🎋शुभमुहूर्तावर शाळा प्रवेश अर्जांची विक्री*
By pudhari
कोल्हापूर : प्रतिनिधी
गुढी पाडव्याचा मुहूर्त साधत शहरासह जिल्ह्यातील अनेक मराठी, इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश अर्जांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. प्रवेश अर्ज घेण्यासाठी पालकांची गर्दी दिसून आली.
शाळा सुरू होण्यासाठी आणखी अडीच महिने कालावधी आहे. मात्र, पाडव्याच्या मुहुर्तावर शाळांमध्ये प्रवेश घेण्याची पद्धत गेल्या काही वर्षांपासून सुरू झाली आहे. पालकांनी कोणत्या शाळेत मुलाचा प्रवेश घ्यायचा याची संपूर्ण माहिती घेतली. इंग्रजीसह मराठी माध्यमांच्या शाळांनी स्पर्धेत उतरत विद्यार्थ्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी काही दिवसांपूर्वी डिजिटल फलक लावून शाळेच्या गुणवत्तेची प्रसिद्धी केली.
मंगळवारी (दि. 28) गुढी पाडव्याच्या निमित्ताने सकाळी दहा वाजल्यापासून शाळेत प्रवेश अर्जांची विक्री करण्यात आली. प्ले स्कूल, नर्सरी, ज्युनिअर केजी, सीनिअर केजी प्रवेश अर्ज पालकांनी नाममात्र शुल्क भरून अर्ज घेतले. काही पालकांनी प्रवेशही निश्चित केले आहेत.
शाळा सुरू होण्यापूर्वी कागदपत्रांची तपासणी व प्रवेश शुल्क भरून पाल्यांचे प्रवेश निश्चित केले जाणार आहेत. यावर्षी काही इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी फी वाढविल्याचे पालकांकडून समजते.
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃
🎯जेईई लेखी परीक्षा येत्या रविवारी*
Maharashtra Times | Updated Mar 28, 2017,
म. टा. प्रतिनिधी, नागपूर
एनआयटी, आयआयटी आणि देशातील इतर महत्वाच्या इंजिनिअरिंग व आर्किटेक्चर कॉलेजेसच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई मेन्स) येत्या रविवारी २ एप्रिलला होणार आहे. पेन आणि पेपर पद्धतीने ही परीक्षा घेतली जाणार आहे. नागपूर केंद्रावरून सुमारे ३० हजार विद्यार्थी ही परीक्षा असा अंदाज आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने देशभरातील ११२ शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील अमरावती, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, नाशिक, पुणे व ठाणे या शहरांचा समावेश आहे. परीक्षेतील पहिला पेपर हा बीई आणि बीटेक अभ्यासक्रमांसाठी असून सकाळी ९.३० ते १२.३० या वेळेत होईल. दुसरा पेपर हा बी.आर्च आणि बी. प्लॅनिंग या अभ्यासक्रमांसाठी दुपारी २ ते ५ या वेळेत घेतला जाणार आहे. पहिल्या पेपरसाठी सकाळी ७ वाजल्यापासून तर दुसऱ्या पेपरला दुपारी १२.४५ वाजतापासून परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाईल. देशातील सुमारे १२ लाख विद्यार्थी या परीक्षेला बसणार असून त्यापैकी २.२ लाख विद्यार्थी हे जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेसाठी पात्र ठरतील. जेईई परीक्षेसाठी यंदा संपूर्ण ऑनलाइन पद्धतीचा वापर करण्यात आला होता. विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन स्वरुपात अर्ज मागविण्यात आले होते तसेच त्यांना परीक्षेची प्रवेश पत्रे देखील ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी अर्जाची छापील प्रत जेईईकडे पाठवू नये असेही निर्देश यावेळी देण्यात आले होते. यंदाची परीक्षा ही पाचवी जेईई परीक्षा राहणार आहे.
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃
🌾कृषी कॉलेजला शाहूंचे नाव*
Maharashtra Times | Updated Mar 28,2017
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी देशात आरक्षणाचे धोरण प्रथम आणणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या लोकोत्तर कार्याचा गौरव करण्याचा भाग म्हणून कोल्हापूरच्या कृषी कॉलेजचे ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय’ असे नामकरण करण्याचा निर्णय भाजप-शिवसेना महायुतीच्या सरकारने नुकताच घेतला आहे. शाहू महाराजांच्या करवीर नगरीत असलेल्या शेतकी कॉलेजला त्यांचे नाव देण्याच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांची मुले शिक्षण घेत असलेल्या या महाविद्यालयाचा गौरव झाला आहे.
राजर्षी छ. शाहू महाराज हे शिक्षण द्रष्टे होते. समाजातील सर्व घटकातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांनी आपल्या राजवटीत अनेक समाजोपयोगी निर्णय घेऊन ते नेटाने राबविले. त्यांच्या कार्याचा विचार करून राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने आपल्या अखत्यारीतील कोल्हापूरच्या कृषी महाविद्यालयाचे नामकरण करण्याचा प्रस्ताव सरकारपुढे मांडला होता. कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी हा प्रस्ताव मार्गी लागण्यासाठी आग्रह धरला होता. अखेर याबाबतचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃
👩🏻🏫अंगणवाडी सेविका १ एप्रिलपासून संपावर*
Maharashtra Times | Updated Mar 29, 2017
म. टा. प्रतिनिधी, पुणे
विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी एक एप्रिलपासून राज्यव्यापी संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दोन एप्रिलच्या पल्स पोलिओ मोहिमेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय, अंगणवाडी सेविका मदतनीस संघटनेच्या राज्य कृती समितीने घेतला आहे. संपामुळे पुणे, पिंपरी-चिंचवडमधील तीन हजार अंगणवाड्या बंद राहणार आहेत. बंदच्या पहिल्या दिवशी (ता.१) सूसन हॉस्पिटल जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून कौन्सिल हॉलवर मोर्चा काढण्यात येणार आहे. अंगणवाडी सेविकांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव तयार करण्यासाठी राज्य सरकारने समिती नेमली होती. मात्र, राज्याच्या अर्थसंकल्पात समितीने दिलेल्या अहवालाचा विचारच करण्यात आलेला नाही.त्यामुळे अर्थसंकल्प मंजूर करताना अंगणवाडी सेविका-मदतनीसांच्या मानधनवाढीचा निर्णय व्हावा, या मागणीसह विविध मागण्यांसाठी संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती अंगणवाडी कर्मचारी सभेच्या नितीन पवार यांनी दिली.
*अंगणवाडी सेविकांच्या मागण्या*
१. अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा, वेतनश्रेणी आणि अन्य लाभ देण्यात यावेत.
२. मिनी अंगणवाडीला पूर्ण अंगणवाडीचा दर्जा आणि त्यानुसार कर्मचाऱ्यांना वेतन द्यावे.
३. अंगणवाडीच्या कामासाठी लागणारे सर्व रजिस्टर, अहवाल व अन्य सर्व साहित्य सरकारने पुरवावे. जे साहित्य हाताने उचलून नेण्यासारखे नाही, असे सर्व साहित्य अंगणवाडीत नेण्यासाठी लागणारा खर्च सरकारने द्यावा.
४. सर्व कर्मचाऱ्यांना दर दिवाळीला नियमितपणे सेविकांच्या एका मानधनाइतका बोनस देण्यात यावा.
५. राज्य कामगार विमा योजना व भविष्य निर्वाह निधीची योजना तयार करून अंगणवाडी क्षेत्राला लागू करावी.
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃