🎋शाळासिद्धीचे सुरू बाह्य मूल्यमापन*
Maharashtra Times | Updated Apr 10, 2017, 11:23 PM IST
म. टा.प्रतिनिधी, नागपूर
शाळासिद्धी उपक्रमांतर्गत राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांच्या बाह्य मूल्यमापनाला सोमवारपासून प्रारंभ झाला आहे. एकूण १८७८ शाळांची तपासणी केली जाणार असून त्याकरिता शिक्षण विभागाचे अधिकारी या शाळांमध्ये जाणार आहेत. १० एप्रिल ते २७ एप्रिल दरम्यान ही मूल्यमापन मोहीम राज्यभर चालणार आहे.
जिल्हापरिषदेच्या शाळा आणि तेथील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शाळा सिद्धी प्रकल्प शिक्षण विभागाने संपूर्ण राज्यभर राबविण्यास प्रारंभ केला आहे. शिक्षणाची साधने उपलब्ध करून देणे, शिक्षण आणि मूल्यमापनात सुधारणा करणे, विद्यार्थ्यांची प्रगती नियमित तपासणे, शालेय व्यवस्थापन उत्तम बनविणे, सर्वंकष शिक्षण, लोकसहभाग वाढविणे आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची काळजी घेणे इत्यादी विविध निकष या उपक्रमात निश्चित करण्यात आले आहेत. या उपक्रमांतर्गत विविध अभिनव उपक्रम राबविणाऱ्या शाळांची निवड करण्यात आली होती. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील निवडक शाळांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. मूल्यमापनाच्या पहिल्या टप्प्यात शाळांना स्वतःची माहिती भरावयाची होती. दिलेल्या निकषांवर शाळेने किती प्रगती केली आहे, हे शाळांना दिलेल्या प्रारूपातून सांगावयाचे होते.
शाळासिद्ध्री उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याला १० एप्रिलपासून प्रारंभ झाला आहे. यामध्ये, बाह्यनिरीक्षक जाऊन संबंधित शाळांची तपासणी करणार आहेत. राज्यातील १८३८ शाळांची अशी तपासणी होणार आहे. यासाठी, एका शाळेसाठी दोन तपासणी अधिकारी शिक्षण विभागाने नियुक्त केले आहे. हे अधिकारी आपला जिल्हा सोडून इतर जिल्ह्यात जाऊन तेथील शाळांचे मूल्यमापन करतील. एका शाळेच्या मूल्यमापनासाठी प्रत्येकी दोन दिवस निश्चित करण्यात आले आहेत. या कालावधीत दिलेल्या निकषांच्या आधारे तटस्थ मूल्यमापन केले जाणार आहे.
या उपक्रमांतर्गत नागपूर जिल्ह्यातील शाळांची निवड करण्यात आली आहे. शाळांचे मूल्यमापन केले जाणार आहे. या सर्व शाळांची माहिती शाळा सिद्धी पोर्टलवर या आधीच अपलोड करण्यात आली आहे. संपूर्ण देशात महाराष्ट्रातील सर्वाधिक शाळांना या उपक्रमांतर्गत स्वयंमूल्यमापन केले आहे. शाळांच्या तपासणीनंतर त्यांना अ, ब आणि क दर्जा बहाल केला जाणार आहे.
*🍃🍂 गुरुवर्य न्यूज 🍂🍃*
♿ ‘बोगस’ अपंगांवर होणार कारवाई*
Maharashtra Times | Updated Apr 10, 2017
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
राज्यात अनेक ठिकाणी अपंगत्वाची बनावट प्रमाणपत्रे घेण्यात आल्याचे आढळून आले असून, अशा बनावट प्रमाणपत्रधारकांच्या विरोधात कठोर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
राज्यस्तरीय कर्ण-बधिर संघटनेच्या मागण्यांसंदर्भात सोमवारी मंत्रालयात बैठक झाली. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुरेंद्रकुमार बागडे, अपंग कल्याण आयुक्त निखिल पाटील, संघटनेचे अध्यक्ष मनोज पटवारी उपस्थित होते.
कर्ण-बधिर व मूक-बधिर विद्यार्थ्यांना सर्वसाधारण शाळेमध्येही प्रवेश घेता यावा, यासाठी राज्य सरकारमार्फत अशा शाळांमध्येही पायाभूत सुविधा पुरविण्यात येतील. या शाळांमध्ये सांकेतिक भाषातज्ज्ञांची नेमणूक करण्यात यावी. अशा विद्यार्थ्यांच्या पहिली ते बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी शासकीय विद्यालय सुरू करण्यासाठी आराखडा सादर करावा, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
शालेय अभ्यासक्रमामध्ये चौथी भाषा म्हणून सांकेतिक भाषेचा समावेशाचा विचार करण्यात येईल, मूक-बधिरांना उच्च शिक्षणाची सोय उपलब्ध नसल्यामुळे शासकीय नोकरीमध्ये समावेशासाठी उच्च शिक्षणाची अट रद्द करण्याचा विचार करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
*🍃🍂 गुरुवर्य न्यूज 🍂🍃*
🎯 सातारा जिल्ह्यातील 528 शाळा दुर्गम घोषीत*
By pudhari | Publish Date: Apr 10 2017
सातारा : प्रतिनिधी
गावात वाहन जात नाही ते गाव दुर्गम व ज्या गावात वाहन जाते ते गाव सुगम या निकषाप्रमाणे जिल्ह्यातील गावे सोमवारी निश्चित करण्यात आली. त्यास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी अंतिम मान्यता दिली. त्यामुळे जिल्ह्यातील 2 हजार 716 शाळांपैकी 528 शाळांचा समावेश अवघड क्षेत्रात म्हणजे दुर्गम तर 2 हजार 188 शाळांचा समावेश सर्वसाधारण क्षेत्रात म्हणजेच सुगम असा करण्यात आला आहे.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांच्या बदल्यांसाठी अध्यादेश काढला असून सुगम व दुर्गम या दोन वर्गातच बदल्या कराव्यात असेही या आदेशात म्हटले आहे.सुगममध्ये 10 वर्षे काम केलेल्यांना दुर्गममध्ये तर दुर्गममध्ये 3 वर्षे काम केलेल्यांना सुगममध्ये बदलीसाठी पात्र धरले जाणार आहे. त्यानुसार सुगम व दुर्गम गावे निवडण्याचे अधिकार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार्यांना दिले होते. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी आपल्याकडे अंतिम अधिकार ठरवून प्राथमिक स्तरावर सुगम व दुर्गम ठिकाणे ठरवण्याचे अधिकार पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकार्यांना दिले होते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच पंचायत समिती स्तरावर अवघड व सर्वसाधारण क्षेत्र निश्चित करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली होती. पंचायत समितीमार्फत हे अहवाल जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे दाखल करण्यात आले होते. सर्व तालुक्यांचा एकत्रीत प्रस्ताव तयार करून अंतिम मंजुरीसाठी मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे सोमवारी पाठवण्यात आला आल्याची माहिती शिक्षणाधिकारी पुनिता गुरव यांनी दिली. डॉ. राजेश देशमुख यांनी अहवालाची पडताळणी करून तालुक्यातील सर्वसाधारण क्षेत्र व अवघड क्षेत्रावर स्वाक्षरी करून अंतिम शिक्कामोर्तब केले.
*🍃🍂 गुरुवर्य न्यूज 🍂🍃*
🎋 डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभ्यासपूर्ण आदरांजली*
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी व्हीजेटीआय येथील विद्यार्थी एकत्र आले आहेत. डॉ. आंबेडकर ज्याप्रमाणे १८-१८ तास अभ्यास करत त्याचप्रमाणे व्हीजेटीआयच्या २६५ विद्यार्थ्यांनी १८ तास अभ्यास करण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार त्यांनी रविवारी सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत १८ तास अभ्यास करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अनोख्या पद्धतीने आदरांजली वाहिली.
१४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६व्या जयंती विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. व्हीजेटीआयचे डॉ. व्ही. बी. निकम यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला असून दोन दिवसांपूर्वी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसमोर ही संकल्पना मांडण्यात आली. यानंतर तब्बल २६५ विद्यार्थ्यांनी या उपक्रमासाठी नोंदणी केली. ६२ विद्यार्थिनीही या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या. ‘एन्जॉय द गेन इन पेन ऑफ १८ अवर्स स्टडी’ अशी शिकवण उपक्रमातून द्यायवयाची आहे.
या उपक्रमाला व्हीजेटीआयचे संचालक ओ. जी. काकडे, प्रा. अभय बांगुले यांनीही मार्गदर्शन केले. त्यानुसार, निकम यांच्यासह त्यांचे सहकारी प्रा. सुषमा वाघ आणि प्रा. राजेश पाटील यांनी हा उपक्रम पूर्णात्वास आणला आहे. या १८ तासांमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यास कोणता करायचा याचे बंधन नाही. काही विद्यार्थी डॉ. आंबेडकरांची पुस्तके, चरित्र वाचत आहेत. तर काही विद्यार्थी दलित साहित्याचा अभ्यास करत आहेत. इंजिनीअरिंगचाही काही विद्यार्थी अभ्यास करत आहेत. १८ तासांमध्ये ३ वेळा नाश्ता आणि दोन वेळा जेवण देण्यात आले.
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃