📈उत्तरपत्रिका तपासणीवर भरारी पथकाचा वॉच...*
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या उत्तरपत्रिका चोरीला गेल्यानंतर बोर्डाच्या उत्तरपत्रिका तपासणी केंद्रांची सुरक्षा धोक्यात आल्याची गंभीर दखल बोर्डाने घेतली आहे. उत्तरपत्रिकांच्या सुरक्षेची खातरजमा करण्यासाठी मुंबईतील तपासणी केंद्रांवर भरारी पथकांद्वारे भेटी देण्यात येणार आहेत. याबाबतच्या सूचना शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
दहिसरमधील इस्रा शाळेतून दहावीच्या तब्बल ४१६ उत्तरपत्रिका चोरीला गेल्याच्या घटनेनंतर बोर्डाला बरीच टीका सहन करावी लागली होती. चोरीला गेलेल्या उत्तरपत्रिकांपैकी फक्त ३१६ उत्तरपत्रिका पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच युवा सेनेने एक व्हिडीओ प्रसिद्ध केला. त्यात एक प्राध्यापक हॉटेलात उत्तरपत्रिका तपासत असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे बोर्डाच्या उत्तरपत्रिकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यातच काही प्राध्यापक बोर्डाच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी घरी नेत असल्याची तक्रारही पुढे आली आहे. या पार्श्वभूमीवर, बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
बोर्डाकडून विभागवार भरारी पथके नेमण्यात आली असून उत्तरपत्रिकांची तपासणी व्यवस्थित होत आहे की नाही? उत्तरपत्रिका बाहेर नेण्यात आल्या आहेत का? यांसारख्या गोष्टींवर हे भरारी पथक विशेष लक्ष ठेवणार आहे, असे बोर्डाकडून सांगण्यात आले. शाळांकडून इतर कोणत्या गोष्टींबाबात हलगर्जी होत आहे का, यावरही भरारी पथक लक्ष देणार असून सध्या हे भरारी पथक पश्चिम उपनगरातील शाळांना भेटी देणार असल्याचे कळते. दहिसरमधील शाळेने सुरक्षेबाबत योग्य खबरदारी न घेतल्यानेच उत्तरपत्रिका चोरीचा प्रकार घडला आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी उत्तरपत्रिका ठेवलेल्या केंद्रांवरील सुरक्षा उपाययोजनांबाबत अधिकारी पथकाकडून पाहणी करण्यात येणार आहे, असे बोर्डाचे मुंबई विभागीय मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप म्हणाले.
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃
📔महाविद्यालयांना माहिती पुस्तक विकण्यास बंदी*
By pudhari | Publish Date: Apr 21 2017
पुणे ः प्रतिनिधी
विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन प्रवेशासाठी माहिती पुस्तक विकण्यास विद्यापीठ अनुदान आयोगाने बंदी घातली आहे. त्याचबरोबर महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची मूळ कागदपत्रे त्यांच्याकडे ठेवू नयेत, अशा सूचना आयोगाने दिल्या आहेत.
पाचशे रुपयांपासून महाविद्यालयांमध्ये माहिती पुस्तकांची विक्री करण्यात येते. ऑनलाइन प्रवेश बंधनकारक केल्यानंतरही काही महाविद्यालयांमध्ये गेल्या वर्षी माहिती पुस्तकांची विक्री करण्यात आली. अनेक महाविद्यालयांकडून ऑनलाइन अर्ज भरण्यासाठीचा पासवर्ड माहिती पुस्तकात नमूद करण्यात येत असल्यामुळे विद्यार्थ्यांना हे पुस्तक विकत घ्यावे लागते. मात्र आता माहिती पुस्तक विकत घेण्याची विद्यार्थ्यांवर सक्ती करता येऊ शकत नाही, असा नियम आयोगाने केला आहे. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांची मूळ कागदपत्रेही ठेवून घेण्यासाठी संस्थांना बंदी घालण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याच्या वेळी मूळ कागदपत्रे महाविद्यालयाला पाहता येतील. कागदपत्रांची स्वसाक्षांकीत प्रतच महाविद्यालयांना घेता येणार आहे. त्याचप्रमाणे प्रवेश प्रक्रिया संपण्यापूर्वी प्रवेश रद्द केल्यास शंभर टक्के शुल्क परत करणे बंधनकारक करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केल्यापासून पंधरा दिवसांत शुल्काची रक्कम परत करणे बंधनकारक राहणार आहे.
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃
📚अखेर ‘पुस्तकांच्या गावा’ला साहित्य रंगाचा साज!*
*२८ घरांमध्ये व्यवस्था; एक मेपासून सुरुवात*
विश्वास पवार, वाई | Updated: April 21, 2017 2:44 AM
*भिलार गावातील साडेतीन एकर जागेवर हा प्रकल्प उभारला जाणार आहे.*
महाबळेश्वरजवळ भिलारमध्ये वाचनसंस्कृतीचे नवे पर्व; २८ घरांमध्ये व्यवस्था; एक मेपासून सुरुवात
स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध असलेले महाबळेश्वरजवळचे भिलार हे देशातील पहिले ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून प्रायोगिक तत्त्वावर पर्यटकांच्या सेवेत महाराष्ट्र दिनापासून दाखल होत आहे. घरोघरी वाचनालय आणि गावाचे ग्रंथालयात रूपांतर करत त्यातून वाचनसंस्कृतीचे आणि आगळ्यावेगळ्या पर्यटनाचीदेखील मुहूर्तमेढ या माध्यमातून रोवली जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ आणि मराठी विश्वकोश मंडळ यांच्या सहकार्याने महाराष्ट्र शासनाने हा उपक्रम हाती घेतला आहे. या प्रकल्पासाठी परिसर निवडण्याची वेळ आली, तेव्हा ज्या भागात पर्यटक स्वत:हून मोठय़ा प्रमाणात येतात अशा ठिकाणांचा शोध सुरू झाला. यातूनच महाबळेश्वर-पाचगणीचे नाव पुढे आले आणि या परिसरातील गाव म्हणून मग भिलारची (ता. महाबळेश्वर) निवड करण्यात आली.
भिलार गावातील साडेतीन एकर जागेवर हा प्रकल्प उभारला जाणार आहे. यासाठी भिलारमधील अठ्ठावीस घरांची निवड करण्यात आली आहे. या प्रत्येक घरात वेगवेगळे साहित्य प्रकार, साहित्याचे प्रवाह दाखवणारी पुस्तके इथे येणाऱ्या पर्यटक-वाचकांना पाहायला, हाताळायला आणि वाचायला मिळतील. यामध्ये कथा, कादंबऱ्या, कविता, बाल साहित्य, वैचारिक, समीक्षा, ऐतिहासिक, चरित्र, संत साहित्य, ज्योतिष, मनोरंजन, नाटय़, दलित साहित्य याशिवाय वैज्ञानिक, गणितीय आणि उच्च शिक्षणाचे आयाम देणारी इतरही विविध प्रकारांतील माहितीपर पुस्तके असणार आहेत. इंग्रजीबरोबरच जगातील अन्य भाषांमधील तसेच हिंदी आणि अन्य भारतीय भाषाांमधील अनुवादित साहित्यही इथे ठेवले जाणार आहे. या प्रत्येक घरी सध्या ८०० पुस्तके ठेवली जाणार आहेत. या पुस्तकांसाठी आवश्यक कपाटे, वाचण्यासाठी टेबल-खुच्र्याची व्यवस्था असणार आहे. सोबतीला पुन्हा सामान्य पर्यटन, पर्यटकांसाठी आवश्यक निवास आणि न्याहरीची सुविधा इथे दिली जाणार आहे. या पर्यटनातही पुन्हा वाईच्या विश्वकोश संस्था, बा. सी. मर्ढेकर स्मारक आदी वाचनसंस्कृतीशी जवळ जाणारे उपक्रम ठेवले आहेत.
गेले काही दिवस या गावामध्येच या उपक्रमाची जोरदार तयारी सुरू आहे. सर्व गावात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे. घरांना विशिष्ट रंगरंगोटी करण्यात आली आहे. गावात आतापर्यंत तब्बल १६ हजार पुस्तके येऊन दाखल झाली आहेत. ही पुस्तके ठरलेल्या घरांमध्ये वाटण्याचे, तिथे ती लावण्याचे काम सुरू आहे.
*साहित्यविषयक उपक्रम*
भिलार गावी या पुस्तकांच्या जोडीनेच लेखक-साहित्यिक आणि वाचकांच्या भेटीगाठी-चर्चा, लेखन कार्यशाळा, सांस्कृतिक आणि साहित्यिक कार्यक्रम, विद्यार्थी- शिक्षक सहली, कवी संमेलने, साहित्य संमेलने असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. येथे विविध प्रकारच्या साहित्यविषयक दालनांबरोबरच शेती आणि स्पर्धा परीक्षा याची माहिती वाचकांना मिळणार आहे. जागतिक साहित्याची तत्परतेने माहिती मिळण्याबरोबरच त्या त्या परिस्थितीला अनुकूल पुस्तके, वेळोवेळी साहित्यात येत असलेले बदल, नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा मानस आहे. अत्याधुनिक दृक् -श्राव्य दालनात ई बुक्स, ऑडिओ बुक्स उपलब्ध असतील. साहित्यिकांच्या वाचकांशी संवादामुळे, सातत्यपूर्ण संवाद लेखन, वाचन, संपादन, मुद्रितशोधन याबाबत प्रशिक्षण, कार्यशाळा होतील. कायमस्वरूपी कविकट्टा, अभिवाचन कट्टा, तर गावातील शाळा, ग्रामपंचायत, समाजमंदिरातही वाचनकट्टे करण्याचा मानस आहे. यासाठी मराठी विश्वकोशाची मदतही घेतली जात आहे.
*वेल्समधील कल्पना*
वेल्स प्रांतात ‘हे ऑन वे’ या गावी ही अशी पुस्तकांच्या गावाची कल्पना आहे. याला अनुसरूनच भिलारमध्ये हा प्रकल्प राबवला जात आहे. वेल्समधील हे पुस्तकांचे गावही सुरुवातीला आठ-दहा पडक्या घरांत आणि जुन्या पुस्तकांतून आकाराला आले. आता याची कीर्ती सर्वत्र झाली आहे. भिलारमध्येही अशा पद्धतीचे गाव विकसित करून त्याचे एका पर्यटनस्थळात रूपांतर करण्याची योजना आहे.
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃