twitter
rss

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨

📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣2⃣8⃣

*💫 हिवरेच्या जिगरबाज जवानाने केला अतिरेक्यांचा खात्मा*

Published On: Jan 23 2018

साभार - दैनिक पुढारी,
सांगली :  प्रतिनिधी

लेथपोरा (जि. पुलवामा, श्रीनगर) येथील केंद्रीय रिझर्व्ह पोलिस दल (सीआरपीएफ) च्या बटालियन क्रमांक 185 च्या ट्रेनिंग सेंटरवर तीन अतिरेक्यांनी घुसखोरी करून बेछूट गोळीबार सुरू केला. सीआरपीएफचे जवान समाधान मलमे यांनी प्रत्युत्तरादाखल जोरदार गोळीबार करुन  सहकारी  जवानांच्या मदतीने तीन अतिरेक्यांचा खात्मा केला. मलमे हे हिवरे (ता. जत, जि. सांगली) येथील आहेत.
दि. 30 डिसेंबररोजी तीन अतिरेक्यांनी मलमे असलेल्या कॅम्पच्या एका इमारतीमध्ये घुसखोरी करुन जवानांवर गोळीबार सुरू केला. ज्या ठिकाणी गोळीबार झाला, तेथून हाकेच्या अंतरावरच सीआरपीएफचे जवान समाधान मलमे सहकार्‍यांसह देशसेवा बजावत होते. अतिरेक्यांच्या पहिल्या फायरिंगमध्येच मलमे यांच्या उजव्या खांद्यातून घुसलेली गोळी मानेजवळ थांबली होती. मात्र एवढ्या गंभीर जखमेचा विचार न करता मलमे यांनी अतिरेक्यांना जोरात फायरिंग करुन रोखले, त्यांचा   खात्मा केला. क्षणात कॅम्पमधील अन्य जवानांचा फौजफाटा घेऊन वरिष्ठ अधिकार्‍यांची तुकडी तेथे दाखल झाली. कॅम्पच्या इमारतीमध्ये घुसलेल्या अतिरेक्यांपैकी एकाला संपविण्यात यश आले.

या हल्ल्यात सीआरपीएफचे पाच जवान शहीद तर तिघेजण गंभीर जखमी झाले. यामध्ये  जवान समाधान मलमे  यांचाही समावेश होता. मलमे यांच्या उजव्या खांद्यात घुसलेली गोळी मणक्यापर्यंत गेली होती.  सीआरपीएफच्या जवानांनी तात्काळ मलमे यांना श्रीनगर येथील लष्करी रुग्णालयात दाखल केले. गोळी काढण्यासाठी मोठी शस्त्रक्रिया त्यांच्यावर केल्यामुळे ते वीस दिवस रुग्णालयातच होते. जवळपास पंचवीस टाक्यांची गंभीर शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. दि. 19 जानेवारी 2018 रोजी ते वैद्यकीय रजेवर हिवरे या गावी दाखल झाले आहेत.

   *समाधान मलमेंच्या या कामगिरीस गुरुवर्यचा सलाम....!*

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨

📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣2⃣7⃣

*💑चार वर्षांच्या चिमुकलीने वाचवले धाकट्या भावाचे प्राण*

*_साभार : कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली . 22 Jan 2018_*

सांगली : बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी भावाच्या खांद्यावर असते, असं पूर्वापार मानलं जातं. काळ बदलला तसं दोघंही एकमेकांच्या अडीअडचणीला धावून येऊ लागले. चिमुरड्या भावाचा जीव वाचवणासाठी चिमुकली बहीण धावून आल्याचं उदाहरण सांगलीत पाहायला मिळालं आहे.

अवघ्या चार वर्षांच्या चिमुकलीच्या प्रसंगावधानामुळे तिच्या दोन वर्षाच्या भावाचे प्राण वाचले. सांगलीत पलूस तालुक्यातील वसगडे गावात ही घटना घडली आहे.

वसगडेमध्ये सुनील शिरोटे आई, वडील, पत्नी आणि दोन लहान मुलांसोबत राहतात. सुनील यांना स्नेहल ही चार वर्षाची मुलगी, तर सुजल हा दोन वर्षाचा मुलगा.

रविवारी सकाळी आठ वाजता हे संपूर्ण कुटुंब कामात व्यस्त होतं. घरात स्नेहल आणि सुजल ही दोघं भावंडं खेळत होती. खेळता खेळता दोघं अंगणात गेली. अंगणाच्या बाहेरील बाजूला असलेल्या स्वच्छतागृहाजवळ स्नेहल बसली होती, तर सुजल अंगणातील पाण्याच्या टाकीजवळ गेला.

पाचशे लिटर क्षमतेच्या या टाकीमध्ये जवळपास चारशे लिटर पाणी होतं. टाकीच्या कट्ट्यावर उभं राहून तो पाण्याने भरलेल्या पाण्याच्या टाकीत बघत होता. चिमुरड्या स्नेहनले हे पाहिले तिला संभाव्य धोक्याची जाणीव झाली.

स्नेहल धावतच सुजलकडे आली, पण तोपर्यंत सुजलचा तोल जाऊन पाण्यात पडला होता. भाऊ पाण्याच्या टाकीत पडत असतानाच स्नेहलने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. पण तिच्या हाती त्याचा एक पाय आला. सुजलचं तोंड पाण्यातच बुडालं होते. तो गटांगळ्या खाऊ लागला. त्याचा श्वास गुदमरत होता.

हे पाहून स्नेहल जिवाच्या आकांताने ओरडली. तिचा आवाज ऐकून घरातील मोठी माणसं बाहेर धावत आली. समोरचं दृश्य पाहून क्षणभर त्यांच्या अंगावर शहारे आले. तात्काळ त्यांनी सुजलला पाण्यातून बाहेर काढले. त्याच्या पोटात पाणी गेले होते. त्याला उलटं झोपवून पाठ थोपटून पोटातील पाणी बाहेर काढलं आणि  सुजलचे प्राण वाचले.

शिरोटे कुटुंबीयांवर आलेलं दु:खाचं सावट चार वर्षांच्या चिमुकलीच्या प्रसंगावधानामुळे टळलं. मुलीच्या या धाडसामुळे तिच्या वडिलांच्या डोळ्यांच्या कडाही पाणावल्या होत्या.

स्नेहलचं वय अत्यंत कमी असूनही तिने दाखवलेली सतर्कता, तत्परता, धाडस आणि बुद्धिकौशल्य थक्क करणारं होतं. मोठ्या माणसांनाही अशा प्रसंगात बऱ्याचदा काही सुचत नाही. त्यामुळे दुर्दैवी घटना टाळता येत नाहीत. अशा परिस्थितीत स्नेहलचं हे धाडस साऱ्यांच्याच कौतुकाचा विषय ठरला आहे.

📚📕📗📘📙📔📒📚

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨

📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣2⃣6⃣

*⛳नेतान्‍याहू यांनी थोपटली सांगलीकराची पाठ*

Published On: Jan 19 2018

साभार - Online Pudhari
बांबवडे : वार्ताहर 

भारताच्या दौर्‍यावर नुकताच इस्‍त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्‍याहू आणि त्यांची पत्‍नी सारा या महाराष्ट्र दौर्‍यावर आले आहेत. त्‍यांच्या स्‍वागतासाठी खास तुतारी वादन करण्यात आले. नेत्यान्‍याहू यांच्या स्‍वागतासाठी जी तुतारी गगनभेदी ठरली ती तुतारी आहे सांगली जिल्‍ह्यातील तुतारीवादक पांडूरंग गुरव यांची.

सांगली जिल्‍ह्यातील वाटेगाव हे पांडूरंग गुरव यांची गाव. मुंबई विमानतळावर वाटेगावची तुतारी या परदेशी पाहुण्यांसाठी गगनभेदी ठरली आणि सगळ्यांच्या आकर्षणाचीही ठरली. 
यावेळी स्वागत करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'ही महाराष्ट्राची तुतारी' अशी ओळख करून दिली. या तुतारीने परदेशी पाहुणे भारावून गेले व महाराष्ट्राला धन्यवाद दिला. शिवाय तुतारीवादक गुरव आणि साथीदारांची नेत्यान्याहू यांनी दखल घेऊन शाबासकी देत आभारही मानले.

वाटेगावचे पर्यायाने सांगली जिल्ह्याचे नाव गुरव यांनी आपल्या तुतारीच्या कलेने देशासह परदेशातही नेले आहे. त्यांनी शासकीय खर्चाने अमेरिका, मॉरिशस, तर मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचे सोबत जपान दौरा केला आहे.

📚📕📗📘📙📔📒📚

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨

📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣2⃣5⃣

*🎓शहीद जवानाची पत्नी झाली उपशिक्षणाधिकारी*

Published On: Jan 17 2018

साभार- दैनिक पुढारी, नागपूर : प्रतिनिधी

पतीचा मृत्यु झाल्यानंतर पत्नी आणि अख्ख्या कुटुंबाची काय हालत होते, हे आपण अवतीभवती पाहत असतो. परंतु एका पोलिस जवानाच्या निधनानंतर त्याच्या पत्नीने धैर्याने परिस्थितीला तोंड देत यशाची एकेक शिखरे पादाक्रांत केली आणि आज ती उपशिक्षणाधिकारी झाली.

ही गोष्ट आहे श्रीमती हेमलता जुरु परसा या विधवेची. हेमलता आणि जुरु दोघेही गोंड-माडिया आदिवासी. भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम हिदूर हे जुरु केये परसा यांचे गाव. घरची परिस्थिती बेताची. दहावीपर्यंत त्यांनी लोकबिरादरी आश्रमशाळेत अध्ययन केले. तेथे असताना डॉ.प्रकाश आमटे यांच्यापासून प्रेरणा घेऊन जुरुंनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि ते पोलिस दलात भरती झाले. नोकरीनंतर कुरखेडा तालुक्यातील मूळ रहिवासी असलेल्या हेमलता नैताम यांच्याशी जुरुचे लग्न जुळले.

हेमलता तेव्हा एम.ए. बी.एड. झालेल्या. त्या आरमोरी तालुक्यातील चुरमुरा येथील वैनगंगा विद्यालयात शिक्षिका होत्या. लग्नानंतर दोघेही गडचिरोली येथे राहू लागले. लग्नाला चार महिने होत नाही, तोच लाहेरी येथे नक्षल्यांशी झालेल्या चकमकीत जुरु शहीद झाल्याची बातमी आली. तो दिवस होता 8 ऑक्टोबर 2009. संसाराच्या वेलीवर फूल उमलण्याआधीच पतीला वीरमरण आल्याने हेमलताचे अवसान गळाले. खरे तर ऐन तारुण्यात पतीचे निधन झाल्यानंतर दुसरे लग्न करावे, असे कुण्याही विधवा महिलेला वाटणे स्वाभाविक होते. परंतु हेमलताने लग्न न करण्याचा निर्णय घेतला.

दु:खाच्या काटेरी वाटेवरुन चालताचालता 6 वर्षे निघून गेली. अखेर पोलिस विभागाने धैर्याचा हात पुढे केला आणि 2015 मध्ये हेमलता गटशिक्षणाधिकारी झाल्या. यशाचे एक शिखर पादाक्रांत झाले होते. परंतु जिद्द आणि चिकाटी कायम होती. हेमलताने पुन्हा पदर खोचला. शहीद पतीला सलामी देण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. यंदा 10 जानेवारीला आयोगाने निकाल जाहीर केला आणि त्यात हेमलताची निवड झाली. ध्यानसाधना करणार्‍या एखाद्या योग्याच्या कपाळावर लख्ख प्रकाश दिसावा, तसाच यशाचा प्रकाश हेमलताच्या कुंकू पुसलेल्या कपाळावर पडला. या यशाने हेमलताच्या आप्तांना जसा आनंद झाला, त्यापेक्षा शहीद जवानाची विधवा पत्नी उपशिक्षणाधिकारी झाल्याचा अभिमान पोलिस अधिकार्‍यांना वाटला. संवेदनशिल म्हणून ओळखले जाणारे पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी हेमलताला बोलावून घेतले आणि शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव केला.

📚📕📗📘📙📔📒📚

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨

📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣2⃣4⃣

*🚀🚓⚓सैनिक टाकळीच्या चार पिढ्यांची जाज्वल्य देशसेवा*

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

साभार-गणेश शिंदे,दैनिक सकाळ

05.54 AM

जयसिंगपूर - देशभक्तीतून देशसेवेची परंपरा जपलेल्या सैनिक टाकळी (ता. शिरोळ) गावच्या शूरवीरांनी पहिल्या महायुद्धापासून ते अलिकडच्या कारगील युद्धापर्यंत प्राणाची बाजी लावली आहे. चार-चार पिढ्यांनी देशरक्षणासाठी बलिदान दिलेल्या या गावचे नावही सैनिकांची टाकळी म्हणजेच "सैनिक टाकळी' असे आदराने घेतले जाते. संपूर्ण देशासाठी अभिमान असणाऱ्या या गावची सैनिकी परंपरा म्हणजे जाज्वल्य देशप्रेमाचे प्रतिक म्हणावे लागेल.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कृष्णाकाठी वसलेल्या सैनिक टाकळी गावाने देशसेवेतून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. गावातील अनेक तरुण सैन्यात भरती होऊन देशाचे आणि गावाचे नाव लौकीक करताना दिसत आहे. अगदी ब्रिटीश काळापासून येथील तरुणांनी लष्कराची वाट मळली आहे. 1880 पासून लष्करात जाण्याची परंपरा सुरू झाली ती आजतागायत सुरुच आहे. 1911 पासून येथील तरुणांनी देशसेवेचे ब्रीद जपले आहे. 1914 ते 1919 या पहिल्या जागतिक महायुध्दाच्या काळात सुरू झालेली सैन्यभरतीचे व्रत इथल्या तरुणांनी आजही जपले आहे.

पहिल्या महायुद्धाच्या काळात एकाचवेळी 60 तरुण सैन्यात भरती झाले. त्यासाठी तत्कालीन सरकारने जमिनीही दिल्या. आजही या जमिनी "लष्करी पट्टा' म्हणून ओळखल्या जातात. 1914 ते 1919 झालेल्या युद्धात मित्र राष्ट्रातील अनेक जवानांचे बळी गेले. यात टाकळीचे सहा जवान शहीद झाले.

युद्धसमाप्तीनंतर काही जवान सहा वर्षे पायपीट करत गावत परतले. सहा वर्षात त्यांचा शोध लागला नसल्याने कुटुंबियांनी त्यांचे पिंडदानही केले. मात्र, काही जिगरबाज महिलांनी आपल्या पतीचा मृतदेह पाहिल्याशिवाय कुंकू पुसणार नाही, अशी शपथ घेऊन ती पाळली.

दुसऱ्या महायुद्धात लढताना हवालदार तुकाराम पाटील यांचे शीर धडावेगळे केले. शत्रूच्या काळजात धडकी भरवणारा पराक्रम त्यांनी केला. त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन ब्रिटीश सरकारने त्यांना मरणोतर पुरस्कार देऊन गौरविले. त्यांच्या आईला त्याकाळी रोख सात हजाराची पेन्शन सुरू केली. हजार-दीड हजार कुटुंबे असलेल्या या गावाने दीड हजाराहून अधिक सैनिक दिले. पहिले आणि दुसरे महायुद्ध, स्वातंत्र्योतर काळात चीन, पाकिस्तानविरोधात झालेली युद्धे आणि श्रीलंकेत पाठवलेल्या शांतीसेनेतून एलटीटीईशी झालेल्या संघर्षात टाकळीच्या 18 जवानांनी हौतात्म्य पत्करले आहे. सैनिक कल्याण मंडळाच्या माध्यमातून त्यांचे प्रेरणादायी स्मारक उभारले गेले.

*गावच्या सैनिकी परंपरेवर दृष्टिक्षेप*

आजतागायत सेवा बजावलेले जवान..... 1004
शहीद जवान.......................................18
स्वातंत्र्य सैनिक ...................................6
लष्कर ...............................................17
नौदल ................................................17
हवाईदल ..........................................7
पोलिस ..............................................801
देशसेवेतील निवृत्त..............................208
वीर माता ............................................2
वीर पत्नी .............................................4

गावातील प्रत्येकाच्या मनात देशप्रेम ठासून भरले आहे. देशभर गावचा लौकीक निर्माण झाला आहे. अनेकांनी रक्त सांडून हा लौकीक निर्माण केला आहे. देशसेवेची परंपरा यापुढे अशीच सुरु राहील. आमची तिसरी पिढी देशसेवा करत आहे.

- शामराव पाटील, निवृत्त, ऑनररी लेफ्टनंट

📚📕📗📘📙📔📒📚

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨

📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣2⃣2⃣

*🍲अहमदपूरचं 'ग्रॅज्युएट खिचडी सेंटर' आणि पीएचडी 🎓*

_*✒बाळासाहेब राजे*_

      लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूरच्या बसस्थानकासमोर असलेलं 'ग्रॅज्युएट खिचडी सेंटर' नावाचं टपरीवजा हॉटेल नावातील वेगळेपणामुळं लक्ष वेधून घेतं. त्याहूनही चकित करणारी बाब म्हणजे ते चालवणाऱ्या वसंत लामतुरे या तरुणाच्या रग्गड पदव्या. एम. ए., बी. एड्, सेट उत्तीर्ण, पेट उत्तीर्ण या पदव्या असूनही हा तरुण हे हॉटेल चालवितो म्हणून त्याचं कौतुक करावं की उच्चशिक्षित असूनही वशिलेबाजी आणि पैसा नसल्यामुळे त्याच्यावर ही पाळी आली आहे, म्हणून सामाजिक व शैक्षणिक व्यवस्थेच्या नावानं बोटं मोडावीत हा प्रश्न पडतो. पेट ही पी. एच. डी.ची पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होऊन वसंत आता स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात 'हिंदी - मराठी दलित आत्मकथाओं का तुलनात्मक अध्ययन' या विषयांवर पी. एच. डी. करीत आहे. त्याचा इथपर्यंतचा प्रवास हा जिद्दीचा असून हे सारं त्यानं स्वतःच्या बळावर केलंय हे विशेष.
      अठरावविश्वे दारिद्र्य असणाऱ्या कुटुंबात त्याचा जन्म झाला. वसंत हे अकरावं अपत्य असून शेंडेफळ आहे. अकरा पैकी चार बालके दगावली. उरलेल्या सात पैकी चार भाऊ, तर तीन बहिणी. वडील हिरामण लामतुरे हे लाकडं फोडायचे तर आई गयाबाई निंदण, खुरपण, गवत कापणे यासारखी शेतमजुरीची कामं करायची. कळत्या वयात शाळेत जाणारा वसंत केसाला लावायला खोबरेल तेल हवं म्हणून हट्ट करी, तेव्हा "तू मोठा झालास की आपण खोबरेल तेल आणू" म्हणून आई त्याची समजूत घालत असे.
      बालवयातल्या गरिबीच्या चटक्यांनी वसंतला अकाली प्रौढत्व आलं. पैसा कमावल्याशिवाय कुटुंबाचा गाडा ओढणं अशक्य आहे, हे ओळखून त्यानं आयटीआयचा कोर्स पूर्ण करताच पुणं गाठलं. पुण्यातल्या एका कंपनीत तुटपुंज्या पगारावर फिटरचं काम करीत असताना त्याच्यासमोर झालेल्या अपघातात एका बंगाली कामगाराला आपला जीव गमवावा लागला होता. दुर्दैवाने आपलाही असाच अपघात झाला तर आपल्या आईवडिलांवर कोणती आपत्ती कोसळेल, म्हणून त्यानं पुणं सोडलं. आणि त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.
      सकाळी सहा वाजल्यापासून घरोघर जाऊन वर्तमानपत्रं टाकायची, सव्वा आठ ते दोन वाजेपर्यंत कॉलेज करायचं, कॉलेजहून आल्यावर पाच वाजेपर्यंत रिक्षा चालवायची, पाच ते आठ वाजेपर्यंत पिग्मी एजंट म्हणून काम करायचं आणि रात्री डोळ्याला डोळा लागेपर्यंत अभ्यास करायचा, पुढची आठ वर्षे हीच त्याची दिनचर्या झाली. खेळकर वृत्तीचा वसंत घरोघर जाऊन वर्तमानपत्रं टाकण्याच्या कामाला 'Morning Walk With Earning' असं म्हणतो. वर्तमानपत्राच्या गठ्ठ्यावर तो अभ्यासाचे पॉईंट लिहिलेला कागद डकवित असे नि ते पॉईंट घोकत घोकत सायकलला पायंडल मारीत असे.
      वसंत कॉलेजला शिकत होता तेव्हाचा प्रसंग आहे हा. बऱ्याचदा पुस्तकं, वह्या घेण्यासाठीही त्याच्याकडे पैसे नसत. त्यावेळी अहमदपूरच्या एका प्रतिष्ठित हॉस्पिटलमध्ये कंपाउंडर असलेला इसम डॉक्टरचे कपडे इस्त्रीसाठी घेऊन येत असे. त्यावेळी एका ड्रेसच्या इस्त्रीला पाच रुपये दर होता. वसंतने त्या इसमाला पटविले. एका ड्रेसमागे एक रुपया कमिशन देऊन वसंत स्वतःच इस्त्री करू लागला आणि त्याने पैशाचा प्रश्न काही अंशी का होईना सोडविला.
            एके दिवशी वसंतच्या मनात विचार आला, रिक्षाचा नंबर यायला दोन तास वाट पहावी लागते आणि एका फेरीत कमाई होते फक्त वीस-तीस रुपये. याऐवजी आपण छोटंसं हॉटेल सुरु केलं तर? त्याने आपला मनोदय आईला सांगितला. त्याची आई म्हणाली, "वसंता!, इमानदार माणसाच्या हातातल्या मातीला सोन्याचं मोल असतंय. तू इमानाला जाग. तुला काई कमी पडणार न्हाई." पदवीचं शिक्षण घेताना दहा-बारा विद्यार्थ्यांना स्वतः स्वयंपाक करून डबा पुरविण्याचा अनुभव त्याच्या गाठीशी होताच, त्याचा उपयोग या व्यवसायात खूप झाला. बी.ए., राज्यशास्त्र व हिंदीत एम. ए., बी. एड् अशा चढत्या क्रमाने तो शिकत राहिला. अहमदपूरपासून जवळच असलेल्या माळेगावला मार्गशीर्ष महिन्यात खंडोबाची मोठी यात्रा भरते. नेमकं या यात्रेच्या वेळी नगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेत रस्त्याकडेची अनेक छोटी छोटी दुकानं, टपरीवजा हॉटेलं उठविली गेली. आता काय करायचं हा प्रश्न आ वासून त्याच्यापुढे होता.  त्यानं आपलं विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर घेतलं आणि माळेगाव गाठलं आणि यात्रेत खिचडी भज्याचं हॉटेल थाटलं. यात्रेत बऱ्यापैकी गिऱ्हाईक होतं. पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत खपल्यावर चार पैसेही गाठीशी उरत. याच वेळी एम. ए.चं सेमिस्टर चालू होतं. कसाबसा एक पेपर देऊन त्यानं परीक्षा न देण्याचा निर्णय घेतला. यात्रेच्या धावपळीत त्याचा अभ्यासही झाला नव्हता आणि काम नाही केलं तर घर कसं चालणार? चौथ्या सेमिस्टरला तो सर्व पेपरमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. काही दिवसानंतर पुन्हा अहमदपूरमध्ये त्याचं टपरीवजा हॉटेल सुरु झालं. पुढे तो हिंदी विषयाची सेट परीक्षाही उत्तीर्ण झाला. सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी मिळते. सेट परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण नगण्य असते.
चार पुस्तकं शिकली, एक दोन पदव्या मिळविल्या की नोकरी मिळेल याची खात्री हल्ली कुणी देऊ शकत नाही. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबादसारखी आठ दहा शहरं सोडली तर इतर ठिकाणी रोजगाराच्या नावानं बोंबच आहे. वयाच्या तिसाव्या वर्षापर्यंत शिकून धड शिक्षणात अव्वल नाही आणि कष्टाची कामं करायला लाज वाटणारी पिढी वर्षानुवर्षे तयार होतेय. कदाचित तत्कालीन इंग्रज सरकारनं लागू केलेली कारकून निर्माण करणारी शिक्षण पद्धती अंधपणे राबवित असल्याचा हा परिणाम असावा. सुशिक्षित बेरोजगार नावाचं न दिसणारं लेबल लावून हे तरुण आपल्या आसपास फिरताना आढळतात. यातले बरेच व्हाट्सअॅप, फेसबुकसारख्या समाजमाध्यमांवर पडीक राहून आपली हुशारी वाया घालवीत असल्याचे चित्र सामान्य आहे. वसंतच्या गाड्यावरचं 'नोकरी लागत नाही म्हणून काय झालं? काम करताना लाजायचं नसतं.' हे वाक्य सुशिक्षित बेरोजगार तरुणांना खूप काही सांगतं. वसंतच्या 'ग्रॅज्युएट खिचडी सेंटरमध्ये दररोज सत्तर ते ऐंशी किलो तांदळाची खिचडी शिजविली जाते. गरमागरम भजी आणि वडापावचा हिशोब वेगळाच. एका ग्रॅज्युएट तरुणाच्या खिचडी सेंटरमुळे दहाबारा लोकांना नियमित रोजगार मिळाला आहे.
      दोनतीन ठिकाणी प्राध्यापक पदाच्या मुलाखती दिल्यावर वसंतला चांगलाच अनुभव आला. दोन ठिकाणी हा माणूस खालच्या जातीतला आहे, अधेमध्ये काही भानगड झाली तर उगाच अॅट्रोसिटीचं लफडं नको म्हणून त्याच्या पात्रतेला वाटण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. आणखी एका शिक्षण संस्थेत असलेला डोनेशनचा आकडा पाहून सेट उत्तीर्ण असण्याला काडीचीही किंमत नसल्याची भावना त्याच्या मनात निर्माण झाल्याचं वसंत सांगतो.
      राजकारण हे मानवी जगण्याचं अविभाज्य अंग आहे. त्यापासून कुणीही अलिप्त राहू शकत नाही. वसंतही राजकारणाच्या धामधूमी पासून स्वतःला दूर ठेवू शकला नाही. अहमदपूर नगरपालिकेच्या मागील दोन निवडणुका उच्चशिक्षित वसंतानं लढविल्या. मात्र शिक्षणातली गुणवत्ता त्याला विजय मिळवून देऊ शकली नाही. राजकारणात निव्वळ गुणवत्ता असून चालत नाही खिसाही गरम असावा लागतो, याचं भान आता त्याला आलं आहे.
            वसंतची आई गयाबाई निरक्षर आहे, काबाडकष्ट करून तिनं त्याला शिक्षण दिलं, कळत्या वयाचा झाल्यापासून वसंत स्वतः कमावून शिक्षण घेतोय. बिकट परिस्थितीत एखाद्याचं शिक्षण पूर्ण झालं नसतं, धडपड करून शिक्षण घेतल्यावरही एखाद्याने डोनेशनचा आकडा पाहून नोकरीचा नाद सोडला असता. पण वसंतचा निर्धार पक्का आहे. कितीही अडचणी आल्या तरी हसत हसत त्या अडचणींचा डोंगर पार करून तो आता पीएचडी करतोय. त्याला प्राध्यापक व्हायचंय. निरोप घेताना वसंतची आई पाणावलेल्या डोळ्याने म्हणाली, "माजा वसंत खरंच मास्तर व्हईल का?"

                                        - *✒बाळासाहेब राजे*

दि. १३ जानेवारी २०१७, शनिवार

📚📕📗📘📙📔📒📚

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_