*प्रज्ञान बग्गी....🖋️दीपक माळी ©*
_ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून तिचा विश्वातील कोणत्याही मानवी अथवा अमानवी जीवाशी कसलाही संबंध नाही, असा संबंध आढळल्यास तो योगायोग समजावा._
*प्रज्ञान बग्गी*
🖋️ *दीपक माळी ,*📲९६६५५१६५७२.
*भाग - ४*
बातमीचं अशी महत्वाची होती, पृथ्वीवरील भारत राज्य आपले चांद्रयान चांद्रभुमीवर पाठवण्याच्या तयारीत होते. इस्त्रायलच्या यानाचा अपघात झाला असे समजून भारतीयांनी हा निर्णय काही कालावधी स्थगित केला, पुन्हा सर्व शक्यतांची पडताळणी करुन लवकरच ते शक्तिशाली चांद्रयान सोडणार आहेत. भारताचे चांद्रयान हे संपूर्ण चांद्रवासियांसाठी मोठा धक्काच होता.चांद्रराज्याच्या राजाने राजपुत्र,सर्व मंत्री ,सैनिक प्रतिनिधी,चांदसा'चे तज्ञ संशोधक यांची तात्काळ सभा बोलावली.
'' भारत .... पृथ्वीपासून थोड्या अंतरावरुन पृथ्वीकडे पाहिले असता मानवाच्या आकाराचे दिसणारे राज्य म्हणजे भारत होय.या भारताचा राजा,प्रधान आणि मंत्री लोकांच्यातून निवडले असतात ,पण येथे राजापेक्षा प्रधानाला अधिक महत्त्व असते. त्याच्याच हातात राज्याची खरी सत्ता असते. सध्या येथे एक महत्वाकांक्षी प्रधान सत्ता सांभाळत आहे. तीन बाजूंनी सागर ,उंच पर्वत ,मोठमोठ्या नद्या , डोंगर ,जंगले,वने,शेती,विविध पशुपक्षी यांनी नटलेले हे संपन्न राज्य म्हणजे पृथ्वीला पडलेले एक सुंदर स्वप्नचं आहे.
येथील लोकांच्यातही विविधता आहे,ते विविध प्रकारचे पोशाख घालतात,अनेक भाषा बोलतात, खाणेपिणे ,रुढी परंपरा ,चालीरीती यांच्यात अनेक प्रकारची विविधता दिसून येते.येथे जेवढी विविधता आहे तितकीच विषमताही आहे, स्त्री-पुरुष, गरीब-श्रीमंत,शिक्षित-अशिक्षित,पुरोगामी- प्रतिगामी अशा अनेक मतभेदांनी येथील लोक विभागले गेले आहेत. असे असले तरी हेच लोक अतिशय पराक्रमी आणि कष्टाळू आहेत .जेंव्हा जेंव्हा राज्यावर संकट येते त्यावेळी सर्व मतभेद विसरुन सर्वजन एकत्र येतात आणि संकटाला सामोरे जातात .याच ताकदीवर त्यांनी त्यांच्या शत्रूराज्याचा सलग तीनवेळा पराभव केला आहे.या लोकांना पृथ्वीवरील महासत्ता बनायचे आहे. त्यासाठी ते सर्व क्षेत्रात संशोधन करुन प्रगतीपथावर जाण्याचा प्रयत्न करीत आहेत, मग अवकाश क्षेत्रात ते कसे मागे राहतील ?
'इस्त्रो ' ही यांची अंतराळ संशोधन संस्था आहे, त्यांची स्पर्धा आपल्या चांद्रभुमीवर पहिले पाऊल ठेवणाऱ्या अमेरिकेच्या 'नासा' या संस्थेशी आहे, 'इस्त्रो' ने पृथ्वीभोवती भ्रमण करणारे अनेक उपग्रह अवकाशात सोडले आहेत ,सध्या ते इतर राज्यांचे उपग्रह अवकाशात सोडत आहेत. कांही दिवसांपूर्वी 'इस्त्रो'ने आपल्या पेक्षाही जास्त अंतरावर असणाऱ्या मंगळ ग्रहाभोवती भ्रमण करणारे मंगळयान सोडले आहे. लवकरच 'गगनयाना'तून मानवाला अवकाशात पाठवायचे यांचे ध्येय आहे. त्याचीच पूर्वतयारी म्हणून ते आपल्या चांद्रभुमीवर चांद्रयान सोडणार आहेत.'' चांदसा'चे प्रमुख मॉनिटरवर पृथ्वीगोल दाखवून सर्व माहिती सांगत होते.राजपुत्र ,राजा ,सैनिक आणि सर्व प्रतिनिधी कानात प्राण आणून सर्व माहिती ऐकत होते.
'' भारतीय लोक जे चांद्रयान सोडणार आहेत त्याचे ऑर्बिटर ,विक्रम लँडर आणि प्रज्ञान बग्गी (रोव्हर) असे तीन भाग आहेत.यापैकी चांद्रयानाचा ऑर्बिटर हा आपल्या चांद्रभुमीभोवती भ्रमण करीत राहिल,तो चांद्रभुमीवर नजर ठेवून सुस्पष्ट छायाचित्रे काढून पृथ्वीवर पाठवू शकतो. तसेच विक्रम लँडर'वर लक्ष ठेवू शकतो. विक्रम लँडर चांद्रयानापासून अलग होऊन तो चंद्राच्या दिशेने झेपावेल. नंतर सावकाश वेग कमी होत त्याचे आपल्या चांद्रभुमीवर स्वाॅफ्ट लँडिंग होईल.विक्रम लँडरच्या आत प्रज्ञान बग्गी असून ती लँडिंग झाल्यानंतर विक्रम लँडरच्या बाहेर येईल. प्रज्ञान बग्गीद्वारे आपल्या चांद्रभुमीच्या पृष्ठभागाचा अभ्यास केला जाणार आहे. चांद्रभुमीच्या भूरचनेचा, इथल्या खनिजांचा व बाह्य वातावरणाचा अभ्यास करणे हा चांद्रयान सोडण्यामागचा भारतीयांचा उद्देश आहे.
जर आपण मागच्या युद्धाप्रमाणे योग्य टप्प्यावर क्षेपणास्त्राचा अचूक मारा केला तर हे भारतीय चांद्रयानही पाडू शकतो.'' चांदसा'च्या प्रमुखांनी सर्वांना योग्य मार्गदर्शन केले.
राजपुत्राच्या मनात काही वेगळेच होते, त्याने सर्वांना सांगितले , ''हा विक्रम लँण्डर पाडायचा नाही,त्याचे नुकसान होता कामा नये,तो मला सुस्थितीत हवा आहे.''
राजपुत्राचा हा निर्णय सर्वांना बुचकाळ्यात टाकणारा होता, राजपुत्राची काही तरी नवीन योजना असेल ,असे सर्वांना वाटले. राजपुत्र सभेमध्ये सर्वांच्या मधोमध उभा राहिला,त्याने आपला उजवा हात छातीवर घेतला, *'' मी चांद्रनगरीचा राजपुत्र चंद्रसेन सर्वांसमोर शपथ घेतो की, भारतीयांचे चांद्रयान ताब्यात घेऊन त्यांच्याच 'प्रज्ञान बग्गी'तून राजभवनात येईन,तरचं मी तुमचा राजपुत्र असेन ''* अशी राजपुत्राने भरसभेत प्रतिज्ञा केली आणि सभेची सांगता झाली.
राजपुत्राच्या घोषणेमुळे सर्वांच्यात नवीन उत्साह आला. सर्वांनी भारतीय आक्रमणाचा सामना करायची मनाची तयारी केली. चांद्रराज्यातील सामान्य प्रजा मात्र थोडी काळजीत होती, पृथ्वीवासियांबरोबर वैर म्हणजे प्रत्यक्ष मृत्यूशीच गाठ होती. खुद्द राजमाताही महालात चिंतीत होती. ती अवकाशात दिसणाऱ्या पृथ्वीगोळ्या समोर वारंवार प्रार्थना करीत होती, ''हे पृथ्वीमाते,मी इतके दिवस तुझी प्रार्थना करते पण माझा पुत्र तुझ्याशीच युद्ध करणार आहे,तो अजुन अजाण आहे,त्याला माफ कर.त्यांच्या प्राणांचे रक्षण कर.''
.............................................................................
*क्रमश:*