🎋शिक्षकांच्या जुन्या पेन्शनचा विषय मार्गी लावू*
By pudhari | Publish Date: Apr 24 2017
मिरज : शहर प्रतिनिधी
जुन्या पेन्शन योजनेबाबत शासनाकडे संयुक्त बैठक लावून प्रश्न मांडू, असे आश्वासन भाजपचे खासदार संजय पाटील, आमदार सुरेश खाडे यांनी आज येथे दिले.
जुनी पेन्शन हक्क संघटनेतर्फे येथील बालगंधर्व नाट्यगृहामध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी आमदार खाडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. पेन्शनची गरज दाखविणारा व्हिडीओ दाखविण्यात आला.
यावेळी खासदार संजय पाटील यांनी या प्रश्नांबाबत आपल्या शिष्टमंडळाची वित्तमंत्र्यांशी भेट घडवून जुन्या पेन्शनचा विषय मांडला जाईल असे सांगितले.
शिरोळचे आमदार उल्हास पाटील म्हणाले, सर्वांना शिकविणारा शिक्षक आपल्या पेन्शनच्या हक्कापासून वंचित आहे. लिहायला, बोलायला शिकविणार्या गुरुजींच्या समस्या राज्यातील किती आमदार मांडत आहेत? आज सत्ता कोणाची आणि कोण सत्ताधारी आहे, हे समजून घ्यायची वेळ येऊन ठेपली आहे. त्यासाठी शिक्षकांना एका झेंड्याखाली यावे लागेल. राज्यभरातील शिक्षकांच्या अंशदान कपातीच्या 600 कोट रुपयांचे काय झाले ते सांगावं, असा अनोखा आहेर सरकारला यावेळी त्यांनी केला.
माजी सभापती छायाताई खरमाटे म्हणाल्या, दुखणं ठसठसत असेल तरच संघटन जन्म घेते. समान काम, समान वेतन आणि समान पेन्शन हा शिक्षकांचा हक्क आहे. महाराष्ट्रात गुणवत्तेत तरुण शिक्षक आघाडीवर आहेत.
सर्जेराव सुतार म्हणाले, मृत कर्मचार्यांच्या सेवेसाठी 10 वर्षांची अट का? मरणाची अट का लावता? मृत्यू सांगून येत नाही, सेवा कितीही असताना 1 नोव्हेंबर नंतर मृत कर्मचार्यांना व कुटुंबियांना सर्व लाभ द्या. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे यांनी केले. मेळाव्यास मिरज पं. स. सभापती जनाताई पाटील, उपसभापती काकासाहेब धामणे, जि. प. सदस्य कोरबू यांच्यासह संघटना पदाधिकारी उपस्थित होते. ....
♻ कोल्हापूर जि.प.६५ शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या*
कोल्हापूर -जिल्हा परिषदेच्या शाळांतील ६५ प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या होणार आहेत. यामध्ये फक्त नाशिक जिल्ह्यातच ६१ शिक्षक बदलीने जात असून हे सर्व एस.टी. प्रवर्गातील आहेत. येत्या चार दिवसांत त्यांना बदलीचे आदेश दिले जाणार असून ८ मे रोजी त्यांना कार्यमुक्त केले जाणार आहे. मात्र आंतरजिल्हा बदलीने कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या सुमारे ७०० शिक्षकांच्या बदलीचा निर्णय अद्याप अधांतरीच आहे. याबाबत निश्चित निर्णय झालेला नाही.
राज्यात हजारो शिक्षक अनेक वर्षांपासून आंतरजिल्हा बदलीच्या प्रतीक्षेत आहेत. शेकडो-हजारो किलोमीटर अंतरावर शिक्षक काम करत आहेत. स्वतःच्या जिल्ह्यात बदलीने येण्यासाठी त्यांची नेहमीच धडपड सुरू आहे. राज्याच्या एका टोकाला पती तर दुसऱ्या टोकाला पत्नी सेवेत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. स्वतःचा जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यात नोकरी करत असलेल्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबत शासनाने अद्याप कोणतेही ठोस धोरण ठरविलेले नाही. राज्यस्तरावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून घेतले जाणार आहेत; मात्र अद्याप कार्यवाही झालेली नाही.
सध्या कार्यरत असलेल्या जिल्हा परिषदेने व बदलीने जाण्यास इच्छुक असलेल्या जिल्हा परिषदेने दिनांक ३१ डिसेंबर २०१६ पूर्वी ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. अशा शिक्षकांना कार्यमुक्त करण्याबाबत शासनाने आदेश दिले आहेत. त्यानुसार दोन्ही जिल्हा परिषदांचे ना हरकत प्रमाणपत्र असलेल्या ६५ शिक्षकांना कार्यमुक्त केले जाणार आहे. त्यामध्ये नाशिक जिल्हा ६३, लातूर व सातारा प्रत्येकी एक अशा ६५ जणांचा समावेश आहे. बदली होणारे बहुतांश शिक्षक हे शाहूवाडी, चंदगड आदी तालुक्यांत कार्यरत आहेत. याशिवाय कोल्हापूर जिल्ह्यातून सुमारे ३६० शिक्षक बाहेरच्या जिल्ह्यात बदलीने जाण्यास इच्छुक आहेत, तर इतर जिल्ह्यातून कोल्हापूर जिल्ह्यात बदलीने येणाऱ्या शिक्षकांची संख्या सुमारे ७०० इतकी आहे.
दोन्ही जिल्हा परिषदांचे ना हरकत प्रमाणपत्र असलेल्या शिक्षकांच्या बदल्या होत आहेत. उर्वरित आंतरजिल्हा बदली इच्छुक शिक्षकांबाबत अद्याप शासन निर्णय झालेला नाही. शासन आदेश येताच बदली प्रक्रिया सुरू केली जाईल.
- सुभाष चौगले, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃
🎯विद्यार्थ्यांना अखेर निर्वाह भत्ता!*
Updated Apr 23, 2017
मुंबई : मुंबईसह राज्यातील सरकारी वसतिगृहांतील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या निर्वाह भत्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अनेक दिवसांपासून हा निधी मिळत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली होती. मात्र समाजकल्याण विभागामार्फत दरमहा ८०० रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
राज्य सरकारच्या समाज कल्याण विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या वसतिगृहांतील विद्यार्थ्यांना विद्यालयीन खर्चासाठी दरमहा ८०० रुपयांचा निर्वाह भत्ता देण्यात येतो. मात्र समाज कल्याण विभागातील अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे वर्षभरापासून राज्यातील अनेक वसतिगृहांतील विद्यार्थ्यांना तो देण्यात येत नव्हता. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी प्रहार विद्यार्थी संघटनेने आंदोलन केले होते. तसेच समाज कल्याण सहआयुक्तांना निवेदन देऊन ‘भीक मांगो’ आंदोलनाचा इशारा दिला होता.
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃
🥀जूनमधील नेट परीक्षा रद्द होण्याची शक्यता*
By pudhari | Publish Date: Apr 24 ,2017
पुणे : प्रतिनिधी
जूनमध्ये होणार्या नेट परीक्षेचे नोटिफिकेशन एप्रिलमध्ये येत असते. एप्रिल महिना संपत आला तरी अजूनही ‘सीबीएससी’कडून नेट परीक्षेचे नोटिफिकेशन देण्यात आले नाही.
प्राध्यापक होण्यासाठी विद्यार्थी पूर्णवेळ वर्षभर अभ्यास करत असतात. नेट परीक्षेचे वेळापत्रक हे निश्चिच समजले जात असते. वर्षातून दोन वेळा म्हणजे जुलै आणि डिसेंबर महिन्यात ही परीक्षा होत असते. विद्यार्थी त्या दृष्टीने अभ्यासाची तयारी करतात. मात्र यंदा नेटचे नोटिफिकेशन सीबीएससीकडून जाहीर करण्यात आले नाही. साधारणपणे तीन महिने आधी हे नोटिफिकेशन सीबीएससी प्रसिद्ध करत असते. त्यामुळे एप्रिलमध्ये ते प्रसिद्ध होईल, अशी विद्यार्थ्यांची अपेक्षा होती. मात्र एप्रिल महिना संपण्यासाठी केवळ आठ दिवस बाकी असताना अजूनही नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले नाही. त्यामुळे जूनमध्ये नेटची परीक्षा होणार का याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃
🔖बनावट गुणपत्रक प्रकरणाचा क्राईम ब्रँचकडून तपास व्हावा*
By pudhari | Publish Date: Apr 23 ,2017
कोल्हापूर : प्रतिनिधी
कोल्हापूर विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर अज्ञातांनी निकाल पानावर अनधिकृतपणे आक्षेपार्ह नोंदी केल्याने संपूर्ण बनावट गुणपत्रक प्रकरणाचा क्राईम ब्रँचकडून तपास करून दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी मुंबईतील अधिकार फाऊंडेशनचे अध्यक्ष शकीलअहमद शेख यांनी मुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठवून केली आहे.
बारावीच्या काही परीक्षेच्या निकालातील गुणपत्रकांत आक्षेपार्ह नोंदी केल्याबाबतची माहिती मुंबईतील आरटीआय कार्यकर्त्याने बोर्डाला फोन, ई-मेलद्वारे कळविली. अज्ञातांनी मंडळ संकेतस्थळावरील निकाल पानावर अनिधकृतपणे आक्षेपार्ह नोंदी करून संपूर्ण बनावट गुणपत्रक तयार केल्याचे आढळल्यानंतर विभागीय शिक्षण मंडळाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास सायबर सेलकडे देण्यात आला आहे.
दरम्यान, मुंबईतील एका आरटीआय कार्यकर्त्याने याबाबतचा तक्रार अर्ज पोलिस अधीक्षक महादेव तांबडे यांच्या नावे पाठविला. तांबडे यांनी ही माहिती राजारामपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अमृत देशमुख यांनी कळविली. देशमुख यांनी संबंधित व्यक्तीस सर्व कागदपत्रे घेऊन कोल्हापुरात तक्रार दाखल करण्यास या, असे सांगितले आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी तांबडे यांनी सायबर सेलला सूचना दिल्या आहेत.
या अनुषंगाने वेळोवेळी घडणार्या घटनांची माहिती पोलिसांनी बोर्डाला द्यावी, असे फिर्यादेत म्हटले आहे. बोर्डाच्या कार्यालयात संकेतस्थळाचे काम पाहणार्या अधिकारी, कर्मचार्यांना सायबर सेलने मागितलेली माहिती तत्काळ देण्याचे आदेश दिले आहेत. यात बोर्डाचे अधिकारी व कर्मचार्यांचा सहभाग असेल असे वाटत नाही. पोलिसांच्या तपासावरच कारवाईची पुढील दिशा ठरेल, अशी माहिती कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व्ही. बी. पायमल यांनी दिली.
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃
👨👩👦👦 अंकलगी येथील अंगणवाडीतील बारा मुलांना विषबाधा*
By pudhari | Publish Date: Apr 24 2017
माडग्याळ : वार्ताहर
अंकलगी (ता. जत) येथील अंगणवाडीत गुरूवारी दुपारी दिलेल्या खाऊत पाल पडल्याने बारा मुलांना व एका पालकाला विषबाधा झाली होती.त्यानंतर सर्वांना संख येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करून औषधोपचार केल्यानंतर घरी सोडण्यात आले.
यामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. तसेच येथील अंगणवाडीला सरस्वती महिला बचत गट आहार पुरवठा करत होते, त्यांना आहार बंद करण्याची नोटीस देण्यात आली असल्याचे महिला बालविकास अधिकारी वाय. एच. मकानदार यांनी सांगितले.
अंकलगी (ता. जत) येथे अंगणवाडीत गुरूवारी दुपारी दिलेल्या भातात पाल पडल्याने अंगणवाडीतील बारा लहान मुलांना विषबाधा झाली होती. तसेच एका पालकालाही विषबाधा झाली होती. त्यामुळे सर्व मुलांना उलट्या, मळमळणे चालू झाल्यामुळे संख येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यामध्ये प्रवीण रायाप्पा मांग ( वय 4), प्राची रायाप्पा मांग ( वय 5), गुरूराज संतोष भातमाने ( वय 5), संकेत सिध्दराम वालेकर ( वय 8), ग़ुडमा मुल्ला ( वय 5), सादिक मुल्ला ( वय 6), संपत सतीश आवटी ( वय 5), आयना रझाक शेख ( वय 7), अंबुजा सय्यद नदाफ ( वय 7), लालबी लालसाब मुल्ला ( वय 7), सिमरन आप्पासाब नदाफ ( वय 7), सुहाना आप्पासाब नदाफ ( वय 7) यांच्यावर संख येथे उपचार करण्यात आले. संख येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एस ए. व्हनखंडे यांनी सर्व मुलांवर उपचार करून त्यांना घरी पाठविले .
अंकलगी येथे सरस्वती महिला गटामार्फत अंगणावाडीला आहार पुरविला केला जात होता. याविषयी महिला बालविकास अधिकारी वाय. एच. मकानदार यांना या घटनेबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांना आहार करताना दक्षता घेण्याबाबतपण सूचना केलेल्या आहेत.आहार पुरवठा करणार्या अंकलगी येथील सरस्वती महिला बचत गटाला आहार बंद करण्याबाबतची नोटीस दिली आहे.
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃