🌿शिक्षण विभागाची शिकवणी जेईई-नीटसाठी*
म. टा. प्रतिनिधी, नागपूर
इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेजेसना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे. मे २०१८ मध्ये जेईई आणि नीट या दोन प्रवेश परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना विभागाच्या वतीने मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
पुण्याची दक्षणा फाउंडेशन आणि शिक्षण विभाग यांच्यामध्ये या प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारानुसार मे २०१८ मध्ये जेईई ही इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षा व नीट ही मेडिकल कॉलेजची प्रवेश परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. मे २०१७ ते मे २०१८ या संपूर्ण वर्षभरात विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत मोफत प्रशिक्षण दिले जाईल. या प्रशिक्षण वर्गांना प्रवेश देण्यासाठी विद्यार्थ्यांची निवड शिक्षण विभागाच्यावतीने केली जाणार आहे. त्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांची चाचणी घेतली जाईल. येत्या ९ एप्रिलला ही चाचणी घेतली जाणार आहे. चाचणीच्या माध्यमातून निवडलेल्या विद्यार्थ्यांना वर्षभर प्रशिक्षण दिले जाईल. दरम्यान, या प्रशिक्षणासाठी केवळ मान्यताप्राप्त ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. सर्व ज्युनियर कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती शिक्षण विभागाच्या वतीने पोचविली जाणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यास विभागीय मंडळाच्या कक्षेतील केंद्राची निवड करून चाचणी परीक्षा घेतली जाईल.
*निवड चाचणीची कार्यपद्धती*
www.tinyurl.com/dak2017mah या संकेतस्थळावर होणार नोंदणी
ऑनलाइन नोंदणी ३० मार्चपर्यंत
चाचणी परीक्षा ९ एप्रिलला
मार्गदर्शन वर्ग प्रारंभ १५ जूनपासून
संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक : दक्षणा फाउंडेशन- ७७९८७८६४०५
ई मेल आयडी- jdst@dakshana.org
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃
👨🏻🏫 शिक्षकांच्या आत्मदहनाच्या इशाऱ्याने तारांबळ*
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
अतिरिक्त शिक्षकांचे वेतन तातडीने देण्याच्या मागणीसाठी माध्यमिक शिक्षकांनी गुरूवारी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या कार्यालयात दुपारपर्यंत ठिय्या आंदोलन केले. आठवडाभरापूर्वी या शिक्षकांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. आत्मदहनाचा इशारा सकाळी दिल्याने यंत्रणेची तारांबळ उडाली. पोलिसांनी जिल्हा परिषदेत प्रवेश करणाऱ्यांची कसून तपासणी केली. दुपारपर्यंत वातावरण तणावपूर्ण होते. अखेर ३१ मार्चपर्यत खात्यावर वेतन जमा न झाल्यास माध्यमिक शिक्षणाधिकारी आणि वेतन पथक अधीक्षकांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचा इशारा शिक्षकांनी दिला.
अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन केले असले तरी त्या शाळांच्या मुख्याध्यापकांनी माध्यमिक शिक्षण विभागाकडे पगार बिले सादर केलेली नाहीत. त्यामुळे शिक्षणसंस्था आणि माध्यमिक शिक्षण विभागाच्या तांत्रिक अडचणीत शिक्षकांचे पगार अडकले आहेत. काही शाळांमध्ये संबंधित विषयाची जागा, अनुदानित पद रिक्त नाही. अपदवीधर वेतनश्रेणीतील पद असताना पदवीधर वेतनश्रेणीतील शिक्षकांचे समायोजन अशा तांत्रिक अडचणी आहेत. समायोजन केलेल्या शाळांत शिक्षकांचे नाव समाविष्ट केले नसल्याने त्यांचा वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याविरोधात चाळीसहून अधिक अतिरिक्त शिक्षकांनी माध्यमिक शिक्षकांनी माध्यमिक शिक्षण विभागाकडे धाव घेतली. अचानक झालेल्या आंदोलनामुळे शिक्षण विभागाची तारांबळ उडाली.
प्रशासनाने पोलिसांना बोलाविले. विभागात शिक्षक आणि शिक्षण विभागाचे अधिकारी यांच्यात दोन तास वादावादी झाली. माध्यमिक शिक्षण विभागाचे अधीक्षक एम. बी. शेख आणि उपशिक्षणाधिकारी सूर्यंकांत पाटील यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. जोपर्यंत वेतनाचा आदेश देत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा देण्यात आला. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले.
दरम्यान माध्यमिक शिक्षण विभागाकडून वेतनाचे पत्र घेऊन शिक्षक शिक्षण उपसंचालक कार्यालयातील माध्यमिक शिक्षण विभागाच्या वेतन पथकाकडे केले. वेतनपथक अधीक्षक शंकरराव मोरे यांना संबधित पत्र दिले. त्यांनी वेतनपत्रक तयार करून देतो. मात्र त्यावर माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची स्वाक्षरी आणा, असे सांगितले. त्यावेळी शिक्षक आणि मोरे यांच्यात वाद झाला. शिक्षण विभागाच्या तांत्रिक कारणामुळे वेतन अडवू नये. ३१ मार्चपर्यंत शिक्षकांचे वेतन खात्यावर जमा न झाल्यास वेतन पथक अधीक्षक आणि माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला. आंदोलनात आनंदा डाकरे, दिनकर कांबळे, शहाजी मासाळ, ए. व्ही. कांबळे, ए. व्ही. पाटील आदी सहभागी झाले.
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🌴
🎋पेपर तपासा अन्यथा.. कारवाईला सामोरे जा*
Maharashtra Times | Updated Mar 23, 2017
म. टा. प्रतिनिधी, पुणे
बारावी परीक्षेच्या पेपर तपासणीच्या कामकाजावर बहिष्कार टाकणाऱ्या शिक्षकांना पेपर तपासणीबाबतच्या सक्त सूचना द्या, अन्यथा शिक्षण विभागाकडून होणाऱ्या कारवाईला सामोरे जा अशा सूचना शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यातील ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्यांना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, मागण्या पूर्ण होईपर्यत बारावीच्या पेपर तपासणीवर आपला बहिष्कार सुरूच राहणार असल्याचे उपोषणकर्त्या शिक्षकांनी गुरुवारी सांगितले ज्युनिअर कॉलेजमधील विभाग, तुकड्या व वर्ग यांची अनुदान पात्र यादीबाबतची आर्थिक तरतूद जाहीर करावी आणि शिक्षकांचा शंभर टक्के पगार तत्काळ सुरू करावा अशा मागण्या पूर्ण होईपर्यंत बारावीच्या पेपर तपासणीवरील बहिष्कार मागे घेतला जाणार नाही, असा पवित्रा महाराष्ट्र राज्य (कायम) विना अनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीने घेतला आहे. समितीच्या वतीने मुंबईतील आझाद मैदान येथे बेमुदत उपोषण सुरू करण्यात येत आहे. या उपोषणाचा गुरुवारी पाचवा दिवस होता. उपोषणाला राज्यातील बहुतांश शिक्षकांनी पाठिंबा दिला आहे. सध्या राज्यात राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावीची परीक्षा घेण्यात येत आहे. शिक्षकांनी बहिष्कार टाकल्याने पेपर तपासणीचे काम रेंगाळण्याची शक्यता आहे.
या बाबत पुणे शिक्षण उपसंचालक कार्यालयांतर्गत येणाऱ्या कॉलेजच्या प्राचार्यांनी शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर यांच्याकडे संबंधित प्रकाराबाबत योग्य तो निर्णय घेण्याबाबत सांगितले होते. यावर टेमकर यांनी बारावी पेपर तपासणीच्या कामकाजावर बहिष्कार टाकणाऱ्या शिक्षकांना पेपर तपासणीचे काम सुरू करण्याबाबत सक्त सूचना देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, पेपर तपासणीच्या कामावर बहिष्कार टाकणाऱ्या शिक्षकांवर शिक्षण विभागाकडून कारवाई होण्याची शक्यता असल्याची माहिती द्या, असे सांगितले आहे. आर्थिक तरतूद जाहीर करणे, शिक्षकांचा शंभर टक्के पगार सुरू करणे, उर्वरित कॉलेजचे ऑफलाइन पद्धतीने मूल्यांकन करणे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे या मागण्यांची पूर्तता होईपर्यत पेपर तपासणीवर आपला बहिष्कार कायम राहणार असल्याचे समितीचे अध्यक्ष प्रा. टी. एम. नाईक यांनी सांगितले.
पराग पाटील, आबू इनामदार, नवनाथ डोके, नानासाहेब जगताप, सचिन पालवे आदी समितीचे पदाधिकारी उपोषणात सहभागी झाले आहेत.
*वेळेत निकालासाठी प्रयत्न*
शिक्षण विभागाला बारावी परीक्षेच्या पेपर तपासणीचे काम मुदतीत करायचे आहे आणि निकाल नियोजित वेळापत्रकाप्रमाणे लावायचा आहे. त्यामुळे कॉलेजांच्या प्राचार्यांनी पेपर तपासणीच्या कामाचे तत्काळ योग्य असे नियोजन करावे. तसेच, पेपर तपासणीच्या कामात उशीर होणार नाही, याची काळजी घेण्याबाबत टेमकर यांनी सांगितले आहे.
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃
🌾 गटशिक्षणअधिका-याला लाच घेताना अटक*
By pudhari | Publish Date: Mar 23 2017
बीड : वार्ताहर
येथील गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने लाच घेताना रंगेहाथ पकडले. श्रीमंत सोनवणे हे मुख्याध्यापक म्हणून अंभोरा येथे कार्यरत आहेत.हंगामी वस्तीगृह अनुदानात भ्रष्टाचार केला आहे त्यातून दोन लाखांची मागणी होत होती अखेर 75 हजार रुपयात सौदा ठरला पैकी 25 हजार दि 6 रोजी दिले.आणि उर्वरित 50 पैकी काल रोजी 25 हजार रु.घेत असताना धनवे यांस साबलखेड शिवारातील एका रसवंती गृहात विलास वायभासे या शिक्षकामार्फत त्यांनी पैसे स्विकारताच बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरिक्षक भाऊसाहेब गोंदकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने रंगेहाथ पकडले.
बाळासाहेब धनवे यास ताब्यात घेऊन पोलिस उप विभागीय कार्यालयात राञी उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃
😌 सातारा : चार शाळकरी मुले बुडाली*
By pudhari | Publish Date: Mar 23 ,2017
सातारा : प्रतिनिधी
मुळीकवाडी-तासगाव (ता.सातारा) येथे गुुरुवारी दुपारी 5 वाजण्याच्या सुमारास त्याच गावातील चार शाळकरी मुले विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. चारही मुले अवघ्या 12 वर्षांची असून मृतांमध्ये सख्ख्या भावांचा समावेश आहे. दरम्यान, या घटनेमुळे मुळीकवाडीसह सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
राजरत्न सुनील कांबळे, अक्षय विश्वास काळभोर, करण सुनील कांबळे व सिद्धार्थ संतोष कांबळे सर्व रा. मुळीकवाडी अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. यातील राजरत्न व करण हे सख्खे भाऊ आहेत. याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी, गुरुवारी दुपारी 3 ते 4 वाजण्याच्या सुमारास संबंधित मुले पोहण्यासाठी गावातील शेतात असणार्या विहिरीमध्ये गेले होते. विहिरीला कठडा असून त्याठिकाणी मुलांनी कपडे काढून बाजूला ठेवली होती. विहिरीमध्ये सुमारे 9 फूट एवढे पाणी आहे. दुर्दैवाने विहिरीत मुले गेल्यानंतर ती बुडाली. बराच वेळ मुले घरी आले नसल्याने यातील काही पालकांची चिंता वाढली. मुले बेपत्ता असल्याची माहिती गावात पसरल्यानंतर विहिरीकडे मुले गेली असल्याची माहिती समोर आली.
गावातील ग्रामस्थ विहिरीजवळ जमल्यानंतर त्यांना विहिरीशेजारी मुलांची कपडे दिसून आली. मुलांची कपडे पाहिल्यानंतर कुटुंबीयांचा व ग्रामस्थांच्या काळजाचा ठोका चुकला. मुलांची कापडे होती, मात्र मुले नसल्याने परिसरात महिलांनी हंबरडा फोडला. या घटनेचे गांभीर्य ओळखून तालुका पोलिस ठाण्याचे पो.नि. दत्तात्रय नाळे यांनी पोलिसांसह तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मुलांची शोध मोहीम राबवण्यात आली. विहिरीत शोध सुरु असतानाच यावेळी एक एक करत मुलांचे मृतदेह विहिरीत आढळून आले. सुमारे 1 तास शोधमोहीम सुरु होती. एक तासानंतर चारही मुलांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. मुलांचे मृतदेह पाहून गावकर्यांनी अक्षरश: हंबरडा फोडला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवले.
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃