twitter
rss

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 5⃣2⃣4⃣

*पद्मश्री मिळवणारा संत्रेवाला....*

आयुष्यात घडणाऱ्या सामान्य घटनांमधेच आयुष्याला असामान्य वळण देण्याची ताकद असते. अनेकदा सामान्य वाटणाऱ्या ह्या घटना आपल्या आयुष्याला लक्ष्य देतात. अशीच एक घटना मंगळुरु जवळच्या पडउ गावात राहणाऱ्या हरेकाला हजब्बा सोबत घडली. अतिशय गरीबीत दिवस काढणारा हरेकाला आपल्या कुटुंबाची उपजिविका पडउ गावात रस्त्यावर संत्री- मोसंबी विकून चालवत होता. एका छोटी झोपडी सारखं असणार घर आणि बायको सोबत तीन मुलांची जबाबदारी त्याच्या डोक्यावर होती. एकदा अशीच संत्री-मोसंबी रस्त्यावर विकत असताना दोन परदेशी लोकांनी त्याच्याकडे त्या संत्र्यांची किंमत विचारली. न शिकलेल्या हरेकाला ला इंग्रजी भाषेतून ते लोकं काय विचारत आहेत ह्याचा काही अंदाज आला नाही. मान डोलावून त्याने समजण्याचा प्रयत्न केला पण  त्याच्याकडे विकायला असलेल्या संत्र्यांची किंमत तो समोरच्या परदेशी लोकांना सांगू शकला नाही. अखेर ते दोघेही काही न घेता निघून गेले. अतिशय सामान्य वाटणाऱ्या घटनेत विशेष असं काही नव्हतं. पण ह्या घटनेने हरेकाला च्या आयुष्याची दिशाच बदलून गेली.

आपल्याकडे शिक्षण नसल्याने आपण त्या परदेशी गिऱ्हाइकासोबत संवाद करू शकलो नाही. एका चांगल्या गिऱ्हाईकाला आपला विक्रीचा माल चांगला असून फक्त भाषेमुळे, शिक्षणामुळे विकू शकलो नाही ह्याची खंत त्याला मनात खूप खोलवर टोचली. तिकडेच त्याने ठरवलं की आज जे आपल्यासोबत घडलं ते आपल्या गावात कोणासोबत घडायला नको. आज शिक्षणामुळे, भाषेमुळे तो मागे राहिला होता त्याच गोष्टींना त्याने आपलं लक्ष्य बनवलं. शिक्षणापासून आपल्या गावात कोणीच वंचित राहू नये म्हणून त्याने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला. दिवसाला अवघे १५० रुपये मिळवणाऱ्या हरेकाला च्या डोक्यावर तीन मुलांची जबाबदारी होती. पण तो मागे हटला नाही. त्याचा हा निर्णय त्याच्या बायकोला रुचला नाही. आपल्या मुलांच्या वाट्याचे पैसे शाळेसाठी देण्याची कल्पनाच तिला सहन होतं नव्हती. पण हरेकाला आपल्या निर्णयावर ठाम होता. 'थेंबे थेंबे तळे साचे' तसं त्याने एक- एक रुपया शाळेसाठी वाचवायला सुरवात केली.

"मुश्किलें बहोत थी, लेकिन कुछ कर जाने का जोश उन मुश्किलों से लाख गुना ज्यादा था"...

कदाचित हरेकाला च्या मनात तोच जोश होता. १९९९ साली हरेकाला ने मदरश्याच्या बाजूला एक छोटी शाळा सुरु केली. त्या वेळेस फक्त २८ मुलं त्याच्या शाळेत आली. गरीबीत असलेल्या कोणत्याही मुलाला त्याची जात-पात, धर्म न बघता त्याने आपल्या शाळेत प्रवेश दिला. त्याला हे पक्के ठाऊक होतं की आज न उद्या आपल्याला ही शाळा मोठ्या जागेत न्यावी लागणार. त्यासाठी त्याने प्रत्येक रुपया वाचवायला सुरवात केली. वाचवलेल्या पैश्यातून त्याने जमिनीचा एक तुकडा २००४ साली विकत घेतला पण शाळा उभी करण्यासाठी लागणारा पैसा त्याच्याकडे नव्हता. त्याने लोकांकडे ह्या कार्यासाठी मदत मागितली. सरकारी कार्यालय ते प्रत्येक पक्षाचे राजकारणी सगळ्यांचे उंबरठे त्याने झिजवले. आजूबाजूच्या श्रीमंत व्यक्तींकडे त्याने शाळेसाठी मदतीची याचना केली. अनेकवेळा वाईट अनुभव आले. एकदा तर एका व्यक्तीने त्याच्या बंगल्यात शिरला म्हणून आपला कुत्रा त्याच्या आंगावर सोडला. पण ह्या सगळ्याने हरेकाला थांबला नाही. त्याच लक्ष्य त्याला खुणावत होतं.

ह्या सगळ्या प्रवासात हरेकाला ने शाळा उभारण्या इतपत पैसे उभे केले आणि बघता बघता एका शाळेची स्थापना त्याने केली. त्याच्या ह्या जिद्दीचं कौतुक सगळीकडे झालं आणि त्याचा प्रवास मिडियाच्या नजरेत आला. CNN IBN ने त्याला ‘Real Heroes’ चा पुरस्कार दिला. जवळपास ५ लाख रुपये रोख ह्या बक्षिसाच्या रूपात त्याला मिळाले. हरेकाला ने सगळ्याचे सगळे पैसे शाळेच्या उभारणीत लावले. एका झोपडीपासून सुरु झालेली शाळा आता १.५ एकराच्या परीसरात विस्तारली. जवळपास १५० गरीब मुलांच्या शिक्षणाची सोय हरेकाला ने केली.

एकीकडे १५० मुलांची शाळा उभारणाऱ्या हरेकालाकडे स्वतःच्या घराचं छप्पर दुरुस्त करण्यासाठी पैसे नव्हते. हिच बाब त्याला आतून पोखरत होती. समाजासाठी आपलं सगळं काही देणाऱ्या हरेकाला साठी आता समाजाने काही करण्याची पाळी होती. एका समाजसेवी संस्थेने हरेकाला ला स्वतःच घर बांधून दिलं. हरेकाला च्या ह्या प्रवासाचा अनुभव अनेकांना प्रेरणा देणारा ठरला. त्याच्यावर अनेक पुरस्कारांचा वर्षाव झाला. ह्या सगळ्यातून मिळालेले सर्व पैसे शाळेला अजून मोठं करण्यासाठी हरेकाला ने दान दिले. त्याच्या ह्या असाधारण कामाची दखल भारत सरकारने घेताना त्याला २०२० च्या पद्मश्री सन्मानाने गौरवांकित केलं.

https://m.facebook.com/photo.php?fbid=10157430489334794&id=786749793&set=a.10150829407484794&refid=52&__tn__=EH-R

'पद्मश्री' सारखा सन्मान मिळाल्यावर ही हरेकाला आपल्या लक्ष्यापासून हटला नाही. शाळेला मोठं करण्याचं त्याच काम आजही अव्याहतपणे सुरु आहे. खिशात एक दमडी नसताना शाळा उभारण्याचं स्वप्न बघून प्रत्येक गरीब मुलाला शिक्षणाच्या पायरीवर नेणाऱ्या हरेकाला हजब्बा ह्यांच कार्य एव्हरेस्ट इतकं मोठं आहे. त्याचं निष्पक्ष कार्य हे भारतातील प्रत्येकाला ज्या समाजातून आपण येतो त्या समाजाला काहीतरी परत देण्यासाठी नक्कीच उद्युक्त करेल. शिक्षण हे सर्वांसाठी, सर्वव्यापक असावं असं आपल्या साध्या वागणुकीतून, कर्तृत्वातून दाखवून देणाऱ्या हरेकाला हजब्बा ह्यांना माझा कडक सॅल्यूट आणि साष्टांग नमस्कार.

फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -*  
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_