twitter
rss

स्वच्छतेत सिंधुदुर्ग जिल्हा देशात अव्वल



नवी दिल्ली - मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियानांतर्गत ग्रामीण भागातील
 स्वच्छतेबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्याने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. केंद्रीय ग्रामविकास व पेयजल मंत्रालयाने घेतलेल्या स्पर्धेत ग्रामीण स्वच्छतेबाबत अग्रेसर असलेल्या पहिल्या 75 जिल्ह्यात सिंधुदुर्गासह सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी व ठाणे या राज्यातील पाच जिल्ह्यांनी पहिल्या दहात स्थान पटकावले आहे. सिंधुदुर्गाच्या दृष्टीने हा खूप मोठा सन्मान मानला जात आहे.

राज्य म्हणून मात्र महाराष्ट्र ग्रामीण स्वच्छतेबाबत मागे म्हणजे 26 पैकी 15 व्या क्रमांकावर आहे. ग्रामस्वच्छतेबाबत सिक्कीम व स्वाभाविकपणे केरळने अव्वल स्थान मिळविले आहे.

ग्रामविकास व पेयजल मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी याबाबत घेतलेल्या राष्ट्रीय स्पर्धेचा निकाल आज जाहीर केला. मंत्रालयाचे मुख्य सचिव परमेश्‍वर अय्यर, पीआयबीचे घनश्‍याम गोयल, सरस्वतीप्रसाद, भारतीय गुणवत्ता परिषदेचे (ओसीआय) आदित्य अनुभाय आदी उपस्थित होते.

तोमर यांनी जाहीर केले की सिक्कीम व केरळ ही देशातील सर्वांत स्वच्छ राज्ये आहेत. बिहार शेवटच्या क्रमांकावर आहे व बिहार, उत्तर प्रदेशातील एकही जिल्हा पहिल्या 75 स्वच्छ जिल्ह्यात नाही. छत्तीसगड, झारखंड या राज्यांनीही ग्रामस्वच्छतेबाबत सुधारणा करण्याची गरज आहे. ग्रामस्वच्छतेसाठी केंद्राने पहिल्या टप्प्यात 12 हजार कोटींचा निधी राज्यांना दिल्याचेही त्यांनी नमूद केले
.

यावेळी तोमर यांच्या हस्ते प्रकाशित झालेल्या पुस्तिकेनुसार ही आकडेवारी जून 2015 ची आहे. मात्र नंतर मंत्रालयाने एक स्वतंत्र निवेदन देऊन जून 2016 ची राष्ट्रीय पातळीवरील स्वच्छ राज्यांची आकडेवारी व क्रमवारी जाहीर केली. महाराष्ट्राची दोन्ही वर्षांतील ग्रामस्वच्छतेत वर्षभरात प्रगती नव्हे तर अधोगतीच झालेली दिसते. कारण 2015 मध्ये 52 टक्‍क्‍यांसह 15 व्या क्रमांकावर असलेले राज्य 2016 मध्ये एका क्रमांकाने घसरून नागालॅंडच्याही खाली म्हणजे 16 व्या क्रमांकावर आलेले आहे. राज्याची स्वच्छता टक्केवारी मात्र 10 टक्‍क्‍यांनी वाढलेली आहे. मध्यप्रदेश वगळता भाजपशासित सर्व राज्ये ग्रामस्वच्छतेबाबत महाराष्ट्राच्या पुढे आहेत. प्रसाद यांनी सांगितले की स्वच्छ भारत मोहिमेत 2014 मध्ये आखणी करतानाच शहरांबरोबरच 70 टक्के लोकसंख्या असलेल्या ग्रामीण भागाकडेही तेवढेच लक्ष देण्यात आले होते. त्यामुळेच स्वच्छ शहरे व गावे यांची वेगवेगळी मानांकन यादी प्रसिद्ध करण्याचा निर्णय पंतप्रधान कार्यालयाने घेतला. 20 राज्यांनी याबाबत उत्सुकता दर्शविली व स्पर्धेत प्रत्यक्ष भागही घेतला. ग्रामीण भागातील स्वच्छ गावे निवडण्यासाठी सुमारे 75 हजार कुटुंबाशी त्यातही महिलांशी संवाद साधण्यात आला. शौचालये व त्येची निगा आणि सांडपाणी निचरा मोहीम या प्रमुख निकषांच्या आधारे भागातील सर्वेक्षण केले गेले. त्यानंतर अव्वल 75 स्वच्छ जिल्हे निवडण्यात आले. यात शहरांचा समावेश नाही. स्वच्छ शौचालय आहे का व त्याचा नियमित वापर होतो आहे का, निवासी भाग कचरामुक्त व पाण्याची डबकी नसलेला आहे का, सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ आहेत का याच्या आधारे ग्रामीण भाग निवडण्यात आले.

*सिंधुदुर्गाच्या शिरपेचात मानाचा तुरा...*..

गेल्या आठ-दहा वर्षांपासून राज्यात सुरू असलेल्या स्वच्छतेविषयीच्या स्पर्धात्मक योजनांमध्ये सिंधुदुर्गाने आपले नाव कायमच वरच्या स्तरावर राखले. *आर. आर. पाटील यांनी जाहीर केलेल्या ग्रामस्वच्छता अभियानात* जिल्ह्यातील तळवडे, आंबडोस आदी गावांनी राज्यस्तरावर यश मिळविले. नागरी स्वच्छतेत सावंतवाडी आणि त्या पाठोपाठ वेंगुर्लेनेतर देशस्तरावर वेगळी ओळख निर्माण केली. स्वच्छता ही मुळातच सिंधुदुर्गाच्या संस्काराचा भाग आहे. यामुळे स्वच्छतेचे बीज रुजविण्यात येथे फारसे प्रयत्न करावे लागले नाहीत. याशिवाय हागणदारीमुक्ती, निर्मलग्राम, तंटामुक्ती यातही सिंधुदुर्गाचे काम लक्षवेधी आहे. स्वच्छतेविषयी देशस्तरावर तयार झालेली ही ओळख जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला पोषक ठरणार आहे.

📚📕📗📘📙📔📒📚

*संकलन -* 

_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_