*प्रज्ञान बग्गी....🖋️दीपक माळी ©*
_ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून तिचा विश्वातील कोणत्याही मानवी अथवा अमानवी जीवाशी कसलाही संबंध नाही, असा संबंध आढळल्यास तो योगायोग समजावा._
*प्रज्ञान बग्गी*
🖋️ *दीपक माळी ,*📲९६६५५१६५७२.
*भाग - १*
सभोवताली पसरलेल्या धुळीच्या साम्राज्याखालील चांद्रराज्यात मोठा जल्लोष सुरु होता. चांद्रराज्याचा राजपुत्र आपल्या विजयाचे प्रतीक असणाऱ्या प्रज्ञान बग्गीत उभा राहून सर्वांना अभिवादन करीत होता. सर्व चांद्रवासी आपल्या राजपुत्राचे आणि त्याच्या साथीदारांचे कौतुक करीत होते.त्यांच्या विजयाच्या घोषणा देत होते. जल्लोषाचे कारणही तसेच होते,पृथ्वीवासियांनी चंद्रावर केलेला हल्ला राजपुत्राने यशस्वीे परतवून लावला होता इतकेच नाही तर विक्रम लँडरच्या आतून प्रज्ञान बग्गी सुरक्षित बाहेर काढून आपल्या ताब्यात घेतली होती. याच प्रज्ञान बग्गीला त्यांच्या पृथ्वीवासीयांवरील विजयाचे प्रतीक म्हणून ते जतन करणार होते....
या गोष्टीला सुरुवात होते फार वर्षांपूर्वी.... प्रत्यक्षात दिसणाऱ्या धुळीच्या विशाल सागराखाली चांद्रराज्य पसरले होते.या धुळीमुळे त्यांचे परग्रहवासियांपासून संरक्षण होत राहिले होते. या चांद्रवासियांना परग्रवासियांविषयी फार कुतुहल होते.विशेषत: नीलग्रहाविषयी फार आकर्षण होते. धुळीच्या आवरणाच्यावर येऊन पाहिले की हा निळा गोळा दिसायचा ,हा इतका मोठा गोळा आकाशात कसा ? असा प्रश्न सर्वांना पडायचा.राजमातेसह चांद्रराज्यातील सर्व महिला या गोळ्याला आपली माता मानायच्या.त्याची पूजाअर्चा करायच्या.काहीजन म्हणायचे या ग्रहावर मोठे राक्षस राहतात ,ते आपल्यापेक्षा आकाराने खूप खूप मोठे आहेत. हळूहळू त्यांनी या ग्रहाविषयी संशोधन सुरु केले ,त्यावेळी त्यांना या निळ्या ग्रहाविषयी अधिक माहिती समजू लागली.
या ग्रहाला पृथ्वी असे म्हणतात, तिथले रहिवासी स्वत:ला मानव समजतात.आपल्या ग्रहाची निर्मिती त्यांच्या ग्रहापासून झाली आहे असा त्यांचा समज आहे ते आपल्याला त्यांचा उपग्रह मानतात.त्यांच्याकडे एक दिवस उपवास असतो त्यादिवशी ते आपले दर्शन घेऊन उपवास सोडतात. या ग्रहावर एक विशिष्ट वायू आहे त्यावायूशिवाय हे जगूच शकत नाहीत ,तरीही ते मोठीमोठी स्वप्ने पाहतात. जिथे हा वायू नाही अशा ठिकाणी जाण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.ते आपआपसात फार भांडतात.त्यांचे एक राज्य नसून त्यांनी आपापली राज्ये वाटून घेतली आहेत,या राज्यांत फार स्पर्धा आहे.या स्पर्धेतून ते एकमेकांर हल्ला करतात.तुंबळ लढाई करतात,परस्परांचा जीव घेतात. या ग्रहावर झाडे आहेत ती सजीव असली तरी हालचाल करीत नाहीत .ही झाडेच त्या मानवांना त्यांना आवश्यक असणारा प्राणवायू देतात. पण स्वत:ला मानव समजणारे हे जीव त्या झाडांची कत्तल करतात . पृथ्वीवर अगणित सजीव आहेत पण मानवाने आपल्या बुद्धींच्या जोरावर सर्व जीवांना आपले गुलाम बनवले आहे. हा मानव आपल्यापेक्षा आकाराने दहापट मोठा आहे. त्याची ताकद जरी जास्त असली तरी प्राणवायू हा त्याचा कमजोरी आहे, आपल्या चांद्रग्रहावर हा वायू नसल्याने तो येथे येण्याचा कधीच प्रयत्न करणार नाही,अशी समस्त चांद्रवासियांची खात्री झाली होती.
.................................................
धुळीच्या आवरणाखाली असलेल्या चांद्रराज्यातील प्रजा निर्धास्त होती.पण अखेर ती भितीदायक बातमी समजली. ''आपल्या ग्रहाभोवती एक वस्तू भ्रमण करीत आहे ,ती नित्य नेमाने विशिष्ट गतीत आपल्या ग्रहाभोवती फिरत आहे'',आवरणाच्यावर असणाऱ्या रक्षकांकडून ही बातमी चांद्रराज्यात पोहचली. राजाने लगेच सभा बोलावली ,सभेमध्ये आपल्याभोवती फिरणारी वस्तू काय आहे? कोणी पाठवली आहे ?यापासून आपणांस काय धोका आहे का ? यावर विचारविनिमय झाला . शेवटी चर्चा होऊन या प्रश्नाचे निराकरण्यासाठी एक संस्था स्थापन करण्याचे ठरले .या संस्थेचे नाव 'चांदसा'असेल ,या संस्थेमध्ये ठराविक निवडक सैनिक असतील ते अवकाश संशोधन करतील तसेच अवकाशातील शत्रूंपासून आपले संरक्षण करतील. परग्रहावरील वस्तूं पासून धोका असल्यास त्यापासून आपला बचाव करण्यासाठी,प्रसंगी युद्ध करावे लागले तर शत्रूसोबत युद्धही करण्यासाठी तयार असतील. या 'चांदसा ' संस्थे विषयीचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार राजपुत्र चंद्रसेन यास देण्यात आले.
चांदसा'चे काम राजपुत्राच्या मार्गदर्शनाखाली सुरु झाले.एवढ्यात काही दिवसांतच एक विचित्र घटना घडली .'चांदसा'चे एजंट धुळीच्या आवरणाच्यावर गस्त घालत असताना त्यांना एक मोठी वस्तू जमिनीवर येताना दिसली ,ती अलगद धुळीच्या आवरणावर स्थिरावली ,त्यातून दोन मोठे मानव बाहेर आले, ते त्यांच्यापेक्षा किमान दहापट मोठे होते,त्यांनी डोक्यावर विशाल आवरण घातले होते,पाठीवर मोठ्या टाक्या बांधलेल्या होत्या. या हिंस्त्र प्राण्यापुढे आपला टिकाव लागणार नाही ,आपण त्यांच्या पावलाखाली चिरढून जाऊ हे सैनिकांनी ओळखून तात्काळ राजपुत्राला संदेश पाठवला. इकडे हे महाकाय मानव मातीतील दगड गोळा करु लागले ,एकाने एक उंच झेंड्यासारखी काठी मातीत रोवली ,तेवढ्यात त्यांना काहीतरी सुचना मिळाली ते पुन्हा त्या मोठ्या वस्तूत जाऊन बसले, इकडे राजपुत्र आपल्या सैन्यासह त्या ठिकाणाजवळ आला ,त्याचवेळी ती वस्तू आकाशात झेपावली .राजपुत्राच्या समोर आकाशात उंच गेली आणि दिसेनासी झाली. राजपुत्र त्या धुळीत रोवलेल्या झेंड्याकडे पाहतचं राहिला.
......................................................
*क्रमश:.....*