twitter
rss

♻ बारावीची गणितची प्रश्नपत्रिका व्हॉटसअॅपवर व्हायरल*

By pudhari | Publish Date: Mar 6 2017 2:13PM

मुंबई :

मराठी विषयाचा पेपर व्हॉटस्अपवर व्हायरल झाल्याचा प्रकार घडला होता. तोच आज (सोमवार) गणिताचा पेपर नियोजित वेळेच्या २० मिनिटे आधी व्हॉटस्अपवर व्हायरल झाला असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पेपर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली.

गणितचा पेपर नियोजित वेळेनुसार ११ वाजता होणार होता. मात्र, परीक्षेच्या अगोदर २० मिनिटे म्हणजे अंदाजे पावणे दहाच्या सुमारास  हा पेपर व्हॉटस्अपवर व्हायरल झाला. त्यामुळे शिक्षण विभाग नेमके काय करत आहे असा सवाल विचारला जात आहे. एकापाठोपाठ एक पेपर फुटत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

याविषयी सायबर क्राइम सेलकडे तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय सचिव दत्तात्रय जगताप यांनी दिली. सोशल मीडियावरुन पेपर लीक होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी २०१५ आणि २०१६ मध्येही अशाच प्रकारे पेपर लीक झाले होते. यंदाही पेपर लीक झाल्याने खळबळ उडाली आहे.

गुरूवारी मराठीचा पेपर ११ वाजता सुरु होणार होता. मात्र, विद्यार्थांना १०.३० वाजताच वर्गात सोडण्यात आले होते. त्यानंतर १०.५० वाजता त्यांना पेपर हातात देण्यात आला. त्यामुळे पेपर नक्की कोणी लीक केला याबाबत सध्या बोर्डही साशंक आहे. पेपर अवघ्या काही मिनिटांपूर्वी लीक झाल्याने तो पुन्हा घेण्यात येणार की नाही, याबाबत बोर्डाने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

💶 *केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार २ % 'डीए' वाढ*

मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली

केंद्र सरकारी सेवेतील ५० लाख कर्मचारी आणि ५८ लाख पेन्शनधारकांना या महिन्याच्या अखेरीस महागाई भत्तावाढीची गोड बातमी मिळणार आहे. केंद्र सरकार लवकरच महागाई भत्त्यात २ ते ४ टक्क्यांची वाढ करणार असून १ जानेवारी २०१७ पासून ही भत्तावाढ लागू केली जाणार आहे. या निर्णयाने वाढत्या महागाईत कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

केंद्र सरकार १२ महिन्यांमधील महागाईची सरासरी काढून त्यानुसार महागाई भत्ता निश्चित करत असतं. यात दशांशच्या नंतरचे आकडे गृहित धरले जात नाहीत. म्हणजे २.९५ टक्के इतका महागाई दर असल्यास हा दर २ टक्के इतकाच धरला जातो आणि त्या प्रमाणातच महागाई भत्तावाढ दिली जाते. कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनावर ही भत्तावाढ मिळत असते. या फॉर्म्युल्यानुसार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना २ ते ४ टक्क्यांपर्यंत महागाई भत्तावाढ देण्याचे जवळपास निश्चित करण्यात आले आहे. याबाबत या महिन्याच्या अखेरपर्यंत घोषणा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, कर्मचारी संघटना मात्र या प्रस्तावित महागाई भत्तावाढीबाबत समाधानी नाही. वेगाने वाढणारी महागाई पाहता ही भत्तावाढ तुटपूंजी ठरेल, असे केंद्रीय कर्मचारी संघाचे अध्यक्ष के. के. एन. कुट्टी यांनी सांगितले.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

🌱12 वी पेपरफुटी वाशीतून दोघे विद्यार्थी अटकेत*

By pudhari | Publish Date: Mar 6 2017

मुंबई : प्रतिनिधी

12 वी मराठीचा पेपर व्हाट्स अ‍ॅपवर फुटल्या प्रकरणी पोलिसांनी रविवारी राहुल भास्कर आणि अझरुद्दीन शेख या दोन विद्यार्थ्यांना वाशीतून अटक केली.

दरम्यान, बारावीच्या शिल्लक राहिलेल्या पेपरला उशिरा येणार्‍या विद्यार्थ्यांवर मंडळाची बारकाईने नजर राहणार आहे. उशिरा येणार्‍या विद्यार्थ्यांची नोंंद केली जाणार असून तो का उशिरा आला याची कारणे तपासली जाणार आहेत.

अगोदर इंग्रजी मग मराठी त्यानंतर लगेच शनिवारी वाणिज्य शाखेचा ‘चिटणिसाची कार्यपद्धती’ एसपी चा पेपर व्हॉटसअ‍ॅपवर फुटल्याने शिक्षण मंडळाची डोकेदुखी वाढली असून,शिक्षण मंडळाने परीक्षेचे नियम अधिक कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे.  बारावीच्या पुढील पेपरांना येणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्यांचा परीक्षा केंद्रात येण्यापूर्वी मोबाईलला पूर्णत: बंदी असेल. विद्यार्थ्यांना तपासूनच आता सोडण्यात येणार आहे.

व्हॉटसअ‍ॅपवर अस्तित्वात असलेल्या एचएससी स्टुडंट या ग्रुपवर बारावीच्या प्रश्‍नपत्रिका लीक होत आहेत. परीक्षेपूर्वी दहा ते पंधरा मिनिटे आधी प्रश्‍नपत्रिका व्हॉटसअ‍ॅपवर शेअर होत आहेत. या पेपरफुटीचा विद्यार्थ्यांना कोणताही फायदा होत नाही. कारण त्यावेळी विद्यार्थी परीक्षा केंद्रात असतो.

पेपर फोडणार्‍या विद्यार्थ्यांचा हा खोडसाळपणा असू शकतो अशी शक्यता शिक्षण मंडळाने वर्तवली असली तरी याचा फायदा घेणारे विद्यार्थी आहेत का? ते उशिरा येतात का याचीही पाहणी केली जाणार आहे. एखादा विद्यार्थी परीक्षा केंद्रात उशिरा आल्यास सर्वात अधिक त्याची कसून तपासणी केली जाईल आणि त्याला उशिरा येण्यामागचे नेमके कारणही स्पष्ट करावे लागणार आहे.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

🎋दहावीच्या परीक्षेवर पेपरफुटीचे सावट*

Maharashtra Times | Updated Mar 6, 2017

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

बारावीचा मराठीपाठोपाठ ‘एसपी’चा पेपरही व्हॉट्सअॅपवर आल्याने पेपरफुटीचा सिलसिला सुरूच राहिला आहे. उद्या, मंगळवारपासून दहावी बोर्डाची परीक्षाही सुरू होत असून व्हॉटस्अॅपवरील या पेपरफुटीचे सावट या परीक्षेवरही पडले आहे. त्यामुळे बोर्डाने अधिक सज्ज राहण्याच्या सूचना केंद्रप्रमुखांना केल्या असून यानुसार विविध उपाययोजनाही राबविण्याची सूचना बोर्डाने दिल्याचे कळते.
सध्या राज्यभरात बारावी बोर्डाची परीक्षा सुरू आहे. या परीक्षेदरम्यान मराठी आणि कॉमर्स शाखेचा एसपीचा पेपर व्हॉटसअॅपवर परीक्षा सुरू होण्या अगोदरच आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. व्हॉटसअॅपवर प्रश्नपत्रिका आढळून आल्याने बोर्डाने मंगळवारपासून सुरू होण्याऱ्या दहावी बोर्डाच्या परीक्षेसाठी योग्य त्या उपाययोजना घेतल्या असल्याचे बोर्डाने जाहीर केले. त्यानुसार बोर्डाने शनिवारपासूनच परीक्षा केंद्रांना मोबाइलबंदीची अंमलबजावणी करण्याची ताकीद दिली आहे. परीक्षा केंद्रप्रमुख आणि कस्टोडियन वगळता अन्य कोणालाही मोबाइल वापरण्याची मुभा न देण्याची सूचना राज्य शिक्षण मंडळानी दिल्या आहेत.

दरम्यान, विद्यार्थी आणि पालकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन बोर्डातर्फे करण्यात आले असून विद्यार्थ्यांनी कोणत्याही दडपणात न राहता पेपर द्यावे, असेही सांगण्यात आले. दुसरीकडे व्हॉट्स अॅपवरील पेपरफुटी रोखण्यासाठी बोर्डाने भरारी पथकांची संख्या वाढविली असून परीक्षा सुरू होण्याअगोदर परीक्षा केंद्रावर आणि आसपासच्या भागात भेट देण्याची सूचना केली आहे. याबाबत मुंबई विभागीय मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, दहावीच्या परीक्षेवर पेपरफुटीचे कोणतेही सावट नाही. विद्यार्थ्यांनी त्यासंदर्भात ताण घेऊ नये. खबरदारी म्हणून आम्ही परीक्षा केंद्रप्रमुखांना मोबाइलबंदीच्या निर्णयाची सक्तीने अंमलबजावणी करण्याची सूचना केली आहे. त्याचप्रमाणे भरारी पथकांना सूचना देण्यात आल्या आहेत.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

🌴दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष सुविधा - तावडे*

First Published :06-March-2017

मुंबई : दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडथळे दूर करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने या विद्यार्थ्यांना सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणे सोपे होणार आहे.राज्यातील हजारो दिव्यांग विद्यार्थ्यांना दिव्यांगाच्या वर्गवारीनुसार आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालये, विद्यापीठे यांची राहणार असल्याचे ही स्पष्ट करण्यात आले. दिव्यांग विद्यार्थ्यांची वर्गवारी ठरवण्यात आली आहे. त्यानुसार दिव्यांग विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार, सोयी-सुविधा दिल्या जाणार आहेत. अंध विद्यार्थ्यांसाठी गणितातील पाटी (मॅथेमॅटिक स्लेट), आवाजाचे गणकयंत्र (टॉकिंग कॅल्क्युलेटर), ग्लास मॅग्नीफायर वापरायची परवानगी देण्यात आली आहे.काही दिव्यांग विद्यार्थी थकल्यास मधेच लेखनिक उपलब्ध करून देण्याची परवानगी दिली आहे. तर, काही वर्गवारीमध्ये अशा विद्यार्थ्यांना सुरक्षित वाटावेत्यांना खात्री वाटेल अशी व्यक्ती परीक्षा वर्गाजवळ उपस्थित राहू शकणार आहे. तर, सेरेबल पाल्सी, बहुविकलांग, लोकोमीटर डिसेबिलिटी इत्यादी वर्गवारीतील विद्यार्थी हे जास्त दाब देऊन लिहितात त्यासाठी त्यांना जाड पानांची उत्तरपत्रिका उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केले. (प्रतिनिधी)

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

🎋राज्याच्या सीईटीची काठिण्य पातळी वाढणार*

By pudhari | Publish Date: Mar 6/03/2017

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणार्‍या सामाईक प्रवेश परीक्षेचा (सीईटी)चा अभ्यासक्रम व दर्जा आता राष्ट्रीय पातळीवरील संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई) प्रमाणे करण्यात येणार आहेत. राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमांवरच ही परीक्षा असेल मात्र याची काठीण्य पातळी वाढणार आहे. हा बदल यंदाच्या वर्षी होणार नसून 2018-19 या शैक्षणिक वर्षात होणार आहे.

राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून (सन 2016-17) एकच सामायिक परीक्षा (एमएचटी-सीईटी) राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित ही सीईटी घेतली जात आहे. मात्र  वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेशाबाबत गतवर्षी मोठ्या गोंधळाला सामोरे जावे लागले. या वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या जागांवर प्रवेश देण्यासाठी राज्य शासनाने एमएचटी सीईटी ही प्रवेश परीक्षा घेण्याचे तर केंद्र शासनाने नीट ही परीक्षांची तयारी केली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय प्रवेशासाठी देश पातळीवर एकच प्रवेश परीक्षा घेण्यात यावे असा निकाल दिला. त्यामुळे वैद्यकीय प्रवेशाचा मोठा गोंधळ झाला होता.

अभियांत्रिकी प्रवेशही राज्य एमएचटी सीईटीच्या माध्यमातून होत आहेत. अभियांत्रिकी तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सामायिक प्रवेश परीक्षांचा अभ्यासक्रम व त्याची काठिण्य पातळी नीट आणि जेईई सारख्या राष्ट्रीय स्तरावरील केल्यास आपल्या राज्यातील विद्यार्थी चांगल्या पद्धतीने सक्षम होतील हा विचार करुन आता उच्च व तंत्र शिक्षण विभागाने आता शालेय शिक्षण विभागाला बारावीच्या अभ्यासक्रमांवर होणार्‍या राज्य सीईटी अभ्यासक्रमांचा पॅटर्न बदलण्याची सूचना केली आहे. सीईटीसाठी लागणार्‍या अभ्यासक्रमांचा समावेश करुन त्याबाबतची जनजागृती करावी असेही यासंदर्भातील काढलेल्या शासन निर्णयात म्हटले आहे. केंद्र आणि राज्यस्तरावील सीईटी परीक्षांचा समान अभ्यासक्रम असल्यास विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे तयारी करावी लागणार नाही. तसेच राज्यातील विद्यार्थी राज्याच्या सीईटी बरोबर राष्ट्रीय स्तरावरील जेईई परीक्षेसाठी प्रोत्साहन मिळेलही स्पष्टीकरण निर्णयात केले आहे.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

📖 जिल्हा परिषद शाळांमध्ये डॉ. अब्दुल कलाम कट्टा सुरू करण्याचा निर्णय!*

*‘डॉ. अब्दुल कलाम वाचन कट्टा’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.*

वार्ताहर, सावंतवाडी | March 6, 2017 1:19 AM

शासनाच्या शालेय शिक्षण खात्याने जिल्हा परिषद शाळांत ‘डॉ. अब्दुल कलाम वाचन कट्टा’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील ४१२ जिल्हा परिषद शाळांचा समावेश आहे. या प्रत्येक शाळेत पुस्तक खरेदीसाठी ९ हजार ९०० रुपयांचे अनुदानदेखील मंजूर करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेतील शाळांत विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडण्यासाठी वाचन कट्टा अर्थात ग्रंथालये निर्माण करण्याचा शालेय शिक्षण  विभागाने जुलै २०१६ मध्ये निर्णय घेतला. पण वाचन कट्टय़ासाठी लागणारी पुस्तके निश्चित करण्यास शासनाने विलंब लावल्याने वाचन कट्टा पुढील हंगामात सुरू होण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना पाठय़पुस्तकापलीकडे ज्ञान मिळावे म्हणून गोष्टी किंवा विविध विषयांचे ज्ञान निर्माण करणारी पुस्तके पुरवठा करून ‘डॉ. अब्दुल कलाम वाचन कट्टा’ ठेवायची आणि विद्यार्थ्यांनी ती वाचन करून बौद्धिक क्षमता वाढवायची अशी त्या मागची भूमिका आहे. विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची आवड निर्माण करण्याचे या निर्णयामागे प्रयोजन आहे.
आकर्षक रचना, सचित्र धडे या पुस्तकात असतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना वाचन करीत असणाऱ्या धडय़ातील संदर्भ चित्रातून उमगणार आहे.
जिल्ह्य़ातील १४६७ शाळांपैकी या उपक्रमासाठी ४१२ शाळांची निवड करण्यात आली आहे. त्यात सावंतवाडी तालुक्यात ५९ शाळांचा समावेश आहे. या वाचन कट्टय़ासाठी प्रत्येकी ९ हजार ९०० रुपयांचे अनुदान आहे. तसेच शासनाने पुस्तकेही निश्चित केली आहेत. त्या यादीप्रमाणे पुस्तके खरेदी करण्याचा आणि वाचन कट्टा चालविण्याचा अधिकार शाळांना देण्यात आला आहे.
सावंतवाडी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी शिवाजी देसाई म्हणाले, शिक्षण खात्याचा हा उपक्रम विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची आवड निर्माण करणारा ठरणार आहे. वाचन संस्कृतीची चळवळ शालेय जीवनातून प्राथमिक शिक्षणात सुरू करण्यात आल्याने निश्चितच विद्यार्थ्यांना फायदा होईल.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃