twitter
rss

🌿फीवाढीविरोधात पालकांचा एल्गार*

By pudhari | Publish Date: Apr 18 2017

मुंबई : प्रतिनिधी

खासगी शाळांच्या वाढत्या फीवाढीला विरोध करण्यासाठी मुंबईतील पालक एकत्र येणार आहेत. खाजगी शाळा अव्वाच्या सव्वा फीवाढ करीत असून ही फी वाढ नियमानुसार नाही. अनेक खाजगी शाळांनी तब्बल 25 टक्के फीवाढ केली आहे. वाढत्या फीविरोधात सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येत्या 20 एप्रिल रोजी आझाद मैदानात आंदोलन करण्यात येणार आहे.

मुंबई शहरातील आणि उपनगरांतील अनेक शाळा प्रशासनाने फीवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. बुक, स्टेेशनरी, क्रीडा साहित्य, फेरप्रवेश आदी नावाने पालकांची लूट केली जात आहे. त्यामुळे या फी वाढीविरोधात अनेक पालकांनी बंड पुकारले असून फीवाढीला विरोध करण्यासाठी फोरम फॉर फेअरनेस एज्युकेशनतर्फे पालकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मुंबईतील युनिवर्सल हायस्कूल, लोखंडवाला इंटरनॅशनल हायस्कूल, सिस्टर निवेदिता, गरोडिया हायस्कूल, ठाकूर इंटरनॅशनल, आयईएस सारख्या अनेक शाळांत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या पालकांनी सहभाग घेत या शाळांनी केलेल्या फी वाढीचा विरोध केला होता. त्यानुसार या फी वाढीच्या निर्णयाविरोधात जनआंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

लोखंडवाला इंटरनॅशनल हायस्कूलने तब्बल फेरप्रवेशाच्या नावाखाली पालकांकडून फी उकळत आहे. फेर प्रवेश घेण्यासाठी तब्बल 55 हजार रुपये भरण्याची सक्ती ही शाळा करीत आहे. तसेच ठाकूर इंटरनॅशनल हायस्कूल मध्येही 12 टक्के फी वाढ केली आहे.  तर युनिव्हर्सल हायस्कूल मध्येही 12 टक्के वाढ केली आहे. अनेक शाळा बुक आणि स्टेशनरीच्या नावाने पालकांची लूट करत आहेत. वह्या-पुस्तक, गणवेशासाठी पालकांकडून अधिक पैसे आकारले जात आहेत. अशी माहिती फोरम फॉर फेअरनेस एज्युकेशनचे अध्यक्ष जयंत जैन यांनी दिली.

शैक्षणिक वर्षासाठी नव्याने फी आकारणी केली जात आहे. यासंदर्भात रितसर तक्रारीचे निवेदन आम्ही शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले आहे. यासंदर्भात कारवाई करु असे आश्‍वासनही शिक्षणमंत्र्यांनी दिले आहे. आम्ही शिक्षणमंत्र्यांच्या चौकशीची वाट पाहत आहे. तसेच त्यांचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करत असल्याचे फोरम फॉर फेअरनेस एज्युकेशनचे अध्यक्ष जयंत जैन यांनी सांगितले.

पालकांची यातून लूट

गेल्यावर्षीच्या फी मध्ये तब्बल 25 टक्के वाढ खाजगी शाळांकडून केली जात आहे. त्याचबरोबर प्रामुख्याने शालेय साहित्याच्या विक्रीतून पालकांची लूट चालवली आहे. फी रेग्यूलर अ‍ॅक्टमध्ये दोन वर्षानी फी मध्ये वाढ करावी असे असतानाही पालकांची लूट होत आहे. अनेक शाळांत दुसर्‍या वर्गात विद्यार्थी जाताना फेर प्रवेशाच्या नावाने 55 हजार रुपयेही घेतले जात आहेत अशी तक्रारी येत आहेत.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

🌱उत्तरपत्रिका न तपासताच विद्यार्थी उत्तीर्ण*

Maharashtra Times | Updated Apr 18, 2017

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या फेब्रुवारी-मार्च २०१५ मध्ये घेतलेल्या विज्ञान शाखेतील प्रथम वर्षाच्या पदवी परीक्षेतील गणित विषयाच्या उत्तरपत्रिका न तपासताच प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले आहे. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंतला ही घटना घडली आहे. या घटनेमुळे विद्यापीठाच्या प्रशासनाचा आणि प्रामुख्याने परीक्षा विभागाचा अनागोंदी कारभार समोर आला असून, या प्रकाराने त्यात आणखी भरच पडली आहे. दरम्यान, नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कमध्ये देशात १० वे स्थान मिळालेल्या विद्यापीठाच्या या कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
पिंपळगावमध्ये प्राध्यापकाच्या पत्नीने उत्तरपत्रिकांचा गठ्ठा रद्दी म्हणून एका रद्दीवाल्याला विकायला दिला. त्यानंतर स्थानिक युवासेनेच्या पदाधिकारी दीपक गोसावी यांनी उत्सुकतेपोटी या उत्तरपत्रिकांची पाहणी केली. त्या वेळी गोसावी यांच्या लक्षात आले की, प्राध्यापकांनी बीएस्सी प्रथम वर्षाच्या पदवी परीक्षेतील गणित विषयाच्या उत्तरपत्रिकांची तपासणीच केली नसून सरळ त्यावर उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक गुण दिले आहेत. हे गुण एकूण गुणांच्या एका रकान्यात लाल शाईने लिहिण्यात आले आहे. त्यामुळे उत्तरपत्रिकांची तपासणी न होताच शेकडो विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. संबंधित उत्तरपत्रिका या एका नामवंत कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या असण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच, या प्रकरणात संबंधित कॉलेज प्रशासनातील अधिकारी आणि प्राध्यापक असण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका या तपासणी झाल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाकडे द्याव्या लागतात आणि काही कालावधीसाठी सांभाळाव्या लागतात. तसेच, उत्तरपत्रिका तपासणी झाल्यानंतही त्या प्राध्यापक किंवा कॉलेज प्रशासनाकडे ठेवण्याचे काही एक अधिकार नाहीत. असे असतानाही प्राध्यापकाच्या घरी त्या उत्तरपत्रिका राहिल्याच कशा, अशी विचारणा होत आहे. मात्र, विद्यापीठाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, कॉलेजच्या प्राचार्यांची विचारपूस सुरू केली आहे. दरम्यान, या प्रकरणाची विद्यापीठाच्या विभागीय कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली असून चौकशीची मागणी केली आहे. पिंपळगावमध्ये सापडलेल्या उत्तरपत्रिका या विद्यापीठाच्या आहेत की कॉलेजच्या, याबाबत चाचपणी केली जात आहेत. या संपूर्ण प्रकाराच्या अधिक माहितीबाबत कॉलेजच्या प्राचार्यांबाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, तो होत नाही. त्यामुळे अद्याप याबाबत ठोस सांगता येणार नाही, असे विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अशोक चव्हाण यांनी सांगितले.

व्हाइटनर लावून खाडाखोड

विद्यापीठाच्या या उत्तरपत्रिकांच्या पहिल्या पानावर थेट विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करणारे केवळ गुणच लिहिले आहे. तसेच, काही उत्तरपत्रिकांवर गुणही लिहिले नाही. काही उत्तरपत्रिकांमध्ये गणिताच्या विविध समीकरणांमध्ये व्हाइटनर लावून खाडाखोड करण्यात आली आहे. त्याचा उद्देश उत्तर बदलण्यासाठी केला आहे.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

♻शिक्षकांच्‍या आंतरजिल्हा बदलीसाठी ऑनलाइन प्रक्रिया*

सकाळ वृत्तसेवा
03.45 AM

सातारा - आंतरजिल्हा बदलीसाठी प्रतीक्षेत असलेल्या प्राथमिक शिक्षकांची ऑनलाइन बदली प्रक्रिया यावर्षीपासून सुरू झाल्याने शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. इतर जिल्ह्यांत बदलीसाठी कराव्या लागणाऱ्या कसरती आणि वशिला प्रकाराला यामुळे आता आळा बसणार आहे.

आंतरजिल्हा शिक्षक बदलीबाबत ज्या त्या जिल्हा परिषदेच्या धर्तीवर विचार होत असल्याने अनेक शिक्षकांना परजिल्ह्यात काम करण्यावाचून पर्याय उरत नव्हता. आंतरजिल्हा बदली केवळ नावापुरतीच राहिली होती. या प्रक्रियेत बदल करीत शासनाने ऑनलाइन प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच त्याबाबतचा अध्यादेश काढला जाणार असून, ही प्रक्रिया राबविली जाईल, असा अंदाज प्राथमिक शिक्षण विभागातून वर्तविला.

यापूर्वी आंतरजिल्हा बदलीसाठी संबंधित शिक्षकास मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे ना हरकत प्रमाणपत्र मिळवावे लागत होते. समोरील जिल्ह्याच्या सीईओंनी होकार दिल्यास संबंधित शिक्षकांस रुजू करून घेतले जात असे. दोन्ही सीईओंचे ना हरकत प्रमाणपत्र घेताना शिक्षकांना अनेक कसरती कराव्या लागत होत्या. त्याशिवाय राजकीय वशिलाही वापरावा लागत असे.

ग्रामविकास मंत्रालयाने आता या प्रक्रियेत बदल करीत संबंधित प्रक्रिया ऑनलाइन करण्यास गती दिली आहे. संबंधित शाळेच्या पोर्टलवर शिक्षकाची माहिती भरली जाईल. मुख्याध्यापकांनी ही माहिती गटशिक्षणाधिकाऱ्यांना पाठवायची आहे. गटशिक्षणाधिकारी ही माहिती जिल्ह्याचे शिक्षणाधिकाऱ्यांच्या लॉग इनवर पाठवतील. जिल्ह्याची माहिती शिक्षणाधिकाऱ्यांकडून विभाग आणि राज्याच्या लॉग इनवर दिली जाणार आहे.

शासनाच्या ई-गव्हर्नन्स धोरणानुसार आता शाळेची परिपूर्ण माहिती ही शालार्थ, सरल आणि संचमान्यता पोर्टल यावर भरण्यात आलेली आहे. या माहितीमुळे आता आंतरजिल्हा बदलीची प्रक्रियाही सोपी होणार आहे. आंतरजिल्हा बदलीसाठी आता राज्यातून एकाच वेळेस ऑनलाइन प्रक्रिया सुरू होणार आहे.

खुल्या वर्गास वेट ॲण्ड वॉच
दोन्ही सीईओंचा ना हरकत दाखला मिळाला आहे, अशा शिक्षकांना ता. आठ मेपर्यंत मुक्‍त करावे, असे शासनाने पत्र दिले आहे. त्याचा फायदा जिल्ह्यातून बाहेर जाणाऱ्या ८७, तर परजिल्ह्यातून साताऱ्यात येणाऱ्या चार शिक्षकांना होणार आहे. हे सर्व एससी, एसटी, ओबीसी प्रवर्गातील आहेत. सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या रोस्टरमध्ये खुल्या प्रवर्गातील शिक्षक अतिरिक्‍त असल्याने आंतरजिल्हा बदलीस इच्छुक असलेल्या खुल्या वर्गास वेट ॲण्ड वॉचची भूमिका घ्यावी लागेल.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃