twitter
rss

📚बालभारतीची पुस्तके जगाशी ‘बोलणार’*

First Published: 13-March-2017

अविनाश साबापुरे,

यवतमाळक्यूआर कोड वापरून ‘बोलकी’ झालेली बालभारतीची पुस्तके आता अवघ्या जगासोबत संवाद साधणार आहेत. कॅनडामध्ये होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत महाराष्ट्रातील ‘बोलक्या’ पुस्तकांना मानाचे निमंत्रण मिळाले आहे. अध्ययन अक्षम असलेल्या कोणत्याही देशातील विद्यार्थ्यांसाठी ही पुस्तके वापरता येतील का, याचा अदमास परिषदेत घेतला जाणार आहे.चालू शैक्षणिक सत्रात इयत्ता सहावीची नवी पाठ्यपुस्तके तयार करताना बालभारतीने त्यात क्यूआर कोड वापरला. या पुस्तकांत पानापानावर विशिष्ट टॅग लावण्यात आला आहे. त्यामुळे पुस्तकातील कविता मोबाईलमध्ये ऐकता येते किंवा पुस्तकातील चित्रावर मोबाईल ठेवल्यास त्या चित्राशी संबंधित व्हिडिओ मोबाईलमध्ये बघता येतो. मुलांना पाठ्यपुस्तकांकडे आकृष्ट करणारा हा प्रयोग सोलापूर जिल्ह्यातील रणजितसिंह डिसले या शिक्षकाने सर्वप्रथम आपल्या शाळेत केला. तोच नंतर बालभारतीने स्वीकारून राज्यभरातील सहावीच्या १८ लाख पुस्तकांमध्ये वापरला. आता हाच प्रयोग जगभरातील शिक्षणप्रेमींपुढे ठेवण्यासाठी आमंत्रण आले आहे.शिक्षणात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर कसा करावा, याबाबत मायक्रोसॉफ्टच्या वतीने टोरांटो (कॅनडा) येथे २१ ते २४ मार्च दरम्यान आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे. त्यात विविध देशातील ३०० तंत्रस्नेही शिक्षणतज्ज्ञ सहभागी होणार आहेत.भारतातील एकंदर आठ जणांना आपले शिक्षणविषयक प्रयोग सादर करण्याची यात संधी मिळणार आहे. दिल्ली, चेन्नई, पंजाबमधील ५ शिक्षिकांचा समावेश आहे. हे सर्व खासगी नामवंत शाळांमधील अध्यापक आहेत. एकमेव महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक म्हणून रणजितसिंह डिसले यांना मायक्रोसॉफ्टचे निमंत्रण आहे. पुस्तके ‘बोलकी’ केल्यावर ग्रामीण भागात राहणारेआणि विविध कारणांनी अध्ययनात मागे असणारे विद्यार्थीही गतीने अभ्यास करतात, हा प्रयोग ते जगापुढे ठेवणार आहेत.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

👫शिक्षणहक्क प्रवेशप्रक्रिया संथ*

First Published: 13-March-2017

नाशिक : शिक्षणहक्क प्रवेश प्रक्रियेअंतर्गत अधिकृत संकेतस्थळावर सोडत पद्धतीने निवड झालेल्या ३९३ शाळांतील सुमारे ४५७४ विद्यार्थ्यांची शाळानिहाय यादी आणि निवड न झालेल्या ३०८४ विद्यार्थ्यांची यादीसंकेत स्थळावरील ‘सिलेक्टेड’ आणि ‘नॉन सिलेक्टेड’ विभागात उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.नमूद करण्यात आलेल्या शाळांनी बुधवार (दि. १५)पर्यंतकागदपत्रांची योग्य तपासणी करून आॅनलाइन पद्धतीने प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. नोंदणी केल्यानंतर शाळांना सबळ कारणाने प्रवेश नाकारायचा झाल्यास बुधवार (दि. १५) पर्यंत शाळेने पालकांना योग्य कारण नमूद करून पत्रव्यवहार करणे आवश्यक आहे. याप्रकरणी पालकांनी तक्रार केल्यास गटशिक्षण अधिकारी किंवा प्रशासन अधिकाऱ्यांनी गुरुवार (दि. १६) पर्यंत सुनावणी घेऊन शुक्रवार (दि. १७) पर्यंत आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेत ‘०’ (शून्य) नोंदवणे आवश्यक आहे. असे न केल्यास सोमवारी (दि. २०) घेण्यात येणारी दुसरीप्रवेशफेरी घेता येणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

💵अतिरिक्त शिक्षकांना मूळ शाळेतूनच पगार*

सकाळ वृत्तसेवा

सोळांकूर - जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होईपर्यंत त्या कर्मचाऱ्यांचा पगार मूळ शाळेतूनच काढण्यात येईल, असे आश्‍वासन शिक्षण उपसंचालक एम. के. गोंधळी यांनी जिल्हा शैक्षणिक व्यासपीठच्या शिष्टमंडळाला दिले. जिल्हा शिक्षण उपसंचालक कार्यालयात शैक्षणिक व्यासपीठाचे पदाधिकारी आणि शिक्षण उपसंचालक यांची संयुक्त बैठक झाली. शिष्टमंडळाचे नेतृत्व ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील, सभाध्यक्ष एस. डी. लाड, संघाचे चेअरमन व्ही. जी. पोवार, सचिव आर. वाय. पाटील, संस्थाचालक संघाचे प्रा. जयंत आसगावकर यांनी केले.

सभेत जिल्ह्यातील अर्धवेळ शिक्षकांची संचमान्यता करून त्यांचे वेतन आदा करावे, प्रलंबित मुख्याध्यापक पदांना त्वरित मान्यता द्यावी, तसेच लक्षतीर्थ वसाहतीतील महात्मा फुले हायस्कूलमधील दोन शिक्षकांना मुख्याध्यापिका व संस्थाचालक जाणीवपूर्वक त्रास देत असून त्यांचा मानसिक छळ करत असल्याने तसेच शाळेचे कामकाज नियमबाह्य होत असल्याने या शाळेवर प्रशासक नेमावा, अशी जोरदार मागणी शिष्टमंडळाने केली. शिक्षण उपसंचालक श्री. गोंधळी यांनी योग्य ते आदेश शिक्षणाधिकाऱ्यांना दिले जातील, असे आश्‍वासन शिष्टमंडळाला दिले.

सभेस प्रभारी माध्यमिक शिक्षणाधिकारी टी. एल. मोळे, शिक्षण निरीक्षक डी. एस. पोवार, माध्यमिक वेतन पथकाचे अधीक्षक शंकरराव माने, माध्यमिक शिक्षक संघटनांचे एस. जी. तोडकर, बी. डी. पाटील कनिष्ठ महाविद्यालय संघाचे प्रा. सी. एम. गायकवाड, शारीरिक शिक्षक संघाचे प्राचार्य आर. डी. पाटील, प्राचार्य प्रभाकर हेरवाडे, कायम विनाअनुदानित शाळा संघटनेचे खंडेराव जगदाळे, मुख्याध्यापक संघाचे माजी चेअरमन के. बी. पोवार, संघाचे उपाध्यक्ष डॉ. ए. एम. पाटील, जॉ. सेक्रेटरी डी. एस. घुगरे, बी. जी. बोराडे, एस. के. पाटील, जे. एम. पोवार, आर. एम. तोरस्कर आदी उपस्थित होते.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

🎓पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांची माहिती संकेतस्थळावर*

शीतलकुमार कांबळे

रविवार, 12 मार्च 2017

सोलापूर - संशोधक विद्यार्थ्यांची (पीएच.डी.) माहिती विद्यापीठांनी आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचा आदेश विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशातील सर्व विद्यापीठांना दिला आहे. "यूजीसी'च्या 22 फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. देशपातळीवरील संशोधनाचा स्तर कळण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

सर्व विद्यापीठांनी त्यांच्या संशोधक विद्यार्थी व संशोधनाच्या विषयाची माहिती संकेतस्थळावर दोन महिन्यांच्या आत प्रसिद्ध करावी. या आदेशाची पूर्तता केल्यानंतर दोन महिन्यांत याचा अहवाल "यूजीसी'ला देण्यात यावा, परिपत्रकात नमूद केले आहे. संशोधक विद्यार्थ्याचे नाव, मार्गदर्शकाचे नाव, विषय, विभाग, विद्यार्थ्याचा आधार क्रमांक, नोंदणी क्रमांक, शिष्यवृत्तीचे नाव आदी माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. हा आदेश न मानता संकेतस्थळावर माहिती प्रसिद्ध न करणाऱ्या विद्यापीठांची "डिफॉल्टर यादी' तयार करण्यात येणार आहे.

संशोधनाचा दर्जा सुधारावा या उद्देशाने "यूजीसी'ने हा निर्णय घेतला आहे. देशपातळीवर कोणत्या प्रकारचे संशोधन होते, आपल्या देशातील संशोधन आंतरराष्ट्रीय पातळीवर कुठे आहे हे याद्वारे "यूजीसी'ला कळणार आहे. यामुळे संशोधनात होणारी पुनरावृत्ती टाळता येईल.

- प्रा. डॉ. एच. के. अवताडे, अध्यक्ष सोलापूर विद्यापीठ शिक्षक संघटना

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

📄शाळा दाखल्यांमध्ये येणार सारखेपणा..!*

धुळे : राज्यभर सर्व विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यात एकसारखेपणा आणण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे  सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून राज्यस्तरावरून देण्यात आलेल्या सुधारित नमुन्याचा वापर करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयाने सर्व प्राथमिक शिक्षणाधिकाºयांना दिले आहेत.

*सुधारित नमुन्यास मान्यता*

शाळा सोडल्याचा दाखला व जनरल रजिस्टरच्या सुधारित नमुन्यास शासनाने मान्यता दिली आहे. यासंदर्भात नुकतेच आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व प्राथमिक शाळांना आपल्या शाळा सोडल्याच्या दाखल्यात व जनरल रजिस्टरमध्ये बदल करावा लागणार आहे. हा शासन निर्णय सर्व व्यवस्थापन व सर्व माध्यमांच्या शाळांना हा निर्णय लागू राहणार आहे.

*नवीन नमुन्यात छपाईचे आदेश*

सर्व शाळा प्रमुखांना जनरल रजिस्टर व शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रांची शासनाने दिलेल्या नमुन्यात छपाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

याबाबत तत्काळ योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

*एकवाक्यता नसल्याने संभ्रम*

सध्या शाळा-शाळांमधून शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रात एकवाक्यता नाही, त्यामुळे विद्यार्थी व पालकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो.

त्यामुळे शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था, शिक्षक संघटना, पालक आणि विद्यार्थ्यांकडून शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आणि जनरल रजिस्टरमधील नोंदीत राज्यभर एकवाक्यता असणेबाबत वारंवार मागणी करण्यात येत होती.

*सरल प्रणालीसाठीही बदल*

तसेच सरल प्रणालीमार्फत शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी काही बदल करणे आवश्यक होते. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व त्या अनुषंगाने सर्वसाधारण नोंदवहीमध्ये कोणकोणत्या नोंदणी आवश्यक आहेत, याबाबत पालकांकडून व शाळा मुख्याध्यापकांकडून सूचना मागविण्यात आल्या होत्या. या सूचनांच्या आधारे राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमांच्या, सर्व मंडळांचे अभ्यासक्रम राबविणाºया शाळांसाठी शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व जनरल रजिस्टरमध्ये राज्यभर एकसारखेपणा आणण्यासाठी शासनाचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे.

तसेच याची अंमलबजावणी यावर्षीपासूनच होणार आहे.

यासंदर्भात प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून ७ मार्च रोजी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना सूचना दिल्या आहेत. त्यादृष्टीने शिक्षण विभागाने कार्यवाही सुरू केली आहे.

*जनरल रजिस्टरमध्येही राहणार बदल*

जनरल रजिस्टरमध्ये दाखल्यातील सर्व नोंदी, दाखला मिळाल्याचा दिनांक व पालक स्वाक्षरी, नोंदी अचूक असल्याची पालकाची स्वाक्षरी आदी बाबींचा समावेश असणार आहे.

शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक प्रमाणभूत व महत्त्वाचा दस्तावेज असतो. विद्यार्थ्यांना एका शाळेतून दुसºया शाळेत प्रवेश घेणे, जातीचा दाखला व इतर अनेक बाबींसाठी शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असते. हे प्रमाणपत्र म्हणजे विद्यार्थ्यांची व शाळेची परिपूर्ण ओळखच असते. यामध्ये एकसारखेपणा आणण्यासाठी राज्यस्तरावरून बºयाच दिवसापासून प्रयत्न सुरू होते.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

🏋शारीरिक फिटनेस शालेय अभ्यासक्रमात*

*बालभारतीकडून लवकरच घोषणेची शक्यता*

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

शारीरिक फिटनेसचे धडे शाळेतच मिळावेत, यासाठी शालेय शिक्षण विभागाने हाचलाली सुरू केल्या आहेत. शारीरिक फिटनेसचा अभ्यासक्रमात समावेश करण्याचा प्रस्ताव बालभारतीकडे पाठवण्यात आला असून, त्यावर कार्यवाही सुरू आहे. लवकरच या अभ्यासक्रमाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर इतर विषयांसोबतच शारीरिक शिक्षण विषयांतर्गत शारीरिक फिटनेस अभ्यासक्रमाचाही समावेश करावा, अशी मागणी काही दिवसांपूर्वी माजी शिक्षक आमदारांनी केली होती. त्यानुसार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बालभारतीकडून तसा अभ्यासक्रम तयार करण्याची कार्यवाही सुरू केली असल्याचे जाहीर केले आहे.
शिक्षण मंडळाकडे सादर केलेल्या प्रस्तावात प्राथमिक स्तरावर शारीरिक शिक्षण विषयासाठी दर आठवड्याला सर्वसाधारणपणे चार तासिका, उच्च प्राथमिक व माध्यमिक स्तरावर तीन ते चार तासिका व उच्च माध्यमिक स्तरावर दोन तासिका देण्याची शिफारस आहे.
शहरी भागांतील शाळा-कॉलेजांसाठी क्रीडांगणे नसल्याचे खेळाचा तास असूनही विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळत नाही. या विद्यार्थ्यांना त्यांच्या शारीरिक फिटनेसविषयी अभ्यासक्रम उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याने हा अभ्यासक्रम तयार करण्यात येत आहे.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃