twitter
rss

📖 अवांतर वाचनाचा सावळागोंधळ 📚*

Maharashtra Times |
Updated Mar 30, 2017

म. टा. प्रतिनिधी, नागपूर

जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या अवांतर वाचनासाठी असलेल्या पुस्तकांच्या खरेदीचा एकच गोंधळ निर्माण झाला आहे. प्रकाशक, पुस्तकांची किंमत आणि पुस्तकांची उपलब्धता, अशा सर्वच बाबतीत शाळांमध्ये अद्यापही संदिग्धता आहे. त्यामुळे, ३१ मार्चपूर्वी या पुस्तकांची खरेदी करणे शाळांसाठी दुरापास्त झाले आहे.
विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमांव्यतिरिक्त वाचनाची गोडी लागावी, यासाठी शाळांना विविध पुस्तके घेण्यास सांगण्यात आले आहे. गोष्टींची, वर्णनात्मक, माहितीपर पुस्तके शाळांनी खरेदी करावी, अशा सूचना शिक्षण विभागाने शाळांना दिल्या आहेत. त्यासाठी प्रत्येक शाळेला ५१५४ रुपयांचे अनुदानही देण्यात आले आहे. शाळा व्यवस्थापन समितीमार्फत या पुस्तकांची खरेदी करायची आहे. दरम्यान, कोणती पुस्तके घ्यावीत, यासाठीची यादीदेखील शासनाने ठरवून दिली आहे. याआधी तीनवेळा बदल झाल्यानंतर ३६० पुस्तकांची अंतिम यादी तयार झाली.

मात्र, शाळांच्या मुख्याध्यापकांना खुल्या बाजारातून ही पुस्तके मिळालीच नाहीत. दरम्यान, पुस्तक वितरकांनी थेट शाळांशी संपर्क साधून पुस्तके उपलब्ध करून देण्याचेही आश्वासन दिले. शिक्षण सचिव नंदकुमार यांनीदेखील याबाबत व्हिडीओ कॉन्फरन्स घेऊन पुस्तकांची ऑनलाइन खरेदी करण्याच्या सूचना केली तसेच त्यांचे पैसे धनादेशाच्या माध्यमातून थेट प्रकाशकांना द्यावेत, असेही सांगण्यात आले आहे.

शिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर शिक्षण विभागाने या पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित केले होते. या प्रदर्शनाला वितरक पोहोचले होते व तेथे सर्व पुस्तकांऐवजी त्यांची यादी उपलब्ध करुन देण्यात आली होती. यापैकी काही वितरकांनी १० टक्के तर काहींनी २० टक्के सूट देण्याचे आश्वासन दिले होते. काही शाळांनी पुस्तक खरेदीसाठीही धनादेश दिले होते. मात्र, आजपर्यंत पुस्तके मिळत नसल्याची तक्रार विविध शाळांनी केली आहे.

*पुस्तकांच्या किंमती अवास्तव!*

मुलांना आवडतील अशा विषयांवरील १० ते २० पानांची पुस्तके या योजनेतून खरेदी करावयाची आहेत. संकेतस्थळावर दिलेल्या किंमतीपेक्षा जास्त दर प्रकाशक- वितरकांकडून सांगण्यात येत आहेत. संकेतस्थळावर ज्या पुस्तकांची किंमत ३० ते ३५ रुपये आहे तीच पुस्तके सरासरी १०० रुपयांना विकली जात असल्याच्या तक्रारीही मटाकडे करण्यात आल्या आहेत.

*काय आहे अवांतर वाचनाची योजना?*

यू-डायस मध्ये नोंदणीकृत शाळांना योजनेचा लाभ

अवांतर वाचनाच्या पुस्तकासांठी प्रत्येक शाळेला ५१५४ रुपयांचे अनुदान

संकेतस्थळावरुन पुस्तकांची ऑनलाइन नोंदणी

प्रकाशकांच्या नावे द्यायचे धनादेश

३१ मार्चपूर्वी करावी खरेदी

मराठी आणि इंग्रजी अशा दोन भाषांतील पुस्तके

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

🌱मुंबईतील बंद शाळांना नवसंजीवनी*

Maharashtra Times | Updated Mar 29, 2017

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

मुंबईतील पालिका शाळांचा दर्जा हा गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेचा विषय ठरला असून, विद्यार्थ्यांच्या संख्येअभावी शहरातील पालिकेच्या अनेक शाळा बंद पडल्या आहेत. या शाळांना नवसंजीवनी मिळणार आहे. पालिकेच्या अर्थसंकल्पात या शाळांसाठी नवी योजना जाहीर करण्यात आली असून, या बंद पडलेल्या शाळांच्या विल‌निीकरणाचे काम सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार शहरातील ३५ बंद शाळांची ‘आदर्श शाळा’ म्हणून नवनिर्मिती करण्याचा मानस आहे.
मुंबई महापालिकेतर्फे शिक्षणासाठीचा २ हजार ३११ कोटींचा अर्थसंकल्प बुधवारी जाहीर करण्यात आला. पालिका प्रशासनाने अनेक नवनवीन योजना जाहीर करताना पालिका शाळांचा खालावलेला दर्जा उंचविण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. शैक्षणिक वर्षे २०१६-१७ या कालावधीत बंद पडलेल्या भाषिक शाळांच्या विलिनीकरणाचे काम सुरू करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे.

याबद्दल शिक्षणाधिकारी महेश पालकर यांच्याकडे विचारणा केली असता, ‘सध्या यासंदर्भात बैठक सुरू आहे. अद्याप अंतिम स्वरूप प्राप्त झाले नसले तरी एकूण ३५ शाळांना यानिमित्ताने आदर्श शाळा म्हणून नव्याने सुरू करण्याचा आमचा मानस आहे’, असे ते म्हणाले. खासगी कंपन्यांकडून आर्थिक मदत घेऊन (सीएसआर) किंवा केंद्रीय विद्यालयामार्फत या शाळा पुन्हा कार्यान्वित करण्याबाबत विचार सुरू असून, याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

*नववीसाठी ट्युटोरियल कक्ष*

पालिका शाळांतील नववीतील विद्यार्थ्यांच्या निकालाचा टक्का वाढावा याकरिता नववीच्या विद्यार्थ्यांकरिता इंग्रजी, गणित आणि विज्ञान विषयांचे ट्युटोरियल्सची सुविधा पुरविण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. शाळांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

🌾मुख्याध्यापक संघटनेची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी*

Maharashtra Times | Updated Mar 29, 2017

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

मुंबईसह राज्यात तापमानाचा वाढलेला पारा लक्षात घेता त्याचा परिणाम राज्यभरात सुरू असलेल्या बोर्डाच्या परीक्षांवरही झाला आहे. विद्यार्थ्यांची या त्रासातून सुटका करण्यासाठी पुढच्या शैक्षण‌िक वर्षात बोर्डाच्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळातर्फे करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे, या परीक्षांची वेळ सकाळी नऊ वाजता करावी, असेही नमुद करण्यात आले आहे. या मागणीसाठी मुख्यध्यापक संघाने शिक्षणमंत्री विनोद तावडे त्यांना निवेदन दिले आहे.

मुंबईसह राज्याच्या तापमानाचा पारा सध्या वाढतच चालला आहे. अनेक ठिकाणी तापमान ४० अंश सेल्सियसवर पोहोचले आहे. त्यातच गेल्या पाच वर्षांचा इतिहास पाहता बोर्डाच्या परीक्षा मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाचा प्रचंड त्रास होतो, अशी खंत यानिमित्ताने मुख्याध्यापक संघ महामंडळातर्फे व्यक्त करण्यात आली आहे. परीक्षेची वेळ सकाळी ११ वाजता अथवा दुपारी ३ वाजता असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा जास्त त्रास होत असल्याने मुख्याध्यापक संघाने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना निवेदन दिले असून परीक्षेची वेळ सकाळी ९ वाजता ठेवण्याची मागणी केली आहे.

याबद्दल बोलताना राज्य मुख्याध्यापक संघाचे प्रवक्ते प्रशांत रेडीज म्हणाले की, राज्यात अनेक ठिकाणी तापमान ४० अंशांच्या वर पोहोचले आहे. ऊन अधिक असल्यामुळे कितीही कुलर, पंखे लावले तरी त्याचा विद्यार्थ्यांना त्रासच होतो. अनेक विद्यार्थी घामजलेल्या अवस्थेत पेपर सोडवतात, त्यांचा हा त्रास कमी व्हावा म्हणून ही मागणी करण्यात आली आहे.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

🎯शिष्यवृत्ती अर्ज ऑफलाइन अशक्य*

By pudhari | Publish Date: Mar 30 2017

पुणे : हिरा सरवदे

तांंत्रिक अडचणींमुळे एकही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये, यासाठी ऑफलाइन पद्धतीने शिष्यवृत्ती अर्ज स्वीकारण्याचे आदेश समाजकल्याण अधिकार्‍यांना दिले जातील, अशी माहिती सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. दुसरीकडे मात्र, ऑफलाइन अर्ज स्वीकारणे अशक्य असून, गरज वाटल्यास ऑनलाइन अर्ज भरण्यास पुन्हा मुदतवाढ दिली जाईल, असे याच विभागाचे कॅबिनेट मंत्री राजकुमार बडोले यांनी दैनिक ‘पुढारी’शी बोलताना सांगितले. यामुळे समाजकल्याण विभागाच्या दोन मंत्र्यांमध्येच समन्वयाचा अभाव असल्याचे सिद्ध झाले आहे.

मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दहावीनंतर शिक्षण घेण्यास आर्थिक मदत मिळण्यासाठी शासनाकडून समाजकल्याण विभागाद्वारे शिष्यवृत्ती दिली जाते. पूर्वी या शिष्यवृत्तीसाठी महाविद्यालयांमार्फत ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविले जात होते. मात्र 2011-12 मध्ये त्यात बदल करून हे अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागविले जात आहेत. सॉफ्टवेअरची  कार्यक्षमता आणि राज्यातील विद्यार्थ्यांची संख्या यामध्ये मोठी तफावत असल्याने ताण येऊन वेबसाईट हँग होते. परिणामी ऑनलाइन पद्धतीने नवीन शिष्यवृत्ती व फ्रीशिप अर्ज भरताना व जुन्या अर्जांचे नूतनीकरण करताना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो. ऑनलाइन पद्धतीने शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी वारंवार मुदतवाढ द्यावी लागते. वारंवार मुदतवाढ दिल्यानंतर यंदा 15 मार्चपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया बंद करण्यात आली. तांत्रिक अडचणींमुळे यंदाही अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिले आहेत.

या पार्श्‍वभूमीवर राज्यमंत्री कांबळे यांनी ‘शैक्षणिक पात्रता व आवश्यक कागदपत्रे असलेल्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती व फ्रीशिफ अर्ज ऑफलाइन पद्धतीने स्वीकारावेत, यासाठी विधानसभेत निवेदन करून संबंधित अधिकार्‍यांना सूचना दिल्या जातील,’ असे दै. ‘पुढारी’शी बोलताना सांगितले होते. मात्र, ही शक्यता विभागाचे मंत्री राजकुमार बडोले आणि समाजकल्याण विभागातील अधिकार्‍यांनी फेटाळून लावली आहे. त्यामुळे एकाच विभागाच्या दोन मंत्र्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे सिद्ध झाले आहे. याच दोन मंत्र्यांमधील विसंवाद यापूर्वीही अनेकदा समोर आला आहे.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

🎋कोल्हापूर शिक्षणाधिकार्‍यांचा चौकशी अहवाल शिक्षण सचिवांकडे*

By pudhari | Publish Date: Mar 30 ,2017

कोल्हापूर : प्रतिनिधी

माध्यमिक शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी ज्योस्ना शिंदे यांच्या चौकशीचा अहवाल शिक्षण आयुक्तांनी राज्यातील शिक्षण सचिवांकडे सादर केला. याही अहवालात शिंदे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे ताशेरे ओढल्याचे समजते.

माध्यमिक शिक्षण विभाग म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण म्हणून ओळखले जात होते. नोटाबंदीनंतर दुसर्‍या दिवशी याच विभागातील अधिकारी लाच घेताना सापडल्याने हा विभाग भ्रष्टाचाराचे आगर असल्याचे स्पष्ट झाले.

यामध्ये जिल्हा परिषदेची मोठी बदनामी झाली होती. याची गंभीर दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी या विभागाच्या चौकशीचे आदेश दिले. त्यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांची नियुक्ती केली. देशमुख यांनी या प्रकरणाचा सखोल अभ्यास करून तो अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. खेमनार यांच्याकडे सादर केला.

डॉ. खेमनार यांनी तो अहवाल शिक्षण आयुक्तांकडे सादर केला. शिक्षण आयुक्तांनी त्या अहवालावर शिक्षण उपसंचालक दर्जाच्या तीन अधिकार्‍यांची चौकशी समिती नियुक्त केली.

या समितीने चार दिवस कोल्हापुरात थांबून सौ. शिंदे व माध्यमिक शिक्षण विभागाबाबत लोकांकडून तक्रारी मागून घेतल्या. सुमारे 105 लोकांनी तक्रारी सादर केल्या होत्या. यातील गंभीर स्वरूपाच्या 6 ते 7 तक्रारींची या पथकाने चौकशी केल्याचे समजते. तेवढ्यावर आपला अहवाल शिक्षण आयुक्तांना सादर केला आहे.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

🌿बालभिक्षेकरींसाठी सिग्नल शाळा तीन हात नाक्यानंतर संपूर्ण शहरात उपक्रम*

म. टा. वृत्तसेवा, ठाणे

समर्थ भारत व्यासपीठ आणि ठाणे पालिकेच्या माध्यमातून तीन हात नाक्यावरील सिग्नलवरच्या मुलांसाठी सुरू करण्यात आलेला सिग्नल शाळेचा उपक्रम यशस्वी झाल्यानंतर आता ठाण्यातील सर्व सिग्नलवरील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी पालिका आणि समर्थ व्यासपीठ संस्था प्रयत्न करणार आहे. पालिकेच्या माध्यमातून सगळ्या सिग्नलवरील मुलांना शाळेत घेऊन येण्यासाठी बसची सेवाही पालिका उपलब्ध करणार आहे.
शहरातील सिग्नलवर शालेय वयाची मुले भीक मागताना, पालकांसोबत विविध वस्तू विकताना दिसतात. परिणामी शिक्षणापासून मुलांना वंचित राहावे लागते. यासाठी १५ जून २०१६ साली ठाणे शहरात सिग्नल शाळा सुरू करण्यात आली. तीन हात सिग्नलवरील मुले, या शाळेत शिकू लागली. आता या मुलांसोबत शहरातील माजिवडा, मानपाडा, चरई, कळवा ब्रीज, मुलुंड चेक नाका आदी सिग्नलवरील मुलेही दाखल होणार आहेत. पालिकेने बसची सेवा तात्काळ उपलब्ध केली तर मुलांना शाळेत प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या शाळेत सध्या २८ मुले शिकत आहेत. यामध्ये पूर्व माध्यमिकची १० तर प्राथमिकची १८ मुले शिक्षण घेत आहेत. इतर सिग्नलवरची साधारण १८ मुले येण्याची शक्यता आहे. संस्थेने या मुलांच्या पालकांशी संवाद साधला आहे.
बालमंदिराचे उद्घाटन
समर्थ भारत व्यासपीठ आणि ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागाच्यावतीने सुरू असलेल्या सिग्नल शाळेतील विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे पूर्व प्राथमिक वर्गासाठीचे बालमंदिर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुरू करण्यात आले. या मुलांना आता बालमंदिराच्या माध्यमातून नवीन वर्ग मिळाल्याने शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यास अधिक मदत होणार आहे.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃