🎋 शिक्षकांचा गुरुवारी सांगलीत मोर्चा*
By pudhari | Publish Date: Apr 23 2017
सांगली : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षण, शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न आणि नवीन बदली धोरण या विरोधात राज्यभर प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने आंदोलन सुरू आहे. सांगली जिल्ह्यातही गुरुवारी ( दि. 27 ) रोजी दुपारी दोन वाजता त्रिकोणी बागेपासून जिल्हा परिषद, राम मंदिर, स्टेशन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगली जिल्हा समन्वय समितीचे निमंत्रक, शिक्षक समितीचे जिल्हा सरचिटणीस बाबासाहेब लाड यांनी सांगितले.
ते म्हणाले, प्राथमिक शिक्षण व शिक्षकांच्या प्रलंबीत प्रश्नांची सोडवणूक व्हावी आणि 27 फेब्रुवारी 2017 च्या शिक्षक बदली धोरणामुळे शाळेच्या गुणवत्तेवर आणि शिक्षकांच्या स्थैर्यावर परिणाम होणार आहे. याकरिता सर्व संघटनांची बैठक घेण्यात आली. यावेळी शिक्षक समितीचे राज्यकोषाध्यक्ष किरणराव गायकवाड, जिल्हाध्यक्ष सयाजीराव पाटील, शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष हंबीरराव पवार, जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे, जगन्नाथ कोळपे, अविनाश गुरव, पदवीधर संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव भोसले, भास्कर यादव, शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष महेश शरनाथे, कृष्णा पोळ, पुरोगामी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मारुती शिरतोडे, उर्दू संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुश्ताक पटेल, पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे, नेताजी भोसले यांनी जिल्ह्यातील मोर्चा यशस्वी करण्यासाठी नियोजन केले आहे. राज्य शासनाचे प्राथमिक शिक्षण, विद्यार्थी, पालक, शिक्षक विरोधी धोरणामध्ये बदल करावा अन्यथा नाईलाजाने तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने घेण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे बाबासाहेब लाड यांनी सांगितले. यावेळी सतीश पाटील, शशिकांत बजबळे, सुनील गुरव, सचिन खरमाटे, सलीम मुल्ला, हरीभाऊ गावडे, श्रेणिक चौगुले, राजाराम शिंदे, कुबेर कुंभार आदि विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃
📚आता पुस्तके वाचण्याऐवजी 'ऐका'*
म. टा. प्रतिनिधी, पुणे
इयत्ता आठवी आणि नववीची संस्कृत विषयाची नवीन पाठ्यपुस्तके सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीने अधिक आकर्षक तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. पाठ्यपुस्तके तयार करताना प्रथमच ‘क्यूआर कोड’चा वापर करण्यात येणार आहे, असे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचे (बालभारती) संचालक सुनील मगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
या पाठ्यपुस्तकांचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे संस्कृत भाषेची पुस्तके पूर्णपणे संस्कृतमधूनच तयार करण्यात आली आहेत. पुस्तकामध्ये शब्दांचे अर्थ व इतर माहिती संस्कृत व्यतिरिक्त इतर भाषांतून देणे आवश्यक आहे. मात्र, अशा ठिकाणी ही माहिती शिक्षक आणि पालकांच्या सोयीसाठी ‘क्यूआर कोड’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने उपलब्ध करुन दिली जाईल. याद्वारे एखादा पाठ्यपुस्तकातील भाग व्हिडिओ किंवा ऑडिओवर रेकॉर्ड करून तो मोबाइलद्वारे विद्यार्थी व पालकांना पाहता अथवा ऐकता येईल. संस्कृत भाषा समितीने ही पुस्तके तयार केली आहेत, असे मगर यांनी सांगितले.
नवीन पाठ्यपुस्तके सोप्या, सुटसुटीत, चित्रमय, रंगीत, आकर्षक स्वरुपात तयार करण्यात येत आहेत. स्वयं अध्ययन, कृतियुक्त मूल्यमापन, ज्ञानरचनावाद अशा आधुनिक शैक्षणिक संकल्पना या पाठ्यपुस्तकात प्रत्यक्षात आणल्या आहेत. विद्यार्थ्यांची भाषिक कौशल्ये विकसित करण्यासाठी संभाषण पद्धतीने या पाठ्यपुस्तकांची रचना केली आहे. पाठ्यक्रमातील कथा, गीते, संवाद आणि स्वाध्याय यातून भाषा शिकण्याचा आनंद घेत विद्यार्थी भाषिक कौशल्ये आत्मसात करतील. संपूर्ण व संयुक्त पाठ्यक्रमांमध्ये अध्ययन पद्धतीची समानता आणली आहे. याचा लाभ विद्यार्थी व शिक्षकांना होणार असल्याचे मगर यांनी सांगितले.
🎨 कला शिक्षकांचे प्रश्न सोडविणार*
By pudhari
सांगली : प्रतिनिधी
विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडविण्यात कला शिक्षकांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन मागण्या मान्य करण्यासंदर्भात प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन खासदार संजय पाटील यांनी दिले.
येथील शांतिनिकेतन विद्यापीठात महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ, पुणे व सांगली जिल्हा कलाध्यापक संघ, सांगली यांच्यावतीने दोन दिवस चालणार्या 38 व्या राज्यस्तरीय कलाशिक्षण परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार भगवानराव साळुंखे उपस्थित होते.
खासदार पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत कला शिक्षकांचे खूप मोठे योगदान आहे. परंतु सध्या शासनाने त्यांना अतिरिक्त ठरवून त्यांना कमी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. तसेच माध्यमिक पातळीवर कला व क्रीडा विभागच बंद करण्याचा विचार सुरू आहे. परंतु कला शिक्षक हा महत्वाचा घटक आहे. त्यांच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कलेची आणि शिक्षणाची गोडी विद्यार्थ्यांना लागत असते.
यावेळी आमदार सुधीर गाडगीळ यांनी सांगलीच्या कला परंपरेचा उल्लेख करून कलाशिक्षकांचे मोठे योगदान असल्याचे सांगितले. त्यासाठी कला शिक्षकांच्या मागण्यासंदर्भात पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी ज्येष्ठ कला शिक्षक भीमाशंकर शेंडगे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच समिता पाटील, कलाविश्वचे प्राचार्य बाळासाहेब पाटील व सुरेंद्र जगताप यांचा सत्कार करण्यात आला.
जिल्हाध्यक्ष श्रीकांत माळी यांनी स्वागत केले. राज्याध्यक्ष पी. आर. पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी गौतम पाटील, एम. ए. कादरी, हिरामण पाटील, धनंजय इंगळे, प्रकाश गुदले, वंदना हुळबत्ते आदीसह राज्यातील कला शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपाध्यक्ष दादा भगाटे यांनी आभार मानले.
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃
🎋शाळांच्या लुटमारीविरुद्ध पालक आक्रमक*
By pudhari | Publish Date: Apr 23 2017
पुणे : लक्ष्मण खोत
शासनाच्या शुल्क नियंत्रण समितीच्या पूर्व परवानगीशिवाय फी वाढ करण्यास सर्व शाळांना मनाई केली असतानाही शासनाचे आदेश धाब्यावर बसवून इंग्रजी शाळा भरमसाठी फी वाढ करीत आहेत. तसेच स्वत:कडील शालेय साहित्य खरेदीसाठी विद्यार्थी आणि पालकांना सक्ती करीत आहेत. याबाबत आक्रमक होत पालकांनी तब्बल 17 शाळांविरोधात शिक्षण विभागाकडे तक्रार केली आहे. आता या शाळांविरोधात प्रशासन काय भूमिका घेणार याचे औत्सुक्य आहे.
न्यायालयाच्या निर्देशानुसार शुल्क नियंत्रण पूर्व परवानगीशिवाय कुठल्याही विनाअनुदानित शाळांना शुल्क वाढ करता येत नाही; परंतु प्रवेश अर्ज, शैक्षणिक-सांस्कृतिक उपक्रम, प्रश्नपेढी, पालकसभा अशा विविध सबबी पुढे करून बेकायदेशीर शुल्कवसुली केली जात आहे.
शहरांसह जिल्ह्यातील अनेक खाजगी विनाअनुदानित शाळांकडून बेकायदेशीरपणे फी वाढ केली जात आहेत. तसेच अनेक शाळांकडून विद्यार्थ्यांना लागणार्या पुस्तकांसह इतर शालेय साहित्य खरेदी करताना ठराविक ठिकाणांहून घेण्याची सक्ती केली जात आहे. शहरातील अशा तब्बल 17 शाळांविरोधात पालकांनी शिक्षण विभागाकडे वारंवार तक्रारी दिल्या आहेत. यामध्ये शालेय साहित्य खरेदी प्रकरणी पालकांना वेठीस धरणार्या शाळांचा समावेश जास्त आहे. शिक्षण विभागाकडे तक्रारी प्राप्त झालेल्या शाळांमध्ये शहरातील शाळांची संख्या जास्त आहे. दरवर्षी शाळेच्या फी मध्ये भरमसाठ वाढ करून तसेच पालकांना शालेय साहित्याच्या खरेदीत सक्ती करून अनेक शाळांकडून पालकांची लूट केली जात आहे. मात्र, तक्रारी करूनही संबंधित शाळांवर कारवाईस होणार्या विलंबाप्रकरणी गेल्या दोन दिवसांपासून पालकांनी शिक्षण विभागाला धारेवर धरले आहे. त्यामुळे संबंधित शाळांची चौकशी करून त्यावर आवश्यक ती कारवाई करण्याचा आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत; परंतु प्रत्यक्षात अद्यापपर्यंत कोणत्याही शाळेवर कारवाई झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शाळांद्वारे पालकांची होणारी लूट थांबणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज 🍃🍂🍃