twitter
rss

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग -*  5️⃣3️⃣7️⃣

*लिहावे नेटके*

_वाचनापासून  लेखनापर्यंतच्या  प्रवासाविषयीचे काही अनुभव सांगणारा "लिहावे नेटके" डॉ.वसंतराव काळपांडे यांचा 'सोहन' या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला लेख._

*📝लिहावे नेटके*
-
१९५६मध्ये मी पहिलीत गेलो. मला शाळेत जायच्या आधीपासूनच वाचायला  खूप आवडायचे. जे जे मिळेल ते मी अधाशासारखे वाचून काढत असे.   त्या काळात किराणा माल रद्दीत घेतलेल्या वर्तमानपत्रांच्या कागदांच्या पुड्यांतून मिळायचा. घरी आल्यानंतर वर्तमानपत्राचे तुकडेसुद्धा मी वाचत असे. चांदोबामधील विक्रम आणि वेताळ, काशाचा किल्ला, अशा अद्भुतरम्य कथांनी मुलांना त्या काळात वेडच लावले होते. याशिवाय अंगठ्याएवढा राजपुत्र, जादूचे बूट, उडणारी सतरंजी, अशी छोटेखानी पुस्तकेसुद्धा मुलांची खूपच आवडती होती. पाठ्यपुस्तकांतील कविता वर्गात शिकवण्याबरोबरच चालींसह पाठ करून घेण्यावर त्या काळात शिक्षकांचा भर असायचा. त्यामुळेच आजही पहिलीपासून अकरावीपर्यंतच्या अनेक कविता माझ्या तोंडपाठ आहेत.

पहिली ते चौथीपर्यंत मी बुलढाणा जिल्हयातील खामगाव नगरपरिषदेच्या सहा नंबरच्या शाळेत शिकलो. सहा नंबरमध्ये भारंबे सर मुलांच्या अवांतर वाचनाबाबत खूपच आग्रही असायचे. पाचवी ते आठवी मी अमरावतीच्या ‘सायन्सकोअर’, तर पुढे अकरावीपर्यंत ‘कलानिकेतन’ या सरकारी शाळांमध्ये शिकलो. ‘सायन्सकोअर’मध्ये शिकत असताना आम्ही मधल्या सुटीत शाळेच्या वाचनालयात बसत असू. तेथे मुलांसाठी ‘मुलांचे मासिक’, ‘शालापत्रिका’, ‘कुमार’, ‘फुलबाग’, सृष्टिज्ञान, अशी अनेक मासिके ठेवलेली असायची. वर्गवाचनालयाचीही सोय होती. गो. नी. दांडेकर, भा. रा. भागवत, नाथमाधव, हे त्यावेळचे माझे आवडते लेखक. अनेक इंग्रजी पुस्तकांची मराठी भाषांतरेही मी त्या काळात वाचली.

कलानिकेतनमध्ये भैयासाहेब निंबेकर आम्हाला शारीरिक शिक्षण शिकवायचे. त्यांच्याकडे ग्रंथालयाचाही कार्यभार होता. त्यांनी मला कोणतीही पुस्तके घरी न्यायची परवानगी दिली होती. या काळात मी एका लेखकाची पुस्तके वाचायला सुरवात केली की, त्याची सर्व पुस्तके वाचून काढत असे. त्यामुळे त्या लेखकाची लेखनशैली चांगली कळायची. मुन्शी प्रेमचंद, रामधारी सिंह ‘दिनकर’, मैथिली शरण गुप्त, सूर्यकांत त्रिपाठी ‘निराला’, सुभद्रा कुमारी चौहान हे हिंदीचे माझे आवडते लेखक आणि कवी होते. विदर्भात त्याकाळात हिंदी-मराठी सरमिसळ मोठ्या प्रमाणात असायची. अनेक मराठी गोष्टींमध्ये पात्रांच्या तोंडी हिंदी संवाद असायचे. या सर्व गोष्टींबद्दल कोणाचाही आक्षेप नसायचा; मराठीवर हिंदीचे आक्रमण झाले अशी तक्रार नसायची. रहस्यकथा लेखक बाबुराव अर्नाळकर यांचा माझ्या पिढीची वाचनाची आवड घडवण्यात मोठा वाटा होता. त्यांच्या रहस्यकथा मी याच काळात वाचायला लागलो. अर्थात बाबुराव अर्नाळकरांच्या कादंबऱ्या शाळेच्या ग्रंथालयात मिळायच्या नाहीत. अनेकांना घरीसुद्धा त्या पालकांची नजर चुकवून, चोरूनच वाचाव्या लागायच्या. त्यांच्या धनंजय आणि छोटू, झुंजार आणि काळा पहाड या पात्रांनी हायस्कूल आणि कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या मनांचा कब्जाच घेतला होता. याच काळात शाळेच्या ग्रंथालयात असलेली विज्ञान आणि गणितावरची अनेक इंग्रजी आणि मराठी पुस्तके मी वाचून काढली. अनेक शास्त्रज्ञ आणि गणितज्ञ यांच्या जीवनावरील पुस्तके मी याच काळात वाचली. आकाशनिरीक्षणावरील पुस्तके, वेगवेगळ्या नक्षत्रांवरील भारतीय आणि ग्रीक पुराणकथा वाचल्या. भास्कराचार्यांच्या “लीलावती” या ग्रंथाचा मराठी अनुवाद आमच्या शाळेच्या ग्रंथालयात होता. त्यातील प्रश्न सोडवताना खूप मजा वाटायची. “लीलावती”वरून त्या काळातील सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थितीची बऱ्यापैकी कल्पना यायची. मी कोणती पुस्तके वाचावी यांवर शाळेत किंवा घरी कोणतेही बंधन नव्हते. चांगले संस्कार व्हावेत यासाठी दर्जेदार पुस्तकेच वाच, असा आग्रह नव्हता. चांगल्या साहित्याबरोबरच सुमार दर्जाचेही साहित्य मी वाचले. तरीही चांगल्या आणि वाईट साहित्यांतील फरक कळण्यात मला कोणतीच अडचण आली नाही.
*                *                      *
सायन्सकोअरमध्ये कमलताई डांगे आणि कमलताई देशपांडे या दोन शिक्षिका शाळेच्या हस्तलिखिताच्या संपादनात माझी मदत घ्यायच्या. त्यांच्या प्रोत्साहनामुळे मी काही कथा आणि कविता लिहिल्याही. पण ललितलेखन हा माझा पिंड नाही, हे लवकरच माझ्या लक्षात आले. माझे वाचन भरपूर असले तरी मला पल्लेदार, अलंकारिक भाषेत लिहिणे मला कधी जमायचे नाही. मी बरेचदा मला चांगल्या वाटणाऱ्या लेखकांच्या लेखनशैलीचे अनुकरण करत असे. राम दारव्हेकर सर आम्हांला मराठी शिकवायचे. सुप्रसिद्ध नाटककार पुरुषोत्तम दारव्हेकर यांचे ते लहान भाऊ. एकदा त्यांनी आम्हांला ‘उन्हाळ्याची सुट्टी’ या विषयावर विनोदी निबंध लिहायला सांगितला होता. माझा निबंध वाचल्यानंतर ते म्हणाले होते, “ निबंध छान झाला; पण आपण श्रीपाद कृष्ण कोल्हटकर नाही; वसंत काळपांडे आहोत हे लक्षात ठेवावं.” दारव्हेकर सरांचा विद्यार्थ्यांनी स्वत:च्या भाषेत, स्वत:च्या शैलीत लिहिण्यावर भर असायचा. लिखाणात आपण स्वत: दिसायला पाहिजे त्यासाठी स्वत:ची शैली शोधायला हवी असे ते म्हणायचे.

मला माझ्या भाषाशैलीचा शोध लागला तो सरदेशमुख सरांमुळे. ते आम्हाला भौतिकशास्त्र शिकवायचे. साध्या, सरळ, कमीतकमी शब्दांचा वापर असणाऱ्या, ओघवत्या, अनलंकृत आणि आपल्याला जे काही सांगायचे त्याचे स्पष्ट चित्र डोळ्यांपुढे उभे करणाऱ्या भाषाशैलीवर त्यांचा भर होता. पुस्तकातला मजकूर पाठ करून जसाच्या तसा लिहिण्याऐवजी तो स्वत:च्या भाषेत लिहावा आणि भाषेच्या आणि अचूकतेच्या दृष्टीने नऊ वेळा तरी तपासावा अशी त्यांची शिकवण असायची. एखादा विद्यार्थी पुस्तकातील बोजड वाक्ये जशीच्या तशी वापरू लागला तर ते म्हणायचे, “ध्वनी होतो, पण अर्थबोध होत नाही.” सरदेशमुख सर आणि दारव्हेकर सर यांच्यामुळे माझी भाषा घडली. शाळेत असतानाच इंग्रजी पुस्तकांत वाचलेल्या माहितीच्या आधारे मी लिहिलेले विज्ञानावरचे काही लेख ‘अमृत’, ‘श्रीयुत’ आणि ‘नवनीत’ या मराठी डायजेस्टमध्ये छापून यायला लागले होते. महाविद्यालयाच्या वार्षिकात मी पुंज सिद्धांता(Quantum Theory)वर, तसेच मॅक्स प्लँक आणि अर्नेस्ट रुदरफोर्ड या शास्त्रज्ञांच्या जीवनांवर मराठीत लेखही लिहिले होते
*                *                      *
पण त्यानंतर वेगळे अनुभव आले. १९७२ मध्ये एम. एससी. झाल्यानंतर मी एक वर्षाच्या प्रशिक्षणानंतर अहमदनगरला १९७३ मध्ये जिल्हा शिक्षणाधिकारी म्हणून रुजू झालो. १९६४ चा महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६५ पासून लागू झाला असला तरी १९७८ पर्यंत सरकारी पत्रव्यवहार आणि बैठकांमध्ये वापरली जाणारी भाषा प्रामुख्याने इंग्रजी असायची. १९७८ नंतर वसंतदादा पाटील आणि शरद पवार हे मुख्यमंत्री असताना सरकारी कामकाजात मराठीचा वापर खूपच वाढला. त्यानंतरच्या काळात मी काही अहवाल मराठीतून लिहिले. “अहवाल अभ्यासपूर्ण आहे, पण भाषा बोलल्यासारखी वाटते. लेखनात  ‘प्रगल्भ’,  ‘डौलदार’ भाषा असावी लागते.” असे शिक्षण विभागातील अनेक ज्येष्ठ अधिकारी किंवा माझे काही सहकारी मला सांगायचे. अशा वर्णनाची भाषा कशी असते ते मला माहीत होते; पण ती वापरण्याचे कौशल्य मात्र माझ्याकडे नव्हते आणि आजही नाही. अशा अभिप्रायांमुळे माझ्यात काही प्रमाणात का होईना पण न्यूनगंड निर्माण व्हायचा.
*                *                      *
१९८०-८१ मध्ये मी कोल्हापूर विभागाचा शिक्षण उपसंचालक असताना माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचा-यांचा, म्हणजे लिपिक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहायक आणि शिपाई यांचा कार्यभार अजमावून आकृतिबंध ठरवण्यासाठी महाराष्ट्राचे तत्कालीन शिक्षण संचालक वि. वि. चिपळूणकर यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र शासनाने एक समिती नेमली होती. मी या समितीचा सदस्य-सचिव होतो. व्यवस्थापन शास्त्रातील कार्यमापन तंत्राचा शास्त्रशुद्ध वापर करून आम्ही निकष ठरवले होते. सगळा अहवाल मीच मराठीत लिहिला. तो चिपळूणकर सरांना दाखवला. सर म्हणाले, “एवढ्या रुक्ष वाटणाऱ्या विषयावर इतका शास्त्रशुद्ध आणि ओघवत्या शैलीतला अहवाल मी पहिल्यांदाच वाचतो आहे.”

“सर, हा अहवाल भाषेच्या दृष्टीनी कोणाला दाखवायचा काय?” मी विचारले. “कशाला?” ते म्हणाले. “भाषा आणखी डौलदार होऊ शकेल.” मी उत्तरलो. ते हसले आणि त्यांनी मला एक गोष्ट सांगितली.

प्रख्यात गायक कै. पंडित वसंतराव देशपांडे यांचे अनेक गुरू होते. एका गुरुंकडून शिक्षण संपवून निरोप घेऊन ते निघताना म्हणाले, “मला तुम्ही तुमच्याकडचं सगळं ज्ञान तुम्ही मला दिलं.” “सगळं नाही दिलं. एक गोष्ट अजून नाही सांगितली. कसं गायचं याचं माझ्याकडे असलेलं खरं गुपित मी तुला अजून सांगितलं नाही.” गुरुजी म्हणाले. पंडितजी आश्चर्याने पाहत राहिले. त्यांचे गुरुजी म्हणाले, “तू जसा बोलतोस तसाच गा. हेच ते गुपित.”

चिपळूणकर सर म्हणाले, “आपल्या सर्वच कामांत अशीच सहजता असली पाहिजे. आपलं लिखाणही तसंच असावं. तुम्ही लिहिलेल्या अहवालात यत्किंचितही बदल करण्याची आवश्यकता नाही. असंच लिहीत जा.” ज्यांच्या कामाबरोबरच, ज्यांच्या भाषणांमुळे आणि लेखनामुळे ज्यांची संपूर्ण महाराष्ट्रात ओळख होती आणि आजही आहे त्या चिपळूणकर सरांचे हे प्रमाणपत्र मिळताच माझा न्यूनगंड कुठल्याकुठे पळून गेला.

त्यानंतर १९८२ ते १९८५ ही चार वर्षे मी दिल्लीच्या राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन या संस्थेत काम केले. महाराष्ट्रात परत आल्यानंतर शैक्षणिक धोरणावर आणि शैक्षणिक प्रशासनावर मराठीत अनेक लेख लिहिले. १९९२मध्ये ‘शालेय प्रशासन आणि मानवी संबंध’ हे माझे पहिले मराठी पुस्तक प्रकाशित झाले. मी लिहिलेली त्यापूर्वीची पुस्तके इंग्रजीत होती. या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा वाङ्मय पुरस्कार मिळाला.
*                *                      *
आजही लिहीत असताना
“जसे बोलतोस, तसेच लिही.”
“लिखाणात आपण स्वत: दिसायला पाहिजे.”
“ध्वनी होतो, पण अर्थबोध होत नाही.”
“लिहिलेला मजकूर नऊ वेळा तरी तपासावा.”
ही चिपळूणकर सर, दारव्हेकर सर आणि सरदेशमुख सर यांची वाक्ये माझ्या कानांत घुमत असतात.

- डॉ. वसंत काळपांडे

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -*  
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

यापूर्वीच्या प्रेरणादायी पोस्ट वाचण्यासाठी आमच्या
https://guruvarykm.blogspot.com/?m=1
या ब्लॉगला भेट द्या.