twitter
rss

स्वच्छतेत सिंधुदुर्ग जिल्हा देशात अव्वल



नवी दिल्ली - मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियानांतर्गत ग्रामीण भागातील
 स्वच्छतेबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्याने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. केंद्रीय ग्रामविकास व पेयजल मंत्रालयाने घेतलेल्या स्पर्धेत ग्रामीण स्वच्छतेबाबत अग्रेसर असलेल्या पहिल्या 75 जिल्ह्यात सिंधुदुर्गासह सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी व ठाणे या राज्यातील पाच जिल्ह्यांनी पहिल्या दहात स्थान पटकावले आहे. सिंधुदुर्गाच्या दृष्टीने हा खूप मोठा सन्मान मानला जात आहे.

राज्य म्हणून मात्र महाराष्ट्र ग्रामीण स्वच्छतेबाबत मागे म्हणजे 26 पैकी 15 व्या क्रमांकावर आहे. ग्रामस्वच्छतेबाबत सिक्कीम व स्वाभाविकपणे केरळने अव्वल स्थान मिळविले आहे.

ग्रामविकास व पेयजल मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी याबाबत घेतलेल्या राष्ट्रीय स्पर्धेचा निकाल आज जाहीर केला. मंत्रालयाचे मुख्य सचिव परमेश्‍वर अय्यर, पीआयबीचे घनश्‍याम गोयल, सरस्वतीप्रसाद, भारतीय गुणवत्ता परिषदेचे (ओसीआय) आदित्य अनुभाय आदी उपस्थित होते.

तोमर यांनी जाहीर केले की सिक्कीम व केरळ ही देशातील सर्वांत स्वच्छ राज्ये आहेत. बिहार शेवटच्या क्रमांकावर आहे व बिहार, उत्तर प्रदेशातील एकही जिल्हा पहिल्या 75 स्वच्छ जिल्ह्यात नाही. छत्तीसगड, झारखंड या राज्यांनीही ग्रामस्वच्छतेबाबत सुधारणा करण्याची गरज आहे. ग्रामस्वच्छतेसाठी केंद्राने पहिल्या टप्प्यात 12 हजार कोटींचा निधी राज्यांना दिल्याचेही त्यांनी नमूद केले