twitter
rss

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣6⃣1⃣

*लक्ष्मणराव किर्लोस्कर आणि त्यांची वाडी*

🖋विलास शिंदे 12/09/2018

लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर यांचा जन्म 20 जून 1869 रोजी कर्नाटकात गुर्लहोसूर येथे झाला. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण धारवाड व कलादगी येथे झाले. त्यांनी घरच्यांच्या विरोधास न जुमानता चित्रकलेच्या अभ्यासक्रमाला मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्टस येथे प्रवेश घेतला; दोन वर्षें अभ्यासही केला. मात्र त्यांनी त्यांना त्या क्षेत्रात पुढे रंगांधळेपणामुळे जाता येणार नाही हे लक्षात येताच यंत्र अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण होताच ‘जिजामाता संस्थे’मध्ये बाष्प अभियांत्रिकीचे अध्यापक म्हणून नोकरी सुरू केली. त्यांना उपकरणे खोलून पुन्हा जोडण्याची सवय होती. त्यामुळे ते केवळ शिक्षकी पेशात रमले नाहीत. त्यांनी 1887 मध्ये मुंबईतून सायकली खरेदी करून त्या बेळगावमध्ये वडील बंधू रामण्णा यांच्या मदतीने विकण्यास सुरूवात केली.

त्यांनी इंग्लंडच्या मूळ सायकल उत्पादक कंपनीशी थेट करार केला. दरम्यान, त्यांना भारतीय म्हणून शिक्षण संस्थेत पदोन्नती नाकारली गेली आणि लक्ष्मणराव नोकरीचा राजीनामा देऊन बेळगावला आले. त्यांनी भावासह ‘किर्लोस्कर ब्रदर्स’ अशी कंपनी स्थापन केली. त्यांनी काही वर्षें विविध उद्योग केले. परदेशातून पवनचक्क्या आणूनही विकल्या. ते  लोकांना सायकल चालवण्यास शिकवायचे. त्यांनी लाकडाच्या खिडक्या आणि दरवाजे करून विकले. दरम्यान, त्यांनी औंध संस्थानिकांच्या घरातील कुलदैवताच्या मूर्तीला इलेक्ट्रोप्लेटिंगने मुलामा चढवून देण्याचे काम करून दिले.

त्यांनी भारतासारख्या कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांच्या कामी येतील अशी यंत्रे बनवण्याचे ठरवले. जनावरे वैरणीतील बुडख्याकडील मोठा भाग खात नाहीत आणि तो वाया जातो हे त्यांच्या लक्षात आले. त्यातून त्यांचे पहिले यंत्र तयार झाले ते कडबा कापण्याचे. जनावरांच्या चाऱ्यातून बुडखा वेगळा करणे आणि चाऱ्याचे बारीक तुकडे करून ते जनावरांपुढे टाकणे सोपे झाले. ते यंत्र लोकांच्या पसंतीस उतरले.

त्यांनी स्वत:ची कार्यशाळा उभारली. त्यांनी लोखंडाचे ओतीव नांगर बनवण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांना जागा व भांडवल, दोन्हीची गरज भासू लागली. औंध संस्थानने त्यांना दहा हजार रूपये आणि बत्तीस एकर जमीन देऊ केली. ती जागा म्हणजे संस्थानातील कुंडल या गावाजवळील ओसाड जमीन होती. जमिनीवर निवडूंग आणि सराटा यांचे साम्राज्य. लक्ष्मणरावांनी त्यांचा उद्योग त्या सलग जमिनीवर उभा केला. अडचणी अनंत होत्या. त्यांनी तरीही तेथे एक उद्योगनगरी उभी केली. तो परिसर किर्लोस्करवाडी म्हणून ओळखला जातो. ‘उद्यम नगरी’ किर्लास्कर वाडी!

तिच्या उभारणीचे काम 1910 साली सुरू झाले. ती औद्योगिक वसाहत जमशेदपूरनंतरची देशातील दुसऱ्या क्रमांकाची होती. बिहारमध्ये जमशेटजी टाटा यांच्या पोलाद कारखान्याचे जमशेदपूर उभारले गेले. त्यानंतर कै लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी त्यांच्या स्वत:च्या उद्योगसमूहासाठी स्वतंत्र नगरी उभारण्याचे स्वप्न पाहिले आणि त्यातून  ‘किर्लोस्करवाडी’चा जन्म झाला.

लक्ष्मणरावांनी कारखान्याजवळच कामगारांची राहण्याची सोयही केली. बेळगावहून येणारी जुनी यंत्रे आणि साहित्य कारखान्याच्या स्थळी आणली गेली. कारखाना उभारणीच्या काळात उघड्यावर स्वयंपाक आणि झोपण्यास धर्मशाळा असा सर्व प्रकार होता. कारखान्यात जातिभेदाची दरी तेथूनच मिटण्यास सुरूवात झाली. एकमेकांच्या चुलीशेजारी चुली मांडून स्वंयपाक बनू लागला. आपोआपच मने जुळत गेली आणि एकसंध साथीदारांची टीम त्यातून तयार झाली. निवारा, पाणी, अनंत अडचणी! मात्र निर्धार पक्का होता. हळुहळू उद्योग उभारत गेला आणि उत्पादन सुरू झाले. सुरुवातीला, रेल्वे लाइनच्या गळतीचे पाणी गोळा करून आणले जात असे. नंतर एका शेतकऱ्याच्या विहिरीवरून गाडीतून पाणी आणले जाई. त्यानंतर पाईपलाइनने पाणी आणून एका हौदात सोडले जाई. तेथून कामगार पाणी भरत. पांढऱ्या मातीच्या विटा पाडून घरे बांधून झाली. उत्पादन सुरू झाले. मात्र संकटे काही संपत नव्हती. त्यावर्षी जोरात पाऊस झाला आणि पांढऱ्या मातीत बांधलेली अनेक घरे पडली. कामगार बेघर झाले. पांढऱ्या मातीऐवजी लाल मातीतील विटा पाडणे आवश्यक असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यासाठी लाल मातीची जमीन विकत घेणे आवश्यक होते. त्यासाठी खर्च येणार होता.

लक्ष्मणरावांकडील गंगाजळी संपत आली. पुन्हा पंतप्रतिनिधींकडे पैसे मागण्यास मन तयार होईना. तेव्हा स्नेही रामभाऊ गिडे यांनी दहा हजार रूपयांची आर्थिक मदत दिली. लक्ष्मणरावांनी कारखाना सुरू केला. नांगराचे उत्पादन सुरू झाले. रब्बीच्या पिकानंतर मशागतीचा हंगाम आला आणि नांगराची विक्री जोरात सुरू झाली. नांगर भाड्याने देणे हाही फायद्याचा धंदा आहे हे काही चाणाक्ष मंडळींनी हेरले आणि मालाला उठाव मिळाला.

किर्लोस्करवाडीत सुरुवातीला फक्त पाण्याचे पंप बनत. किर्लोस्करांचे पंप इतके लोकप्रिय झाले की, पुढे ‘पंप म्हणजे किर्लोस्करांचे’ अशी ख्याती झाली. किर्लोस्करांनी त्यांच्या उत्पादनांचा पसारा पुढे वाढवला आणि डिझेल व विजेवर चालणाऱ्या पंपांबरोबर यांत्रिक नांगर, ट्रॅक्टर्स अशा शेती उत्पादनांसाठी लागणाऱ्या यंत्रांचीही निर्मिती तेथे सुरू झाली. कर्मचाऱ्यांना कामावर येण्या-जाण्यासाठी प्रवासाची यातायात करावी लागत नसल्याने त्यांच्या कामाची गुणवत्ताही वाढीस लागली. त्यांनी परिसरात शाळा, क्रीडांगणे, पोस्ट ऑफिस अशा सुविधा निर्माण केल्या आणि जणू एक गावच वसवले! मोठाले रस्ते, टुमदार प्रशस्त घरे, स्वच्छता व कर्मचाऱ्यांसाठी उद्याने, विद्यार्थ्यांसाठी शाळा-वाचनालय अशा सर्व सोयींनी सुसज्ज किर्लोस्करवाडी एक आदर्श नगर ठरले. लक्ष्मणराव स्वत:ही तेथे राहू लागले. त्यामुळे उद्योगाची भरभराट झाली.

लक्ष्मणरावांनी त्यांच्या नांगराच्या मूळ रचनेत बदल करून अधिक चांगला नांगर बनवला. त्यातच 1914 मध्ये पहिले महायुद्ध सुरू झाले आणि कच्चा माल, त्यातही लोखंड मिळेनासे झाले. त्यावर उपाय म्हणून विनावापर पडून असलेले लोखंडी साहित्य वितळवून नांगर बनवण्याचे कार्य सुरू ठेवले. रंगांचा कारखाना काढला. उद्योगाचे भाग भांडवल 1918 पर्यंत पाच लाख रूपये झाले. कंपनी शेअर मार्केटमध्ये उतरली. किर्लोस्कर समूहाने ऊसाचा रस काढण्याचे यंत्र, छिद्र पाडण्याचे मशीन अशी साधने तयार केली. हातपंपांची निर्मिती हे त्यांचे आणखी मोठे साध्य. एकूण वीस विविध प्रकारचे नांगर, दहा प्रकारचे हातपंप यांसह चाळीस उत्पादने कंपनीमार्फत बनू लागली. ती इंग्लंडच्या ऑईल कंपनीबरोबर करार (1920) करणारी पहिली भारतीय कंपनी. त्यातून ऑईल इंजिनचे उत्पादन सुरू झाले. त्या यंत्रामुळे किर्लोस्कर हे नाव समग्र शेतकरी वर्गाच्या हृदयावर कोरले गेले. कंपनी ऑईल इंजिन परदेशी निर्यात 1946 पासून करू लागली. त्यांचे चिरंजीव शंतनुराव ‍यांनी शिक्षण संपताच कंपनीच्या कार्यामध्ये लक्ष घातले. कंपनीचे भागभांडवल 2018 साली अडीच अब्ज डॉलर इतके आहे.

लक्ष्मणरावांना औंध संस्थानचे दिवाण म्हणून 1935 मध्ये नेमण्यात आले. त्यांच्या कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन भारत सरकारने 1969 मध्ये त्यांच्यावर पोष्टाचे तिकीट काढले.  शेती पिकावी, शेतकऱ्यांचे कष्ट कमी व्हावेत म्हणून आयुष्यभर कार्य करणाऱ्या त्या उद्योजकाचे 26 सप्टेंबर 1956 रोजी निधन झाले. त्यांनी कृषी उपकरणांच्या उत्पादनात उभारलेली कंपनी जगातील ऐंशी देशांत योगदान देत आहे.

‘किर्लोस्करवाडी’ हे स्टेशन मध्य रेल्वेवर बनले आहे. तेथे प्रवाशांप्रमाणे मालाची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. किर्लोस्करवाडी मराठी मनाचा काही काळ मानबिंदू बनून राहिली आहे.

🖋- विलास शिंदे

vilasshindevs44@gmail.com

(शेतीप्रगती, ऑगस्ट 2018 वरून उद्धृत)

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_