👨🏻🏫‘आम्हाला वर्गावर जाऊ द्या!’*
*_शिक्षक संमेलनात शिक्षण विभागाच्या कारभारावर टीका_*
खास प्रतिनिधी, औरंगाबाद | Updated: April 16, 2017 12:35 AM
शिक्षक संमेलनात शिक्षण विभागाच्या कारभारावर टीका
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हा चांगला कार्यक्रम. त्याचे स्वागत करायला हवे. एका बाजूला या कार्यक्रमाची अंमलबजावणी नीटपणे सुरू असताना वेगवेगळे शासन निर्णय धडाधड आदळत आहे. वेगवेगळे प्रशिक्षण सुरू आहे. एक अहवाल तयार केला आणि वर्गावर जावे म्हटले की, दुसरा अहवाल मागवला जातो. त्यामुळे आम्हाला वर्गावर जाऊ द्या, अशी विनंती सरकारला करतो आहे, असे सांगत राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बालाजी मदन इंगळे यांनी लिहित्या माणसांसाठी सध्याचा काळ वाईट असल्याचे प्रतिपादन केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, शिक्षण विकास मंच व महात्मा गांधी मिशनच्यावतीने औरंगाबाद येथे शनिवारी आणि रविवारी दोन दिवसाचे शिक्षकांचे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
शिक्षक संमेलनाचे उद्घाटन अनोख्या पद्धतीने करण्यात आले. फळ्यावर खडूने शुभेच्छा संदेश लिहीत उपस्थितांनी संमेलनाचे उद्घाटन केले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड, स्वागताध्यक्ष आमदार विक्रम काळे, शिक्षण विकास मंचचे वसंत काळपांडे, बसंती रॉय, नंदकिशोर कागलीवाल, दासू वैद्य, नीलेश राऊत, दत्ता बाळसराफ यांची उपस्थिती होती. यावेळी साहित्य अकादमी पुरस्कार विजेते वीरा राठोड, रवी कोरडे व डॉ. आसाराम लोमटे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सकाळी ग्रंथदिंडीही उत्साहात काढण्यात आली. एमजीएमच्या परिसरात पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
कॉपीमुक्तीसह वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी कशा व कोणत्या उपाययोजना शिक्षकांनी कराव्यात, याचे विवेचन बालाजी इंगळे यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणामध्ये केले. त्याचबरोबर साहित्य क्षेत्रात लिहिणाऱ्यांची मानसिकता कशी बदलली जात आहे, यावरही त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, ‘एक अनामिक भीती, तुटलेपण, अस्वस्थता आणि असुरक्षितता वाटू लागली आहे. लोकशाहीने दिलेले हक्क, अधिकार, आपल्यासाठीच आहेत, असे वाटत नाही. निर्धोकपणे व्यक्त होता येत नाही. कायम टांगती तलवार डोक्यावर ठेवण्यात आली आहे. कुठे गेले आमचे स्वातंत्र्य? निर्वासितांच्या छळछावण्यांमध्ये आम्ही राहत नाही ना, असे वाटत आहे. मंत्रालयात एक शेतकरी भेटायला जातो, त्याला मारहाण होते. विनाअनुदानित शाळेतील शिक्षक मुख्यमंत्र्यांना भेटायला जातात, तेव्हा त्यांना मारहाण होते. स्वतंत्र मराठवाडय़ाच्या विरोधात असलो तरी अणेंचे गाडीवर दगडफेक करणे, हा कुठला मार्ग?’ या वेळी शिक्षक विकास मंचच्यावतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा वसंत काळपांडे यांनी केली. डॉ. शारदा बर्वे लिखित ‘अध्ययन अक्षमता’, डॉ. राजा दांडेकर यांचे ‘अशी घडलेली माणसे’, व श्रुती पानसे लिखित ‘बहुरंगी बुद्धिमत्ता’ या तीन पुस्तकांच्या लेखक व प्रकाशकांचा सत्कार यावेळी करण्यात आला. रोख पाच हजार रुपये, स्मृतिचिन्ह व गौरवपत्र’ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी बाबा भांड यांचे समयोचित भाषण झाले. विशेष सत्कारानंतर बोलताना डॉ. आसाराम लोमटे म्हणाले, जेव्हा समाज संभ्रमित असतो, समाजमन जेव्हा कुंठित असते, तेव्हा शिक्षकच लिहितो. पण हे लिखाण करताना केवळ मनोरंजन व्हावे, रम्य आणि आनंदी भाव लिहिण्यापेक्षा समाजमन हलावे, असे लिहिण्याची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले.
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃
🎯दहावीच्या चोरी झालेल्या उत्तरपत्रिका जप्त*
*दोन तरुणांना अटक; उर्वरित उत्तरपत्रिकांचा शोध सुरू*
खास प्रतिनिधी, मुंबई | Updated: April 16, 2017 1:03 AM
दहिसर पूर्वेकडील इस्त्रा महाविद्यालयातून चोरी झालेल्या दहावीच्या ३३० उत्तरपत्रिका शोधण्यात पोलिसांना यश आले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात या उत्तरपत्रिका सापडल्या असून, विद्यार्थ्यांनी त्यावर लिहिलेली उत्तरे जशास तशी आहेत. त्यामुळे या उत्तरपत्रिका तपासण्यात कोणतीही अडचण येणार नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, सुमारे दीडशे उत्तरपत्रिकांचा शोध दहिसर पोलीस घेत आहेत. या उत्तरपत्रिका चोरणाऱ्या दोन तरुणांना दहिसर पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत. विक्रम शर्मा (१९) आणि आकिब शेख(१९) अशी दोघांची नावे आहेत. दोघांनी याआधीही संधी साधून शाळेतील साहित्य व अन्य कागदपत्रे चोरून रद्दीत विकल्याची माहिती चौकशीतून समोर आली आहे.
शाळेच्याच शेजारी राहणाऱ्या दोघांनी रद्दीत विकून काही पैसे हाती पडतील, त्यातून काही करता येईल या विचाराने उत्तरपत्रिकांचे गठ्ठे चोरले. मात्र जेव्हा या उत्तरपत्रिका आहेत हे लक्षात आले तेव्हा त्यांनी हे गठ्ठे पुन्हा ठेवण्याचा तीनदा प्रयत्न केला. पण त्यांना ते शक्य झाले नाही. त्यामुळे घाबरून त्यांनी उत्तरपत्रिकांचे गठ्ठे परिसराला लागून असलेल्या नॅशनल पार्कच्या जंगलात (खदान नावाचा परिसर) फेकून दिले. या गुन्हय़ात विक्रम व आकिब यांना दोन अल्पवयीन मुलांनी मदत केल्याची माहिती समोर येते आहे. वरिष्ठ निरीक्षक सुभाष सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार या अल्पवयीन मुलांच्या सहभागाबाबत चौकशी व तपास सुरू आहे.
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃
♻स्कॉलरशिपचे पैसे खात्यात जमा होणार*
Maharashtra Times | Updated Apr 15, 2017
म. टा. प्रतिनिधी, पुणे
इंजिनीअरिंग, औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी आदींसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे पैसे थेट त्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यात जमा होणार आहेत. या विषयीचा आदेश राज्य सरकारने शनिवारी काढला. या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याची हजेरी पन्नास टक्के असणे अनिवार्य असणार आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांना प्रवेश घेता यावा यासाठी सरकारने विविध शिष्यवृत्ती योजना लागू केल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना आणि अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर यांच्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेचा समावेश आहे. या योजनांची रक्कम पात्र या पूर्वी कॉलेजांकडे सुपूर्द करण्यात येत असे. मात्र, उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने नियमांत बदल केल्याने आता ही रक्कम विद्यार्थ्यांच्या बॅँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. शैक्षणिक वर्ष २०१७- १८च्या शिष्यवृत्तीचे पैसे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होतील.
दरम्यान, या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी संबंधिताची पन्नास टक्के हजेरी असणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षाला प्रवेश घेतला आहे, अशा विद्यार्थ्यांना प्रथम सत्रासाठी हजेरीचे बंधन शिथिल करण्यात आले आहे. मात्र, नंतरच्या काळात विद्यार्थ्याची हजेरी बंधनकारक करण्यात आले आहे.
कॉलेजांना बायोमेट्रिकची सक्ती
आधारसंलग्न बँक खात्यामध्ये जमा होणारी शिष्यवृत्तीची रक्कम मिळविण्यासाठी सरकारने विद्यार्थ्यांची हजेरी पन्नास टक्के असणे बंधनकारक केले आहे. विद्यार्थ्यांच्या हजेरीची माहिती सरकारला प्राप्त होण्यासाठी सर्व कॉलेजांनी स्वखर्चाने बायोमेट्रिक प्रणाली बसवून घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत .
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃
👭आयआयटीमध्ये मुलींना आरक्षण*
By pudhari | Publish Date: Apr 16 2017
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये (आयआयटी) महिलांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. यावर उपाय म्हणून २०१८ पासून आयआयटीमध्ये विद्यार्थींना आरक्षण देण्यात येणार आहे. प्रत्यक्षात उपलब्ध जागांपेक्षा अधिकच्या जागा निर्माण करून हे आरक्षण देण्यात येईल. हे आरक्षण टप्प्याटप्प्यांनी वाढवण्यात येणार असून २०२६ पर्यंत हे आरक्षण २० टक्के इतके करण्यात येणार आहे.
आयआयटीच्या जॉईंट ॲडमिशन बोर्डने शनिवारी हा निर्णय घेतला आहे.
२०१४ मध्ये आयआयटीमध्ये प्रवेश घेणाऱ्या महिलांची संख्या ८.८ टक्के होती. ही संख्या २०१५ ला ९ टक्के तर २०१६ ला ८ टक्के इतकी घटली. सर्वसाधारण गटातून विद्यार्थीनींना प्रवेश मिळू शकला नाही तर ‘सुपरन्युमरी’ (प्रत्यक्ष मंजुर जागांपेक्षा अधिकच्या जागा) मध्ये विद्यार्थीनींना प्रवेश मिळू शकणार आहे.
या जागा अधिकच्या असल्याने कोणावर अन्याय होण्याचाही प्रश्न येणार नाही. याची सुरुवात २०१८ ला १४ टक्के आरक्षणाने होणार आहे. विद्यार्थींना जेईई (ॲडव्हान्स) ही परीक्षा उत्तीर्ण होता यावी यासाठी शाळेपासून प्रयत्न होणे आवश्यक असून त्यादृष्टीने ही प्रयत्न केले जाणार आहेत.
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃