twitter
rss

📋मूल्यमापन चाचणी सुरळीत*

Maharashtra Times | Updated Apr 7, 2017

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेतर्फे घेण्यात येणाऱ्या संकलित मूल्यमापन चाचणीचा दुसरा म्हणजे गणिताचा पेपरही शुक्रवारी मुंबईतील शाळांमध्ये सुरळीत पार पडला. राज्य शिक्षण मंडळासह इतर मंडळांच्या शाळांमध्येही हा पेपर घेण्यात आल्याची माहिती अनेक मुख्याध्यापकांनी दिली.
राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेतर्फे घेण्यात येणारी मूल्यमापन परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार गुरुवारपासूनच होणार असल्याचे शिक्षण विभागाने जाहीर केले होते. त्यातच आठवीचा पेपर फुटल्याने या परीक्षेला यंदा पुन्हा गालबोट लागले होते. त्यामुळे ही परीक्षा सुरळीत पार पडते की नाही याकडे सर्वांचे लक्ष होते. अखेर शुक्रवारी गणिताचा पेपर सुरळीत पार पडला असून मुख्याध्यापक आणि शिक्षण विभागाने सुटकेचा नि:श्वास सोडला. या पेपरफुटीप्रकरणी शिक्षण उपसंचालक विभागाने पोलिस तक्रार केल्यानंतर अनेक शाळांचे धाबे दणाणले आहे. पोलिसांनी गुरुवारी झेरॉक्स मालकांची चौकशी केल्यानंतर काही शाळांचीही चौकशी केली असल्याचे समजते.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

🎋विनाअनुदानित शाळांनाही मिळणार अनुदान*

मुंबई : राज्यात गेल्या १५ वर्षांपासून विनाअनुदानित तत्त्वावर असलेल्या शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सरसकट २० टक्के अनुदान मंजूर करण्याचा धोरणात्मक निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे १४ जून २०१६पूर्वी अनुदानास पात्र घोषित करण्यात आलेल्या १ हजार ६२८ शाळा व २ हजार ४५२ तुकड्यांमधील १९ हजार २४७ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना २० टक्के अनुदानाचा लाभ मिळेल, अशी माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली.
विनाअनुदानित तत्त्वावर सुरू असलेल्या शाळा अनुदानासंबंधीची लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या वेळी उत्तर देताना तावडे म्हणाले की, शासन निर्णयातील निकषानुसार ही प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येईल.

शिक्षकांना न्याय मिळाला पाहिजे, हेच सरकारचे उद्दिष्ट आहे. या प्रक्रियेनुसार आतापर्यंत १ हजार १७८ शाळांमधील १ हजार ३१६ तुकड्यांची अनुदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
१ व २ जुलै २०१६ रोजीच्या शासन निर्णयानुसार मूल्यांकनात पात्र घोषित करण्यात आलेल्या शाळांना अनुदान उपलब्ध करून देण्याबाबत व उर्वरित शाळांना मूल्यांकनात पात्र घोषित करण्याबाबत सकारात्मक कार्यवाही सुरू आहे. ही प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येईल, असेही तावडे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. (प्रतिनिधी)

*लक्षवेधी सूचना*

शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, श्रीकांत देशपांडे, विक्रम काळे आदी सदस्यांनी विनाअनुदानित तत्त्वावर सुरू असलेल्या शाळांच्या अनुदानासंबंधीची लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

🍛शालेय पोषण आहाराची एसआयटी चौकशी*

By pudhari | Publish Date: Apr 8 ,2017

मुंबई : प्रतिनिधी

शालेय पोेषण आहार योजनेत प्रचंड भ्रष्टाचार असून केवळ चार-पाच ठेकेदारांना पोसण्यासाठी ही योजना चालवली जात असल्याचा आरोप विधानसभेत बहुतेक सदस्यांनी केला. या पार्श्‍वभूमीवर गेल्या दहा वर्षांतील या योजनेची एसआटीमार्फत चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली.

यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडताना प्रकाश अबिटकर यांनी योजनेचे फॉर्म्स या चार-पाच मंडळींशिवाय कोणी भरूच नयेत, असे आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात एम. पी. भुतडा या ठेकेदाराला योजना राबविण्यासाठी देण्याकरीता टेंडरच्या अटीत बदल करण्यात आला.  शिक्षण विभागाला आता शिकवण्यात नाही तर शिजविण्यात रस वाटू  लागला आहे. ज्या मार्केटिंग व कन्झ्युमर्स  फेडरेशनकडून योजना चालविल्याचे सांगण्यात येते त्यांच्या उपविधीत याची तरतूद नाही. ते उपठेकेदार नेमून ती राबवत असल्याचे सांगितले.

बाजारात तुरडाळीचा दर 60ते 65 रुपये असताना ती 165 रुपये किलो दराने खरेदी केली जात असल्याचे अबिटकर यांनी निदर्शनास आणले. शिक्षण संचालकांच्या आशीर्वादाने चाललेला हा ठेकेदारीचा धंदा बंद कधी करणार? असा सवाल त्यांनी केला. एकनाथ खडसे यांनी तर सरकारचे वस्त्रहरणच केले. अबिटकर सांगतात त्यामध्ये तथ्य असल्याचे सांगताना खडसे म्हणाले की, याबाबत आपणही तक्रार केली. कोल्हापूरप्रमाणेच अन्यत्रही प्रकार घडले आहेत. या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी खडसे यांनी केली. सुनील प्रभू ,अतुल भातखळकर, सुभाष साबणे, डॉ. जयप्रकाश मुंदडा यांनीही या चर्चेत मुद्दे मांडत योजनेच्या अंमलबजावणीचे वाभाडे काढले.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

🎋ठाणे : इमारतीचा स्लॅब कोसळल्‍याने शिक्षक जखमी*

By pudhari | Publish Date: Apr 7 ,2017

ठाणे : प्रतिनिधी

तकळवा पूर्व येथील आनंदनगर परिसरातील ठाणे महानगर पालिकेच्या शाळेमध्ये वर्गात शिक्षक मुलांना शिकवत असताना इमारतीचा स्लॅब कोसळल्याने शिक्षक जखमी झाल्याची घटना घडली आहे.

शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास कळवा परिसरातील आनंदनगर येथील ठाणे महानगर पालिकेच्या शाळा क्रमांक २७ येथे ही घटना घडली. शिक्षक विकास चव्हाण हे इयत्ता ७ वीच्या वर्गामध्ये शिकवत असताना इमारतीचा स्लॅब त्यांच्या खांद्यावरती पडला. त्यामुळे ते जखमी झाले आहेत. शिक्षक खासगी डॉक्टरकडे उपचार घेत आहेत. ही घटना घडल्‍यावेळी प्रथम शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वर्गाच्या बाहेर काढले. त्यामुळे विद्यार्थी बचावले. 

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज 🍃🍂🍃

🌿आश्रमशाळांत काळजीवाहक*

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यातील विमुक्त जाती भटक्या जमातीतील मुलींच्या आश्रमशाळेत सुरक्षिततेसाठी महिला काळजीवाहक नेमण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
बीड जिल्ह्यातील सिंदफणा प्राथमिक आश्रमशाळेतील वसतिगृहात विद्यार्थिनींवर झालेल्या लैंगिक छळासंदर्भात आमदार सतीश चव्हाण यांनी विधान परिषदेत ९३ अन्वये सूचना उपस्थित केली होती. त्यांच्या सूचनेला मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तर दिले आहे. बीड जिल्ह्यातील सिंदफणा गावातील प्राथमिक आश्रशाळेत पहिली ते सातवीच्या वर्गात ३०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आश्रमशाळेला सामाजिक न्याय विभागाकडून अनुदान मिळते. या आश्रमशाळेच्या वसतिगृहात ३० मुली राहत असून, तेथे महिला अधीक्षक; तसेच एकही महिला कर्मचारी नसल्याचा मुद्दा आमदार चव्हाण यांनी सूचनेद्वारे उपस्थित केला होता. त्यामुळे मुलींच्या वसतिगृहात रात्रीच्या वेळी कार्यरत असलेले शाळेतील पुरूष शिक्षक मद्यपान करून मुलींचा लैंगिक छळ करत असल्याची घटना घडली आहे. वसतिगृहातील काही मुलींनी लेक लाडकी अभियानाच्या कार्यकर्त्यांमार्फत महिला कल्याण विभागाकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली होती, मात्र यावर अद्यापही कोणतीच कारवाई झाली नसल्याचे वसतिगृहातील मुलींमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून मुलींचा लैंगिक छळ करणाऱ्या दोषी शिक्षकांवर तात्काळ कडक कारवाई करावी; तसेच शासनाने मुलींच्या वसतिगृहांत तात्काळ महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी आमदार चव्हाण यांनी केली होती.

आमदार चव्हाण यांच्या सूचनेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी लेखी उत्तर दिले असून, राज्यातील विमुक्त जाती भटक्या जमातीतील मुलींच्या आश्रमशाळांत सुरक्षिततेसाठी महिला काळजीवाहक नेमण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. आश्रमशाळांतील मुला-मुलींच्या सोयी-सुविधेवर देखरेखीसाठी प्रत्येक जिल्ह्यात नामांकित व्यक्तींचा सहभाग असलेली पालक समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव देखील शासनाच्या विचाराधीन असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

*आश्रमशाळेची मान्यता रद्द*

विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय व विशेष मागास प्रवर्ग संचालनालयाच्या आयुक्तांनी सुनावणीअंती सिंदफणा येथील आश्रमशाळेची मान्यता ३ मार्च २०१७ रोजी रद्द केली असून, याप्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्यात आली अाहे. समितीमार्फत सखोल चौकशी करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃