twitter
rss

*प्रज्ञान बग्गी....🖋️दीपक माळी ©*

_ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून तिचा विश्वातील कोणत्याही मानवी अथवा अमानवी जीवाशी कसलाही संबंध नाही, असा संबंध आढळल्यास तो योगायोग समजावा._

           *प्रज्ञान बग्गी*

🖋️ *दीपक माळी ,*📲९६६५५१६५७२.

*भाग - ५*

       चांदसा'च्या मुख्य कक्षात राजपुत्र जातीने स्वत: हजर होता, चांदसा'प्रमुख पृथ्वीयानांमार्फत मिळणारे पृथ्वीवरील सर्व अपडेटस् राजपुत्राला तात्काळ सांगत होते. भारताने चांद्रयानाचे प्रक्षेपण करण्याचा मुहुर्त बदल्याचे नेमके काय कारण असावे ? इस्त्रायली चांद्रयानाचा अपघात हेच कारण असावे की दुसरे काय असावे ? या बाबीवर सर्वजन विचार करीत होते.

   भारतावर लक्ष ठेवणाऱ्या पृथ्वीयानांकडून समजले की इस्त्रो'चे चांद्रयान हे चांद्रभुमीच्या दक्षिण ध्रुवाजवळील भागात उतरणार आहे . जेथे आजपर्यंत पृथ्वीवरील कोणतेच यान उतरले नव्हते किंवा चांद्रवासीसुद्धा जिकडे सहजासहजी फिरकत नाहीत त्या जागेची लँंडींगसाठी निवड केली होती.यावरुन दोन निष्कर्ष काढता येत होते, भारतीय संशोधकांना चांद्रवासियांच्या अस्तित्वाचा संशय आला असावा किंवा  अजूनपर्यंत चंद्राच्या ज्या भागाचे संशोधन झाले त्या भागाचा त्यांना अभ्यास करावयाचा असेल...कारण कोणतेही असले तरी तयारी जास्त करावी लागणार होती कारण चंद्राचा दक्षिणेकडील भाग हा चांद्रराज्यापासून दूर होता,तिकडे चांद्रवासीही लोकही नाहीत. चांदसा'ची सर्व तांत्रिक साधने आणि क्षेपणास्त्रे दक्षिणेकडे घेऊन जावावे लागणार होते. आव्हान मोठे होते,प्रसंग बाका होता पण आता डगमगून चालणार नव्हते,येणाऱ्या संकटाला धैर्याने सामोरे जायला हवे .राजपुत्र चंद्रसेन सर्वांना प्रोत्साहन देत होता.

    चांदसा'चे संशोधकांना माहित झाले होते की भारतीयांचे चांद्रयान हे अतिशय कमी बजेटचे आहे त्यामुळे ते येण्यासाठी जास्त कालावधी लागणार आहे .हिच चांद्रवासियांसाठी जमेची बाजू ठरणार होती.याच कालावधीत ते आपली सर्व तयारी पूर्ण करणार होते.

   राजपुत्राला आपल्या पहिल्या मोहिमेचा अनुभव होताच.सोबत अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे तो बाजीगर ठरणार होता पण गर्वात न जाता चंद्रसेनाने सुक्ष्म नियोजनाने कामाला सुरुवात केली.पुन्हा एकदा आपले चांद्रराज्य धुळीच्या आवरणाखाली ' लॉकडाऊन ' केले. आपल्या चांदसा' संस्थेचे मुख्यालय दक्षिणे ध्रुवाजवळ हलवले,सर्व तांत्रिक व्यवस्था हलवण्यात आली, आपले सैन्य दल दक्षिण भागावर सज्ज केले.

   इकडे भारतात पृथ्वीवरुन चांद्रयानाचे प्रक्षेपणा करण्याचा मुहुर्त नक्की झाला.इस्त्रो'चे प्रमुख पहाटे आपल्या देवाची प्रार्थना करुन प्रक्षेपक केंद्रात आले.तोपर्यंत काऊंटडाऊन सुरु झाले होते ...10,9,8,7,6,5,4,3,2,1 स्टार्ट...मोठा आवाज करीत भारतीय चांद्रयानाने नवीन इतिहास रचण्याच्या उद्देशाने अवकाशात झेप घेतली. योग्य उंचीवर गेल्यावर चांद्रयानाने आपल्या मातृग्रहाला प्रदक्षिणा मारुन चंद्राच्या पदस्पर्शासाठी ते मार्गस्थ झाले.या घटनेमुळे इस्त्रोच्या संशोधकांना यशाची पहिली वीट रचली गेल्याचा आनंद झाला होता तर 'प्रज्ञान बग्गी'ची आतुरता लागलेल्या चंद्रसेनास 'विक्रम' आता आपलाच असल्याची खात्री झाली होती.
.............................................................

   मजल दरमजल करीत भारतीय चांद्रयान चंद्राच्या कक्षेत दाखल झाले आणि आपल्या लक्ष्याभोवती भ्रमण करु लागले , राजपुत्र चंद्रसेनने चांदसा'मधील मॉनिटरवर दिसणाऱ्या चांद्रयानाचे स्वागत केले. आता ऑर्बिटर आणि विक्रम लॅण्डर यांना विभक्त होण्याची वेळ आली होती. चांद्रयानाचे ऑर्बिटर आणि विक्रम लॅण्डर हे दोन भाग हळूहळू वेगवेगळे झाले.ऑर्बिटर चंद्राभोवती भ्रमण करु लागले तर विक्रम लॅण्डर चंद्राच्या पृष्ठभागाकडे झेपावू लागले. भारताच्या इस्त्रो'मध्ये चांद्रयानाचा दुसरा टप्पा पार पडल्या आनंद साजरा झाला. तर चांदसा'मध्ये राजपुत्राला सावज आपल्या तावडीत येणार याचा आनंद होत होता.

   चांदराज्यात राजा आपल्या प्रजेला धीर देत होता ,येणाऱ्या कोणत्याही परीस्थितीला तोंड देण्यासाठी आपला राजपुत्र,आपले सैनिक आणि आपले शास्त्रज्ञ सक्षम आहेत याची सर्व प्रजेला जाणिव करुन देत होता.गुप्तचरांकडून मोहिमेविषयी माहिती घेत होता. प्रजेला योग्य त्या सुचना देत होता. राजमाता मात्र अजुनही तिच्या पृथ्वीमातेचा धावा करीतचं होती,पृथ्वीमाता आपल्या मुलाचे रक्षण करणार,असा तिला दृढ विश्वास होता.

   चांद्रवासियांसाठी पुढील टप्पा खडतर होता कारण आता त्यांच्या हालचालीवर ऑर्बिटरची नजर राहणार होती. चांदसा'चे शास्त्रज्ञही ऑर्बिटरच्या गतीवर लक्ष ठेवून होते.भारतीयांच्या ऑर्बिटरला आपली कोणतीही कृती दिसणार नाही याची राजपुत्र दक्षता घेत होता,जेव्हा ऑर्बिटर अवकाशात समोर येई तेव्हा सर्व सैनिक व सर्व साधने धुळीखाली लपवली जात आणि ऑर्बिटर पुढे निघून गेला की यांचे कार्य पुन्हा सुरु होई,असा नित्यक्रम ठरला होता.चिकाटी आणि सातत्य हेच आपल्याला यशस्वी बनवू शकतील हे राजपुत्र जाणून होता.

   सर्वात महत्वाचे म्हणजे विक्रम लॅण्डर जर सुस्थितीत हवा असेल तर त्याच्यावर योग्य अंतरावर असतानाच हल्ला करणे गरजेचे होते, जेणेकरुन विक्रम लॅण्डर आणि त्याच्या आतील प्रज्ञान बग्गीचे जास्त नुकसान होणार नाही. चांदसा'च्या शास्त्रज्ञांनी 'विक्रम लॅण्डर'चा वेग आणि चंद्राचे गुरुत्वाकर्षण यांचा अभ्यास करुन योग्य ठिकाण निश्चित केले .विक्रम लॅण्डर चांद्रभुमीपासून फक्त 2 कि.मी.अंतरावर असताना हल्ला करावयाचे निश्चित केले.
    आता प्रतिक्षा होती शिकाऱ्यांचीच शिकार करण्याची  ....
..................................................................

*क्रमश:*