twitter
rss

अन् सेमी इंग्रजीमुळे बंद मराठी शाळा पुन्हा बहरली....

🖋दीपक माळी ,९६६५६१६५७२.

१ जून २०१३ रोजी तब्बल दोन वर्षे पटाअभावी बंद असलेली जि.प.शाळा,माळीवस्ती(हरोली) ही शाळा आव्हान म्हणून स्विकारली. या शाळेच्या माध्यमातून शून्यातून विश्व निर्माण करण्याची संधी होती पण शाळेत मुले आलीच नाहीत तर आगीतून फुफाट्यात पडण्याचा धोकाही होता.
श्री.अजित वांडरे सर आणि मी दोघांनी मिळून आव्हान स्विकारले ,एक नवी सुरुवात करण्यास सज्ज झालो, शाळा सुरु होण्यापूर्वी १५ दिवस अगोदर सर्व पालकांची बैठक घेतली,दाखलपात्र पालकांच्या घरी जावून सर्वांनी विनंती केली ,' आम्ही चांगले शिकवतोय ' असे आयुष्यात पहिल्यांच कोणास तरी सांगावे लागले...
साखरेवस्तीवरील सर्व पालकांची आमच्या आवाहनास साथ दिली,
जवळच असलेल्या शिवगंगा पाईप फँक्टरीमधील कामगारांची मुले हायवे चालत परगावी जात होती त्या पालकांनाही आम्ही भेटलो ,त्यांचीही साथ मिळाली
तेव्हा कुठे जेमतेम १६- १७ विद्यार्थी मिळाले आणि आमची शाळा सुरु झाली .
e-learning, डिजिटल वर्ग ,अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर, विविध शैक्षणिक साहित्य ,क्षेत्रभेटी,सहली ,मातापालक मेळावा असे अनेक शालेय आणि सहशालेय उपक्रम राबविले,वर्गखोल्या नसताना व्हरांड्यात,किचनशेडमध्ये ,कधी झाडाखाली विद्यार्थ्यांना अध्यापन केले ....
या सर्वाचे फलित म्हणून दरम्यानच्या काळात शाळेचा पट १६ वरुन ३१ पर्यंत वाढत गेला..
क्रीडा स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी जिल्हा स्तरापर्यंत यश संपादन केले,विविध स्पर्धापरीक्षांमधूनही विद्यार्थी चमकले.. आमच्या शाळेच्या या यशात मोठा वाटा आहे तो सेमी इंग्रजी माध्यमाचा....

🆎 सेमी इंग्रजी माध्यमातून शिक्षण
आमची शाळा सुरु करताना घेण्यात आलेल्या पालकभेटीं मधून असे लक्षात आले की, या भागामधील पालकांचा ओढा इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्याकडे वाढलेला आहे , वस्तीवरील मुले शेजारच्या गावातील खासगी व्यवस्थापनाच्या सेमी इंग्रजीच्या शाळेत जात आहेत , त्या शाळेमध्ये मिळणारे शिक्षण कोणतीही फी न घेता आपल्या शाळेत मिळू शकते हे पालकांना पटवून दिले. पुढील वर्षापासून इयत्ता पहिलीसाठी सेमी इंग्रजी माध्यम सुरु करण्याचा निर्णय घेतला.आमचे गटशिक्षणाधिकारी मा.आर.जी.पाटील सर तसेच सर्व अधिकाऱ्यांनी आम्हांस सहकार्य केले, सांगली जिल्हा परिषदेने परवानगी दिल्यानंतर सन २०१४-१५ पासून पहिलीचा सेमी इंग्रजीचा वर्ग सुरु केला. नंतर टप्प्या टप्याने नैसर्गिक वाढीने पुढील वर्ग सुरु झाले ,अशाप्रकारे सन २०१७-१८ अखेर पहिली ते चौथीपर्यंतचे सेमी इंग्रजीचे वर्ग पूर्ण झाले.
आता शासननिर्णयानुसार सेमी इंग्रजी माध्यमासाठी इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत गणित हा एकच विषय इंग्रजीतून शिकवावा लागतो ,यापूर्वी आमच्या शाळेत English Wordsbank ,दररोज 5 इंग्रजी शब्द पाठ करणे या सारखे उपक्रम सुरु होतेच त्यामुळे विद्यार्थ्यांची इंग्रजीची भिती दूर झाली होती . तरीही आम्ही अध्यापनासाठी द्विभाषिक पद्धतीचा अवलंब केला. सेमी इंग्रजी माध्यमामुळे इंग्रजीतून गणित आलेच पाहिजे पण आपल्या ग्रामीण भागात व्यवहारासाठी मराठीतून अंकगणिताचे ज्ञान आवश्यक ठरतेचं. त्यामुळेचं आम्ही इंग्रजी सोबत मायबोलीतून शिकवण्याचा प्रयत्न केला ,तसेच ज्या शाळांनी सेमी इंग्रजी सुरु केले आणि काही कालावधीनंतर बंद पडले अशा शाळांमध्ये इंग्रजीची सक्ती करण्यात आली होती,असा अनुभव आहे. त्यामुळे bilingual Method ही पद्धत उपयोगी ठरु शकते.पहिली दुसरीतील मुले इंग्रजीतील शाब्दिक उदाहरणे वाचू शकणार नाहीत पण तिथे मराठीतून भाषांतर करुन सांगितल्यास ते अचूक उत्तर शोधू शकतात. मात्र चौथीच्या वर्गातील विद्यार्थी इंग्रजीतील शाब्दिक उदाहरणे स्वत: वाचून सोडवू शकतात.
सेमी इंग्रजी माध्यम आपल्या ग्रामिण भागात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळेतही यशस्वी होवू शकते पण त्यासाठी वेळ द्यावा आणि थोडी वाट पहावे लागते.
सेमी इंग्रजीमुळे विद्यार्थ्यांना गणिताची गोडी लागतेच त्यासोबत इंग्रजीचा आत्मविश्वासही वाढतो.पुढे पाचवी नंतर नवोदय विद्यालय आणि सैनिक शाळेत सेमी इंग्रजीत शिकावे लागते,याची तयारी जर पहिलीपासूनच झाली तर नंतर विद्यार्थ्यांवर दडपण येणार नाही. इंग्रजीमुळे ज्ञानाची कक्षा रुंदावते तसेच मातृभाषेमुळे आपल्या मातीशी नाळ कायम राहते. त्यामुळे मराठी ,इंग्रजी आणि गणित या तीनही विषयाची उत्तम प्रगती करावयाची असेल तर सेमी इंग्रजी हे उत्तम माध्यम आहे. याचे उदाहरण म्हणजे English speaking Training नंतर त्याच्या feedback घेण्यासाठी आंग्ल भाषा संस्था ,औरंगाबाद हून कमिटी आली होती,प्रत्येक तालुक्यातील एका शाळेत ही कमिटी अनुधावन घेणार होती आणि त्यामध्ये आमच्या शाळेची कवठेमहांकाळ तालुक्यातून निवड झाली होती. सेमी इंग्रजी माध्यमाच्यामुळे आमची मुले मोठ्या आत्मविश्वासाने त्या समितीला सामोरे गेली आणि त्या समितीने आमच्या ग्रामिण भागातील मुलांचे कौतुक केले.
आज मराठी शाळा पर्यायाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा पटाअभावी कमी होत असताना सेमी इंग्रजी माध्यम हा आपल्या शाळा वाचविण्यासाठी उत्तम उपाय आहे . इंग्रजी माध्यमांच्या शाळांशी स्पर्धा करावयाचे असेल तर आपणही सेमी इंग्रजीचा स्विकार करायला हवा ,आणि ती काळाची गरजही आहे, जर आपण या मार्गाचा वापर केला; योग्य मार्गदर्शन ,पालकांची साथ घेतली तर नक्कीच आपण यशस्वी होवू शकतो,आणि हेच आमच्या शाळेने सिद्ध केले आहे.
धन्यवाद....

🖋दीपक महादेव माळी ,सहा.शिक्षक,
जि.प.शाळा ,माळीवस्ती (हरोली)
ता.कवठेमहांकाळ,जि.सांगली.
📱९६६५५१६५७२