🖥ठाणे जि.प.📹 शंभर टक्के जि प शाळा डिजिटल!*
Maharashtra Times | Updated Mar 13, 2017.
म. टा. वृत्तसेवा, ठाणे
प्रगत शैक्षणिक धोरणानुसार जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल करण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून करण्यात येत असलेली मेहनत अखेर फळाला आली आहे. शुक्रवारी जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी जिल्हा परिषदेच्या १०० टक्के शाळा डिजिटल झाल्याचे घोषित केले.
२८ फेब्रुवारीपर्यंत शाळा डिजिटल करण्यासाठी अथक प्रयत्न करण्यात आले होते. परंतु अंबरनाथ तालुक्यातून शाळा डिजिटल करण्यासाठी सीएसआर फंड उपलब्ध होण्यासाठी विलंब झाल्यामुळे नियोजित तारखेत शाळा डिजिटल होऊ शकल्या नाहीत. मात्र त्यानंतर जलद गतीने काम करत जिल्हा प्रशासनाचा रोडावलेला कारभार प्रगतीपथावर घेऊन येण्यास महत्त्वाची भूमिका बजावणारे मुख्य कार्यकारी अधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्या निरोप समारंभाच्या वेळी शाळा डिजिटल झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या १३३६ शाळा डिजिटल झाल्या आहेत.
शहापूरच्या पष्टेपाडा शाळेचे शिक्षक संदीप गुंड यांनी शाळेत डिजिटल संकल्पना राबवल्यानंतर या उपक्रमाची दखल राज्यभरात घेण्यात आली. शहापूरसारख्या दुर्गम भागात डिजिटल माध्यमांचे शिक्षण उपलब्ध होत असेल तर जिल्ह्याच्या प्रत्येक शाळेत अशा प्रकारचे शिक्षण उपलब्ध झाले पाहिजे, अशी आग्रही भूमिका घेऊन जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शाळा डिजिटल करण्याच्या दृष्टीने पावले उचलली. सीएसआर फंड, लोकवर्गणी, लोकसहभाग आणि विविध सामाजिक-शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून शाळा डिजिटल करण्यास जिल्हा परिषदेला यश आले.
सन २०१५मध्ये राज्य शिक्षण विभागाने ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ हे धोरण तयार करून राज्यातील जिल्हा परिषद शाळांना आलेली मरगळ झटकण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले. त्यावेळी राज्यातील प्रत्येक शाळा डिजिटल झाली पाहिजे, यासाठी जिल्हा-तालुका पातळीवर जोरदार कामे सुरू झाली. ठाणे जिल्ह्यातील शिक्षकांनीही मेहनत घेत शाळा डिजिटल करण्यासाठी लोकसहभाग वाढवला. १९ जानेवारी रोजी कल्याण तालुक्याच्या शाळा शंभर टक्के डिजिटल झाल्या आणि त्या पाठोपाठ शहापूर, भिवंडी, मुरबाड, आदी तालुक्यातील शाळाही डिजिटल झाल्या आणि शेवटी अंबरनाथ तालुक्याच्या शाळा डिजिटल झाल्या.
*अशी आहे रचना*
स्क्रीन, प्रोजेक्टर, पाठयपुस्तकीय अभ्यासक्रमाच्या ऑडिओ आणि व्हिडिओ स्वरूपातील सीडी आणि मॉनिटर अशा प्रकारचे ई- साहित्य विद्यार्थी स्वतः हाताळणार असून या सगळ्या वस्तू एका वर्गात ठेवण्यात आल्या आहेत. त्या वर्गाचे ‘डिजिटल’ असे नामकरण करण्यात आले आहे. दिवसातील एक तास प्रत्येक वर्गातील विद्यार्थी शिक्षण घेणार आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळा शंभर टक्के डिजिटल झाल्या आहेत, याचा प्रचंड आनंद आहे. शाळा डिजिटल करण्यास प्रत्येक शाळेतील शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे आहे. शाळा डिजिटल झाल्यामुळे मुलांच्या प्रगतीला चालना मिळणार आहे.
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃