twitter
rss

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 5⃣1⃣6⃣

*अनाथांची माय*

महाराष्ट्र टाइम्स | Updated: 03 Feb 2020.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या, देहविक्रय करणाऱ्या, अत्याचारग्रस्त महिलांच्या, तमाशा कलावंतांच्या, ऊसतोडणी कामगारांच्या आणि अनाथ मुलांचा स्वीकार करून त्यांचा आईच्या मायेने सांभाळ करण्याचे काम बीड जिल्ह्यातील कावेरी दीपक नागरगोजे बीडमध्ये करत आहेत.
बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील आर्वी गावात २०००मध्ये शांतीवन प्रकल्प सुरू करून कावेरी यांनी जवळजवळ ३०० अनाथ मुलांचे पालकत्व स्वीकारले. त्यातील १२५ मुली आहेत. तसेच या प्रकल्पात शाळेची उभारणी करून आज १००० मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांनी पेलली आहे. याशिवाय दहावीनंतर या मुलांना शिक्षणसंधी मिळाव्यात यासाठीही त्या प्रयत्न करत आहेत. मुलांना नवे आयुष्य देण्याबरोबरच अनेक अत्याचारग्रस्त तरुणी-महिलांच्या पुनर्वसनाचे कार्य त्या करत आहेत.
बाबा आमटे यांच्या कार्यातून प्रेरणा घेत कावेरी आणि दीपक नागरगोजे यांनी संस्थेची स्थापना केली. सुरुवातीला कावेरी यांना घरातून प्रचंड विरोध झाला, पण न डगमगता त्यांनी कार्य सुरू ठेवले. प्रारंभी नागरगोजे दाम्पत्याने दोन महिने बीड जिल्ह्याचा प्रत्येक कोपरा पालथा घालून त्याचा सखोल अभ्यास केला. सुरुवातीला कावेरी यांच्या छत्रछायेखाली ५१ मुले होती. कालांतराने संस्था सुरू झाली तेव्हा पुरेसे आर्थिक साहाय्य नव्हते. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असे. अशावेळी कावेरीताईंनी त्यांचे दागिने विकून आर्थिक पाठबळ उभे केले. मुलांच्या पुनर्वसनाबरोबरच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शाश्वत शेतीचा प्रकल्प त्यांनी सुरू केला. १०० शेतकऱ्यांना संघटित करून हा प्रकल्प पूर्णत्वास नेला. पूर्वी बीड जिल्ह्यातील शेतकरी किंवा कामगार यांच्या स्थलांतराचे प्रमाण ८५ टक्के होते ते प्रकल्पानंतर ६० टक्क्यांवर आले आहे. शांतीवनातील मुले उत्तम शिक्षण घेऊन पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर या ठिकाणी स्थायिक झाली आहेत. आता हे कमावते हातही संस्थेला मदत करण्यास पुढे सरसावले आहेत. कावेरीताईंना नातेवाईकांचा विरोध मावळला असून शांतीवनाचे कार्य ६५ एकर जागेत विस्तारले आहे. आज शांतीवनचा परीघ विस्तारत असताना कावेरीताई भक्कमपणे उभ्या राहून अनेकांच्या आधारवड होत आहेत.

https://m.maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/the-mother-of-the-orphans/articleshow/73879910.cms

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -*  
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_