twitter
rss

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣9⃣7⃣

*साताऱ्याच्या मनालीची 'इस्त्रो'त झेप*

By-भाग्यश्री रसाळ,महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 29 Aug 2019, 01:16 PM

_भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे (इस्रो)मध्ये सातारा जिल्ह्यातील मनाली सपाटे हिची संशोधक शास्त्रज्ञ म्हणून निवड करण्यात आली आहे. मनाली सध्या एमटेकचे उच्च शिक्षण बंगळुरूत घेत असून एमटेकच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या गेट परीक्षेतही तिनं देशात तेरावं स्थान प्राप्त केलं होतं._

साताऱ्याच्या मनालीची 'इस्त्रो'त झेप

सातारा: भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे (इस्रो)मध्ये सातारा जिल्ह्यातील मनाली सपाटे हिची संशोधक शास्त्रज्ञ म्हणून निवड करण्यात आली आहे. मनाली सध्या एमटेकचे उच्च शिक्षण बंगळुरूत घेत असून एमटेकच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या गेट परीक्षेतही तिनं देशात तेरावं स्थान प्राप्त केलं होतं.

खटाव तालूक्यातील राजापूर या खेडेगावातील शाळेत मनालीनं प्राथमिक शिक्षण पूर्ण असून इंजिनिअरींगचं शिक्षण मुंबईत घेतलं. इंजिनिअरींगचं शिक्षण संपल्यानंतर मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीकडून चांगल्या पगाराच्या नोकरीची ऑफर तिनं नाकारून पुढं शिकण्याचा निर्णय घेतला.
मनालीचे वडिल महेंद्र सपाटे हे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागात विस्तारअधिकारी या पदावर असून आई गृहिणी आहे. मनालीच्या या यशाचं सर्वत्र कौतुक होत असून साताऱ्याचा झेंडा आता इस्रोत झळकणार आहे.

https://m.maharashtratimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/satara/girl-of-satara-manali-sapate-elected-as-research-scientist-in-isro/articleshow/70889341.cms?utm_source=facebook.com&utm_medium=referral&utm_campaign=manali-sapate290819&fbclid=IwAR1bTlMYJlAgs8tT4oFhydFRZlGfhARHaArUrZ012YWsDQcf9Iraj5kErwg

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣9⃣6⃣

*"..#तिला_काय_वाटत_असेल?*

*_🖋रमेश घोलप IAS_*
*_जिल्हाधिकारी, कोडरमा (झारखंड)_*

आठ लेकरांमधे सर्वात 'धाकटी लेक' असणारी ती सर्वांची लाडकी होती. मागेल तो हट्ट पुरवायला मोठे ४ भाऊ, ३ बहिणी आणि आई-वडिल होते असं ती नेहमी अभिमानानं सांगते. मग तुला त्यावेळी शाळेत का घातलं नाही? या प्रश्नाचं उत्तर मात्र तिच्याकडं नसतं. याबाबत तिला खंत असते मात्र ती कुणाला दोष देत नाही.
लग्नानंतर मात्र ती जवळजवळ माहेर इतकच मोठ असलेल्या कुटुंबांची 'थोरली सुन' होते.सासरबद्दल तक्रारीचा सुर नसला तरी नव्वदच्या दशकात जी कौटुंबिक व्यवस्था होती त्यात 'धाकटी लेक' आणि 'थोरली सुन' यातील फरक तिने नक्कीच अनुभवला होता. त्यात भर म्हणून ज्या व्यक्तीसोबत आपल्या साताजन्माच्या गाठी बांधलेत त्या व्यक्तीला दारू पिण्याचं 'व्यसन' आहे हे समजल्यानंतर, कित्येक वेळा त्याचे चटके सहन केल्यानंतरही जोडीदाराबद्दल माहेरच्यांकडे एक 'ब्र' सुद्धा न काढता, कित्येक वेळा मरणाच्या दारात पोहचून सुद्धा आपलं घर न सोडता, स्वत:चं दु:ख झाकून ठेऊन कुटुंबाच्या भविष्याचा विचार करत ती कणखर बनली. परिस्थितीची 'येसन' तोडून कुटुंबाच्या गाडीचं चाक दारिद्रयाच्या चिखलात रूतू दयायचं नसेल आणि पोरांना शिक्षणाचं बाळकडू पाजायचं असेल तर आपल्याबरोबरच जोडीदाराच्या खांदयावरचा काही भार ही आपल्याला ओढावा लागेल हे वास्तव स्विकारून नातेवाईकांचा विरोध पत्करून ती 'कासारीन' बनली. गावोगावी फिरून बांगड्या भरल्या. दोन मुलांना घडवताना, पतीची बिघड़त जाणारी तब्येत सांभाळताना ती परिस्थितीशी दोन हात करून 'मर्दानी' सारखी लढली. पतिच्या निधनानंतर तिस-या दिवशी पोराला 'बापाला तु शब्द दिलाय ना, कि माझा १२ वीचा रिझल्ट लागला कि तुम्हाला माझा अभिमान वाटेल अशी मार्क्स असतील. ते जिथपण असतील तिथ त्यांना अभिमान वाटायला पाहिजे. तु शिकला तरच आपला संघर्ष संपेल' म्हणत मला परीक्षेला पाठवत 'खंबीर आई'ची भूमिका तिन निभावली.
मोठया मुलाच डी.एड. झाल्यानंतर आणि धाकट्या मुलाचं डी.एड. सुरू असताना मोठया मुलाला नोकरी लागत नाही म्हटल्यावर अनेकांनी तिला सल्ला दिला, की त्याला गावात किंवा तालुक्याच्या ठिकाणी कामाला पाठवा. पण पोराला कामाला नाही पाठवणार 'तो करेल तर नोकरीच!' असं म्हणत बांगड्या विकण्याबरोबरच गावी आणि परगावी दुस-यांच्या शेतात तिन मज़ूरी केली आणि थोरल्या लेकाला पण पुढील शिक्षणासाठी बाहेर पाठवलं.
मी शिक्षक म्हणून नोकरीला लागल्यानंतर, रहायला घर नसताना सुद्धा सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेताना तिचा पूर्ण पाठिंबा होता. 'आपला संघर्ष काय अजून थोड़े दिवस सुरू राहिल, पण तुला जे आवडतं ते कर' असं म्हणत माझ्यावर पूर्ण विश्वास दाखवणारी माझी 'आक्का' हीच अभ्यासाच्या का माझी खूप मोठी प्रेरणा होती. अभ्यास करताना कधी अभ्यासातून लक्ष विचलित होऊ लागलं की मला दुस-याच्या शेतात काबाडकष्ट करणारी माझी माय आठवायची. तिच्या विश्वासाला पात्र ठरत मी २०१२ मध्ये 'आयएएस' (तिच्या भाषेत 'कलेक्टर' झालो). काही महिण्यांपूर्वी मी दुस-या वेळी 'कलेक्टर' म्हणून चार्ज घेतला तेंव्हा ती ऑफिस मधे आली होती. ती खूपवेळ फक्त कुतूहलाने माझ्याकड़े बघत होती. तिच्या चेह-यावर लेकाविषयीचा अभिमान स्पष्टपणे दिसत होता.
तिचे भरलेले डोळयांकड़े बघून मी कल्पना करत होतो की, 'जिल्हयातील मुलींना शिक्षण मिळावे ही जबाबदारी माझ्याकड़े आहे हे समजल्यावर तिच्यातील न शिक्षण घेता आलेल्या मुलीला काय वाटत असेल? अवैध दारू उत्पादनावर आम्ही कारवाया करतों म्हटल्यावर पतिच्या दारूच्या व्यसनामुळे संसार उध्वस्त झालेल्या तिच्यातील एका स्त्री ला काय वाटत असेल? जिल्ह्यातील सरकारी हॉस्पिटलच्या सर्व आरोग्य योजना लोकांपर्यंत कशा पोहचतील याच्यासंबंधी मिटींग आम्ही करतों हे सांगितल्यावर, पती आज़ारी असताना कित्येक वेळा सरकारी दवाखान्यात दुर्लक्षितपणा अनुभवलेल्या तिच्यातील पत्नीला काय वाटत असेल? संघर्षाच्या काळात घरावर छत नसताना आमचं नाव बीपीएल मधे लावा आणि आम्हाला पण 'इंदिरा आवास' मधून एक घरकूल मंज़ूर करा म्हणून तलाठ्याच्या ऑफिसचे उंबरठे झिजवलेल्या पण कधीही लाभार्थी न बनू शकलेल्या त्या महिलेला जेंव्हा आज आपला पोराच्या सहीने जिल्ह्यातील बेघर लोकांना घरे मिळतात हे समजल्यावर काय भावना तिच्या मनात येत असतील? पतीचं निधन झाल्यावर एक-दीड वर्ष ज्या महिलेकड़ून 'विधवा पेंशन' मिळवून देते म्हणून गावातील सरकारी व्यवस्थेतील एका महिला कर्मचारीने पैसे उकळले होते हा कटू अनुभव पाठिशी असताना आज आपला मुलगा कैम्प लावून जागच्या जागी लोकांना पेंशन मिळवून देतो हे समजून तिच्यातील त्या पेंशनसाठी अर्थिक शोषण झालेल्या महिलेला काय वाटत असेल?......'
आयएएस झाल्यापासून गेल्या ६ वर्षात ती खुपवेळा मला म्हटलीय, 'रमू, जे दिवस आपण बघितलेत, भोगलेत तशी लई लोकं ईथपण आहेत. त्यांच्या अड़चणी आधी ऐकत जा. त्यांची काम करत जा.
ग़रीब लोकांचे आशीर्वाद कमव फक्त. देव काहीसूद्धा कमी पडू देणार नाही!'
एक मात्र नक्की..असं संस्काराचं आणि प्रेरणेचं विद्यापीठ घरात असताना मनातील संवेदनशीलता आणि लोकांसाठी काम करण्याची तळमळ जिवंत ठेवायला अजून कशाचीच गरज नसते.

*-रमेश घोलप IAS*
*जिल्हाधिकारी, कोडरमा (झारखंड)*

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣9⃣5⃣

*किशोरवयीन मुलाच्या सतर्कतेमुळे कुर्डूवाडीजवळ रेल्वे अपघात टळला*

_नराज जैतकर याने वेळीच दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे कुर्डूवाडी-दौंड दरम्यान रेल्वे अपघात टळला._

लोकसत्ता टीम | August 14, 2019

कुर्डूवाडी-दौंड दरम्यान धावत्या रेल्वेतून प्रवास करताना धनराज जैतकर या किशोरवयीन मुलाने वेळीच सतर्कता दाखविल्यामुळे रेल्वेचा संभाव्य अपघात टळला. या घटनेची दखल घेत मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागीय व्यवस्थापक हितेंद्र मल्होत्रा यांनी धनराज जैतकर याचा पाच हजार रुपयांचे रोख बक्षीस व प्रशतिपत्र देऊन गौरव केला.
रेल्वे प्रशासनाकडून मुलाचा गौरव
सोलापूर : एका किशोरवयीन मुलाने वेळीच सतर्कता दाखविल्यामुळे रेल्वे अपघात टळल्याची घटना कुर्डूवाडी-दौंड मार्गावर घडली. या घटनेची दखल घेत मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागीय व्यवस्थापक हितेंद्र मल्होत्रा यांनी त्या किशोरवयीन मुलाला पाच हजारांचे रोख बक्षीस व प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित केले.

धनराज जैतकर (वय १५, रा. ऐनपूर, ता. रावेर) असे या मुलाचे नाव आहे. पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी धनराज जैतकर हा आपल्या कुटुंबीयांसह आला होता. पंढरपूरहून भुसावळकडे रेल्वेने परतीचा प्रवास करीत असताना मध्यरात्रीच्या सुमारास कुर्डूवाडी ते दौंडच्या दरम्यान रेल्वे डब्यावर जोरात दगड मारल्यासारखा आवाज येत होता. गाडीचे स्पिं्रग शॉकअपसर तुटल्यामुळे दगड उडून गाडीवर पडत होते. दोन किलोमीटर अंतर कापल्यानंतर दगड पडत असल्याचा आवाज आणखी जोरात येऊ लागला. पहाटे दीडची वेळ असल्यामुळे बहुसंख्य प्रवासी झोपेत होते. जे प्रवासी जागे होते, त्यापैकी कोणीही साखळी ओढण्याची हिंमत दाखवत नव्हते. मात्र त्यावेळी किशोरवयीन धनराज जैतकर याने प्रसंगावधान राखून रेल्वेची साखळी ओढून गाडी थांबविली. गाडी थांबल्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी तपासणी केली असता गाडीचे पाटे (स्प्रिंग) तुटल्याचे आढळून आले. त्यानंतर लगेचच दुरुस्तीकाम हाती घेण्यात आले.
किशोरवयीन धनराज जैतकर याने वेळीच दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे कुर्डूवाडी-दौंड दरम्यान रेल्वे अपघात टळला. अन्यथा अपघात होऊन मोठी हानी झाली असती. धनराजने दाखविलेल्या सतर्कतेची दखल रेल्वे प्रशासनाने घेऊन त्याचा गौरव केला आहे.
मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक हितेंद्र मल्होत्रा यांनी धनराज यास गौरवताना त्याच्या पुढील शिक्षणासाठी व्यक्तिश: मदत करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी अपर विभागीय व्यवस्थापक व्ही. के. नागर व अन्य रेल्वे प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

https://www.loksatta.com/maharashtra-news/teenage-boy-alert-prevented-train-accident-near-kurduwadi-zws-70-1950138/

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣9⃣4⃣

*रामदास मदने : पाचशे पेक्षा जास्त लोकांना पुरातून वाचविणारा अवलिया!*

Published On: Aug 13 2019 3:24PM

_पुरातून सुरक्षितपणे बाहेर काढणारा अवलिया रामदास उमाजी मदने._

सांगली : पुढारी ऑनलाईन

कृष्णा नदीकाठी महापुराने थैमान घातले. असे असताना आपला जीव धोक्यात घालून दुधोंडी पासून पश्चिमेकडील सुमारे तीन किलोमीटरवरील माळी वस्ती, सती आई मंदिर परिसर व जुने घोगाव अशा भागातील पूरबाधित सुमारे पाचशे पेक्षा जास्त नागरिकांना एका अवलियाने आपल्या छोट्याशा कायलीतून सतत चार दिवस तीनशे फेऱ्या मारून पुरातून सुरक्षितपणे बाहेर काढले. हा पंचावन्न वर्षाचा अवलिया म्हणजे रामदास उमाजी मदने...!

आपल्याला आश्चर्य वाटणारी ही बाब खरंच फक्त सांगली जिल्ह्यालाच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राला अभिमानास्पद ठरावी अशी कामगिरी या एका ५५ वर्षाच्या साठीकडे झुकलेल्या या माणसाने केली आहे. पलुस (ता. दुधोंडी, जि. सांगली) येथे राहणारा हा माणूस नदीकडच्या घरात राहूनही, सध्या पूरबाधित असूनही माणुसकीबद्दल अपार प्रेम असणारा आम्हाला दिसला. या माणसाचं घर जमिनीपासून दहा फूट उंचीवर असून सुद्धा घरात चार फूट पुराचे पाणी शिरले होते. या माणसाने आपले कुटुंब इतरत्र हलवले. परंतु महापुराच्या पाण्यात आपण मात्र स्वतः दिवसभर छोट्याशा काहिलीद्वारे आपलं काम सुरू ठेवून ५०० नागरिकांना पुरातून बाहेर काढण्याचे काम सलग चार दिवस तीनशे फेऱ्यातून केले.

शिवाय रात्र झाली तरी हा माणूस आपल्या पुराच्या पाण्यातील घराच्या वर झोपत होता व त्याचा पुतण्या विजय मदने हा वेगवेगळ्या इमारतीवरून त्यांच्यापर्यंत येऊन अन्नपाणी पोहोचवत होता. असा हा निस्वार्थी माणूस आपल्याला कुठे शोधून ही सापडेल का? आज जेव्हा आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडच्या राज्य पदाधिकाऱ्यांनी त्याची भेट घेतली तेव्हा या माणसाने अक्षरशः आम्हाला सुद्धा पुराच्या पाण्यातून काहिलीत बसवून ज्या ठिकाणाहून माणसं बाहेर काढली तो भाग फिरून दाखवला. या माणसाचं एवढं मोठं काम असूनही प्रशासनाने अथवा कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यांने मात्र त्याची साधी दखल सुद्धा घेतली नाही.

रामदास मदने म्हणतात की, फक्त कुंडल पोलिस स्टेशनच्या फौजदार मॅडम आपल्या चार पोलिसांसह याठिकाणी आल्या. ते सर्वजण माझ्या काहिलीत बसले व जवळच्या माळीवस्तीवर आम्ही जाऊन तेथील लोकांना पाणी वाढायला लागले आहे, लवकर बाहेर पडा एवढेच मॅडमनी आवाहन केले. परत त्यांना काठाजवळ सोडले.  तेव्हा जाताना त्या फक्त म्हणाल्या की, बाबा तुम्ही छान काम करता.  या पलिकडे मला कोणत्याही प्रकारची शाब्बासकीची थाप अथवा कोणतीही मदत मिळाली नाही. अशा एका पूरबाधित माणसाच्या कुटुंबाला आणि आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून सतत चार दिवस आपल्या छोट्याशा कायलीतून पुराच्या पाण्यातून तीनशे फेऱ्या मारत पाचशेपेक्षा जास्त नागरिकांना बाहेर काढणाऱ्या माणसाला खऱ्या अर्थाने मदत करणं, पूरग्रस्त म्हणून त्याला जे देता येईल ते देणे हे समाजाचे आद्य कर्तव्य ठरते. या क्षेत्रातील प्रत्येक संवेदनशील माणसाने बजवायला हवे तरच अशा व्यक्ती समाजाला किमान माहित तरी होतील. रामदास उमाजी मदने या अवलियाच्या कार्याला आमचा लाख लाख सलाम...

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

http://pudhari.news/news/Sangli/Sangli-The-true-hero-of-flood-victims-/m/

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_