नव्हतं. बऱ्याचदा त्या उलटी अंकलिपी धरायच्या. त्यामुळं मुळाक्षरंदेखील उलटी दिसायची, अन् त्यांना लिहायला जमायचं नाही. त्यात त्यांना थोडंसं कमी ऐकू येतं, त्यामुळं अधिकच पंचाईत व्हायची... पटकन ऐकताही येतं नाही आणि लिहिताही! खूप दिवस त्या पाटीवर केवळ गोल गोलच काढायच्या. मग त्यांचा हात हातात घेऊन एकच अक्षर खूप दिवस गिरवल्यानंतर आता त्यांना मुळाक्षरं जमू लागली आहेत. त्यामुळं आमचा अभ्यासक्रम खूपच मागं राहिला आहे. लवकरच आजीबाईंच्या शाळेची सहलही काढण्यात येणार आहे.
*शाळेचा श्रीगणेशा*
फांगणे गावात शिवचरित्र पारायणाचा सोहळा मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. दरवर्षी शिवचरित्राचं पारायण गावात होतं. त्या पारायणाला गावातील लिहायला वाचायला येणारे गावातील लोक बसतात. या पारायणाला बसणाऱ्या लोकांचं मंदिरात ऐकत बसण्याशिवाय या आज्यांना पर्याय नव्हता. मनातून किती वाटलं तरी आपण वाचू शकत नसल्यामुळं केवळ श्रवणभक्तीच या आज्यांना करावी लागत होती. याशिवाय गावात कोणत्याही प्रकारचा ठराव संमत करायचा म्हटलं, की सगळ्या आज्यांचा केवळ अंगठ्याचा धब्बा लावावा लागायचा, याची खंत आज्यांना असायची. "आम्ही शाळा शिकलो असतो तर आम्हाला पण सही आली असती, आम्हीपण पारायण वाचायला बसलो असतो,' असं त्या बोलूनही दाखवायच्या. त्यांच्यात शिकण्यासाठीची असलेली ईच्छाशक्ती जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून काम करणारे बांगर गुरुजी यांनी लक्षात घेतली. यातूनच "आजींची शाळा' सुरू करण्याची कल्पना त्यांना सुचली. पुढे त्यांनी ती संकल्पना गावकऱ्यांसमोर मांडली. गावकऱ्यांनीही गुरुजींना साथ दिली. "आजीबाईंची शाळा' ही संकल्पना प्रत्यक्षात उतरण्यासाठी खरा मदतीचा हात दिला तो अंबरनाथ येथे शिक्षणक्षेत्रात कार्यरत असलेल्या या ग्रुपचे संस्थापक दिलीप दलाल यांनी! त्यांनी ही संकल्पना समजून घेतली. आजीबाईंना गणवेश म्हणून साड्या आणि शैक्षणिक साहित्य पुरवण्याचं काम या दलाल ग्रुपनं पार पाडलं. अन् 8 मार्च 2016 ला - महिलादिनी महिला सक्षमीकरणाचा असा श्री गणेशा झाला.
*योगेंद्र बांगर (जिल्हा परिषद शिक्षक)*
"आजीची शाळा' याबद्दल बोलताना सर म्हणतात, "गावातील लोकांचा सहभाग, दिलीप दलाल यांच्या मोतीलाल दलाल ग्रुप या सगळ्यांच्या सहकार्यातून भारतातील ही पहिली आजीबाईंची शाळा उभी राहू शकली. मागच्या वर्षी सुरू झालेल्या या शाळेला इतका चांगला प्रतिसाद मिळेल असं मला वाटलं नव्हतं; पण सर्व आज्यांनी जो उत्साह दाखवला, त्यामुळं आज ही शाळा केवळ भारतातच नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील पोचली आहे, याचा अभिमान वाटतो. या शाळेमुळं शिक्षण घेण्याची आज्यांची इच्छा पूर्ण करता आली. आज शेजारील गावांमध्येदेखील अशा प्रकारचा उपक्रम राबवण्यासाठी गावकरी उत्सुक आहेत.'
ते पुढे म्हणाले की, गावातील लोकांचे सहकार्य मिळाले तर अत्यंत सुंदर असे विविध उपक्रम तुम्ही राबवू शकता. या गावातील जिल्हा परिषदेची शाळादेखील डिजिटल आहे. आम्ही "ई-लर्निंग'चे विविध प्रयोगदेखील राबवले आहेत.
*फांगणेविषयी थोडंसं..*
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात 70 घरं असलेलं 360 लोकसंख्येचं फांगणे हे गाव. पुण्यावरून आळेफाटामार्गे टोकावडे, सावर्णेपर्यंत एसटीनं नाहीतर "वडाप'च्या साहाय्यानं मजल-दरमजल करीत मोरोशी फाट्याला पोचलात, की मोरोशी फाट्यापासून साधारण तीन किलोमीटर आतमध्ये हे फांगणे गाव निसर्गाच्या कुशीत वसलेलं आहे. या गावाच्या चारीबाजूंनी डोंगररांगा पसरलेल्या आहेत. या फाट्यावरून गावात जाताना रस्त्याच्या बाजूला उंच उंच झाडं, अरुंद रस्त्यानं गावात पोचतात. उतरत्या छपरांची - काही पक्क्या, तर काही कच्च्या विटांनी बांधकाम केलेली कौलारू घरं स्वागतासाठी सज्ज असतात. गावाच्या सुरवातीलाच वाळलेल्या कळकांचं कुंपण असलेली जिल्हा परिषदेची शाळा स्वागत करते. रस्त्यानं चालताना कुठंही उघडी गटारं, अस्वच्छता, उघड्यावर पडलेला कचरा यासारख्या गोष्टी दिसत नाहीत. या उलट घराच्या आजूबाजूला अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं लावलेली विविध फुलझाडं, बांबूच्या काठ्यांचं कुंपण दिसतं. निसर्गसंपन्नतेचा वारसा जरी गावाला लाभलेला असला तरी, गावचा मुख्य व्यवसाय शेती आहे. गावातील विकासासाठी शासन अजूनही पूर्णपणे तिथपर्यंत पोचलेलं नाही. मात्र, गावाच्या अवती-भवती दिसणारा तुटपुंजा विकास हा लोकसहभागातून झालेला आहे.
*शाळेचं यश*
"हिस्टरी वाहिनी'नं तयार केलेल्या या शाळेच्या चित्रफितीला आतापर्यंत 24 हजारांहून अधिक लाइक्स, 31,400 वेळा शेअर करण्यात आले आहे आणि 400 प्रतिक्रिया याला मिळाल्या आहेत. या चित्रफितीमुळे "आजीबाईंची शाळा' आंतरराष्ट्रीय स्तरावर जलद गतीने पोचली आहे. याशिवाय, फ्रान्स, जर्मनी, रशिया या देशातील लघुपट निर्माते, पत्रकार यांनी शाळेला भेट दिली आहे. भारतातील अनेक शैक्षणिक संस्थांनीही या शाळेला सदिच्छा-भेट दिली आहे.
(सौजन्य - साप्ताहिक सकाळ )
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃