🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
*👩🏻 जागतिक महिला दिन विशेष 👩🏻*
📃 *आजची प्रेरणादायी पोस्ट* 📜
*भाग* -3⃣4⃣4⃣
*👩🏻तिच्या 'आकांक्षा' पुढती गंगणही ठेंगणे*
By-सकाळ वृत्तसेवा
*विशेष मुलांसाठी झोकून देऊन काम;*
*राणीताई चोरे यांची परिस्थितीवर मात*
शिरूर (पुणे)- पहिली मुलगी सहा वर्षांची झाल्यावर ती "ऍबनॉर्मल' असल्याचे कळल्याने बसलेला धक्का... मग तिची वाटचाल सुखदायक होण्यासाठीची अखंड धावपळ... विविध शाळा किंवा संस्थेतून तिला स्थिरस्थावर करण्यासाठीचा आटापिटा... ती स्थिरस्थावर होते न होते तोच दुसरीही मुलगी पुन्हा "तशी'च असल्याचे कळल्यावर कोलमडून पडलेले आई-वडील... परंतु या "उध्वस्त' होण्यालाच त्यांनी जीवन मानले अन् जीवनाची ही लढाई लहान, चार भिंतींच्या आतली करण्यापेक्षा मोठी आणि व्यापक केली... दोन विशेष मुलींच्या आई असलेल्या राणीताई नितीन चोरे या आता तब्बल वीस विशेष मुलांचे संगोपन करीत असून, त्यासाठी त्यांनी विशेष मुलांसाठी प्रशिक्षण केंद्रही सुरू केले आहे... !
राणीताई चोरे यांचा हा संघर्ष आता एका निर्णायक टप्प्यावर येऊन पोचला असून, या संघर्षातून त्या खूप खंबीरपणे उभ्या राहिल्या आहेत. ही विशेष मुले हेच "विश्व' बनलेल्या राणीताईंनी आता या मुलांसाठीच सर्वस्व अर्पण करण्याचा संकल्प केला आहे. त्यांचे पती नितीन चोरे हे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले असून, भविष्यातील वाटचालीसाठी त्यांनीही सर्वतोपरी योगदान दिले आहे.
राणीताईंच्या संघर्षाचा प्रवास सुरू झाला तो "आकांक्षा' या कन्येच्या जन्मापासून. सहा वर्षांची झाल्यावर ती "ऍबनॉर्मल' असल्याचे तपासणीतून स्पष्ट झाल्याने तिच्या भवितव्यासाठी राणीताईंनी खूप धावपळ केली. विशेष मुलांसाठीच्या शाळेतही तिला घातले. परंतु, बुद्ध्यांकाच्या अडचणीबरोबरच अपंगत्वामुळे ती त्या संस्थांत जास्त काळ राहू शकली नाही. दरम्यान, पुण्याच्या "कामायनी' संस्थेत ती स्थिरस्थावर झाली असताना राणीताईंनी तेथील विशेष मुलांच्या पालकांची मानसिकता अभ्यासण्याचा प्रयत्न केला. अनेक पालक केवळ अशा मुलांना समाजापासून दूर ठेवत असल्याचे गंभीर वास्तव त्यांच्या निदर्शनास आले. त्यातून या मुलांचे संगोपन योग्यरीत्या होत नसल्यानेही त्यांच्या खालावलेल्या मनःस्थितीवर आणखीनच आघात होत असल्याचेही त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे या मुलांच्या संगोपनाचे "कामायनी' तच चालू असलेले प्रशिक्षण त्यांनी सुरू केले. दोन वर्षांचे हे प्रशिक्षण पूर्ण करीत असतानाच राणीताईंना दुसरा धक्का बसला. त्यांची धाकटी मुलगी समिक्षा ही देखील "ऍबनॉर्मल' असल्याचे निदान झाले.
खरेतर कोलमडून पडण्याचीच ही स्थिती. तरीही अत्यंत धीराने या धक्क्यातून सावरताना आता मुलींना कुठेही न पाठवता आपणच त्यांना उभे करायचे या हेतूने राणीताईंनी "आकांक्षा एज्युकेशन फाऊंडेशन' ची स्थापना केली आणि गेल्यावर्षी शहराजवळ "आकांक्षा स्पेशल चाइल्ड एज्युकेशन सेंटर' सुरू केले. सध्या या संस्थेत तब्बल वीस विशेष मुलांचा सांभाळ व सर्वतोपरी संगोपन केले जात असून, राणीताई स्वतः या मुलांच्या भवितव्यासाठी अहोरात्र झटताना दिसत आहेत. येथील दानशूर उद्योजक मनसुखलाल गुगळे यांनी या संस्थेसाठी जागा उपलब्ध करून दिली असून, पती नितीन चोरे, बंधू ज्ञानेश घोडे; तसेच डॉ. मनिषा चोरे, नारायण शिंदे, आदेश गुंदेचा, दत्ता केदारी हे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. सध्या या संस्थेतून विशेष मुलांना "योग्यरीत्या' सांभाळण्याबरोबरच; त्यांच्या सर्वांगीण वाढीसाठी व विकासासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत.
विविध ठिकाणी विशेष मुलांना जनावरासारखी वागणूक मिळते. हे थांबविण्याच्या हेतूने संस्थेतच अशा मुलांचे संगोपन करण्याचा संकल्प असून, भविष्यात त्यासाठी निवासी शाळा सुरू करण्याचा मनोदय असल्याचे राणीताईंनी सांगितले. त्याचबरोबरच वृद्धाश्रम चालू करायचा असून, ज्या ज्येष्ठ नागरिकांची त्यांच्या कुटुंबात दखल घेतली जात नाही, त्यांना सांभाळायचे नियोजन आहे. जेणेकरून आमच्या संस्थेतील विशेष मुलांना आजी-आजोबांची माया मिळेल आणि कौंटुबिक जिव्हाळ्यापासून पारखे झालेल्या आजी-आजोबांनाही नातवाचे प्रेम मिळेल. या उपक्रमातून नात्याचा एक अनोखा सेतू उभारण्याचा मानस राणीताईंनी व्यक्त केला.
संपर्कः
सौ. राणी चोरे, 8605182100
(संस्थापिका- आकांक्षा स्पेशल चाइल्ड एज्युकेशन स्कूल, रामलिंग रोड, शिरूर)
📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -*
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_
यापूर्वीचे भाग वाचण्यासाठी.......
- http://guruvarykm.blogspot.in/
या आपल्या Blog ला भेट द्या.....