twitter
rss

🎯सांगली जि.प.शाळांना उन्हाळी सुट्टी 1 मे पासून देण्याची मागणी*

By pudhari | Publish Date: Apr 28 2017

सांगली : प्रतिनिधी

शिक्षण संचालक यांच्या परिपत्रकानुसार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना दि. 1 मे पासून उन्हाळा सुट्टी द्यावी. सर्व शाळा दि. 15 जूनपासून सुरू व्हाव्यात, *अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे, सरचिटणीस अविनाश गुरव यांनी केली आहे.*

जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती तम्मनगोंडा रवी यांना निवेदन दिले आहे. शिक्षण समिती सभेत निर्णय होईल, असे आश्‍वासन रवी यांनी संघाच्या शिष्टमंडळाला दिले आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार पहिली ते पाचवीच्या वर्गाचे कामकाजाचे दिवस 200 व घड्याळी तासिका 800, तर सहावी ते आठवीच्या वर्गाचे कामकाजाचे दिवस 220 व घड्याळी तासिका 1 हजार इतके निश्‍चित केले आहे.

जिल्हा परिषदेकडील परिपत्रकाप्रमाणे एकूण शैक्षणिक वर्षातील कामकाजाचे दिवस 240 होतात. घड्याळी तासिका 1200 होतात. त्यामुळे ‘आरटीई’ नुसार विचार करता सांगली जिल्हा परिषदेकडील शाळांना दि. 1 मे पासून सुटी देणे शक्य आहे.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

🌸मायबोली मराठीच्या मुळावर नववी-दहावीचा नवा पॅटर्न!*

By pudhari | Publish Date: Apr 29 ,2017

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

नव्या शैक्षणिक वर्षात नववी व दहावीचे मराठी माध्यमाचे विद्यार्थीही प्रथम भाषा म्हणून मराठी नाकारू शकतील आणि इंग्रजीची प्रथम भाषा म्हणून निवड करू शकतील. इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनाही प्रथम भाषा म्हणून इंग्रजी किंवा मराठी निवडण्याचे स्वातंत्र्य असेल. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा हा नवा पॅटर्न आहे. या पॅटर्नचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे द्वितीय भाषा किंवा सामाजिक शास्त्रे टाळून नववी/दहावीचे विद्यार्थी व्यवसाय विषयाची निवड करू शकणार आहेत.

राज्याच्या अभ्यासक्रमांत त्रिभाषा सूत्री आहे. त्यानुसार मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठी ही प्रथम भाषा म्हणून आणि इंग्रजी ही द्वितीय भाषा म्हणून अभ्यासणे बंधनकारक होते. मात्र आता नव्या रचनेत इंग्रजी किंवा मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना प्रथम भाषा कोणती निवडायची इंग्रजी की मराठी याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. या दोन्ही भाषा विषयांत नापासांचे प्रमाण पाहता हे स्वातंत्र्य का देण्यात आले हे कळण्यास मार्ग नाही. शिवाय ऐन नववी किंवा दहावीच्या परीक्षेत इंग्रजी माध्यमाच्या मुलांना मराठीची सक्ती सोडाच पण मराठी माध्यमाच्या मुलांनाही मातृभाषा मराठी नाकारून इंग्रजी भाषा ही प्रथम भाषा म्हणून निवडण्याचे स्वातंत्र्य मंडळाने बहाल केले आहे.

इंग्रजीचे विद्यार्थीही नववी/दहावीला प्रथम भाषा म्हणून मराठीचा विचार करू शकतात, अशी मखलाशी या पॅटर्नमध्ये करण्यात आली असली तरी मुळात पालकांचा आणि ओघानेच विद्यार्थ्यांचा कल हा इंग्रजी शिकण्याकडे असतो. त्यामुळे इंग्रजी आणि मराठी माध्यमाचे विद्यार्थी प्रथम भाषा म्हणून मराठी नाकारू शकतात ही या पॅटर्नची सर्वात मोठी मेख आहे. म्हणजे मराठीच्या सक्तीचा आग्रह राहिला दूरच पण ती नाकारण्याचे स्वातंत्र्य या पॅटर्नने दिले. गतवर्षीचा दहावीचा निकाल पाहता प्रथम भाषा मराठी घेऊन 93.55% विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. त्या तुलनेत प्रथम भाषा इंग्रजी घेऊन 96.10% विद्यार्थी  उत्तीर्ण झाले आहेत. मराठीत नापास होण्याचे प्रमाण हे अधिक असल्याचे या टक्केवारीवरून दिसते. त्यामुळे मराठीच बाद करण्याचे स्वातंत्र्य या पॅटर्नने दिल्याने याचे मोठे गंभीर परिणाम मराठी भाषा शिक्षणावर संभवतात.

नववी, दहावी व्यावसायिक तरुणांना कौशल्याधारित बनविण्यासाठी नववीच्या विद्यार्थ्यांना यंदापासून व्यवसाय शिक्षणाचे धडे गिरविता येणार आहेत. भाषा किंवा सामाजिकशास्त्रे यांपैकी एका पारंपारिक विषयाऐवजी व्यवसाय विषयाची विद्यार्थी निवड करू शकणार आहेत. विशेष म्हणजे या व्यवसाय विषयाची 30 गुणांची लेखी तर 70 गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहे.

जागतिक, राष्ट्रीय व स्थानिक पातळीवरील बदलती अर्थिक परिस्थिती आणि त्यामुळे रोजगार बाजारात होत असलेले बदल, सतत निर्माण होणारी नव नवीन क्षेत्रे व रोजगाराच्या संधी यांचा शोध घेवून रोजगाराच्या संधीनुसार कुशल मनुष्यबळाचा पुरवठा होण्यासाठी आता शालेय अभ्यासक्रमांत मोठे बदल केले जात आहेत. शिक्षण व्यवसायाभिमुख व्हावे, या दृष्टीने राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानातर्ंगत  नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्कने आखून दिलेले तब्बल दहा व्यवसाय विषय नववी व दहावीसाठी सुरू करण्यात येणार आहे. 2017-18 या शैक्षणिक वर्षात नववीसाठी तर 2018-19 साठी दहावीसाठी या विषयांची अंमलबजावणी होणार आहे. हे विषय घेण्यास व्यवसाय शिक्षण संचालनालयाने ज्या शाळांना मान्यता दिली आहे. त्याच शाळांना हे विषय सुरू करता येणार आहे, असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यामिक शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे.

*विद्यार्थ्यांची पसंती तर शिक्षकांचा विरोध होणार*

व्यवसाय विषयाची 30 गुणांची लेखी तर 70 गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा असल्याने हे व्यावसायिक विषय विद्यार्थ्यांसाठी स्कोअरिंग देणारे ठरणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची पसंती ठरेल. मात्र द्वतीय किंवा तृतीय भाषा किंवा सामाजिकशास्त्रे यांपैकी एका विषयास हा पर्याय आता उभा असल्याने या विषयांचे विद्यार्थी कमी होतील आणि त्यामुळे शिक्षकांज्या जागा घटण्याच्या शंकाही उपस्थित होत आहे. त्यामुळे शिक्षकांतून विरोध होण्याची शक्यता आहे.

*नववी, दहावीसाठी सामान्य गणित विषय बंद*

नववी, दहावीच्या बीजगणित व भूमिती या विषयात नापास होण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांना दिलेला सामान्य गणिताचा पर्याय आता बंद होणार आहे. यंदापासून विद्यार्थ्यांना बीजगणित आणि भूमितीचाच अभ्यास करावा लागणार आहे. त्याचबरोबर अर्थशास्त्र विषयाचा समावेश गणित आणि भूगोल विषयात करण्यात येणार असून व्यक्तिमत्व विकास, कार्यानुभव, समाजसेवा व व्यवसाय मार्गदर्शन या विषयांऐवजी ‘स्व विकास व कलारसास्वाद’ या आशयाचे विषय असणार आहेत.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज 🍃🍂🍃

🌼दहावीच्या तासिका कमी होणार*

Updated Apr 28, 2017

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

SHARE
यंदा नववी आणि पुढील वर्षी दहावीच्या काही विषयांमध्ये बदल करण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आला आहे. त्या थेट परिणाम म्हणून दहावीच्या विद्यार्थ्यांच्या तासिका कमी होऊन आठवड्याला ५०वरून ४५ होणार आहेत. तासिका कमी होणार असल्या तरी शाळेच्या वेळेवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे.
गणिताची भीती वाटणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गेल्या काही वर्षांपासून राज्य शिक्षण मंडळातर्फे सामान्य
गणिताचा पर्याय सुरू करण्यात आला होता. मात्र, यंदा नववीसाठी आणि पुढील शैक्षणिक वर्षापासून दहावीसाठी हा सामान्य गणिताचा पर्याय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याशिवाय, ‘अर्थशास्त्र’ हा विषय आता स्वतंत्रपणे शिकवण्यात येणार नाही. यापूर्वी सामाजिक शास्त्र विषयांचे इतिहास-नागरिकशास्त्र, भूगोल आणि अर्थशास्त्र असे चार भाग करण्यात येत होते. मात्र, यंदापासून अर्थशास्त्र हा विषय भूगोल आणि गणित या विषयांत समाविष्ट करण्यात आल्याचे बोर्डाने जाहीर केले आहे. त्यानुसार दहावीच्या तासिकांमध्ये बदल होणार असून, तशा सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत. हे नवे वेळापत्रक शैक्षणिक वर्षे २०१७-१८साठीच असल्याचे बोर्डाचे अध्यक्ष गंगाधर मम्हाणे यांनी जाहीर केले आहे.

*नवे 'वेळा'पत्रक*

-दहावीसाठी आठवड्याला ४५ तासिका घेतल्या जाणार. यापूर्वी आठवड्याला ५० तासिकांचे वेळापत्रक असायचे.

-नव्या निर्णयानुसार दहावीच्या वर्गांची पहिली तासिका ४० मिन‌टिांची असेल. उर्वारित तासिका ३५ मिनिटांच्या असतील. यापूर्वी या तासिका ३० मिन‌टिांच्या होत्या.

-समाजसेवा गटातील विषयांसाठी शनिवारी शेवटची तासिका ठेवण्याचे निर्देश शाळांना
देण्यात आले आहेत.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूद🍃🍂🍃

🥀भाषा, कला, शारीरिक शिक्षणावर घाला!*

*पहिली ते आठवीच्या तासिकांमध्ये घट*

प्रतिनिधी, पुणे | Updated: April 29, 2017

_*पहिली ते आठवीच्या तासिकांमध्ये घट*_

भाषा, कला आणि शारीरिक शिक्षण हे व्यक्ती जडणघडणीसाठीचे शाळेतील सर्वाधिक महत्त्वाचे विषय. मात्र या विषयांतल्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासात कपात करण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे. पहिली ते आठवीसाठी  आठवडय़ाच्या तासिकांमध्ये घट झाली असून आता ५० ऐवजी ४५ तासिका असणार आहेत. त्यामुळे भाषा, कला, शारीरिक शिक्षण या विषयांचा अभ्यास कमी होणार आहे.
नव्या वर्षांचे शैक्षणिक वेळापत्रक, विषयानुसार तासिकांची आखणी कशी असावी याचे नियोजन विद्या प्राधिकरणाने जाहीर केले आहे. त्यानुसार आठवडय़ाच्या तासिकांमध्ये बदल करण्यात आला आहे. पूर्वी एक तासिका ३५ मिनिटांची याप्रमाणे आठवडय़ाला पन्नास तासिका घेणे बंधनकारक होते.  आता मात्र आठवडय़ाच्या तासिका ४५ असतील.

*बदल काय?*

पहिली आणि दुसरीसाठी मराठीच्या तासिका आता १८ ऐवजी १५ असतील. शारीरिक शिक्षण आणि कार्यानुभवासाठी ५ ऐवजी ४ तासिका असणार आहेत. तिसरी आणि चौथीला मराठीसाठी १३ ऐवजी १२ तासिका, शारीरिक शिक्षणासाठी ५ ऐवजी ३, कलेसाठी ४ ऐवजी ३ आणि कार्यानुभवासाठी ५ ऐवजी ४ तासिका करण्यात आल्या आहेत. पाचवी आणि सहावीसाठी प्रथम भाषा आणि तृतीय भाषेसाठी ७ ऐवजी ६ तासिका असणार आहेत. द्वितीय भाषेच्या तासिका वाढवण्यात आल्या असून त्या ४ ऐवजी ६ करण्यात आल्या आहेत. परिसर अभ्यासासाठी १३ ऐवजी ११ तासिका असणार आहेत. सहावीपासून पुढील वर्गासाठी शारीरिक शिक्षण, कला, कार्यानुभव या विषयांच्या तासिका मोठय़ा प्रमाणावर कमी करण्यात आल्या असून त्या ८ ऐवजी ३ करण्यात आल्या आहेत. सहावी ते आठवीसाठी प्रथम भाषा, तृतीय भाषा, सामाजिक शास्त्रे यांसाठी ७ ऐवजी ६ तासिका असतील, द्वितीय भाषेसाठी ४ ऐवजी ६ तासिका असतील. विज्ञानाच्या तासिकांमध्ये वाढ करण्यात आली असून त्या ६ ऐवजी ७ करण्यात आल्या आहेत. शारीरिक शिक्षण आणि कला विषयाच्या तासिका ४ ऐवजी २ आणि कार्यानुभवाच्या ४ ऐवजी ३ तासिका असतील.

*संमिश्र प्रतिक्रिया*

या बदलांबाबत शिक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. पूर्ण शंभर गुण असलेल्या विषयांना अधिक वेळ दिल्यामुळे या विषयांना न्याय मिळत असल्याची भावना शिक्षक व्यक्त करत आहेत. त्याच वेळी कला, शारीरिक शिक्षण या विषयांच्या प्राथमिक वर्गाच्या तासिका कमी केल्यामुळे नाराजीही व्यक्त होत आहे. ‘लहान मुले खेळ आणि कलेतून अधिक शिकतात. या तासिका त्यांना आवडतात. त्यातून ती व्यक्त व्हायला शिकतात अशा वेळी या तासिका कमी करणे दुर्दैवी आहे. त्याचबरोबर हिंदीसाठी तासिका वाढवण्याचेही कारण कळू शकत नाही,’ अशी प्रतिक्रिया शिक्षक भाऊसाहेब चासकर यांनी व्यक्त केली आहे.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃