twitter
rss

🌱भाषेचा पेपर सोप्पा...!*

By pudhari | Publish Date: Mar 8 2017

पुणे ः प्रतिनिधी

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा असलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेस भाषा विषयाने मंगळवारी सुरुवात झाली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाद्वारे घेण्यात येणार्‍या या परीक्षेमध्ये मंगळवारी दोन सत्रांत परीक्षा घेण्यात आली. पहिल्या सत्रात मराठी, हिंदी,उर्दू, गुजराथी, तमिळ, कन्नड, तेलुगु,मल्याळम,सिंधी,बंगाली या भाषा विषयांचा पेपर झाला, तर दुपारच्या सत्रात फ्रेंच द्वितीय व तृतीय भाषेचा पेपर झाला. भाषा विषयांचे पेपर अपेक्षेप्रमाणे  सोपे आणि सुटसुटीत आले, कृति प्रश्‍नपत्रिकेमुळे फारशी अडचण आली नसल्याची भावना या वेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.  दरम्यान, पहिलाच पेपर असल्याने विद्यार्थी आणि पालकांची परीक्षा केंद्रांवर धावपळ पाहायला मिळाली.

राज्य शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात येणारी  माध्यमिक शालांत परीक्षा (इयत्ता दहावी)  7 मार्च ते एक एप्रिल या काळात होणार आहे. राज्यभरातून 17 लाख, 66 हजार, 9 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. यात 9 लाख 89 हजार 90 विद्यार्थी, तर 7 लाख, 76 हजार, 190 विद्यार्थिनींचा समावेश आहे. एकूण 21 हजार 686 शाळांतून या विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. परीक्षेसाठी राज्यभरातील 4 हजार 728 केंद्रे सज्ज आहेत. दहावीची लेखी परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये 16 लाख 52 हजार 270 नियमित विद्यार्थी असून, 64 हजार 412 पुनर्परीक्षार्थी आहेत.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

🌷दीड लाख विद्यार्थ्यांची परीक्षा*

Maharashtra Times | Updated Mar 7, 2017,

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शालेय प्रवासानंतरच्या करिअरचे पहिले वळण असलेल्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेला मंगळवारी प्रारंभ झाला. उत्सुकता, हुरहूर आणि दडपण अशा वातावरणात विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी मराठीची परीक्षा दिली. दरम्यान, कोल्हापूर विभागातून एक लाख ५१ हजार ६४२ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. एकूण ३५१ केंद्रांवर परीक्षा सुरू झाली.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने दहावीच्या परीक्षेसाठी यंत्रणा कार्यरत झाली. कोल्हापूर विभागातील कोल्हापूरसह सांगली व सातारा या जिल्ह्यात ४४ परिरक्षक केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. प्रत्येक विभागासाठी सात भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना ताणमुक्त करण्यासाठी तसेच त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी समुपदेशकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. संवेदनशील केंद्रांवर बोर्डातर्फे विशेष लक्ष ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

सकाळी दहा वाजल्यापासूनच विद्यार्थी परीक्षा केंद्रांच्या आवारात जमण्यास सुरूवात झाली. परीक्षा क्रमांक आणि परीक्षागृह यांची माहिती घेण्यात काही विद्यार्थी दंग झाले. काही विद्यार्थी पालकांसमेवत तर काही विद्यार्थी ग्रुप करून परीक्षेसाठी आले होते. विद्यार्थिंनींसोबत मात्र पालकांनीच परीक्षा केंद्रांपर्यंत येण्यास प्राधान्य दिल्यामुळे सकाळी अकरा ते दोन या वेळेत केंद्राबाहेर पालक थांबल्याचे चित्र दिसले.

उपनगर किंवा लांब पल्ल्याच्या अंतरावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पालकांनी रिक्षा व खाजगी वाहनांची व्यवस्था केल्यामुळे शाळांबाहेर वाहनांची गर्दी झाली. शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या शाळांच्या परिसरात सकाळी अकरा ते दुपारी दोन यावेळेत वाहतुकीची कोंडी झाली.

*संवेदनशील केंद्रावर वॉच*

शिक्षण मंडळाच्यावतीने विभागातील संवेदनशील व गैरप्रकारासाठी कुप्रसिद्ध असलेल्या केंद्राची यादी तयार करण्यात आली असून या केंद्रावर भरारी पथकाचा वॉच राहणार आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील फलटण, मिरज तालुक्यातील एरंडोली, सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, भवानीनगर, उमदी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील गांधीनगर, किणी, पारगाव आणि मुरगूड या केंद्रांचा समावेश आहे. तर सातारा जिल्ह्यातील परळी, वाघोली, वाठार किरोली, सांगली जिल्ह्यातील मालगाव, शिराळा, वाळवा, येलूर, कुची, कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली, परिते, शाहूनगर, सोळांकूर ही केंद्रे उपद्रवी केंद्र म्हणून नोंद करण्यात आली आहेत.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

🎋शिक्षणमंत्र्यांनी दिलेल्या दहा मिनिटांत फुटतो पेपर!*

By pudhari | Publish Date: Mar 7 ,2017

मुंबई : प्रतिनिधी

बारावीच्या परीक्षेत व्हॉट्सअ‍ॅपवरील पेपरफुटीने डोके वर काढले आहे. परीक्षा केंद्रात 11.25 वाजता येणार्‍या विद्यार्थ्यांच्या मोबाइलमध्ये विज्ञान शाखेच्या गणित विषयाच्या प्रश्‍नपत्रिकेची तीन पाने सापडल्याने या विद्यार्थ्यांस खार पोलीसांनी अटक केली आहे. मुलांना निर्धारीत वेळेच्या दहा मिनिटे आधी प्रश्‍नपत्रिका द्या, असा नवा फंडा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी यावर्षी काढला आणि या दहा मिनिटांतच पेपरफुटीचा घोळ होत असल्याचे मंडळाच्या लक्षात आले आहे.

इंग्रजी, मराठी, चिटणिसाची कार्यपद्धती, भौतिकशास्त्र आदी विषयांच्या पेपरपाठोपाठ आता सोमवारी गणिताच्या  पेपरफुटीने डोके वर काढले. बारावीच्या विज्ञान शाखेचा गणिताचा पेपरही परीक्षा सुरू होण्यापूर्वी 20 मिनिटे आधी 10.40 वाजताच व्हॉट्स अ‍ॅपवर आला.

पान 1 वरून : वांद्रे येथील एमएसके महाविद्यालयातील परीक्षा केंद्रातून एका विद्यार्थ्याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडे विज्ञान शाखेच्या गणिताची प्रश्‍नपत्रिकेची तीन पाने व्हॉटसअ‍ॅपवर सापडली. हा विद्यार्थी 11 वाजून 20 मिनिटांनी परीक्षाकेंद्रात घाईघाईने येत होता. त्याच्या चेहर्‍यावरही पेपरफुटीचा ताण दिसत होता. या विद्यार्थ्यांची केंद्रचालकांनी झडती घेतली असता त्याच्या मोबाईलमध्ये प्रश्‍नपत्रिकेचे स्क्रिनशॉट सापडले. हा विद्यार्थी अल्पवयीन असल्याने त्याला दोन वाजेपर्यंत पेपर लिहीण्यास परवानगी देण्यात आली. दोन नंतर पोलीसांनी त्याच्या विरोधात खार पोलीसांत गुन्हा नोंदविला. त्याचबरोबर कॉमर्सच्या प्रश्‍नपत्रिकेचा स्क्रिनशॉर्ट मुंबई विभागीय मंडळाकडे परीक्षेपूर्वी आला ही प्रश्‍नपत्रिका परीक्षा सुरु होण्याअधीच फुटल्याचे उघड झाल्याने या संदर्भात वाशी पोलीसांत मंडळाने तक्रार दाखल केली आहे. पेपरफुटीत कोचिंग क्लास व शिक्षकांचाही सहभागी असण्याचा मंडळाचा संशय असून त्या पद्धतीनेही पोलीस तपास करीत आहेत.
अटक झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या पाचवर

बारावी पेपरफुटीप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी सोमवारी पहाटे आणखी दोघांना अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणात आतापर्यंत अटक केलेल्यांची संख्या 5 झाली आहे. मोहम्मद अमन मोहम्मद इस्लाम शेख (19) आणि सुरेश विमलचंद झा (26) अशी पहाटे अटक केलेल्या आरोपींची नावे असून दोघेही कांदिवलीचे रहिवासी आहेत. यापैकी शेख हा बारावीचा विद्यार्थी आहे. पोलिसांनी रविवारी मुंबईतून अझरुद्दीन शेख आणि राहुल भास्कर या एसवाय व टीवायच्या विद्यार्थ्यांना अटक केली होती. या दोघांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वी पंधरा मिनिटे आधी मराठी आणि सेक्रेट्रियल प्रॅक्टिस विषयाच्या प्रश्‍नपत्रिका बारावीतील काही विद्यार्थ्यांना व्हॉट्सअपवरून पाठविल्याची माहिती परिमंडळ 1 चे पोलिस उपायुक्त प्रशांत खैरे यांनी दिली. 

*ही पेपरफुटी नव्हे..शिक्षणमंत्री.*

बारावीचा आजचा गणित विषयाची प्रश्‍नपत्रिका  सकाळी 10 वाजून 40 मिनिटांनी व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून बाहेर आल्याचा संशय व्यक्त होत आहे.  सकाळी सर्व विद्यार्थी परीक्षा केंद्रात गेल्यानंतर एमएमके येथील केंद्रावर एका विद्यार्थ्याच्या मोबाईलवर पेपर आला. पण तो संशयित विद्यार्थी परिक्षा केंद्राच्या बाहेर होता. तसेच त्यावेळी परिक्षा केंद्रावरील विद्यार्थी वर्गामध्ये पोहोचले होते, त्यामुळे आजचा प्रकार हा पेपर फुटीचा म्हणता येणार आहे. तरीही हा प्रकार नक्कीच गंभीर आहे. त्यामुळे हा प्रकार नजरेआड केला जाणार नाही. प्रश्‍नपत्रिका परिक्षा केंद्रावर पोहोचल्यानंतर प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना प्रश्‍नपत्रिका देण्याच्या दरम्यान असा प्रकार घडला असल्याची शक्यता असून त्यादृष्टीने विभागाच्या परिक्षा केंद्रप्रमुखांना सूचना देण्यात आल्या आहेत, असे प्रकार पुन्हा घडू नये याची खबरदारी घेण्यात आल्याची माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना दिली.

आजचा प्रकार ज्या वांद्रे येथील एमएमके महाविद्यालच्या परिक्षा केंद्रावर घडला, तेथील संशयित विदयार्थ्याला पुढील तपासासाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकराच्या विषयी सायबर सेलच्या पोलिसअधिका-यांनाही सूचना देण्यात आल्या असून त्यादृष्टीने तपास सुरू असल्याचेही तावडे यांनी सांगितले.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

🌴आरटीईतून ३४५ विद्यार्थ्यांना प्रवेश*

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मोफत व सक्तीच्या शिक्षणाधिकार कायद्याअंतर्गत (आरटीई) २५ टक्के प्रवेशप्रक्रियेतील पहिल्या फेरीसाठी मंगळवारी लॉटरी पद्धतीने सोडत काढण्यात आली. या फेरीत ३४५ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले. या लॉटरी सोडतीसाठी दुधाळी येथील मामा भोसले विद्यालयात पालकांची गर्दी झाली.
आरटीई कायद्यानुसार प्राथमिक व पूर्व प्राथमिक वर्गातील प्रवेशासाठी विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये आर्थिक दुर्बल व वंचित घटकांमधील विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के प्रवेश राखीव ठेवण्याची तरतूद आहे. जिल्ह्यातील शाळांमध्ये या कायद्याअंतर्गत प्रवेश देण्यासाठी ३२८६ जागा आहेत. यामध्ये ३२१ पात्र शाळांनी ऑनलाइन नोंदणी केली होती.

यामध्ये जिल्हा परिषदेच्या २७८ व महापालिकेच्या ४३ शाळांचा समावेश आहे. प्रवेश प्रक्रियेमध्ये १३२६ ऑनलाइन अर्ज मिळाले होते. मात्र ३४ शाळांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त अर्ज आल्यामुळे पहिल्या फेरीसाठी लॉटरी पद्धतीने सोडत काढण्यात आली. बुधवारी प्रवेश निश्चितीबाबत विद्यार्थ्यांना कळवण्यात येणार आहे. २० मार्चनंतर प्रवेशाची दुसरी फेरी होणार आहे. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले, उपशिक्षणाधिकारी ए. जी. मगदूम, शिक्षण विस्तार अधिकारी जे. टी. पाटील, अधीक्षक पी. एन. नलवडे आदींसह अधिकारी उपस्थित होते.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

🌸शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू द. ना. धनागरे यांचे निधन*

मुंबईतील एशियाटिक सोसायटीचे ते विश्वस्त होते.

लोकसत्ता ऑनलाईन | March 7, 2017 8:54 PM

शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू द. ना. धनागरे. (संग्रहित छायाचित्र)
ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ आणि कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. द. ना. धनागरे यांचे चिंचवडमधील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्या मागे दोन मुले, सुना आणि नात असा परिवार आहे.

गेल्या महिन्यात पुद्दुचेरी येथे व्याख्यान देत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यानच्या काळातही त्यांच्या भेटीगाठी व लिखाण सुरू होते. त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रियाही करण्यात येणार होती. मंगळवारी चिंचवडमधील खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांचे डायलिसिस सुरू होते. त्याचवेळी रक्तदाब कमी होऊन त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच दुपारी साडेचारच्या सुमारास त्यांचे निधन झाले.
डॉ. धनागरे यांचा जन्म व महाविद्यालयीन शिक्षण वाशीम येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी नागपूरची वाट धरली. अमेरिकेतील प्रतिष्ठित एमआयटी विद्यापीठातून त्यांनी समाजशास्त्रातील उच्चशिक्षणही घेतले. त्यानंतर आग्रा विद्यापीठात प्राध्यापक म्हणून ते रूजू झाले. पुढील काळात कानपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमध्ये प्राध्यापक म्हणून त्यांनी अनेक वर्षे अध्यापन केले. त्यानंतर तत्कालीन पुणे विद्यापीठात ते रूजू झाले. शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी त्यांची निवड झाली. त्यांची ही कारकीर्द खूप गाजली. भारतीय समाजविज्ञान संशोधन परिषदेचे (आयसीएसएसआर) सदस्य सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले. इंडियन सोशिओलॉजिकल सोसायटीच्या जीवनगौरव पुरस्कारासह अन्य काही संस्थांचे जीवनगौरव तसेच अन्य पुरस्कारांनीही त्यांना सन्मानित करण्यात आले होते. मुंबईतील एशियाटिक सोसायटीचे ते विश्वस्त होते. त्याचबरोबर विदर्भवासी पुणे निवासी या संघटनेसह काही संस्थांमध्ये ते कार्यरत होते.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃