twitter
rss

*प्रज्ञान बग्गी....🖋️दीपक माळी ©*

_ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून तिचा विश्वातील कोणत्याही मानवी अथवा अमानवी जीवाशी कसलाही संबंध नाही, असा संबंध आढळल्यास तो योगायोग समजावा._

           *प्रज्ञान बग्गी*

🖋️ *दीपक माळी ,*📲९६६५५१६५७२.

*संपूर्ण कथा*

सभोवताली पसरलेल्या धुळीच्या  साम्राज्याखालील चांद्रराज्यात मोठा जल्लोष सुरु होता. चांद्रराज्याचा राजपुत्र आपल्या विजयाचे प्रतीक असणाऱ्या प्रज्ञान बग्गीत उभा राहून सर्वांना अभिवादन करीत होता. सर्व चांद्रवासी आपल्या राजपुत्राचे आणि त्याच्या साथीदारांचे कौतुक करीत होते.त्यांच्या विजयाच्या घोषणा देत होते. जल्लोषाचे कारणही तसेच होते,पृथ्वीवासियांनी चंद्रावर केलेला हल्ला राजपुत्राने यशस्वीे परतवून लावला होता इतकेच नाही तर विक्रम लँडरच्या आतून प्रज्ञान बग्गी सुरक्षित बाहेर काढून आपल्या ताब्यात घेतली होती. याच प्रज्ञान बग्गीला त्यांच्या पृथ्वीवासीयांवरील विजयाचे प्रतीक म्हणून ते जतन करणार होते....

या गोष्टीला सुरुवात होते फार वर्षांपूर्वी.... प्रत्यक्षात दिसणाऱ्या धुळीच्या विशाल सागराखाली चांद्रराज्य पसरले होते.या धुळीमुळे त्यांचे परग्रहवासियांपासून संरक्षण होत राहिले होते. या चांद्रवासियांना परग्रवासियांविषयी फार कुतुहल होते.विशेषत: नीलग्रहाविषयी फार आकर्षण होते. धुळीच्या आवरणाच्यावर येऊन पाहिले की हा निळा गोळा दिसायचा ,हा इतका मोठा गोळा आकाशात कसा ? असा प्रश्न सर्वांना पडायचा.राजमातेसह चांद्रराज्यातील सर्व महिला या गोळ्याला आपली माता मानायच्या.त्याची पूजाअर्चा करायच्या.काहीजन म्हणायचे या ग्रहावर मोठे राक्षस राहतात ,ते आपल्यापेक्षा आकाराने खूप खूप मोठे आहेत. हळूहळू त्यांनी या ग्रहाविषयी संशोधन सुरु केले ,त्यावेळी त्यांना या निळ्या ग्रहाविषयी अधिक माहिती समजू लागली.
      या ग्रहाला पृथ्वी असे म्हणतात, तिथले रहिवासी स्वत:ला मानव समजतात.आपल्या ग्रहाची निर्मिती त्यांच्या ग्रहापासून झाली आहे असा त्यांचा समज आहे ते आपल्याला त्यांचा उपग्रह मानतात.त्यांच्याकडे एक दिवस उपवास असतो त्यादिवशी ते आपले दर्शन घेऊन उपवास सोडतात. या ग्रहावर एक विशिष्ट वायू आहे त्यावायूशिवाय हे जगूच शकत नाहीत ,तरीही ते मोठीमोठी स्वप्ने पाहतात. जिथे हा वायू नाही अशा ठिकाणी जाण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.ते आपआपसात फार भांडतात.त्यांचे एक राज्य नसून त्यांनी आपापली राज्ये वाटून घेतली आहेत,या राज्यांत फार स्पर्धा आहे.या स्पर्धेतून ते एकमेकांर हल्ला करतात.तुंबळ लढाई करतात,परस्परांचा जीव घेतात. या ग्रहावर झाडे आहेत ती सजीव असली तरी हालचाल करीत नाहीत .ही झाडेच त्या मानवांना त्यांना आवश्यक असणारा प्राणवायू देतात. पण स्वत:ला मानव समजणारे हे जीव त्या झाडांची कत्तल करतात . पृथ्वीवर अगणित सजीव आहेत पण मानवाने आपल्या बुद्धींच्या जोरावर सर्व जीवांना आपले गुलाम बनवले आहे. हा मानव आपल्यापेक्षा आकाराने दहापट मोठा आहे. त्याची ताकद जरी जास्त असली तरी प्राणवायू हा त्याचा कमजोरी आहे, आपल्या चांद्रग्रहावर हा वायू नसल्याने तो येथे येण्याचा कधीच प्रयत्न करणार नाही,अशी समस्त चांद्रवासियांची खात्री झाली होती.
.................................................

धुळीच्या आवरणाखाली असलेल्या चांद्रराज्यातील प्रजा निर्धास्त होती.पण अखेर ती भितीदायक बातमी समजली. ''आपल्या ग्रहाभोवती एक वस्तू भ्रमण करीत आहे ,ती नित्य नेमाने विशिष्ट गतीत आपल्या ग्रहाभोवती फिरत आहे'',आवरणाच्यावर असणाऱ्या रक्षकांकडून ही बातमी चांद्रराज्यात पोहचली. राजाने लगेच सभा बोलावली ,सभेमध्ये आपल्याभोवती फिरणारी वस्तू काय आहे? कोणी पाठवली आहे ?यापासून आपणांस काय धोका आहे का ? यावर विचारविनिमय झाला . शेवटी चर्चा होऊन या प्रश्नाचे निराकरण्यासाठी एक संस्था स्थापन करण्याचे ठरले .या संस्थेचे नाव 'चांदसा'असेल ,या संस्थेमध्ये ठराविक निवडक सैनिक असतील ते अवकाश संशोधन करतील तसेच अवकाशातील शत्रूंपासून आपले संरक्षण करतील. परग्रहावरील वस्तूं पासून धोका असल्यास त्यापासून आपला बचाव करण्यासाठी,प्रसंगी युद्ध करावे लागले तर शत्रूसोबत युद्धही करण्यासाठी तयार असतील. या 'चांदसा ' संस्थे विषयीचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार राजपुत्र चंद्रसेन यास देण्यात आले.

चांदसा'चे काम राजपुत्राच्या मार्गदर्शनाखाली सुरु झाले.एवढ्यात काही दिवसांतच एक विचित्र घटना घडली .'चांदसा'चे एजंट धुळीच्या आवरणाच्यावर गस्त घालत असताना त्यांना एक मोठी वस्तू जमिनीवर येताना दिसली ,ती अलगद धुळीच्या आवरणावर स्थिरावली ,त्यातून दोन मोठे मानव बाहेर आले, ते त्यांच्यापेक्षा किमान दहापट मोठे होते,त्यांनी डोक्यावर विशाल आवरण घातले होते,पाठीवर मोठ्या टाक्या बांधलेल्या होत्या. या हिंस्त्र प्राण्यापुढे आपला टिकाव लागणार नाही ,आपण त्यांच्या पावलाखाली चिरढून जाऊ हे सैनिकांनी ओळखून तात्काळ राजपुत्राला संदेश पाठवला. इकडे हे महाकाय मानव मातीतील दगड गोळा करु लागले ,एकाने एक उंच झेंड्यासारखी काठी मातीत रोवली ,तेवढ्यात त्यांना काहीतरी सुचना मिळाली ते पुन्हा त्या मोठ्या वस्तूत जाऊन बसले, इकडे राजपुत्र आपल्या सैन्यासह त्या ठिकाणाजवळ आला ,त्याचवेळी ती वस्तू आकाशात झेपावली .राजपुत्राच्या समोर आकाशात उंच गेली आणि दिसेनासी झाली. राजपुत्र त्या धुळीत रोवलेल्या झेंड्याकडे पाहतचं राहिला.

......................................................

    आपल्या भूमीवरील परग्रहवासियांचे हे निशाण पाहून राजपुत्राला भयंकर राग आला,या घटनेचा बदला घ्यायचाचा असा त्याने निश्चय केला. चांदसा'चे संशोधक या घटनेचे संशोधन करु लागले.त्यांनी त्या मानवांच्या पावलांच्या ठशांचे आणि झेड्यांचे निरीक्षण केले .त्यावरुन ते या निर्णयाप्रत ते आले की हे कृत्य पृथ्वीवरील मानवाचेच असून त्यांनी एकप्रकारे आपल्यावर आक्रमण केले आहे.
  आता हे जर राक्षस आपल्या ग्रहावर आले तर आपले काही खरे नाही, आता फक्त दोघे आले होते ,नंतर शेकड्याने येतील आपली भूमीही वाटून घेतील.येथेही तोच हैदोस मांडतील .यांच्या आगमनाने आपले अस्तित्वच संपून जाईल ,अशी शंका सर्वांना वाटू लागली हे जर टाळायचे असेल तर त्यांचे आक्रमण थोपवावे लागेल.यासाठी आपल्याला गप्प बसून चालणार नाही,त्यांच्याशी सामना करणारी शस्त्रात्रे निर्माण करावयास हवीत.प्रसंगी आपणांसही पृथ्वीवर जावावे लागेल.त्यासाठी पृथ्वीवर जाऊन परत येणारे 'पृथ्वीयान' तयार करावे लागेल.
    राजपुत्राच्या आदेशाने चांदसा'मध्ये पृथ्वीयाना'ची निर्मिती करावयास सुरुवात झाली.पृथ्वीवासियांच्या लक्षात न येणारे,पृथ्वीवरील सर्व रडारयंत्रणांना चुकवून चांद्रभूमीवर सुरक्षित परत येणाऱ्या पृथ्वीयाना'ची निर्मिती करण्यासाठी चांदसा'चे शास्त्रज्ञ दिवसरात्र राबू लागले. शेवटी एका तबकडीचा आकार असणारे, एकाच वेळी दोन चांद्रवासियांना घेऊन जाणारे आणि प्रचंढ वेग असणारे पृथ्वीयान तयार करण्यात चांदसा'चे संशोधक यशस्वी झाले.       
   आता पृथ्वीवर स्वारी करण्याची आपली वेळ होती.आजपर्यंत कथेतून ऐकलेला निळा ग्रह चांद्रवासियांना प्रत्यक्ष अनुभवता येणार होता.शेवटी दिवस ठरला,वेळ ठरली, राजपुत्राने आपल्या सुरक्षा दलातील दोन वीरांची या कामगिरीसाठी निवड केली. धुळीच्या आवरणाच्यावर असलेल्या चांदसा'च्या प्रक्षेपककेंद्रातून पृथ्वीयाना'चे प्रक्षेपण होणार होते. या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी चांद्रराज्याचा राजा स्वत: उपस्थित होता. राजपुत्राने इशारा करताच काऊंटडाऊन सुरु झाले...10,9,8,7,5,4,3,2,1 झूम्.... प्रचंढ वेगाने गरगर फिरत ,तबकडीच्या आकाराच्या पृथ्वीयाना'ने अवकाशात झेप घेतली , काही क्षणातच ते दिसेनासे झाले. इकडे कंट्रोेलरुममधील मॉनिटर वर अचूक दिशेने मार्गक्रमण करणारे पृथ्वीयान दिसत होते ,चांद्रभूमीला दोन प्रदक्षिणा मारुन ते पृथ्वीच्या दिशेने आक्रमण करु लागले , काही क्षणात ते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत प्रवेश करणार होते ,हिच वेळ फार महत्वाची होती ,थोडी जर चूक झाली तर .. आगीच्या ठिणग्यातच रुपांतर होणार.. पण सर्व काही ठरल्याप्रमाणे घडले आणि आईच्या कुशीत शिरणाऱ्या बालकाप्रमाणे पृथ्वीयानाने  पृथ्वीच्या कक्षेत अलगद प्रवेश केला.हळूहळू पृथ्वीवरील पक्ष्यांप्रमाणे ते मुक्त संचार करु लागले. सात खंड ,चार महासागर क्षणार्धात पार करुन हव्या त्या ठिकाणचे मातीचे अन् दगडाचे नमुने गोळा करुन पृथ्वीयान परतीच्या मार्गावर निघाले. काही वेळातच पुन्हा तबकडीने चंद्राच्या कक्षेत प्रवास केला.चांद्रभुमीला दोन प्रदक्षिणा मारुन सावकाश वेग कमी करीत ते अलगद चंद्राच्या पृष्ठभागावर येऊन विसावले .पृथ्वीयाना'च्या छोट्या गोलाकार कप्पीतून अवकाशवीर खाली उतरले. आपल्या या पराक्रमी वीरांचे  राजपुत्राने मिठी मारुन स्वागत केले .
     राजपुत्र त्यांना घेऊन चांदसा'च्या गुप्त कक्षात घेऊन गेला. अवकाशवीरांनी पृथ्वीचे वर्णन करायला सुरुवात केली.पृथ्वीची आजपर्यंत माहित नसलेली माहिती ते सांगू लागले.
पृथ्वीचा आकार,पृथ्वीवरील पाण्याचे प्रमाण,अवाढव्य आकाराची माणसे,त्यांची वेगवेगळी राज्ये,विविध प्राणी ,वनस्पती,मानवामधील विषमता, मानवाने केलेला विध्वंस,प्रदूषण,निसर्गाची हानी, इतर प्राण्यांचा करीत असलेले छळ या सर्वांचे वस्तुनिष्ठ वर्णन अवकाशवीरांनी केले.

.......................................................

     राजपुत्र चंद्रसेन विचार करु लागला, ''आपण या पृथ्वीवासियांपेक्षा प्रगत की मागास आहोत ? भले आपला ग्रह लहान आहे, पण आपले एकसंघ एकच राज्य आहे, अनेक राज्यांत विखुरलेले हे मानव आपला मुकाबला कधीच करु शकत नाहीत, तरीही आपणांस गप्प बसून चालणार नाही ते कधीही चांद्रभुमीवर आक्रमण करु शकतात. त्यांच्या प्रत्येक योजनेची आपल्याला पूर्वकल्पना यायला हवी यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत.पृथ्वीवरील जी राज्ये चांद्रभुमीवर आक्रमण करु शकतात त्यांच्यावर कायम लक्ष ठेवायला हवे, त्यासाठी आपले 'पृथ्वीयान' सदैव पृथ्वीभोवती फिरत रहायला हवे.''
 
   राजपुत्राने सर्व संशोधकांना 'चांदसा'त बोलावले . ''पृथ्वीवर २४ तास आपली नजर राहाण्यासाठी आपल्या 'पृथ्वीयानां'ची संख्या वाढविणे आवश्यक आहे. आपला ग्रह पृथ्वीपेक्षा लहान आहे ,आपण मानवापेक्षा लहान आहोत,आपले पृथ्वीयान'ही लहानच असायला हवे, पृथ्वीवरील मानवाने चुकून पाहिले तरी 'उडती तबकडी ' दिसली की काय ? असा त्याला भास व्हायला हवा.
इतके करुनही जर पृथ्वीवरुन मानवाने आक्रमण केले तर त्यांचा प्रतिकार करण्यासाठी आपणांस क्षेपणास्त्रांची निर्मिती करायला हवी.'' अशा सुचना राजपुत्राने दिल्या.
    लवकरच संशोधकांनी आणखी काही पृथ्वीयानां'ची निर्मिती केली. ती पृथ्वीयाने पृथ्वीभोवती २४ तास भ्रमण करु लागली,त्यांनी पृथ्वीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींचा वृत्तांत क्षणात पाठविणे सुरु केले.तसेच हवेत ५० कि.मी.पर्यंत मारा करुन शत्रूचे लक्ष्य अचूक टिपणारे क्षेपणास्त्र संशोधकांनी निर्माण केले.त्यामुळे चंद्रावर येणाऱ्या कोणत्याही वस्तूला आता चांद्रभुमीवर उतरणे अशक्यप्राय झाले.

...........................................................   

      काही दिवसांनी पृथ्वीयानाद्वारे गुप्तखबर मिळाली की पृथ्वीवरील इस्त्रायल राज्य चांद्रभुमीवर  चांद्रयान पाठवणार आहे , इस्त्रायल हे पृथ्वीवरील प्रगत राज्य आहे तेथील लोकांनी सर्व क्षेत्रात प्रगती केली असून त्यांना आता चंद्रावर यान पाठवून  चांद्रभुमीवर आपला झेंडा रोवायचा आहे. त्यासाठी त्यांचे शास्त्रज्ञ दिवसरात्र राबत आहेत.
राजपुत्र चंद्रसेन ही बातमी ऐकून घाबरला नाही त्याने धैर्याने या संकटाला सामोरे जायचे ठरविले.
राजपुत्राने तात्काळ राजाला ही खबर दिली ,चांद्रराज्यातील सर्व लोकांना धुळीच्या आवरणाखाली राहण्याची सक्ती केली.सैनिक आणि चांदसा'चे एजंट फक्त धुळीच्या आवरणाच्यावर जाऊ शकतील . अशी सक्त सुचना राजपुत्राने दिली. सर्वांना आपल्या राजपुत्राच्या कर्तृत्वावर विश्वास होता पण थोडी भिती वाटत होतीच. शेवटी मुकाबला मानवाशी होता....
   चंद्रसेेन सतत आपल्या पृथ्वीवरील पृथ्वीयानांच्या संपर्कात राहून माहिती घेत होता .
इस्त्रायलचे चांद्रयान लवकर चांद्रभुमी येणार होते , विशेष म्हणजे ते त्या भागावर उतरणार होते जेथे मानवाने आपले पहिले पाऊल ठेवले होते.राजपुत्राने आपल्या सर्व सैनिकांना आपली योजना सांगितली.त्यांना योग्य त्या सुचना दिल्या.चांदसा'मधील मॉनिटर'वर यानाची दिशा आणि वेग अचूक दिसत होता .त्याच्या आधारे क्षेपणास्त्रे रोखून धरण्यात आली होती. एक क्षेपणास्त्र असफल झाले तर त्याला पर्यायी दुसरी क्षेपणास्त्रे सज्ज ठेवली होतीे.
आता इस्त्रायलचे यान चंद्राच्या कक्षेत प्रवेश करुन वेग कमी करीत चांद्रभुमीच्या दिशेने हळू हळू मार्गक्रमण करु लागले होते. राजपुत्र मॉनिटर'वर स्वत:लक्ष ठेवून होता . इस्त्रायली चांद्रयान योग्य टप्प्यात येताच राजपुत्राने इशारा केला . राजपुत्राचा इशारा होताच क्षेपणास्राने यानाच्या दिशेने झेप घेतली.काही क्षणातच क्षेपणास्त्राने यानाचा अचूक वेध घेतला . इस्त्रायलचे चांद्रयान आपली दिशा आणि वेग गमावून चांद्रभुमीवर कोसळले. या  यानासोबतच मानवी स्वप्नांचाही चक्काचूर झाला. संपूर्ण विश्वावर निर्विवाद वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या मानवी महत्वकांक्षांना पहिला धक्का बसला होता . चांद्रभुमीवर कोसळलेल्या यानाचा चांद्रराज्याच्या सैनिकांनी लगेच ताबा घेतला .त्यामध्ये कोणी मानव नसल्याची खात्री करुन जल्लोषाला सुरुवात झाली.राजपुत्राने आज आपला बदला पूर्ण केला होता .''आपल्या भूमीवर येणाऱ्या प्रत्येक पृथ्वीवासियांचे असेच स्वागत केले जाईल'' ,अशी घोषणा राजपुत्राने केली.ही आनंदाची बातमी संपूर्ण चांद्रराज्यात पसरली.
...................................................................................
  
चांद्रवासी लोकांचा हा आनंद क्षणभुंगर ठरला, राजपुत्राला आणि त्याच्या सहकाऱ्यांना विजयोत्सव साजरा करायची संधीही मिळाली नाही.योद्ध्यांच्या नशिबी उत्सव नसतोच मुळी, त्यांच्या नशिबी असतं फक्त लढणं आणि लढणं....!
  

      बातमीचं अशी महत्वाची होती, पृथ्वीवरील भारत राज्य आपले चांद्रयान चांद्रभुमीवर पाठवण्याच्या तयारीत होते. इस्त्रायलच्या यानाचा अपघात झाला असे समजून भारतीयांनी हा निर्णय काही कालावधी स्थगित केला, पुन्हा सर्व शक्यतांची पडताळणी करुन लवकरच ते शक्तिशाली चांद्रयान सोडणार आहेत. भारताचे चांद्रयान हे संपूर्ण चांद्रवासियांसाठी मोठा धक्काच होता.चांद्रराज्याच्या राजाने राजपुत्र,सर्व मंत्री ,सैनिक प्रतिनिधी,चांदसा'चे तज्ञ संशोधक यांची तात्काळ सभा बोलावली.

    '' भारत .... पृथ्वीपासून थोड्या अंतरावरुन पृथ्वीकडे पाहिले असता मानवाच्या आकाराचे दिसणारे राज्य म्हणजे भारत होय.या भारताचा राजा,प्रधान आणि मंत्री लोकांच्यातून निवडले असतात ,पण येथे राजापेक्षा प्रधानाला अधिक महत्त्व असते. त्याच्याच हातात राज्याची खरी सत्ता असते. सध्या येथे एक महत्वाकांक्षी प्रधान सत्ता सांभाळत आहे. तीन बाजूंनी सागर ,उंच पर्वत ,मोठमोठ्या नद्या , डोंगर ,जंगले,वने,शेती,विविध पशुपक्षी यांनी नटलेले हे संपन्न राज्य म्हणजे पृथ्वीला पडलेले एक सुंदर स्वप्नचं आहे.

   येथील लोकांच्यातही विविधता आहे,ते विविध प्रकारचे पोशाख घालतात,अनेक भाषा बोलतात, खाणेपिणे ,रुढी परंपरा ,चालीरीती यांच्यात अनेक प्रकारची विविधता दिसून येते.येथे जेवढी विविधता आहे तितकीच विषमताही आहे, स्त्री-पुरुष, गरीब-श्रीमंत,शिक्षित-अशिक्षित,पुरोगामी- प्रतिगामी अशा अनेक मतभेदांनी येथील लोक विभागले गेले आहेत. असे असले तरी हेच लोक अतिशय पराक्रमी आणि कष्टाळू आहेत .जेंव्हा जेंव्हा राज्यावर संकट येते त्यावेळी सर्व मतभेद विसरुन सर्वजन एकत्र येतात आणि संकटाला सामोरे जातात .याच ताकदीवर त्यांनी त्यांच्या शत्रूराज्याचा सलग तीनवेळा पराभव केला आहे.या लोकांना पृथ्वीवरील महासत्ता बनायचे आहे. त्यासाठी ते सर्व क्षेत्रात संशोधन करुन प्रगतीपथावर जाण्याचा प्रयत्न करीत आहेत, मग अवकाश क्षेत्रात ते कसे मागे राहतील ?

   'इस्त्रो ' ही यांची अंतराळ संशोधन संस्था आहे, त्यांची स्पर्धा आपल्या चांद्रभुमीवर पहिले पाऊल ठेवणाऱ्या अमेरिकेच्या 'नासा' या संस्थेशी आहे, 'इस्त्रो' ने पृथ्वीभोवती भ्रमण करणारे अनेक उपग्रह अवकाशात सोडले आहेत ,सध्या ते इतर राज्यांचे उपग्रह अवकाशात सोडत आहेत. कांही दिवसांपूर्वी 'इस्त्रो'ने आपल्या पेक्षाही जास्त अंतरावर असणाऱ्या मंगळ ग्रहाभोवती भ्रमण करणारे मंगळयान सोडले आहे. लवकरच 'गगनयाना'तून मानवाला अवकाशात पाठवायचे यांचे ध्येय आहे. त्याचीच पूर्वतयारी म्हणून ते आपल्या चांद्रभुमीवर चांद्रयान सोडणार आहेत.'' चांदसा'चे प्रमुख मॉनिटरवर पृथ्वीगोल दाखवून सर्व माहिती सांगत होते.राजपुत्र ,राजा ,सैनिक आणि सर्व प्रतिनिधी कानात प्राण आणून सर्व माहिती ऐकत होते.
  
     '' भारतीय लोक जे चांद्रयान सोडणार आहेत त्याचे ऑर्बिटर ,विक्रम लँडर आणि प्रज्ञान बग्गी (रोव्हर) असे तीन भाग आहेत.यापैकी चांद्रयानाचा ऑर्बिटर हा आपल्या चांद्रभुमीभोवती भ्रमण करीत राहिल,तो चांद्रभुमीवर नजर ठेवून सुस्पष्ट छायाचित्रे काढून पृथ्वीवर पाठवू शकतो. तसेच विक्रम लँडर'वर लक्ष ठेवू शकतो. विक्रम लँडर चांद्रयानापासून अलग होऊन तो चंद्राच्या दिशेने झेपावेल. नंतर सावकाश वेग कमी होत त्याचे आपल्या चांद्रभुमीवर स्वाॅफ्ट लँडिंग होईल.विक्रम लँडरच्या आत प्रज्ञान बग्गी असून ती  लँडिंग झाल्यानंतर विक्रम लँडरच्या बाहेर येईल. प्रज्ञान बग्गीद्वारे आपल्या चांद्रभुमीच्या पृष्ठभागाचा अभ्यास केला जाणार आहे. चांद्रभुमीच्या भूरचनेचा, इथल्या खनिजांचा व बाह्य वातावरणाचा अभ्यास करणे हा चांद्रयान सोडण्यामागचा भारतीयांचा उद्देश आहे.
  जर आपण मागच्या युद्धाप्रमाणे योग्य टप्प्यावर क्षेपणास्त्राचा अचूक मारा केला तर हे भारतीय चांद्रयानही पाडू शकतो.'' चांदसा'च्या प्रमुखांनी सर्वांना योग्य मार्गदर्शन केले.
   
    राजपुत्राच्या मनात काही वेगळेच होते, त्याने सर्वांना सांगितले , ''हा विक्रम लँण्डर पाडायचा नाही,त्याचे नुकसान होता कामा नये,तो मला सुस्थितीत हवा आहे.''

   राजपुत्राचा हा निर्णय सर्वांना बुचकाळ्यात टाकणारा होता, राजपुत्राची काही तरी नवीन योजना असेल ,असे सर्वांना वाटले. राजपुत्र सभेमध्ये सर्वांच्या मधोमध उभा राहिला,त्याने आपला उजवा हात छातीवर घेतला, *'' मी चांद्रनगरीचा राजपुत्र चंद्रसेन सर्वांसमोर शपथ घेतो की, भारतीयांचे चांद्रयान ताब्यात घेऊन त्यांच्याच 'प्रज्ञान बग्गी'तून राजभवनात येईन,तरचं मी तुमचा राजपुत्र असेन ''* अशी राजपुत्राने भरसभेत प्रतिज्ञा केली आणि सभेची सांगता झाली.
   राजपुत्राच्या घोषणेमुळे सर्वांच्यात नवीन उत्साह आला. सर्वांनी भारतीय आक्रमणाचा सामना करायची मनाची तयारी केली. चांद्रराज्यातील सामान्य प्रजा मात्र थोडी काळजीत होती, पृथ्वीवासियांबरोबर वैर म्हणजे प्रत्यक्ष मृत्यूशीच गाठ होती. खुद्द राजमाताही महालात चिंतीत होती. ती अवकाशात दिसणाऱ्या पृथ्वीगोळ्या समोर वारंवार प्रार्थना करीत होती, ''हे पृथ्वीमाते,मी इतके दिवस तुझी प्रार्थना करते पण माझा पुत्र तुझ्याशीच युद्ध करणार आहे,तो अजुन अजाण आहे,त्याला माफ कर.त्यांच्या प्राणांचे रक्षण कर.''

.............................................................................

       चांदसा'च्या मुख्य कक्षात राजपुत्र जातीने स्वत: हजर होता, चांदसा'प्रमुख पृथ्वीयानांमार्फत मिळणारे पृथ्वीवरील सर्व अपडेटस् राजपुत्राला तात्काळ सांगत होते. भारताने चांद्रयानाचे प्रक्षेपण करण्याचा मुहुर्त बदल्याचे नेमके काय कारण असावे ? इस्त्रायली चांद्रयानाचा अपघात हेच कारण असावे की दुसरे काय असावे ? या बाबीवर सर्वजन विचार करीत होते.

   भारतावर लक्ष ठेवणाऱ्या पृथ्वीयानांकडून समजले की इस्त्रो'चे चांद्रयान हे चांद्रभुमीच्या दक्षिण ध्रुवाजवळील भागात उतरणार आहे . जेथे आजपर्यंत पृथ्वीवरील कोणतेच यान उतरले नव्हते किंवा चांद्रवासीसुद्धा जिकडे सहजासहजी फिरकत नाहीत त्या जागेची लँंडींगसाठी निवड केली होती.यावरुन दोन निष्कर्ष काढता येत होते, भारतीय संशोधकांना चांद्रवासियांच्या अस्तित्वाचा संशय आला असावा किंवा  अजूनपर्यंत चंद्राच्या ज्या भागाचे संशोधन झाले त्या भागाचा त्यांना अभ्यास करावयाचा असेल...कारण कोणतेही असले तरी तयारी जास्त करावी लागणार होती कारण चंद्राचा दक्षिणेकडील भाग हा चांद्रराज्यापासून दूर होता,तिकडे चांद्रवासीही लोकही नाहीत. चांदसा'ची सर्व तांत्रिक साधने आणि क्षेपणास्त्रे दक्षिणेकडे घेऊन जावावे लागणार होते. आव्हान मोठे होते,प्रसंग बाका होता पण आता डगमगून चालणार नव्हते,येणाऱ्या संकटाला धैर्याने सामोरे जायला हवे .राजपुत्र चंद्रसेन सर्वांना प्रोत्साहन देत होता.

    चांदसा'चे संशोधकांना माहित झाले होते की भारतीयांचे चांद्रयान हे अतिशय कमी बजेटचे आहे त्यामुळे ते येण्यासाठी जास्त कालावधी लागणार आहे .हिच चांद्रवासियांसाठी जमेची बाजू ठरणार होती.याच कालावधीत ते आपली सर्व तयारी पूर्ण करणार होते.

   राजपुत्राला आपल्या पहिल्या मोहिमेचा अनुभव होताच.सोबत अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे तो बाजीगर ठरणार होता पण गर्वात न जाता चंद्रसेनाने सुक्ष्म नियोजनाने कामाला सुरुवात केली.पुन्हा एकदा आपले चांद्रराज्य धुळीच्या आवरणाखाली ' लॉकडाऊन ' केले. आपल्या चांदसा' संस्थेचे मुख्यालय दक्षिणे ध्रुवाजवळ हलवले,सर्व तांत्रिक व्यवस्था हलवण्यात आली, आपले सैन्य दल दक्षिण भागावर सज्ज केले.

   इकडे भारतात पृथ्वीवरुन चांद्रयानाचे प्रक्षेपणा करण्याचा मुहुर्त नक्की झाला.इस्त्रो'चे प्रमुख पहाटे आपल्या देवाची प्रार्थना करुन प्रक्षेपक केंद्रात आले.तोपर्यंत काऊंटडाऊन सुरु झाले होते ...10,9,8,7,6,5,4,3,2,1 स्टार्ट...मोठा आवाज करीत भारतीय चांद्रयानाने नवीन इतिहास रचण्याच्या उद्देशाने अवकाशात झेप घेतली. योग्य उंचीवर गेल्यावर चांद्रयानाने आपल्या मातृग्रहाला प्रदक्षिणा मारुन चंद्राच्या पदस्पर्शासाठी ते मार्गस्थ झाले.या घटनेमुळे इस्त्रोच्या संशोधकांना यशाची पहिली वीट रचली गेल्याचा आनंद झाला होता तर 'प्रज्ञान बग्गी'ची आतुरता लागलेल्या चंद्रसेनास 'विक्रम' आता आपलाच असल्याची खात्री झाली होती.
.............................................................

   मजल दरमजल करीत भारतीय चांद्रयान चंद्राच्या कक्षेत दाखल झाले आणि आपल्या लक्ष्याभोवती भ्रमण करु लागले , राजपुत्र चंद्रसेनने चांदसा'मधील मॉनिटरवर दिसणाऱ्या चांद्रयानाचे स्वागत केले. आता ऑर्बिटर आणि विक्रम लॅण्डर यांना विभक्त होण्याची वेळ आली होती. चांद्रयानाचे ऑर्बिटर आणि विक्रम लॅण्डर हे दोन भाग हळूहळू वेगवेगळे झाले.ऑर्बिटर चंद्राभोवती भ्रमण करु लागले तर विक्रम लॅण्डर चंद्राच्या पृष्ठभागाकडे झेपावू लागले. भारताच्या इस्त्रो'मध्ये चांद्रयानाचा दुसरा टप्पा पार पडल्या आनंद साजरा झाला. तर चांदसा'मध्ये राजपुत्राला सावज आपल्या तावडीत येणार याचा आनंद होत होता.

   चांदराज्यात राजा आपल्या प्रजेला धीर देत होता ,येणाऱ्या कोणत्याही परीस्थितीला तोंड देण्यासाठी आपला राजपुत्र,आपले सैनिक आणि आपले शास्त्रज्ञ सक्षम आहेत याची सर्व प्रजेला जाणिव करुन देत होता.गुप्तचरांकडून मोहिमेविषयी माहिती घेत होता. प्रजेला योग्य त्या सुचना देत होता. राजमाता मात्र अजुनही तिच्या पृथ्वीमातेचा धावा करीतचं होती,पृथ्वीमाता आपल्या मुलाचे रक्षण करणार,असा तिला दृढ विश्वास होता.

   चांद्रवासियांसाठी पुढील टप्पा खडतर होता कारण आता त्यांच्या हालचालीवर ऑर्बिटरची नजर राहणार होती. चांदसा'चे शास्त्रज्ञही ऑर्बिटरच्या गतीवर लक्ष ठेवून होते.भारतीयांच्या ऑर्बिटरला आपली कोणतीही कृती दिसणार नाही याची राजपुत्र दक्षता घेत होता,जेव्हा ऑर्बिटर अवकाशात समोर येई तेव्हा सर्व सैनिक व सर्व साधने धुळीखाली लपवली जात आणि ऑर्बिटर पुढे निघून गेला की यांचे कार्य पुन्हा सुरु होई,असा नित्यक्रम ठरला होता.चिकाटी आणि सातत्य हेच आपल्याला यशस्वी बनवू शकतील हे राजपुत्र जाणून होता.

   सर्वात महत्वाचे म्हणजे विक्रम लॅण्डर जर सुस्थितीत हवा असेल तर त्याच्यावर योग्य अंतरावर असतानाच हल्ला करणे गरजेचे होते, जेणेकरुन विक्रम लॅण्डर आणि त्याच्या आतील प्रज्ञान बग्गीचे जास्त नुकसान होणार नाही. चांदसा'च्या शास्त्रज्ञांनी 'विक्रम लॅण्डर'चा वेग आणि चंद्राचे गुरुत्वाकर्षण यांचा अभ्यास करुन योग्य ठिकाण निश्चित केले .विक्रम लॅण्डर चांद्रभुमीपासून फक्त 2 कि.मी.अंतरावर असताना हल्ला करावयाचे निश्चित केले.
    आता प्रतिक्षा होती शिकाऱ्यांचीच शिकार करण्याची  ....
..................................................................

     पृथ्वीवरील भारत राज्यातही क्षणाक्षणाला उत्कंठा वाढत होती,भारतीय वेळेनुसार शनिवारी पहाटे 1.55 वा.भारतीय चांद्रयानाच्या विक्रम लॅण्डरचे सॉफ्ट लँडिंग करून भारत इतिहास रचणार असे सर्वांना वाटत होते, या घटनेचे साक्षीदार होण्यासाठी भारत राज्याचे प्रधान स्वत: इस्त्रोच्या कंट्रोलरुम मध्ये उपस्थित होते.सोबत भारत आणि शेजारच्या भुटान राज्यातील निवडक मुलेही भविष्याचा वेध घेण्यासाठी कंट्रोलरुममध्ये उपस्थित होती. शेवटची १५ मिनिटे विक्रम लॅण्डरसाठी महत्वाची होती.क्रिकेटच्या सामन्यांसाठी रात्री जागणारे लाखो भारतीय लोक आज पहिल्यांदाच इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी मध्यरात्री जागे होते.

  चांदसा'च्या कंट्रोलरुममध्येही थरार वाढत होता. ऑर्बिटर काही वेळापुर्वी वरुन गेल्यामुळे आता लगेच येण्याचा धोका नव्हता.सैनिकांनी दक्षिण ध्रुवाजवळील सर्व भाग व्यापून टाकला होता.चुकुन जर यानासोबत मानव असतील तर त्यांच्यावर प्रतिघात करण्यासाठी सैनिक सज्ज होते,आपल्यापेक्षा आकाराने दहापट मोठ्या असणाऱ्या मानवाशी मुकाबला करण्यासाठी चांद्रवीर तयार होते कारण हे युद्ध होते आत्मरक्षणासाठी,हे युद्ध होते स्वसंरक्षणासाठी,हे युद्ध होते आपल्या भुमीच्या रक्षणासाठी .. तसेच हे युद्ध साम्राज्यवादी मानवी प्रवृत्तीच्या विरोधात होते,त्यासाठी आपल्या राजपुत्राला साथ देण्यासाठी सर्व चांद्रवीर तयार होते. चंद्रावर मानव आलाच तर मानवाचे शिरस्त्राण आणि प्राणवायूच्या टाक्यांना लक्ष्य करण्यात येणार होते. ज्यामुळे मानव चंद्रावर जगूच शकणार नाही.

   विक्रम लॅण्डर क्रुमगतीने चांद्रभुमीकडे झेपावू लागला होता , इस्त्रो'मध्ये मोठ्या पडद्यावर प्रक्षेपण सुरु होते,निवेदक हिंदीमधून निवेदन करीत सर्वांचा उत्साह वाढवत होते.भारताचे प्रधान इस्त्रो'प्रमुखांची पाठ थोपटत प्रोत्साहन देत होते,एक एक टप्पा पार करीत चांद्रभुमीला स्पर्श करण्यासाठी 'विक्रम' पुढे सरकत होता.

   चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ खिंडीत दबा धरुन बसलेल्या सैनिकाप्रमाणे चांद्रवीर आपली क्षेपणास्त्रे रोखून बसले होते.राजपुत्र चंद्रसेन कंट्रोलरुममधील मॉनिटरवर लॅण्डरचा मार्गावर लक्ष ठेवून होता. विक्रम लॅण्डर  चंद्रापासून 2 कि.मी.अंतर असताना फक्त एकच इशारा होणार होता.विक्रम लॅण्डर हळूहळू खाली येत होता. अखेर तो क्षण आला.विक्रम लॅण्डर चांद्रभुमीपासून बरोबर 2 कि.मी.अंतरावर होता.
राजपुत्राने इशारा केला ...डोळ्याची पापणी लवते ना लवते तोच क्षेपणास्त्राने विक्रम'चा वेध घेतला.पण थोडा अंदाज चुकला. विक्रमचा फक्त अॅन्टेना मोडला गेला.पंख छाटलेल्या पक्ष्याने जीवाच्या आकांताने उडण्याचा प्रयत्न करावा तसा विक्रम'ने स्वत:हून योग्य दिशा पकडण्याचा प्रयत्न केला. राजपुत्राने दुसरा इशारा केला ,क्षणात दुसऱ्या चांद्र-क्षेपणास्त्राने विक्रम लॅण्डर'चा अचूक वेध घेतला. आपली दिशा आणि वेग गमावून ते धप्पकन खाली आले .

    इस्त्रो'मध्ये डोळ्यांत प्राण आणून विक्रम चा मार्गक्रमण पाहण्याऱ्यांना निर्धारीत रेषेपासून विक्रम लॅण्डर किंचित खाली आल्यासारखे जाणवले ,लगेच पुन्हा ते त्या निर्धारीत रेषेवर गेले.पुढच्या क्षणाला ते दिसेनासे झाले. विक्रम लॅण्डरने सिग्नल देणे बंद केले. निवेदकांचा आवाज धीरगंभीर झाला.दोन,चार वाक्ये बोलून त्यांनी निवेदन बंद केले. संशोधक विक्रम'शी संपर्क साधायचा पुन्हा पुन्हा संपर्क करु लागले. विक्रम'कडून कोणताचा सिग्नल येत नव्हता.थोड्यावेळाने इस्त्रोप्रमुख आपल्या जागेवर उठले,भारतीय प्रधानांच्या जवळ जाऊन कानात काही तरी पुटपुटले. शेवटी इस्त्रोप्रमुखांनी 'विक्रम लॅण्डर' शी संपर्क तुटल्याची अधिकृत घोषणा केली,अन् लाखों भारतीयांच्या काळजाचा ठोका चुकला.भारतभरातून इस्त्रोच्या कंट्रोलरुममध्ये आलेल्या चिमुकल्यांचे चेहरे हिरमुसले गेले.

...................................................................

    विक्रम लॅण्डर चांद्रभुमीवर येताच चांद्रवीरांनी त्याला चारीबाजुंनी घेरले . छोटे चांद्रवीर सावधानी बाळगत त्याच्यावर चढू लागले होते , त्यांनी विक्रम लॅण्डरच्या आत प्रवेश करुन त्यामध्ये मानव नसल्याची खात्री केली .तोपर्यंत राजपुत्र चंद्रसेन आपल्या सुरक्षादलासह तेथे पोहचला.चांदसा'च्या शास्त्रज्ञांनी विक्रम लॅण्डर'ची पाहणी केली.विक्रम'चा एक पाय वाकला होता त्यामुळे ते थोडे वाकले होते तसेच त्याची सर्व इंजिने बंद पडल्याने त्याने कार्य करणे बंद केले होते.विक्रम लॅण्डरच्या आत 'प्रज्ञान बग्गी' सुरक्षित होती.शास्त्रज्ञांनी 'प्रज्ञान बग्गी'ची विक्रम लॅण्डरशी जोडलेली सर्व संपर्क यंत्रणा तोडून टाकली. आता 'प्रज्ञान बग्गी' मानवाच्या लहान मुलांच्या खेळण्यातील गाडीप्रमाणे होती. चांद्रवीरांनी 'विक्रम लॅण्डर'चा घसरगुंडी प्रमाणे असणारा जीना खाली सोडला. त्या जिन्यावरुन 'प्रज्ञान बग्गी' हळुवार खाली सोडण्यात आली. 'प्रज्ञान बग्गी' खाली येताच सैनिकांनी 'विक्रम लॅण्डर'वर धुळ टाकण्यास सुरुवात केली . विक्रम लॅण्डर धुळीखाली लपवून टाकला.चांद्रयानाचा ऑर्बिटर काही वेळाने जरी अवकाशातून गेला तरी विक्रम लॅण्डर'वरील धुळीमुळे त्याचे स्थान समजणार नव्हते . त्यानंतर काही तासांनी चंद्राच्या दक्षिण भागात मोठी रात्र सुरु होणार होती. जेणेकरुन विक्रम लॅण्डर' पृथ्वीवासियांना दिसण्याची शक्यता जवळजवळ संपुष्टात आली होती.

     ' प्रज्ञान बग्गी'चा चांद्रभुमीला स्पर्श होताच राजपुत्र चंद्रसेनाने शास्त्रज्ञांना मिठी मारली त्यांच्या डोळ्यांतूनच आनंदाश्रू वाहू लागले. त्याचवेळी इकडे पृथ्वीवर 'इस्त्रो'प्रमुख भारतीय प्रधानांच्या मिठीत अश्रू ढाळत होते.

    आता चांद्रवीरांनी 'प्रज्ञान बग्गी' ओढायला सुरुवात केली होती. सर्वांनी राजपुत्राला ' प्रज्ञान बग्गी'त बसायची विनंती केली. राजपुत्र 'प्रज्ञान बग्गी'त चढून उभा राहिला अन् सर्व चांद्रसैनिकांनी जल्लोष केला .सर्वांनी राजकुमार चंद्रसेनाच्या नावाने जयजयकार करण्यास सुरुवात केली. चांद्रराज्यात ही बातमी गुप्तचरांनी ताबडतोब कळवली. आपल्या राजपुत्राच्या विजयामुळे राजा खुश झाला. संपुर्ण चांद्रराज्य आपल्या राजपुत्राच्या स्वागताला सज्ज झाले.........

   ''युवराज,आपण राजभवनात आलो.'' रक्षकाचे वाक्य ऐकून राजपुत्र भानावर आला. कित्तेक दिवसांचा जीवनपट राजपुत्राच्या डोळ्यासमोरुन सर्रकन निघून गेला. राजपुत्र चंद्रसेनाने 'प्रज्ञान बग्गी'त उभा राहून राजभवनात प्रवेश केला. राजपुत्राने शेवटी आपली प्रतिज्ञा पूर्ण केली.

  राजभवनाच्या समोरील प्रांगणात मधोमध 'प्रज्ञान बग्गी' उभी करण्यात आली. सर्व सैनिक आपापल्या जागेवर जाऊन उभे राहिले. 'प्रज्ञान बग्गी ' राजभवनात येताच राजमाता राजवाड्यातून धावतच बाहेर आली. तिने राजपुत्राच्या गालावरुन हात फिरवला आणि राजपुत्राला कडकडून मिठी मारली. राजमातेचे डोळे लाल झाले होते. राजपुत्र आईचा आशीर्वाद घेऊन महाराजांची भेट घेण्यासाठी महालाच्या दिशेने निघाला.
    राजमातेचे लक्ष प्रांगणात उभी असलेल्या 'प्रज्ञान बग्गी'कडे गेले. ती धावतच 'प्रज्ञान बग्गी'जवळ गेली आणि मनातल्या मनात तिच्या पृथ्वीमातेला हात जोडून म्हणाली , '' हे माते, तू माझ्या इतक्या दिवसांच्या प्रार्थनेची लाज राखलीस. माझ्या मुलाचे मोठ्या संकटातून रक्षण केलेस आणि तुझा प्रसाद म्हणून ही प्रज्ञान बग्गी दिलीस.तुझे आभार मी कसे मानू ? तुझी कृपा अशीच आमच्यावर सदैव राहू दे.''
  
   राजपुत्र चंद्रसेन अभिमानाने राजवाड्याच्या पायऱ्या चढत होता,जाता जाता त्याने मागे वळून पाहिले.राजभवनाच्या प्रांगणात *प्रज्ञान बग्गी*  दिमाखात उभी होती....आणि आकाशातील  *नीलग्रह*  आणखीनचं निळसर दिसत होता......!

.........................................................................................

*समाप्त*

*🖋️ दीपक माळी ©* *📲९६६५५१६५७२*