twitter
rss

🇬 🇺 🇷 🇺 🇻 🇦 🇷 🇾 🇦

🇳 🇪 🇼 🇸

🇮🇳 भारतीय शिक्षकांचा कॅनडात गौरव*

By pudhari | Publish Date: Mar 27 2017

पुणे : गणेश खळदकर

शिक्षणात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर कसा करावा, याबाबत मायक्रोसॉफ्टच्या वतीने टोरांटो (कॅनडा) येथे 21 ते 24 मार्चदरम्यान आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत जगभरातील विविध देशांमधील जवळपास 300 शिक्षक सहभागी झाले होते. यामध्ये भारतातील पाच शिक्षकांना दहा पदके देऊन गौरव करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी दिली.

‘मायक्रोसॉफ्ट’च्या वतीने आयोजित इनोव्हेटिव्ह एज्युकेटर एक्स्पर्ट परिषदेत जगातील 300 कल्पक प्रकल्पांची निवड करण्यात आली होती व या प्रकल्पांच्या सादरीकरणासाठी जगभरातील 300 तंत्रस्नेही शिक्षक कॅनडातील टोरांटो या ठिकाणी एकत्र आले होते. या परिषदेच्या निमित्ताने अनेक देशांमधील शिक्षण व्यवस्था, त्यांच्या समस्या, शिक्षकांजवळ असलेले कौशल्य, शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवत असताना येत असलेले अनुभव यांची सर्वांना ओळख झाली. या परिषदेत जगभरातील शिक्षण क्षेत्राकडून भविष्यात नेमकी काय गरज आहे, तसेच भविष्यात जी आव्हाने जगासमोर उभी ठाकली आहेत त्यांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना बौद्धिकदृष्ट्या तयार करण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरणे आवश्यक आहे व ते कशा पद्धतीने वापरले जाणे आवश्यक आहे, याविषयी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये रोबोटिक सायन्स व बीम टेक्नॉलॉजी यांचा समावेश होता.

या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी भारतातील एकूण आठ जणांचा सहभाग होता. मात्र, त्यातील केवळ पाच शिक्षकांनाच त्या ठिकाणी जाण्याची संधी मिळाली. तीन जणांना व्हिसा न मिळाल्यामुळे या परिषदेला उपस्थित राहता आले नाही. यामध्ये महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळेचे एकमेव शिक्षक म्हणून रणजितसिंह डिसले यांचा समावेश होता. दिल्ली, चेन्नई, पंजाबमधील इतर 4 शिक्षक होते. या सर्वांना व्यक्तिगत व सामूहिक सादरीकरणासाठी एकूण दहा पदके देण्यात आली. यातील रणजितसिंह डिसले यांचा ‘मायक्रोसॉफ्ट सर्टिफाइड एज्युकेटर व सोशल एक्स्पर्ट’ अशा दोन पदकांनी गौरव करण्यात आला.

या ठिकाणी आलेल्या जगभरातील शिक्षकांचे 48 गट करण्यात आले होते व त्यांच्या वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये रणजितसिंह डिसले (भारत), फ्रेड वे (केनिया), केली न्यू (अमेरिका), अशीगन (इजिप्त), करीटा (जपान) यांनी पारितोषिके मिळवली. या परिषदेत कॅनडाच्या 150 व्या स्थापनादिनानिमित्त लहान मुलांना स्पर्धेचे परीक्षक म्हणून आमंत्रित केले होते. या मुलांना आवडलेल्या प्रकल्पांना विशेष पारितोषिक देण्यात आले. यात अमेरिका, बेल्जियम, अर्जेंटिना या देशांनी बाजी मारली.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

🇮🇳 देशातला दुसऱ्या क्रमांकाचा ध्वजस्तंभ कोल्हापुरात*

सुधाकर काशीद 05.06 AM

कोल्हापूर - देशातल्या दुसऱ्या क्रमांकाच्या उंचीचा ध्वज कोल्हापुरात एक मे रोजी जरूर फडकणार आहे. हा ध्वज केवळ 300 फूट उंचीचे वैशिष्ट्य नव्हे तर उंच ध्वज उभारणीच्या तंत्रातील एक वैशिष्ट्य म्हणूनही गणला जाणार आहे. ध्वज उभारणीला सव्वा महिन्याचाच अवधी उरल्याने युद्धपातळीवर त्याचे काम सुरू आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन व के.एस.बी.पी. यांच्या संयुक्त प्रयत्नातून या ध्वजाची उभारणी होत आहे.

जमिनीपासून 300 फूट उंचीचा ध्वजस्तंभ उभारण्यासाठी आता 21 फूट रुंद, 21 फूट लांब व 16 फूट खोलीचा पाया काढला आहे. या पायासाठी के.आय.टी.ने सॉइल बेअरिंग कपॅसिटी तंत्राद्वारे मार्गदर्शन केले आहे. या पायात तब्बल साडेतीन टन लोखंडी सळी व 232 क्‍युबिक मीटर कॉंक्रिट घातले जात आहे. 300 फूट ध्वजस्तंभासाठी जी.आय. एपोक्‍सी कोटिंग खांब तयार केला जात असून 30 फिुटाचा एक भाग असे दहा भाग जोडून तो उभा केला जाणार आहे आणि ध्वजस्तंभाचे वजन तब्बल 24 हजार किलो असणार आहे.

पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरील उद्यानात (पोलिस लाइन) ध्वजस्तंभ उभारला जाणार आहे. केवळ ध्वजस्तंभ नव्हे तर या ठिकाणी साउंड अँड शो तंत्रावर आधारित उद्यानही उभारले जात आहे. उंच फडकणारा ध्वज आजूबाजूचे वातावरण यामुळे राष्ट्रप्रेम जागृतीचे हे एक स्फूर्तिस्थळ ठरणार आहे.

के.एस.बी.पी. या संस्थेचे सुजय पित्रे हे ध्वज उभारणीच्या कामावर नियंत्रण ठेवून आहेत. ते म्हणाले, ""ध्वज उभारणीसाठी टेंबलाई टेकडी, चित्रनगरी व पोलिस लाइन अशा तीन जागांचा विचार झाला. त्यात पोलिस लाइनच्या जागेला प्राधान्य देण्यात आले. कारण पुढील देखभालीच्या दृष्टीने हेच ठिकाण योग्य होते. बजाज इलेक्‍ट्रिकल कंपनी या ध्वजस्तंभाची उभारणी करत आहे. 30 फुटांचा एक भाग अशा पद्धतीने ध्वजस्तंभ आणून तो येथे पूर्ण जोडून क्रेनच्या साहाय्याने उभा केला जाणार आहे व इलेक्‍ट्रिक मोटारीच्या साहाय्याने ध्वज वरती चढवला जाणार आहे.

पॉलिस्टरच्या विशिष्ट कापडाचा वापर
ध्वजस्तंभ 300 फूट उंचीचा व त्यावर फडकणारा तिरंगा ध्वज 90 फूट लांब व साठ फूट रुंद म्हणजे 5400 चौरस फुटांचा असणार आहे. उंचावरील वाऱ्याच्या झोताने ध्वजाचे नुकसान होऊ नये म्हणून त्यासाठी पॉलिस्टरचे विशिष्ट कापड वापरले जाणार आहे. शहराच्या कोणत्याही भागातील तीन मजली इमारतीच्या टेरेसवरून हा ध्वज दिसू शकणार आहे. तो रात्रीही फडकता राहणार आहे. त्यासाठी त्यावर दिव्याचे सहा झोत अखंड कार्यरत राहणार आहेत.

सर्वात उंचीचा ध्वज वाघा बॉर्डरवर
देशात सर्वात उंचीचा ध्वज वाघा बॉर्डरवर आहे. आता कोल्हापुरात उभारला जाणारा ध्वज त्या खालोखाल उंचीचा आहे. राज्यात सध्या 237 फूट उंचीचा ध्वज कात्रजमध्ये आहे. त्यामुळे कोल्हापुरातील 300 फूट उंचीचा ध्वज राज्यात सर्वात उंच ठरणार आहे. ध्वजस्तंभ तळात पाच फूट रुंद व 300 फुटावर टोकाला सोळा इंच असणार आहे.

*दृष्टिक्षेपात*

ध्वजस्तंभ उंची ः 300 फूट
फडकणारा झेंडा ः 90x60 फूट आकाराचा
ध्वजस्तंभासाठी ः पाया 16 फूट खोल
ध्वजस्तंभ वजन ः 24 हजार किलो
ध्वजस्तंभ पाया ः साडेतीन टन सळीचा वापर

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

🌺‘हळदी-कुंकू’ करा; शाळाप्रवेश वाढवा*

Maharashtra Times | Updated Mar 27,2017

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांनी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर ‘गुढी पाडवा, शाळेत प्रवेश वाढवा’ या टॅगलाइनवर ‘शाळा प्रवेशोत्सव’ उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. उपक्रमाच्या यशस्वितेसाठी आणि पालक-शिक्षक यांच्यातील संबंध दृढ होण्यासाठी शाळेत ‘हळदी-कुंकू’सारखे कार्यक्रम घेण्याच्या अफलातून सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकारी व शिक्षकांना दिल्या आहेत. त्यामुळे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र धोरणात शाळांची वाटचाल वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित कार्यक्रमांऐवजी हळदी-कुंकवाचे कार्यक्रम घेण्याकडे जात आहे का, असाच प्रश्न निर्माण झाला आहे.
राज्यात जिल्हा परिषदांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख यांनी २०१७-१८ या येत्या शैक्षणिक वर्षापासून शाळा प्रवेशोत्सव उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमात शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचे प्रवेश करणे, त्यांना शाळेत उपस्थित राहण्याबाबत प्रोत्साहीत करून गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे, असे कार्यक्रम राबवायचे आहेत. तसेच, राज्य सरकारच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र धोरणातील घटकांची अंमलबजावणी पूर्ण करण्यासाठी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर शाळा प्रवेशोत्सव उपक्रम राबविण्यात येत आहे.

गुढीपाडवा २८ मार्चला आहे. त्यामुळे हा उपक्रम गटशिक्षणाधिकारी व शिक्षकांनी २७ ते ३१ मार्च दरम्यान राबवायचा आहे. ‘गुढी पाडवा, शाळेत प्रवेश वाढवा’ अशी भन्नाट ‘टॅग लाइन’च या उपक्रमाला दिली आहे. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षकांनी शाळेत हळदी-कुंकूसारखे विविध कार्यक्रम घेण्यात यावेत, शाळेचे वातावरण प्रफुल्लित व स्वच्छ ठेवावे, शाळांचे सुशोभीकरण करावे अशा सूचना पत्रकाद्वारे दिल्या आहेत. त्यामुळे भर उन्हाळ्यात हळदी-कुंकवासारखे कार्यक्रम घेतले जात आहेत.

   जिल्हा परिषदांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. शाळांमध्ये महिला पालक मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे शिक्षिका आणि महिला पालकांमध्ये चांगले संबंध निर्माण होण्यासाठी तसेच स्वागत म्हणून ‘हळदी-कुंकू’सारखे कार्यक्रम घेण्याच्या सूचना दिल्या आहेत- मुश्ताक शेख, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद (प्राथमिक)

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃