♻ दहावी नापासांसाठी आता कौशल्य सेतू!*
By pudhari | Publish Date: Apr 2 2017
कोल्हापूर : प्रवीण मस्के
दहावीत तीन विषय गेलेल्या विद्यार्थ्यांनी घाबरण्याचे कारण नाही. नापास विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे कौशल्य रोजगाराचे प्रशिक्षण देण्यासाठी शिक्षण विभागाने महत्त्वाकांक्षी ‘कौशल्य सेतू अभियान’ हाती घेतला आहे. यामुळे आता नापास विद्यार्थीही हिमतीने समाजात स्वत:च्या पायावर उभे राहू शकणार आहेत.
दहावीच्या निकालानंतर विद्यार्थी गैरमार्गाचा वापर करून चुकीचे पाऊल उचलतात. याचा कुटुंबासह समाजव्यवस्थेवर परिणाम होतो. विद्यार्थ्यांमधील न्यूनगंड कमी करून त्यांच्यात आत्मविश्वास निर्मितीसाठी शिक्षण विभाग, तंत्रशिक्षण विभाग व राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने कौशल्य सेतू अभियान राबविण्यात येत आहे.
केद्रीय कौशल्य विकास मंत्रालयांतर्गत मेक इन इंडिया, स्कील इंडिया या संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी पंतप्रधान कौशल्य योजना राबविण्यात येत आहे. देशातील विद्यार्थ्यांना कौशल्याची संधी देणारा चाकोरीबाहेरील हा प्रकल्प ‘कौशल्य सेतू’ सुरू झाला आहे. दहावीत तीनपेक्षा अधिक विषयांत नापास झालेल्यांना या उपक्रमात सहभागी होता येईल. ‘एसएससी’ बोर्डाच्या अॅप्लिकेशनवर शाळेतील नापास विद्यार्थ्यांची नोंद करण्यात येते. आयटीआय समकक्ष हा कोर्स आहे. कोर्ससाठी विद्यार्थ्यांची 80 टक्के हजेरी आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची यादी कौशल्य सेतू विभागाकडे जाते. यात पात्र विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे.
मोबाईल हार्डवेअर रिपेअरिंग, टू व्हिलर, थ्री व्हिलर मॅकेनिक, सॉफ्टवेअर, हँड अॅब्रॉयडरी, रिटेल सेल्स, आदी कोर्सचा समावेश आहे. कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी अर्ज करता येईल. निकालानंतर ऑगस्ट महिन्यात कोर्स सुरु होणार असल्याचे समजते.
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃
🎋 प्राध्यापकांचे बहिष्कारास्त्र मागे*
Maharashtra Times | Updated Apr 2, 2017.
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
बारावीची परीक्षा सुरू असतानाच प्राध्यापकांच्या काही संघटनांनी पेपर तपासणीवरील बहिष्कार मागे घेऊन पेपर तपासणीसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होत, त्यानंतरही सुरू असणारे नॉन ग्राण्टेडच्या ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांचे बहिष्कार आंदोलन अखेरीला शमले आहे.
ज्युनिअर कॉलेजेसमध्ये प्राध्यापक म्हणून सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. दरवर्षी बारावीच्या पेपरचे निमित्त साधून या मागण्या चव्हाट्यावर येतात. मात्र, केवळ आश्वासनांचे फुगे हवेत सोडत पुढे ‘जैसे थे’ च राहतात, या स्थितीमुळे प्राध्यापकांची चांगलीच नाराजी सरकारवर आहे.
यंदाही या प्राध्यापकांद्वारे आंदोलन छेडण्यात आले होते. दिवसाकाठी अवघी एकच प्रश्नपत्रिका तपासून ‘स्लो’ पध्दतीने हे आंदोलन सुरू झाले होते. मात्र शिक्षणमंत्री व शिक्षणसचिवांनी मध्यस्थी केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले होते. पण महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय शाळा कृती समिती याला अपवाद ठरली होती. अखेर मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विना अनुदानित प्राध्यापकांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे सांगत बहिष्कार आंदोलन मागे घेत असल्याची भूमिका घटनेचे अध्यक्ष प्रा. टी. एम. नाईक यांनी मांडली.
समितीच्या सदस्यांनी या मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानात हे बेमुदत आंदोलन छेडले होते. संघटनेच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी दोन दिवसांपूर्वी चर्चा झाली. यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
*म्हणून आंदोलन मागे*
महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय शाळा कृती समितीच्या वतीने मुंबईच्या आझाद मैदानावर छेडण्यात आलेल्या उपोषण आंदोलनास राज्यभरातून सुमारे २२ हजारावर शिक्षकांचा पाठिंबा दर्शविल्याचा दावा समितीच्या वतीने करण्यात आला होता. समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या मोठ्या पाठिंब्याच्या बळावर हे आंदोलन चिघळले असते तर विद्यार्थ्यांच्या निकालावर याचा परिणाम झाला असता. विद्यार्थ्यांचे अहित होऊ नये व मुख्यमंत्र्यांनीही विनाअनुदानित प्राध्यापकांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली.
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃
🌿 ‘जेईई मेन’ला दहा लाख विद्यार्थी*
Maharashtra Times | Updated Apr 3, 2017.
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) अभियांत्रिकी अभ्यासक्रम प्रवेशासाठी आवश्यक असलेली जॉइंट एन्ट्रन्स एक्सामिनेशन मेन (जेईई) परीक्षा रविवारी देशभर पार पडली. देशभरात १ हजार ७८१ केंद्रांवर झालेल्या या परीक्षेला देशभरातून सुमारे १० लाख २० हजार विद्यार्थी बसले होते.
गणिताची प्रश्नपत्रिका लांबलचक असल्याने अनेक विद्यार्थ्यांना वेळ कमी पडला. मात्र, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राच्या प्रश्नपत्रिका तुलनेने सोप्या होत्या. बीई/बीटेक आणि अन्य अभियांत्रिकी शाखांसाठी असलेल्या या परीक्षेमध्ये सीबीएसईच्या ११ वी आणि १२ वीच्या अभ्यासक्रमाचा समावेश होता.
या परीक्षेला भौतिकशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेत अभ्यासक्रमाबाहेरील एक प्रश्न आला होता तर एका प्रश्नाला दोन बरोबर उत्तरांचे पर्याय देण्यात आले होते. गेल्या दोन ते तीन वर्षांच्या तुलनेत यंदा भौतिकशास्त्राची प्रश्नपत्रिका अधिक कठीण होती. त्या तुलनेत रसायनशास्त्र आणि गणिताची प्रश्नपत्रिका सोपी होती. सामान्य श्रेणीतील कटऑफ साधरणपणे ९७-९८ इतका असणार आहे. अंदाजे अडीच लाख विद्यार्थी जेईई अॅडव्हान्ससाठी पात्र होण्याची अपेक्षा आहे.
या परीक्षेत वरच्या श्रेणीत येणाऱ्या विद्यार्थ्यांना ३४५ ते ३५० गुण मिळू शकतील, असे राव आयआयटी अकॅडमीचे व्यवस्थापकीय संचालक विनय कुमार यांनी सूचित केले. गणिताची प्रश्नपत्रिका सोपी असली तरी मोठी असल्याने ते प्रश्न सोडवायला वेळ लागल्याची माहिती ‘आयआयटीएन्स पेस’चे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण त्यागी यांनी दिली.
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃