🎯यंदा अकरावी महागली!*
By pudhari | Publish Date: Mar 28 2017
मुंबई : प्रतिनिधी
यंदाच्या प्रवेश प्रक्रियेपासून ते संकेतस्थळ तसेच प्रवेश शुल्कात वाढ असे विविध बदल होणार आहेत. 2009 पासून एमकेसीएलतर्फे राबविण्यात येणारी ही प्रवेश प्रक्रिया आता नोएडाच्या ‘नायसा’या कंपनीकडून राबविण्यात येणार असल्याने अकरावी ऑनलाईन प्रवेशाची नवी रचना यंदा दहावी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध केली जाणार आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत या प्रवेश प्रक्रियेची तयारी केली जात आहे.
दहावीच्या परीक्षेनंतर अकरावी प्रवेशाची चिंता पालकांना मोठी असते. दरवर्षी अकरावी प्रवेशाचा गोंधळ सुरूच आहे. गेल्या वर्षी ऑफलाईन प्रवेश बंद केल्याने तब्बल दहा फेर्या पूर्ण कराव्या लागल्या होत्या. यंदा ‘एमकेसीएल’ला डच्चू देऊन पहिल्यांदाच ई-निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. निविदा प्रक्रियेत ‘नायसा’कडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. अकरावी प्रवेशाची संपूर्ण प्रक्रियाच आता नव्याने याकंपनीला सुरु करावी लागणार आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात संकेतस्थळ सुरू केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात महाविद्यालयांची नोंदणी पूर्ण करण्यात येणार आहे. यामध्ये महाविद्यालयांना लॉगीन आयडी देऊन शाखानिहाय जागा अपडेट करण्यात येतील त्यानंतर उपसंचालक कार्यालयाकडून त्या तपासल्या जातील. त्यानंतर हे संकेतस्थळ विद्यार्थ्यांना सरावासाठी उपलब्ध केले जाणार आहे. यासंदर्भात शिक्षण उपसंचालक कार्यालयात कोअर कमिटीची बैठक होऊन यासंदर्भात अंतिम निर्णय घेऊन बदल लवकरच जाहीर केले जाणार आहेत.
*संकेतस्थळ नव्याने*
अकरावी ऑनलाईनसाठी संकेतस्थळात बदल होणार आहे. पूर्वी असलेले संकेतस्थळ आता असणार नाही. तर नव्याने संकेतस्थळ आयडी देण्यात येणार आहे. येत्या आठवडाभरात हे नवे संकेतस्थळ सुरू होणार आहे.
*विद्यार्थिनींना 30 टक्के आरक्षण*
अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत नव्या सूचना आणि बदलांसह नव्या प्रक्रियेचा शासन निर्णय सात जानेवारी रोजी जाहीर केला आहे. त्यानुसार या प्रक्रियेसाठी आता विद्यार्थिनींना 30 टक्के स्वतंत्र आरक्षण मिळणार आहे. हे यंदा पहिल्यांदाच असल्याने तो बदल होणार आहे.
*माहिती पुस्तिका दोन मिळणार*
मुंबईसह, पुणे- पिंपरी चिंचवड, नागपूर, अमरावती, नाशिक आणि औरंगाबाद या ठिकाणी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविणार जाणार आहे. माध्यमिक शिक्षण संचालनालयाच्या वतीने ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे या सर्व शहरांसाठी संकेतस्थळांची माहिती देण्यासाठी ए पार्ट आणि स्थानिक शहरातील महाविद्यालयांची माहिती देण्यासाठी बी पार्ट अशी दोन पुस्तके काढण्याचाही विचार शालेय शिक्षण विभागाचा आहे.
*बेटरमेंटची संधी आता नाही*
पहिल्या फेरीत प्रवेश मिळाला असला तरी दुसर्या किंवा तिसर्या फेरीत विद्यार्थ्यांना पसंतीक्रमातील वरचे महाविद्यालय मिळावे, यासाठी बेटरमेंटची संधी दिली जात होती. ही संधी आता बंद होणार आहे. यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत प्रत्येकवेळी विद्यार्थ्यांना शिल्लक जागांवर पसंतीक्रम भरावा लागणार आहे.एक ते दहा महाविद्यालयांचा पसंतीक्रम विद्यार्थ्यांना द्यावा लागणार आहे. प्रवेश निश्चित झाल्यावर प्रत्येक फेरीला विद्यार्थी बाहेर पडणार आहे. त्यामुळे यंदा प्रवेश नियमावलीत मोठा बदल करण्यात येणार आहे.
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃
🌿पेपर तपासणीवरील बहिष्कार मागे*
By pudhari | Publish Date: Mar 28,2017
पुणे : प्रतिनिधी
उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय, विभाग, तुकड्या वर्ग यांची अनुदान पात्र यादी आर्थिक तरतूद करून जाहीर करावी व तत्काळ शिक्षकांचा शंभर टक्के पगार सुरू करावा. या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्या मान्य करण्यासाठी बारावी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकणार्या महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय शाळा कृती समितीने मागण्यांवर मुख्यमंत्री सकारात्मक निर्णय घेणार असल्याने पेपर तपासणीवरील बहिष्कार आंदोलन मागे घेत असल्याची माहिती संघटनेचे राज्य अध्यक्ष प्रा. टी. एम. नाईक यांनी दिली.
समितीच्या वतीने मुंबईतील आझाद मैदान येथे बेमुदत आंदोलन सुरू होते; परंतु संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी चर्चा केल्यानंतर व त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आग्रही राहण्याचे अनेक आमदारांनी आश्वासन दिल्यानंतर संघटनेने हे पेपर तपासणीवरील बहिष्कार उपोेषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात प्रा. टी. एम. नाईक म्हणाले, राज्यातील जवळपास 22 हजार 500 शिक्षकांनी उपोषणाला पाठिंबा दर्शविला होता त्यामुळे जर उपोषण चिघळले असते, तर त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या निकालावर निश्चितच झाला असता त्यामुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन व मुख्यमंत्र्यांनी मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे मान्य केल्यामुळे हा निर्णय घेतला. या उपोषणामुळे पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांची भेट झाली असून, त्यांनी उच्च माध्यमिकला 20 टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच इतरही प्रश्नांचा गांभीर्याने विचार करणार असल्याची माहिती दिली आहे.
यासंदर्भात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे म्हणाले, शिक्षकांच्या पेपर तपासणीवरील बहिष्काराच्या पार्श्वभूमीवर पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती; परंतु संघटनेने त्यांचे आंदोलन मागे घेतल्यामुळे पेपर तपासणीसाठी त्यांची नक्कीच मदत होणार आहे.
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃
😌कोल्हापूर~ पिंपळगाव खुर्दमधील 10 मुलांना विषबाधा*
By pudhari | Publish Date: Mar 28 2017
कोल्हापूर : प्रतिनिधी
शेंगदाणे समजून एरंड बिया खाल्ल्याने पिंपळगाव खुर्द (ता.कागल) येथील दहा मुलांना विषबाधा झाली. त्यापैकी पाच जणांची प्रकृती गंभीर असून सर्वांना शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. रविवारी सायंकाळी हा प्रकार घडला.
अशोक यल्लाप्पा विभुते (वय 3 वर्षे), आलम्मा यल्लाप्पा विभुते (5), राजेश बसवराज गणाचारी (3), अंजली यल्लाप्पा विभुते (10), विजय मल्लाप्पा विभुते (4), अंजली रामा विभुते (10), सुलकम्मा मारुती गणाचारी (5), मुन्ना मंजुनाथ गणाचारी (8), गीता मारुती गणाचारी (3), शाम रकाप्पा विभुते (5, सर्व रा. पिंपळगांव खुर्द) अशी त्यांची नावे आहेत.
विषबाधा झालेल्या सर्व मुलांना कागल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले; मात्र पाच जणांची प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना मध्यरात्री सीपीआरमध्ये हलविण्यात आले. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. सीपीआर पोलिस चौकीमध्ये घटनेची नोंद झाली आहे .
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃