*********************************************************************************
सरकारी दारुबंदी
*********************************************************************************
पश्चिम महाराष्ट्रातील एक संपन्न आणि सुसंस्कृत गांव होतं .गावाला देशभक्तीची आणि शौर्याची परंपरा होती.आजही घरटी एकजण सैन्यात दाखल होता .
सगळे सुरळीत चालू होते,आता ~म्हैसाळचे~ कॅनॉलचे पाणी आल्याने शेती अधिकच बहरात आली होती,जसजसी गावची भरभराट होत होती.. तसा पैशाचा सुकाळ होत होता.. तसतसा गावात _आक्काबाई_ चा शिरकाव होवू लागला ...गावातील तरुणांना जराजरा तिची चटक लागू लागली .. गावाची गरज ओळखून मग गावातचं कशी उपलब्ध होईल याचा विचार होवू लागला ,पानाच्या पट्टीतचं सहजचं मिळू लागली . विदेशीच्या जोडीला देशी ,गावठीही मिळू लागली , '' कशाला बाहेरुन आणायाची ? करुया स्वनिर्मिती ....!'' या उदात्त हेतूने काही तरुणांनी गावातचं उत्पादन सुरु केलं. काही दिवसातचं ... निर्मितीच्या बाबतीत भारतातलं पहिलं स्वयंपूर्ण गांव होण्याचा मानआपल्या गावाला मिळणार असू प्रत्येकाला वाटू लागलं ...
'' कशाला कुणाला आडवायचं आणि चार मताला गमवायचं ...'' या विचाराने गावातले पुढारी डोळ्याला पट्टीला बांधून नाकाने ब्रँड ओळखण्यात आतापर्यंत तरबेज झाले होते.. आसं सगळं सुरळीत चालू असताना ....
गावातले एक मेजर सैन्यातून रिटायर होवून गावाकडे कायमचं राहायला आले. मेजरसाहेबांनी चार दिवसातचं गावचा रागरंग ओळखला ... सकाळ-संध्याकाळी व्यायामाला जाणारी गावातली पोरं आता जराशी झुलतं _लेझिम खेळत_ रस्त्याच्या कडकडनं जातं होती. दुधाची डेअरी बंद पडून त्याच गाळ्यात आता _सरकारमान्य_ रांगेत विकली जात होती.
गावची अवस्था पाहून मेजरची सटकली ...त्यांनी तडकं पंचायत गाठली , सरपंचाची भेट घ्यायची ठरवलं अन् बंदी आणायची ... पण सरपंच वर्षातनं दोनदाचं झेंडा फडकावयाला पंचायतीत येतात .शिपायाने माहिती दिली .. मग मेजरसाहेबांनी महिला सरपंचाच्या नावाची पाटी बघून सरपंच-पतीचीच भेट घेतली. जादा काही नाही पण पुढच्या ग्रामसभेला ठरावाचं घेण्याचं आश्वासन मिळालं . _डेप्युटी_ अवस्था पाहून त्यांच्याकडे विषय काढलाच नाही. गावच्या पाटलाची आठवण झाल्याने त्यांनाही भेटले ,महिन्याला तालुक्याला हप्ता पोहोच होतो येवढेचं ज्ञान मिळले...
मेजर साहेबांनी ग्रामसेवकांना २ ऑक्टोबरला ग्रामसभा बोलवायची तसदी दिली... गांधीजयंतीला ड्रायडेच्या मुहुर्तावर साडेचार नागरिकांच्या उपस्थितीत (इतरांचे अंगठे उठवून) ग्रामसभेत ठराव झाला ...
गावात बंदी करायचा अर्ज ,ठराव जोडून तालुका... जिल्हा... मजल दरमजल पुढं सरकू लागला ...
दोन महिन्यात काहीच हालचाल झाली नाही . दरम्यान _थर्टीफस्ट_ मात्र जोरात साजरा झाला.
पुन्हा मेजरने तालुक्याची कचेरी गाठली, जिल्ह्याची वाट धुंडाळली,पुण्याची वारी केली _माहित अधिकाराची_ ढाल केली... तेव्हा आनंदाची बातमी मिळाली , गावात _सरकारी बंदी_ झाली. राज्य ,जिल्हा ,तालुका मजल दरमजल करीत पत्र एकदा गावात पोहचले....
मेजरनीं पत्राच्या झेरॉक्स काढून तालुक्यात पोलिस स्टेशन आणि सगळ्या विभागात दिल्या ...निर्धास्त होवून गावची वाट धरली ...
गावातही बातमी सगळ्यांनाचं कळली ,पण सवय कोणाची जाते ? ' सरकारी आलेलं पत्र चार ठिकाणी चिकटावलं गेलं ' याच्यापेक्षा वेगळं काही झालचं नाही.
स्वनिर्मिती पहिल्या प्रमाणे चालूचं होती .. देशी ,विदेशी,गावठी आजही मिळत होती ,पोर जोरात _लेझिम_ खेळत होती.
मेजर साहेबांची पुन्हा सटकली .. दुसऱ्यादिवशी सकाळी सकाळीचं तालुक्याची कचेरी गाठली.... '' जिल्ह्याला मिटींग असल्याने सगळे जिल्ह्याला गेलेत,तुम्ही दुपारी या.'' चपराश्याने सरकारी उत्तर दिले.. आज सोक्षमोक्ष लावायचाचं असा निर्णय मेजर साहेबांनी केला. दुपारपर्यंत काय करायचे असे मनात आणून _एस् बी आय_ची वाट धरली महिन्याची पेंशन घेतली. पावलं आपोआप मिल्ट्री कॅन्टीनकडे वळली.. महिन्याचे लागणारे सामान ग्रोसरी विभागातून घेवून _लिकर_कडे साहेब वळले... सेल्समनला कार्ड आणि पैसे दिले.. सेल्समनने गावाचे नाव पाहून नवीन यादी पाहिली .. नावाची खात्री केली ,आणि मेजरसाहेबांना सांगितले, _'' सरकारी आलेल्या पत्रामुळे तुमच्या गावातील सर्व माजी सैनिकांची या महिन्यापासून बंद केली आहे..... हे पहा पत्र अन् नावांची यादी.....!''_
मेजर साहेबांनी डोक्याला हात लावला आणि कचेरीची वाट धरली .
आतापर्यंत एक अव्वल कारकून कचेरीत आला होता ,आता त्यांना मेजरचां चेहरा पाठ झाला होता. मेजरसाहेबांनी काही बोलण्यापूर्वीच सरकारी पत्रानुसार केलेल्या कार्यवाहीची स्थळपत्र त्यांच्या हातात देत ते कारकून बोलले,
*'' मेजरसाब,सरकारने दारुबंदी करावी अशी तुमची मागणी होती,आम्ही _सरकारी दारूबंदी_ कलेेली आहे .''*
*_✒ दीपक माळी .९६६५५१६५७२._*
******************************
मित्रांनो असचं काही तरी आपल्या K. T. S. परीक्षेच्या बाबतीत झाले आहे का ?
******************************
|